श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
सप्तमः स्कन्धः
चतुर्विंशोऽध्यायः


हरिश्चन्द्रचिन्तावर्णनम्

शौनक उवाच -
ततः किमकरोद्‌राजा चाण्दालस्य गृहे गतः ।
तद्‌ ब्रूहि सूतवर्य त्वं पृच्छतः सत्वरं हि मे ॥ १ ॥
सूत उवाच -
विश्वामित्रे गते विप्रे श्वपचो हृष्टमानसः ।
विश्वामित्राय तद्‌ द्रव्यं दत्त्वा बद्ध्वा नरेश्वरम् ॥ २ ॥
असत्यो यास्यसीत्युक्त्वा दण्डेनाताडयत्तदा ।
दण्डप्रहारसम्भ्रान्तमतीव व्याकुलेन्द्रियम् ॥ ३ ॥
इष्टबन्धुवियोगार्तमानीय निजपक्कणे ।
निगडे स्थापयित्वा तं स्वयं सुष्वाप विज्वरः ॥ ४ ॥
निगडस्थस्ततो राजा वसंश्चाण्डालपक्कणे ।
अन्नपाने परित्यज्य सदा वै तदशोचयत् ॥ ५ ॥
तन्वी दीनमुखी दृष्ट्वा बालं दीनमुखं पुरः ।
मां स्मरन्त्यसुखाविष्टा मोक्षयिष्यति नौ नृपः ॥ ६ ॥
उपात्तवित्तो विप्राय दत्त्वा वित्तं प्रतिश्रुतम् ।
रोदमानं सुतं वीक्ष्य मां च सम्बोधयिष्यति ॥ ७ ॥
तातपार्श्वं व्रजामीति रुदन्तं बालकं पुनः ।
तात तातेति भाषन्तं तथा सम्बोधयिष्यति ॥ ८ ॥
न सा मां मृगशावाक्षी वेत्ति चाण्डालतां गतम् ।
राज्यनाशः सुहृत्त्यागो भार्यातनयविक्रयः ॥ ९ ॥
ततश्चाण्डालता चेयमहो दुःखपरम्परा ।
एवं स निवसन्नित्यं स्मरंश्च दयितां सुतम् ॥ १० ॥
निनाय दिवसान् राजा चतुरो विधिपीडितः ।
अथाह्नि पञ्चमे तेन निगडान्मोचितो नृपः ॥ ११ ॥
चाण्डालेनानुशिष्टश्च मृतचैलापहारणे ।
क्रुद्धेन परुषैर्वाक्यैर्निर्भत्स्य च पुनः पुनः ॥ १२ ॥
काश्याश्च दक्षिणे भागे श्मशानं विद्यते महत् ।
तद्‌रक्षस्व यथान्यायं न त्याज्यं तत्त्वया क्वचित् ॥ १३ ॥
इमं च जर्जरं दण्डं गृहीत्वा याहि मा चिरम् ।
वीरबाहोरयं दण्ड इति घोषस्व सर्वतः ॥ १४ ॥
सूत उवाच -
कस्मिंश्चिदथ काले तु मृतचैलापहारकः ।
हरिश्चन्द्रोऽभवद्‌राजा श्मशाने दद्‌वशानुगः ॥ १५ ॥
चाण्डालेनानुशिष्टस्तु मृतचैलापहारिणा ।
राजा तेन समादिष्टो जगाम शवमन्दिरम् ॥ १६ ॥
पुर्यास्तु दक्षिणे देशे विद्यमानं भयानकम् ।
शवमाल्यसमाकीर्णं दुर्गन्धं बहुधूमकम् ॥ १७ ॥
श्मशानं घोरसन्नादं शिवाशतसमाकुलम् ।
गृद्ध्रगोमायुसंकीर्णं श्ववृन्दपरिवारितम् ॥ १८ ॥
अस्थिसङ्घातसङ्कीर्णं महादुर्गन्धसंकुलम् ।
अर्धदग्धशवास्यानि विकसद्दन्तपंक्तिभिः ॥ १९ ॥
हसन्तीवाग्निमध्यस्थकायस्यैवं व्यवस्थितिः ।
नानामृतसुहृन्नादं महाकोलाहलाकुलम् ॥ २० ॥
हा पुत्र मित्र हा बन्धो भ्रातर्वत्स प्रियाद्य मे ।
हाप्यते भागिनेयार्ह हा मातुल पितामह ॥ २१ ॥
मातामह पितः पौत्र क्व गतोऽस्येहि बान्धव ।
इति शब्दैः समाकीर्णं भैरवैः सर्वदेहिनाम् ॥ २२ ॥
ज्वलन्मांसवसामेदच्छूमिति ध्वनिसङ्कुलम् ।
अग्नेश्चटचटाशब्दो भैरवो यत्र जायते ॥ २३ ॥
कल्पान्तसदृशाकारं श्मशानं तत्सुदारुणम् ।
स राजा तत्र सम्प्राप्तो दुःखादेवमशोचत ॥ २४ ॥
हा भृत्या मन्त्रिणो यूयं क्व तद्‍राज्यं कुलोचितम् ।
हा प्रिय पुत्र मे बाल मां त्यक्त्वा मन्दभाग्यकम् ॥ २५ ॥
ब्राह्मणस्य च कोपेन गता यूयं क्व दूरतः ।
विना धर्मं मनुष्याणां जायते न शुभं क्वचित् ॥ २६ ॥
यत्‍नतो धारयेत्तस्मात्पुरुषो धर्ममेव हि ।
इत्येवं चिन्तयंस्तत्र चाण्डालोक्तं पुनः पुनः ॥ २७ ॥
मलेन दिग्धसर्वाङ्गः शवानां दर्शने व्रजन् ।
लकुटाकारकल्पश्च धावंश्चापि ततस्ततः ॥ २८ ॥
अस्मिञ्छव इदं मौल्यं शतं प्राप्स्यामि चाग्रतः ।
इदं मम इदं राज्ञ इदं चाण्डालकस्य च ॥ २९ ॥
इत्येवं चिन्तयन् राजा व्यवस्थां दुस्तरां गतः ।
जीर्णैकपटसुग्रन्थिकृतकन्थापरिग्रहः ॥ ३० ॥
चिताभस्मरजोलिप्तमुखबाहूदराङ्‌घ्रिकः ।
नानामेदोवसामज्जालिप्तपाण्यङ्गुलिः श्वसन् ॥ ३१ ॥
नानाशवौदनकृतक्षुन्निवृत्तिपरायणः ।
तदीयमाल्यसंश्लेषकृतमस्तकमण्डलः ॥ ३२ ॥
न रात्रौ न दिवा शेते हाहेति प्रवदन्मुहुः ।
एवं द्वादश मासास्तु नीता वर्षशतोपमाः ॥ ३३ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
सप्तमस्कन्धे हरिश्चन्द्रचिन्तावर्णनं नाम चतुर्विंशोऽध्यायः ॥ २४ ॥


राजा हरिश्‍चंद्राची करुण स्थिती -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

विश्‍वामित्र द्रव्य घेऊन निघून गेल्यावर राजा हरिश्‍चंद्राला अत्यंत वाईट अवस्थेत दिवस घालवावे लागले. चांडाळाने विश्‍वामित्राला विपुल द्रव्य देऊन राजाला विकत घेतले व तो अतिशय आनंदाने राजाला कुत्सितपणे म्हणाला, "हे पुरुषाधिपते, खरोखरच तू महा लबाड आहेस. न जाणो तू एखादे वेळी पळूनही जाशील. !"

असे म्हणून त्या क्रूर चांडाळाने राजाला प्रचंड दोरांनी करकचून बांधले व त्याला काठीने मारण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे तो जोरजोराने राजाला ताडन करून ओढून नेऊ लागला. कधीही प्रहार सहन करण्याची सवय नसलेल्या राजाला ते प्रहार सहन झाले नाहीत. राजाची इंद्रिये अत्यंत व्याकुळ झाली. राजा फारच घाबरून गेला. त्यातून त्याला झालेला प्रिय पत्‍नीचा वियोग हा तर फारच कष्टप्रद होता. शिवाय पुत्राच्या ताटातुटीमुळे अगोदरच त्याचे हृदय विदीर्ण झाले होते. अशारीतीने दुःखाने अत्यंत व्याकुळ झालेल्या राजाला जोरजोराने ढकलत, ओढत चांडाळाने आपल्या घरी आणले. नंतर त्याने राजाच्या पायात लोखंडी बेडया व साखळदंड बांधले आणि अशा विकल अवस्थेत राजाचा त्याने पूर्ण बंदोबस्त केला. इतका छळ केल्यावर तो क्रूरकर्मा चांडाळ शांतपणे निद्रेच्या आधीन होऊन सुखाने झोपला.

राजाला चांडाळाच्याच वाडयात बंदिस्त राहून वास्तव्य करावे लागले. चांडाळगृहात राहण्याची वेळ आल्यामुळे राजा निराहार राहू आगला. अन्नपाणी वर्ज्य करून त्याने अत्यंत शोक केला. प्रिय पत्‍नी व लाडका पुत्र यांच्या स्मरणाने राजा वारंवार मूक रोदन करू लागला.

तो आपल्याच मनाशी म्हणे, "अरेरे, ती माझी प्रिय भार्या, ती कोमलांगी, ती सुंदरी आपल्या त्या लाडक्या व परिस्थितीने अनाथ झालेल्या बालकाला समोर घेऊन माझ्या आठवणींनी अत्यंत शोकसागरात बुडाली असेल आणि माझ्या सामर्थ्याच्या आशेवरच ती आपले जीवन जगवीत असेल. तिला वाटेल, आपला विक्रय केल्यावर राजा त्या ब्राह्मणाच्या ऋणातून मुक्त झाला आहे. तो लवकरच आपली सोडवणूक करील. पुन्हा आपल्या राजाच्यासह रहाता येईल. याबद्दल ती निःशंक होऊन काळ काढीत असेल.

आपला प्रिय पुत्र नित्य आकोश करीत असेल. आपल्या त्या पुत्राला सारखे रडत असलेले पाहून ती त्याचे सांत्वन करण्याचा प्रयत्‍न करीत असेल. तो पुत्र म्हणत असेल, "मला बाबांबरोबर जायचे आहे. मला जाऊ द्या." असे म्हणून तो अधिकच रडत असेल व सारखा "अहो बाबा, अहो बाबा या ना" अशा मला हाका मारीत असेल. तो मला हाक मारीत असता माझी प्रियतमा, त्या बालकाची माता त्याला म्हणत असेल, "अरे, लवकरच तुझे बाबा आपली सुटका करतील." पण त्या दीनवदन मृगनयनेला मी येथे चांडाळाचे दास्यत्व करीत आहे याची किंचितही जाणीव नसेल. खरोखर मी अधमाकडे सेवक म्हणून राहिलो आहे हे तिला कसे समजणार ! म्हणून ती मजविषयी आशा धरून जगत असेल.

अरेरे ! काय ही दुष्टगती ! केवढा हा अनर्थ आज माझ्यावर कोसळला आहे. माझ्य़ा राज्याचा नाश तर झालाच, पण माझ्यावर निरपेक्ष बुद्धीने जे प्रेम करीत होते, जे फलापेक्षा न धरता मजवर उपकार करण्यास सदैव तत्पर होते, त्या सर्वांचा आज त्याग करण्याची मजवर पाळी आली. हरहर ! प्रत्यक्ष प्राणाहूनही जिची जपणूक करावी अशा पत्‍नीचा व ज्याला नित्य हृदयांत स्थान द्यावे अशा पुत्राचा मी आज विक्रय की हो केला ! इतके करूनही मला उत्तम स्थिती न प्राप्त होता अधमत्व होऊन मी चांडाळकर्म स्वीकारले. काय हे दुःख ! या एकामागून एक येणार्‍या दुःखाने माझी काय ही स्थिती करून टाकली आहे !"

अशाप्रकारे दुर्दैवाचे प्रहार सहन करण्याची वेळ येऊन ठेपलेल्या व दुःखाने गांजलेल्या त्या राजाने चांडाळाच्या बंदिखान्यात राहून वारंवार स्त्रीचे व पुत्राचे स्मरण केले. ह्या आठवणींनी व्याकुळ होऊन रोदन करीत राजाने चार दिवस कसेबसे काढले. नंतर पाचवा दिवस उगवताच त्या दुष्ट चांडाळाने राजाला आपल्या बंदिखान्यातून मोकळे केले आणि त्याला तो काम सांगू लागला. स्मशानातील प्रेतांची वस्त्रे आणण्याचे काम त्याने राजावर सोपविले.

चांडाळाने अत्यंत निर्दय मनाने व कठोर शब्दांनी राजाची पुन्हा पुन्हा निर्भर्त्सना करून अत्यंत अवहेलना केली. दीन झालेल्या राजाला कामगिरी समजावून सांगून तो म्हणाला, "हे पुरुषा, ह्या नगराच्या दक्षिण भागात एक विस्तीर्ण असे स्मशान आहे. तू नित्य तेथे राहून उत्तम रीतीने त्या स्मशानाचे प्रामाणिकपणे रक्षण कर. तू ते स्मशान सोडून कधीही दूर जाऊ नकोस. हा महाभयंकर व दणकट सोटा घेऊन तू तेथे सत्वर जा आणि आता क्षणाचाही विलंब न करता तेथे जाऊन तू मोठयाने ओरड आणि म्हण, "अहो, हा वीरबाहूचा देह आहे." तू असे ओरडल्यास म्हणजे तू कोण आहेस हे लोकांना कळेल."

अशाप्रकारे चांडाळाने राजाला काम सांगताच राजा स्मशानात जाऊन राहू लागला. चांडाळाच्या आज्ञेप्रमाणे तो प्रेतावरील वस्त्रे जमवीत असे. प्रेतावरील वस्त्रे जमवून स्वतःची उपजीविका करणार्‍या चांडाळाचा राजा दास झाला आणि त्याची प्रत्येक आज्ञा पालन करीत काही काळ तो स्मशानात राहिला.

ते स्मशान फारच विस्तीर्ण व भयंकर होते. नगराच्या दक्षिण भागातील ते अवाढव्य स्मशान नित्य प्रेतांवरील फुलांनी व हारांनी झाकून गेलेले असे. प्रेतांना देण्यात येणार्‍या अग्नीमुळे तेथे अत्यंत दुर्गंध सुटलेला होता. सामान्य माणसाला तेथे क्षणभरही थांबणे अशक्य होते. त्यातच पुष्कळशा भालूंनी ते गजबजले होते. भालूंच्या भयंकर ओरडण्यामुळे त्या स्मशानाची भयानकता अधिकच वाढली होती. तेथील दृश्य अत्यंत किळसवाणे होते. घारीच्या व गिधाडांच्या थव्यांनी ते स्मशान जणू काय झाकूनच गेले होते. तसेच असंख्य कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी त्या स्मशानांत घुसत होत्या व इतस्ततः वावरत होत्या. त्यामुळे जराही भूमी मोकळी दिसत नव्हती.

तेथील अर्धवट जळलेल्या दुर्गंधीयुक्त हाडामासांचे प्रचंड खच तेथे पडले होते. तेथील घारी, गिधाडे व कुत्री या प्राण्यांनी प्रेतांची खाल्लेली अर्धवट तोंडे भयानक दिसत होती. त्यांच्या मुखातले दात उघडे पडल्यामुळे जणू ते आपणाकडे पाहून विकट हसत आहेत असाच भास होत होता.

कित्येक प्रेते अग्नीत जळत होती. पण त्यांचीही अवस्था अशीच भयानक झाली होती. शिवाय प्रेतांचे नातेवाईक, आप्त-मित्र आक्रोश करीत होते.

"अरे माझ्या बाळा, का रे सोडून गेलास !"

"हे माझ्या प्रिय मित्रा, आता तू भेटशील का ?"

"अरे दादा -"

"माझे प्रिय पतिराज, का हो असे चाललात ?"

"हे वत्सा, काय रे दुर्दैव हे !"

"हे प्रियतमे, आता मी कोठे जाऊ !"

"अरे भाच्या, अहो मामा, अहो आजोबा, अहो मला येथे टाकून तुम्ही का हो निघून जाता ?"

"अहो बाबा"

"अरे माझ्या लाडक्या प्रिय नातवा !"

"कुठे गेलास रे माझ्या आवडत्या बंधो !"

अशाप्रकारे त्या मृतांच्या आप्त-इष्टांचे महाकरुण रोदन त्या स्मशानात अक्षय्य चालू होते. त्या करुण विलापांनी सारे अवकाश दुमदुमून गेले होते. तो दुःख देणारा दुःसह आक्रोश ऐकून कोणीही पुरुष भीतीने खचून जाईल.

त्या स्मशानात मांस, वसा व मेद हीच सर्व जळत असल्याने जिकडून तिकडून "सूं,सूं" असाच एक प्रकारचा भीषण आवाज सदैव होत होता. खरोखर ते स्मशान कल्पांताप्रमाणे अति भयानक भासत होते.

अशा भयावह जागी राहून तेथील स्मशानात नित्य कामगिरी करीत असता राजा सदैव विलाप करीत असे. तो म्हणे, "अहो, माझ्या प्रामाणिक सेवकहो, अहो एकनिष्ठ मंत्रीजनहो, खरोखर माझ्या कुलाला शोभून दिसणार्‍या माझ्या राज्याचे काय झाले हो ? आता माझे राज्य राहिले आहे का ? हे प्रियतम स्त्रिये, अरे माझ्या कोमल बालका ब्राह्मणाच्या कोपामुळे विपरीत स्थिती प्राप्त झाल्यावर तुम्ही मला टाकून कोठे बरे गेलात ? अरे तुम्ही किती दुःखात काळ काढीत आहात ?"

अशाप्रकारे राजा अतिशय दुःख करीत असे, रडत असे. पण बर्‍याच वेळाने तो पूर्ण शांत होई. तो अत्यंत गंभीरपणे विचार करी, अहो ! आपला धर्म रक्षण करण्यातच मानवाचे पूर्णपणे कल्याण आहे. म्हणून पुरुषाने कोणतीही परिस्थिती प्राप्त झाली तरी धर्माचे आचरण कधीही सोडू नये. कोणतेही हाल सहन करून त्याने आपला धर्म पालन करावा.

असा हा बुद्धीस पटेल असा विचार करून तो राजा चांडाळाच्या आज्ञेप्रमाणे पुनः प्रेतावरील वस्त्रे आणण्याचे आपले काम करू लागे. पुनः तो त्या स्मशानात सर्वत्र हिंडू लागे.

हरिश्‍चंद्राचे सर्वांग मलिन झाले होते. त्याच्या शरीराला दुर्गंधी येऊ लागली होती. तरी आज्ञापालन करण्यासाठी तो प्रेते शोधीत स्मशानात सर्वत्र संचार करीत होता. एखाद्या स्थाणूप्रमाणे तेथे उपस्थित राहून तो सदैव स्मशानात प्रेते दिसतील तसे त्या अनुरोधाने धावतपळत होता.

राजाच्या मनात वारंवार विचार येत, ह्या प्रेताचे मूल्य इतके आहे, मी यांचे आगाऊ शंभर सुवर्ण घेईन, हे माझे आहे, ह्यावर फक्त राजाचाच हक्क आहे. पण याचा मालक मात्र चांडाळ आहे. अशाप्रकारे नित्य काहीतरी विचार मनात येऊन तो राजा अत्यंत करुण व दीन अवस्थेप्रत येऊन पोहोचला. त्याला हे सर्व असह्य झाले होते. त्याच्या अंगावर वस्त्राला अनेक गाठी मारून तयार केलेली एक गोधडी होती. हातात तो भयंकर दंडुका होता.

त्याचे मुख, हात, पोट, पाऊले हे सर्व अवयव संपूर्ण देहच चितेतील राखेने माखून गेले होते. मेद, वसा, मज्जा इत्यादी दुर्गंधयुक्त किळसवाण्या रसाचे त्याच्या हातावर लेप बसून बोटावर पुटे चढली होती आणि अत्यंत दमल्यामुळे तो विकलांग होऊन सारखे दीर्घ उसासे सोडीत होता.

प्रेतांना स्मशानात नित्य पिंडदाने चालू असत. राजा त्या पिंडाच्या भातावरच आपली उपजीविका करीत होता. प्रेतांच्या शरीरावरील पुष्पमाला तो मस्तकावर धारण करीत असे.

नित्य तो कामातच व्यग्र असे. दुःखाने व चिंतेमुळे दिवसा व रात्रीही त्याला झोप येत नसे. पण मुखाने मात्र, "हाय, हाय, हाय रे दैवा" असे शब्द सारखे उच्चारीत असे. याप्रमाणे राजाने तेथे बारा महिने काढले, पण जणू काय ते शंभर वर्षाप्रमाणेच त्याला भासले.



अध्याय चोविसावा समाप्त

GO TOP