[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
येणेप्रमाणे चांडाळाची आज्ञा ऐकून राजाने हातात तरवार घेतली. खाली मान घालून तो राणीजवळ आला आणि क्षमायाचनेच्या स्वरात तो त्या स्त्रीला म्हणाला, "हे अबले, आता माझा नाईलाज आहे, तू सत्वर या पापी पुरुषापुढे खाली मान घालून बस. माझ्यात जर हे शस्त्र चालविण्याचे सामर्थ्य प्राप्त झालेच तर मी तुझा निश्चित शिरच्छेद करीन."
असे करुण स्वरात म्हणून स्वामीची आज्ञा म्हणून त्याने हातातले शस्त्र उचलले आणि तो स्त्रीवधास सिद्ध झाला. वास्तविक पति-पत्नी असूनही त्यांनी एकमेकांना ओळखले नाही. कारण दुःखाच्या भाराखाली खचून गेल्यामुळे ती स्त्री मृत्यूचीच याचना करीत होती. मृत्यूचे तिला भय वाटत नव्हते. ती स्त्री म्हणाली, "हे चांडाळा, माझे म्हणणे ऐकून घेण्यास तू सिद्ध असशील तर कृपावंत होऊन थोडेसे माझे ऐकून घे. तुला जर माझी दया येत असेल तर सांगते,
हे कृपाळु पुरुषा, येथून जवळच नगराच्या बाहेर माझा एकुलता एक पुत्र मरून पडलेला आहे. त्याचे दहन करावे अशी माझी इच्छा आहे. त्याला येथे आणून तुझ्यासमक्ष मी त्याला जाळीन. तोपर्यंत तू धीर करून माझ्यावर दया कर. मी त्याचे दहन करून मुक्त झाले म्हणजे हे चांडाळा, तू अगदी सत्वर माझा वध कर. माझा वध केल्याने तू माझ्यावर उपकारच करशील."
त्या स्त्रीचे म्हणणे राजाने मान्य केले व तिला बालकाला घेऊन येण्यास सांगितले. त्या चांडाळाची परवानगी घेऊन ती राजपत्नी अत्यंत दुःखाने विलाप करीत व करुण आक्रोश करीत सर्पदंशाने मृत्यु पावलेल्या आपल्या बालकाकडे आली. ती पुन्हा बालकाला पाहून म्हणाली, "अरे, पुत्रा, हे वत्सा, हे बाळा, आता तुला कोठे रे पाहू ?" असे सारखे म्हणत तिने त्या बालकाला खांद्यावर घेतले आणि ती वेगाने स्मशानभूमीकडे येण्यास निघाली, तिचा अवतार यावेळी भीतीदायक वाटत होता. ती कृश झालेली होती. तिचे कपडे फिक्कट व मलिन झाले होते. तिच्या केसात धुराळा उडाला होता. तोंडही धुळीने माखले होते. तिचा चेहराही धुळीने माखला होता. अशा अवस्थेत ती आपल्या पुत्राला खांद्यावर घेऊन स्मशानात आली. त्या स्मशानभूमीवर बालकाला ठेवून ती स्वतःही त्याच्या शेजारी भूमीवर बसली व रडू लागली.
तिचा करुणालाप ऐकून राजा तिच्याजवळ गेला आणि तेथे जाऊन त्याने एकदम त्या लहान मुलाच्या शवावरील वस्त्र ओढले. पण अजूनपर्यंत त्या पति-पत्नींनी एकमेकांना ओळखले नव्हते. बराच काळ एकमेकांपासून दुरावल्यामुळे आणि सदैव चिंतेमुळे राणीच्या शरीरयष्टीत बराच फरक पडला होता. राजा तर प्रति चांडाळच दिसत होता. त्यामुळे परस्परांना ओळखू येणे अशक्य झाले होते.
राजाच्या मस्तकावरील सुंदर केसांच्या सांप्रत जटा झाल्या होत्या. त्याची दाढी वाढली होती व सुकलेल्या वृक्षाच्या सालीप्रमाणे देह करपून गेला होता. राजाच्या त्या शोचनीय अवस्थेमुळे राणीने त्याला किंचितही ओळखले नाही.
पण शवावरील वस्त्रे ओढताच त्याला सर्पदंशामुळे मृत झालेले ते बालक राजलक्षणांनी युक्त दिसले. त्यामुळे राजा पुन्हा चिंताक्रांत होऊन विचार करु लागला.
"अहो, खरोखरच या सुंदर पुत्राचे मुख पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे मनोहर आहे. त्याची नासिका उंच आणि तरतरीत आहे. मुखावर कोठेही व्रणाची खूण नाही. जरा वर आलेले ते दोन्ही गाल स्वच्छ आरशाप्रमाणे शोभून दिसत आहेत. त्याचे केस बारीक अग्राचे असून सरळ, लांबसडक व कोवळे आहेत. त्यात किंचित कुरळेपणामुळे सौंदर्यात भर पडली आहे.
त्याचे कमलपत्राप्रमाणे विशाल नेत्र आकर्षक आहेत. पिकलेल्या तोंडल्याप्रमाणे ओठ लालचुटुक दिसत आहेत. वक्षस्थल भरदार व विस्तृत आहे. बांधा उंच असून तो बालक अजानुबाहू आहे. उन्नत असे पुष्ट खांदे त्या पुत्राला शोभून दिसत आहेत. त्याची पावले रुंद व लाल आहेत. ह्या बालकाची अंगुली व बोटे लहान आहेत. पाय कमलाच्या देठासारखे सुंदर आहेत. तो पुत्र मनाने ताठ आहे. त्याची नाभी खोल आहे. हा बालक अत्यंत धीरगंभीर दिसत आहे.
अरे, काय दुःख हे. फारच वाईट घटना ही. हा बालक कोणातरी श्रेष्ठ राजघराण्यातच जन्मलेला असावा यात मात्र शंका नाही. अरेरे, काय हे दैव दुष्ट आहे ! एवढ्याशा बालवयात याला काळाने या जगातून एकाकी घेऊन जावे ना ! अरेरे, किती निष्ठूरपणे दैवाने घाला घातला हा ! हरहर ! निर्दय काळाने आपले कालपाश याच्याभोवती घट्ट बांधून याला ओढून नेले. खरोखरच ही घटना अत्यंत वाईट आहे."
त्या स्त्रीच्या मांडीवर पडलेल्या त्या सुकुमार पुत्राला पाहून राजालाही अतीव दुःख झाले आणि त्या पुत्राबरोबरीचाच आपलाही पुत्र आहे असे म्हणून राजाला रोहिताचे स्मरण झाले. पुत्राच्या वियोगाच्या स्मरणाने तोही "हरहर" म्हणून अश्रू ढाळू लागला. आक्रोश करीत तो स्वतःशी म्हणाला, "अरेरे, माझाही पुत्र आज कोठे असेल बरे ? त्याची सांप्रत काय स्थिती झाली असेल ? तो कोणत्या संकटात सापडला असेल ? हे परमेश्वरा माझा पुत्र आता काय करीत असेल हे फक्त देवा तुलाच माहीत असणार ! कालाची गति विलक्षण आहे खरी."
पुन्हा त्या राजाने त्या राणीच्या मांडीवरील मृत बालकाकडे पाहिले आणि स्त्रीचे दुःख अवलोकन करून तो मनातल्या मनात विचार करू लागला.
"हिचे दुःख पाहून मलाही दुःखाचा आवेग सहन होत नाही. पण हिच्या दुःखामुळे मी दुःखी होऊन उपयोग काय आहे ? प्रत्यक्ष यमधर्माने या पुत्राला आपल्याकडे ओढून घेऊन सांप्रत स्वतःच्या आधीन करून घेतले आहे. त्याला इतर कोण कसा इलाज करणार ?
राजा मनात उलट सुलट विचार करीत स्तब्ध राहिला. त्या स्त्रीचे दुःख पाहून तो काहीच बोलला नाही.
राणीला पुन्हा आपल्या परिस्थितीची जाणीव होताच ती पुन्हा मोठमोठयाने आक्रोश करू लागली. तिला आपल्या गतस्मृतींनी जास्तच रडू कोसळले. ती म्हणाली, "अरे माझ्या लाडक्या, कोणी रे आपले असे वाईट व्हावे म्हणून मनात आणले आहे ! ज्याच्या मनात आपल्याला हे दुःख भोगायला लावण्याची इच्छा असेल तो तर सांप्रत कोठेही दिसत नाही. आपल्याला अशा संकटात टाकण्याचा त्याने का बरे विचार केला ?
अहो प्राणनाथ, अहो राजराजेश्वरा, मला या अतिशय दारुण अशा असह्य दुःखाच्या खाईत लोटून हे नाथ, आपण स्वतः कोठे बरे गेलात ? यावेळी आपण कोठे आहात ? अहो, आपणाला हे दुःख कसे बरे सहन होत आहे ? आपण असे स्वस्थ का बरे राहिलात ? अरेरे, हे विधात्या, त्या पराक्रमी अयोध्यापति हरिश्चंद्राला राज्याचा त्याग करायला लावून, मित्रांपासून दूर नेऊन, तू त्याला आपली प्रिय पत्नी आणि लाडका पुत्र यांची विक्री की रे करावयास लावलीस ! का बरे तू असे केलेस ? पुण्य़ात्म्यावर इतका रुष्ट होण्याचे तुझे कारण तरी काय ? का इतका दुष्टावा धरलास ?"
राणीचे हे विरहदग्ध शब्द ऐकताच राजा चमकला. त्याने त्या स्त्रीकडे अगदी निरखून पाहिले आणि पुन्हा एकदा पुत्राला जवळून पाहिले. त्याने आपल्या पत्नीला व मृत पुत्राला पूर्ण ओळखले आणि त्याच्यावर जणू वज्राघातच झाला.
"अरेरे, काय पाहतो आहोत आपण हे ! ही तर माझी प्रिय भार्या, आणि हा ! हाय रे हाय, हा माझाच पुत्र की हो !"
असा विचार मनात येताच राजाला स्वतःचा शोक असह्य झाला आणि तो मूर्च्छित होऊन धरणीवर कोसळला. त्या चांडाळाला मूर्च्छित झाल्याचे पाहून आश्चर्याने राणीने त्याला निरखून पाहिले. तिनेही त्याला ओळखले. आपल्या प्राणनाथाला अशा अवस्थेत पहाताच तीही धाडकन निःसत्त्व होऊन भूमीवर कोसळली. दोघांनाही जीवाचे भान राहिले नाही.
थोडया वेळाने दोघेही सावध झाली आणि ती राजाराणी उभयता शोकसागरात बुडून गेली. दुःख असह्य होऊन त्यांनी खूप आक्रोश केला.
राजा म्हणाला, "अरे प्राणप्रिय वत्सा, तुझे हे कुरळ्या केसांनी युक्त असलेले सुकुमार मुख आज अशा दीन स्थितीत पाहून माझे हृदय शतशः विदीर्ण होत आहे. खरोखरच हे हृदय फुटून का बरे जात नाही ! अरे पुत्रा, तू गेल्यामुळे मला आता "बाबा, बाबा," असे कोण बरे हाक मारील ? आपल्या मधुर वाणीने बाबा म्हणत आपण होऊन माझ्याकडे कोण बरे धावत येईल ? आता मी तरी प्रेमभराने दुडदुडत आलेल्या पुत्राला आलिंगन देऊन "हे माझ्या वत्सा," असे कसे बरे म्हणू शकेन ? माझे हे वस्त्र, मांडी कोणाच्या गुडघ्यावरील पिंगट धुळीने डाग पडून मलीन होईल ?
अरे माझ्या अंतःकरणाला समाधान मिळवून देणार्या पुत्रा ! मी अजूनही तुझे मुख अवलोकन करून पूर्ण सुखाने तृप्त झालो नाही. बाळा, माझे सगळे आप्त स्वकीय आणि सर्व राजैश्वर्य यांसह विस्तृत राज्य सांप्रत नामशेष झाले, पण त्याचेही मला दुःख कधीच वाटले नाही. कारण तू माझा लाडका पुत्र माझ्यासमोर होतास. म्हणून मी त्यातच माझा आनंद मानीत होतो. पण हे पुत्रा, त्या महासर्पाने तुला दंश करून तुझे हे मुखकमल काळवंडून टाकले आहे, तुझे हे निर्जीव मुख पाहून जणू काय मी शोकरूपी घोर विषच आज प्राशन करीत आहे."
असे म्हणून राजाने पुत्राला पुन्हा दृढ आलिंगन दिले. दुःख असह्य होऊन तो मूर्च्छित होऊन पुन्हा भूमीवर कोसळला. अशाप्रकारे राजा भूमीवर पडल्याचे अवलोकन करून ती महाराणी शैव्या मनातच विचार करू लागली, "अहो, हाच तो महापराक्रमी पुरुषश्रेष्ठ होय ! केवळ ह्यांच्या आवाजावरूनच मी यांना ओळखू शकते. खरोखरच पंडित व विद्वान यांच्या मनाला चंद्रासारखे आल्हाददायक सुख उत्पन्न करून देणारा हा महाराज राजराजेश्वर हरिश्चंद्र आहे. ती पहा, याची नासिका तिळाच्या पुष्पासारखी मोहक आणि उंच आहे. त्याचे दातही सुंदर कळ्यासारखे दिसत आहेत. अहो, पण असे जर असेल, हा साक्षात राजा हरिश्चंद्र असेल तर तो सत्यवचनी महात्मा या अवस्थेत स्मशानात का बरे वास्तव्य करीत आहे ?"
राणीला पुत्रशोकाचा जरासा विसर पडून ती त्या भूमीवर पडलेल्या महात्म्या पुरुषाबद्दल विचार करू लागली व सारखी एकटक आपल्या पतीकडे पाहू लागली. बर्याच कालानंतर आपल्या पतीचे दर्शन झाल्यामुळे तिला अत्यंत आनंद झाला होता. पण येथे या अवस्थेत पतीला पाहून तिला विस्मयाचा धक्काच बसला होता. पतीसंबंधी विचार येऊन व सांप्रतच्या परिस्थितीची जाणीव होऊन ती राणी अत्यंत व्याकुळ झाली. पतीच्या या अवस्थेचे अवलोकन करून पुत्राच्या मृत्यूमुळे तिला अपार दुःख झाले व त्या वेदना असह्य होऊन तिला मूर्च्छा आली. ती वेगाने धरणीवर पडली.
थोडया वेळाने ती सावध होऊ लागली. सावध झाल्यावर ती ओक्साबोक्शी रडू लागली. ती रडत रडत म्हणाली, "अरे दुष्टा, अमर्याद निष्करुणा, कठोर दैवा ! ज्या राजाला देवांनीही मान्य केले अशा पुरुषश्रेष्ठाला तू चांडाळ की रे केलेस ? खरोखर हे दैवा, तुझा धिक्कार असो ! अरे, तू क्रूरकर्मा आहेस. राजाच्या विस्तृत राज्याचा तू नाश केलासच, पण आप्तेष्टही दूर ठेवलेस. सत्यवचनासाठी स्त्री व पुत्राचा विक्रय करण्यास तू त्याला भाग पाडलेस व एवढे करूनही अजूनही तुझे समाधान झाले नाही. म्हणजे तुला आता काय म्हणावे ! अरे, त्या पुण्यमय राजाचे इतके हाल करून अखेर तू त्याला चांडाळ केलेस ना ?
महाराज, आज आपले छत्र कोठे गेले हो ! हे राजराजेश्वरा, ते आपले सुवर्णमय रत्नजडित सिंहासन काय झाले ? आपल्या पाठीमागे आज चामरे व पंखे का बरे दिसत नाहीत ? काय हा दुष्ट दैवाचा फेरा ! अहो, हा राजाधिराज जेव्हा राजवाडयातून बाहेर पडे, तेव्हा त्याचे सर्व मांडलिक राजे आपल्या शरीरावरील वस्त्रांनी या राजाच्या पुढचे भूमीतल निर्मल करीत असत. तो हा महापराक्रमी राजेंद्र येथे या मानवी मस्तकांच्या कवटयांचा खच पडलेल्या स्मशानात वास्तव्य करीत आहे.
केवढे भयानक स्मशान हे ! या स्मशानात प्रेतसंस्कारासाठी आणलेली लहान लहान मडकी दिसत आहेत. प्रेतांवरील वस्त्रांनी ही भूमी व्याप्त झाली आहे. मृतांच्या गळयातील सुकलेल्या माळांचा या ठिकाणी ढीग पडलेला आहे. त्या फुलमाळांना व त्यांच्या सूत्रांना मृतांच्या अंगावरील व मस्तकावरील केस चिकटून राहिलेले आहेत. त्यामुळे ते जास्तच भेसूर दिसत आहे. मृताच्या चरबीने ती भिजून गेली असून सूर्यकिरणांनी ती भूमीवरच सुकून गेल्यामुळे ही भूमी कठीण झाली आहे. राख, कोळसे, अर्धवट जाळलेली प्रेते, हाडे, मज्जा यांचे ढीगच्याढीग या भूमीवर सर्वत्र पसरलेले आहेत. गिधाडे व कोल्ही यांच्या आक्रोशाने व पुष्ट कावळयांच्या ओरडण्यामुळे हे स्मशान अत्यंत भयावह दिसत आहे. तसेच तो काळसर रंगाचा चितेतून निघणारा धूर आकाशात सगळीकडे भरून गेल्यामुळे ते अंतरिक्ष काळेनिळे होऊन गेले आहे. आपल्याला प्रेते खावयास मिळावीत म्हणून राक्षस या भूमीवर संचार करीत आहेत. अशा भयानक, अमंगल स्मशानात हा दुःखाने व्याप्त झालेला अयोध्याधीश कसा बरे राहत आहे ? किती दुर्धर प्रसंग हा !"
अशाप्रकारे विलाप केल्यावर त्या क्षत्रियकन्येने राजाच्या गळयाला मिठी घातली आणि अतिशय शोकव्याप्त होऊन ती पुन्हा आक्रोश करू लागली. रडतच ती म्हणू लागली, "महाराज, हे आपणाला दिसत आहे ते स्वप्न तर नव्हे ना ? का हा प्रकार खराच घडत आहे ? प्राणनाथ, खरे काय ते आपणच मला सांगा.
हे धर्मज्ञा, जर हे सर्व सत्यच घडत असेल तर धर्माप्रमाणे वर्तन करणार्यांना धर्म सहाय्य करत नाही अर्थात धर्म योग्य तसे आपलेपणाने वागवीत नाही असे म्हणणे रास्त नाही का ?
राजेंद्रा, आपण सद्धर्मशील राहूनही राज्यापासून भ्रष्ट झालात. यावरून एकच निष्कर्ष निघतो की, ब्राह्मण, देव, ऋषिमुनी यांचे पूजन करणे तसेच सत्यधर्माचे रक्षण करणे हे सर्व व्यर्थ व कालापव्यय करण्यासारखे आहे. खरोखरी जर यात धर्म नाही तर मग सत्य तरी कसे असणार ! खरेपणा व सत्यांश हे भाव यांच्याच सांप्रत स्थितीवरून आढळत नाहीत."
राणीचे भाषण ऐकून राजाचा गळा दाटून आला. त्याने वारंवार दीर्घ उसासे सोडले. अत्यंत गहिवरल्या स्वराने त्याने आपली साद्यंत हकीकत राणीला सांगून आपण चांडाळ कसे झालो हेही समजावून सांगितले. त्या सुकुमारीने ते एकाग्रतेने श्रवण केले. ते ऐकून तिला अनावर दुःख झाले व ती पुष्कळ वेळपर्यंत रडत बसली. तिने दीर्घ असे उष्ण श्वास सोडले.
नंतर त्या राणीने आपली सर्व माहिती सांगितली. आपल्या पुत्राला मृत्यू कसा प्राप्त झाला हे वर्तमान तिने राजाला सांगितले. हे ऐकून त्या अवस्थेत मृत्यू पावलेल्या पुत्राकडे पाहून राजाला पुन्हा मूर्च्छा आली. तो धरणीवर पडला.
राणीने आपल्या मृत पुत्राला जवळ घेऊन वारंवार जिभेने चाटले आणि ती शैव्या गद्गद्लेल्या स्वराने हरिश्चंद्राला म्हणाली, "हे राजाधिराज, हे प्राणनाथ, आता आपण सत्वर माझा शिरच्छेद करावा. कारण आपल्या धन्याची आज्ञा पाळणे हे आपले धर्मकर्तव्य आहे. स्वामीद्रोह होऊन आपल्याकडून असत्य भाषण घडले असा आपला दुर्लौकिक होऊ देऊ नका.
हे राजेंद्रा, आजवर आपणाला असत्याचा स्पर्शही झाला नाही. तो यावेळी होऊ देऊ नका. स्वामीद्रोह हे महापातक आहे. तेव्हा आपण आपल्या स्वामीची आज्ञा पूर्णत्वास न्या."
राणीचे हे धर्मशील भाषण ऐकताच राजा पुन्हा दुःखाने निःसत्त्व होऊन धरेवर पडला. पण लवकरच तो सावध झाला आणि करुणालाप करू लागला. राजा हृदय व्याकुळ होऊन म्हणाला, "हे सुकोमलांगी, हे प्रिये, इतके कठोर आणि अत्यंत निष्ठुर शब्द तुझ्याच्याने बोलवले कसे ? अगे, जे कृत्य शब्दांनी उच्चारणेही अशक्य ते कृत्य प्रत्यक्ष माझ्या हातून कसे होणार ?"
राणी म्हणाली, "हे प्रभो, मी पूर्वी गौरीची उपासना केली आहे. तसेच देव व ब्राह्मण यांचेही मनापासून पूजन केले आहे. त्यावरून पुढील जन्मीही आपणच माझे पती व्हाल यात संशय नाही."
राणीचे हे शब्द ऐकून राजा धरणीवर कोसळला आणि दुःखाने तो आपल्या मृत पुत्राचे चुंबन घेऊ लागला. राजा म्हणाला, "हे प्रियतमे, आता मला हे सर्व कष्ट असह्य झाले आहेत. माझ्याच्याने हे आता सहन होत नाही. पण करणार काय ? मी आता स्वतःच्या स्वाधीन राहिलो नाही. हा देह चांडाळाच्या आधीन झाला आहे. खरोखरच मी किती कमनशीबी आहे ते तू पहा. खरोखरच आज चांडाळाच्या आज्ञेवाचून जरी मी आत्मनाशासाठी अग्नीत प्रवेश करीन तरी महापातकी ठरून पुढील जन्मीही मला चांडाळाचेच दास्यत्व करावे लागेल. त्या घोर नरकप्राप्तीमुळे मला फारच दुःख होईल. रौरवात व महारौरवात मला खितपत पडावे लागेल आणि ते फारच त्रासाचे आहे. म्हणून एवढया प्रचंड दुःखात होरपळत असलेल्या मला सांप्रत स्वेच्छेने मृत्यु येईल तर कितीतरी उत्तम होईल ! पण आता असह्य दुःखामुळे मी प्राणत्याग करणार !
खरोखर पुत्राच्या मृत्यूच्या दुःखाप्रमाणे दुसरे दुःख त्रैलोक्यातही नाही. असिपत्रवन नावाच्या नरकातही पुत्रनाशासारखे दुःख नाही. मग या वैतरिणीत ते कसे बरे असेल ?
हे प्रियतमे, पुत्राच्या दहनासाठी पेटलेल्या अग्नीत मी सत्वर प्रवेश करणार आहे. म्हणून हे सत्त्वशील सुंदर, याबद्दल तू मला क्षमा कर ! कमलनयने, माझे हे शब्द ऐकून तुझ्या अंतःकरणाला अपार यातना होतील. त्यामुळे तू काहीतरी बोलण्यास प्रवृत्त होशील. पण हे प्रिये, यावर तू आता एकही शब्द न बोलता स्वस्थ रहा.
हे प्रिये, माझी आज्ञा होताच तू सत्वर त्या ब्राह्मणाच्या घरी गमन कर. मी आजवर दिलेल्या दानापासून, हवनापासून अगर गुरुंना संतुष्ट करून जे पुण्य पदरात जोडले असेल त्या पुण्यबलाने तुझा व माझा परलोकी या पुत्रासह संगम होईल. कारण आपला तिघांचा संगम आपल्या इच्छेप्रमाणे आता इहलोकी कसा बरे होणार !
हे सुंदरी, एकांतप्रसंगी मी तुला कधी कधी पुष्कळ वेळा थटटेने बोललो होतो. पण त्याबद्दल आता मला दुःख होत आहे. म्हणून त्या बोलण्याबद्दल आता तू मला क्षमा कर. कारण मी आता परलोकी गमन करणार आहे. हे स्त्रिये, मी ज्या ब्राह्मणाला तुला विकले आहे त्याचा, मी राजपत्नी आहे, असे समजून गर्वोन्मत्त होऊन तू कधीही अवमान करू नकोस. कारण हे कल्याणी, प्रत्येक सेवकाने आपल्या धन्याला देव समजून त्याची निष्ठेने सेवा करावी आणि धन्याला नेहमी संतुष्ट ठेवावे असे धर्मशास्त्रवचन आहे."
राजाचे बोलणे ऐकून राणीला जणू वेडच लागण्याची पाळी आली. तीही अत्यंत निर्धाराने म्हणाली, "हे प्राणनाथा, हे राजश्रेष्ठा, मीसुद्धा आता याच अग्नीत उडी घेणार आहे. महाराज, मलादेखील हा दुःखभार कसा बरे सहन होईल ? म्हणून या असह्य होणार्या दुःखापेक्षा मी आपल्याबरोबरच अग्नीप्रवेश करणार आहे. हे नाथ, पतीबरोबर गमन करणे हे पुण्यकारक असते. म्हणून सांप्रत आपल्यासमवेत मी या अग्नीत प्रवेश करणे हेच श्रेयस्कर आहे. अन्यथा मला दुसरी गती नाही. हे मान्यवर राजेश्वरा, स्वर्ग असो वा नरक असो, आपल्याबरोबर मी मिळेल ते भोगण्यास तयार आहे, मी आता तुमच्यावाचून कुठेही जाणार नाही !"
आपल्या प्रियपत्नीचे भाषण ऐकून राजा म्हणाला, "हे पतिव्रते, तुझे म्हणणेही योग्य आहे. तसेच कर."