श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
सप्तमः स्कन्धः
एकविंशोऽध्यायः


हरिश्चन्द्रोपाख्यानवर्णनम्

एतस्मिन्नन्तरे प्राप्तो विश्वामित्रो महातपाः ।
अन्तकेन समः क्रुद्धो धनं स्वं याचितुं हृदा ॥ १ ॥
तमालोक्य हरिश्चन्द्रः पपात भुवि मूर्च्छितः ।
स वारिणा तमभ्युक्ष्य राजानमिदमब्रवीत् ॥ २ ॥
उत्तिष्ठोत्तिष्ठ राजेन्द्र स्वां ददस्वेष्टदक्षिणाम् ।
ऋणं धारयतां दुःखमहन्यहनि वर्धते ॥ ३ ॥
आप्यायमानः स तदा हिमशीतेन वारिणा ।
अवाप्य चेतनां राजा विश्वामित्रमवेक्ष्य च ॥ ४ ॥
पुनर्मोहं समापेदे ह्यथ क्रोधं ययौ मुनिः
समाश्वास्य च राजानं वाक्यमाह द्विजोत्तमः ॥ ५ ॥
विश्वामित्र उवाच -
दीयतां दक्षिणा सा मे यदि धैर्यमवेक्षसे ।
सत्येनार्कः प्रतपति सत्ये तिष्ठति मेदिनी ॥ ६ ॥
सत्ये प्रोक्तः परो धर्मः स्वर्गः सत्ये प्रतिष्ठितः ।
अश्वमेधसहस्रं तु सत्यं च तुलया धृतम् ॥ ७ ॥
अश्वमेधसहस्राद्धि सत्यमेकं विशिष्यते ।
अथवा किं ममैतेन प्रोक्तेनास्ति प्रयोजनम् ॥ ८ ॥
मदीयां दक्षिणां राजन्न दास्यति भवान्यदि ।
अस्ताचलगते ह्यर्के शप्स्यामि त्वामतो ध्रुवम् ॥ ९ ॥
इत्युक्त्वा स ययौ विप्रो राजा चासीद्‌भयातुरः ।
दुःखीभूतोऽवनौ निःस्वो नृशंसमुनिनार्दितः ॥ १० ॥
सूत उवाच -
एतस्मिन्नन्तरे तत्र ब्राह्मणो वेदपारगः ।
ब्राह्मणैर्बहुभिः सार्धं निर्ययौ स्वगृहाद्‌ बहिः ॥ ११ ॥
ततो राज्ञी तु तं दृष्ट्वा आयान्तं तापसं स्थितम् ।
उवाच वाक्यं राजानं धर्मार्थसहितं तदा ॥ १२ ॥
त्रयाणामपि वर्णानां पिता ब्राह्मण उच्यते ।
पितृद्रव्यं हि पुत्रेण ग्रहीतव्यं न संशयः ॥ १३ ॥
तस्मादयं प्रार्थनीयो धनार्थमिति मे मतिः ।
राजोवाच -
नाहं प्रतिग्रहं काङ्क्षे क्षत्रियोऽहं सुमध्यमे ॥ १४ ॥
याचनं खलु विप्राणां क्षत्रियाणां न विद्यते ।
गुरुर्हि विप्रो वर्णानां पूजनीयोऽस्ति सर्वदा ॥ १५ ॥
तस्माद्‌ गुरुर्न याच्यः स्यात्क्षत्रियाणां विशेषतः ।
यजनाध्ययनं दानं क्षत्रियस्य विधीयते ॥ १६ ॥
शरणागतानामभयं प्रजानां प्रतिपालनम् ।
न चाप्येवं तु वक्तव्यं देहीति कृपणं वचः ॥ १७ ॥
ददामीत्येव मे देवि हृदये निहितं वचः ।
अर्जितं कुत्रचिद्‌ द्रव्यं ब्राह्मणाय ददाम्यहम् ॥ १८ ॥
पत्‍न्युवाच -
कालः समविषमकरः परिभवसम्मानमानदः कालः ।
कालः करोति पुरुषं दातारं याचितारं च ॥ १९ ॥
विप्रेण विदुषा राजा क्रुद्धेनातिबलीयसा ।
राज्यान्निरस्तः सौख्याच्च पश्य कालस्य चेष्टितम् ॥ २० ॥
राजोवाच -
असिना तीक्ष्णधारेण वरं जिह्वा द्विधा कृता ।
न तु मानं परित्यज्य देहि देहीति भाषितम् ॥ २१ ॥
क्षत्रियोऽहं महाभागे न याचे किञ्चिदप्यहम् ।
ददामि वाहं नित्यं हि भुजवीर्यार्जितं धनम् ॥ २२ ॥
पत्‍न्युवाच -
यदि ते हि महाराज याचितुं न क्षमं मनः ।
अहं तु न्यायतो दत्ता देवैरपि सवासवैः ॥ २३ ॥
अहं शास्या च पत्या च रक्ष्या चैव महाद्युते ।
मन्मौल्यं संगृहीत्वाथ गुर्वर्थं सम्प्रदीयताम् ॥ २४ ॥
एतद्वाक्यमुपश्रुत्य हरिश्चन्द्रो महीपतिः ।
कष्टं कष्टमिति प्रोच्य विललापातिदुःखितः ॥ २५ ॥
भार्या च भूयः प्राहेदं क्रियतां वचनं मम ।
विप्रशापाग्निदग्धत्वान्नीचत्वमुपयास्यसि ॥ २६ ॥
न द्युतहेतोर्न च मद्यहेतो-
     र्न राज्यहेतोर्न च भोगहेतोः ।
ददस्व गुर्वर्थमतो मया त्वं
     सत्यव्रतत्वं सफलं कुरुष्व ॥ २७ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
सप्तमस्कन्धे हरिश्चन्द्रोपाख्यानवर्णनं नाम एकविंशोऽध्यायः ॥ २१ ॥


राणी हरिश्‍चंद्राला स्वधर्माची जाणीव करून देते -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

याप्रमाणे स्थिती झाली असता थोडयाच वेळात राजा सावध झाला आणि आपल्या पुत्राचा व स्त्रीचा शोक निवारण करण्याचा प्रयत्‍न करू लागला. पण त्याचवेळी अत्यंत अनिवार राग येऊन क्रुद्ध झालेला तो विप्ररूपी विश्‍वामित्र वेगाने तेथे आला. त्यावेळी तो साक्षात् यमाप्रमाणे भासत होता. त्याची क्रूर चर्या फारच भयंकर दिसत होती. त्याला पाहताच हरिश्‍चंद्राला पुन्हा मूर्च्छा आली आणि तो धाडकन धरणीवर कोसळला. पण त्या मुनीने त्याची पर्वा न करता त्याच्यावर जलसिंचन करून राजाला सावध केले. राजा उठल्यावर तो संतप्त मुनी राजाला म्हणाला, "हे राजेश्‍वरा, उठ आता. जोपर्यंत तू माझा ऋणी आहेस तोवर तुला प्रतिदिनी जास्तच दुःख होत जाईल. म्हणून तू सत्वर माझी योग्य ती दक्षिणा देऊन मुक्त हो."

ते बर्फाप्रमाणे अत्यंत थंड पाणी अंगावर पडताच राजा सावध झाला. तो पुन्हा अत्यंत दुःखाने मूर्च्छित होऊन पडला. राजाची ही स्थिती पाहून विश्‍वामित्र अत्यंत क्रुद्ध झाला. त्याने पुन्हा प्रयत्‍न करून राजाला चांगलेच सावध केले व तो म्हणाला, "हे राजा, तुला धैर्य असेल तर माझी दक्षिणा देऊन टाक. अरे, हा सूर्य सत्यानेच जगाला उष्णता पुरवीत आहे. केवळ सत्याच्याच आधारावर ही पृथ्वी स्थिर आहे. कारण सत्यातच धर्म असल्यामुळे सत्यामुळेच स्वर्गही स्थिर राहिला आहे. हजारो अश्‍वमेधांशी सत्याची तुलना केली असता सत्यच त्याहून अतिश्रेष्ठ असते. पण असा हा सत्य धर्म तुझ्यासारख्याला व्यर्थ सांगून मला काय मिळणार आहे ! असो, हे राजा, सूर्य अस्ताला जाण्यापूर्वी जर तू माझी दक्षिणा देऊ शकला नाहीस तर मी मात्र निश्‍चित तुला शाप देईन." असे सांगून त्वरेने तो महामुनी निघून गेला.

एखाद्या दुष्ट धन्याने आपल्या सेवकाला जसे नित्य त्रस्त करावे व त्यामुळे त्या सेवकाला जसे दुःख भोगावे लागावे तशी अवस्था सांप्रत महाप्रतापी हरिश्‍चंद्र राजाची झाली. राजा आपले वचन पालन करण्यास सर्वथैव असमर्थ झाला.

त्याचवेळी वेदविद्यासंपन्न असा एक ब्राह्मण आपल्यासमवेत अनेक ब्राह्मणांना घेऊन घरातून बाहेर पडला व राजा ज्या ठिकाणी दुःख व्याप्त झाला होता त्याच मार्गाने तो ब्राह्मण जाऊ लागला. समोरून येत असलेल्या त्या तपस्वी ब्राह्मणास अवलोकन करून राणीने राजाशी धर्म व अर्थ यांनी उचित असे भाषण केले.

राणी म्हणाली, "महाराज, ब्राह्मण वर्ण हा तिन्ही वर्णाचा पिता आहे असे शास्त्र सांगते. तसेच धर्मशास्त्राप्रमाणे पुत्रास पित्याकडून द्रव्य मागून घेता येते यात संशय नाही. म्हणून आपण या पितृतुल्य ब्राह्मणाजवळ धनाची याचना करावी. त्याची प्रार्थना करून कार्य सिद्धी होते का ते पहावे."

राजा विचार करून म्हणाला, "हे सुंदरी, मी क्षत्रिय आहे. तेव्हा याचना करणे हा माझा धर्म नाही. यास्तव मी याचना करणे उचित नव्हे. याचना करणे हा ब्राह्मणांचा धर्म आहे. ब्राह्मण हे सर्वात श्रेष्ठ असून गुरुतुल्य असतात. तेव्हा कोणत्याही परिस्थितीत क्षत्रियाने कोणाकडेही, त्यातून गुरुजवळ तर कधीही याचना करू नये. ते क्षत्रिय धर्माला शोभणारे कृत्य नव्हे. यज्ञयाग करणे, ज्ञान प्राप्ती करून घेणे आणि शरणागताला अभय देऊन त्याचे योग्यतेप्रमाणे रक्षण करणे, प्रजेचे उत्तम प्रकारे पालन करणे हेच क्षत्रिय धर्मास योग्य आहे. क्षत्रियाची हीच विहित कर्मे होत. क्षत्रियाने "द्या" असे दीनपणे म्हणणे हे पाप आहे."

"हे देवते, खरोखरच माझ्या हृदयात "मी देतो" हेच शब्द सदैव वास्तव्य करून असतात. तेव्हा ब्राह्मणाला देण्यासाठी मी इतर कोठल्याही मार्गाने द्रव्य संपादन करून त्याचे दान पूर्ण करीन."

राणी राजाला म्हणाली, "हे महाराज, काळाची गती अगम्य आहे. काळच सर्वांचे शुभ अथवा अशुभ करीत असतो. जिताला जेता बनविण्याचे सामर्थ्य फक्त कालातच आहे. मान, सन्मान व अपमान हे घडविण्यास कालच एकमेव समर्थ आहे. तसेच पराक्रमी पुरुषाला दाता अथवा याचक बनविणे हे कालाचेच कर्म आहे. खरोखरच फार विद्वत्ता असूनही हा धर्म जाणण्यास समर्थ असूनही त्या ब्राह्मणाने अत्यंत बलाढय होऊन राजाला राज्यैश्‍वर्यापासून व सुखापासून भ्रष्ट केले व संसारातून उठविले. ही कालाची भयंकर कृति पहा म्हणून कालाची गती समजत नाही."

राजा निश्‍चयी वाणीने बोलला, "हे प्रिये, एखाद्याने तीक्ष्ण धारेच्या तरवारीच्या साहाय्याने माझ्या या सत्यवचनी जिव्हेचे दोन तुकडे केले, तरीही मी ते सहन करीन, पण सर्व लज्जा सोडून कोणाजवळही "द्या, द्या" असे शब्द उच्चारणे मला इष्ट वाटणार नाही.

हे महाभाग्यवती स्त्रिये, मी तुला वारंवार हेच सांगतो आहे. मी क्षत्रिय असून कोणाजवळही दीन होऊन याचना करणार नाही. पण माझ्या बाहूंच्या सामर्थ्यावर मी द्रव्य मिळवीन व ब्राह्मणाला अर्पण करीन."

राजाच्या भाषणाने प्रसन्न होऊन राणी म्हणाली, "तर मग महाराज, आपण याचना करणार नसाल तर मी आपणास धर्म सांगते तो आपण अनुसरावा. हे नाथ, इंद्रादिदेवांना साक्ष ठेवून ब्राह्मणासमोर माझ्य़ा पित्याने न्यायपूर्वक मला आपणास दान दिलेले आहे. तेव्हा पति या नात्याने माझे संरक्षण करणे अथवा परिस्थितिवश माझी व्यवस्था करणे हे आपल्याला योग्य असेच आहे. म्हणून हे महातेजस्वी राजेश्‍वरा, आपण माझी सत्वर विक्री करून शब्दाप्रमाणे गुरूला यथेष्ट दक्षिणा द्यावी."

प्रियेचे हे वाक्य पुन्हा कानी पडताच राजा दुःखव्याप्त होऊन विलाप करू लागला. त्याचे दुःख अनावर झाल्याचे अवलोकन करून राणी आपल्या प्रिय पतीला उद्देशून म्हणाली, "महाराज, ब्राह्मणाच्या शापामुळे आपण भ्रष्ट व्हाल आणि आपणाला नीचत्व प्राप्त होईल. म्हणून तसे न व्हावे यासाठीच आपण मी सांगितलेले विहित कर्म करून माझे म्हणणे मान्य करावे. हे राजेश्‍वरा, आपण हे कृत्य जुगार खेळण्यासाठी मद्य प्राशनाच्या लालसेने किंवा सुखोपभोग भोगण्यासाठी करीत नसून केवळ कर्तव्य म्हणून करणार आहात. आपल्या सत्त्वाचे संरक्षण करणे हे श्रेष्ठ पुरुषाचे परम कर्तव्य आहे. म्हणून त्या कर्तव्य तत्परतेसाठी आपण सिद्ध होऊन माझी विक्री करावी आणि गुरूची दक्षिणा देऊन ऋणातून मुक्त व्हावे. आपले सत्यवचन निश्‍चयाने पाळावे यातच धर्म आहे."

अशाप्रकारे राणी राजाला विधीधर्माचे पुन्हा पुन्हा स्मरण करून देत होती.



अध्याय एकविसावा समाप्त

GO TOP