हरिश्चन्द्र उवाच -
अदत्त्वा ते हिरण्यं वै न करिष्यामि भोजनम् ।
प्रतिज्ञा मे मुनिश्रेष्ठ विषादं त्यज सुव्रत ॥ १ ॥
सूर्यवंशसमुद्भूतः क्षत्रियोऽहं महीपतिः ।
राजसूयस्य यज्ञस्य कर्ता वाञ्छितदो नृषु ॥ २ ॥
कथं करोमि नाकारं स्वामिन्दत्त्वा यदृच्छया ।
अवश्यमेव दातव्यमृणं ते द्विजसत्तम ॥ ३ ॥
स्वस्थो भव प्रदास्यामि सुवर्णं मनसेप्सितम् ।
कञ्चित्कालं प्रतीक्षस्व यावत्प्राप्स्याम्यहं धनम् ॥ ४ ॥
विश्वामित्र उवाच -
कुतस्ते भविता राजन् धनप्राप्तिरतः परम् ।
गतं राज्यं तथा कोशो बलं चैवार्थसाधनम् ॥ ५ ॥
वृथाशा ते महीपाल धनार्थे किं करोम्यहम् ।
निर्धनं त्वां च लोभेन पीडयामि कथं नृप ॥ ६ ॥
तस्मात्कथय भूपाल न दास्यामीति साम्प्रतम् ।
त्यक्त्वाऽऽशां महतीं कामं गच्छाम्यहमतः परम् ॥ ७ ॥
यथेष्टं व्रज राजेन्द्र भार्यापुत्रसमन्वितः ।
सुवर्णं नास्ति किं तुभ्यं ददामीति वदाधुना ॥ ८ ॥
गच्छन्वाक्यमिदं श्रुत्वा ब्राह्मणस्य च भूपतिः ।
प्रत्युवाच मुनिं ब्रह्मन् धैर्यं कुरु ददाम्यहम् ॥ ९ ॥
मम देहोऽस्ति भार्यायाः पुरस्य च ह्यनामयः ।
क्रीत्वा देहं तु तं नूनमृणं दास्यामि ते द्विज ॥ १० ॥
ग्राहकं पश्य विप्रेन्द्र वाराणस्यां पुरि प्रभो ।
दासभावं गमिष्यामि सदारोऽहं सपुत्रकः ॥ ११ ॥
गृहाण काञ्चनं पूर्णं सार्धं भारद्वयं मुने ।
मौल्येन दत्त्वा सर्वान्नः सन्तुष्टो भव भूधर ॥ १२ ॥
इति ब्रुवञ्जगामाथ सह पत्न्या सुतान्वितः ।
उमया कान्तया सार्धं यत्रास्ते शङ्करः स्वयम् ॥ १३ ॥
तां दृष्ट्वा च पुरीं रम्यां मनसो ह्लादकारिणीम् ।
उवाच स कृतार्थोऽस्मि पुरीं पश्यन्सुवर्चसम् ॥ १४ ॥
ततो भागीरथीं प्राप्य स्नात्वा देवादितर्पणम् ।
देवार्चनं च निर्वर्त्य कृतवान् दिग्विलोकनम् ॥ १५ ॥
प्रविश्य वसुधापालो दिव्यां वाराणसीं पुरीम् ।
नैषा मनुष्यभुक्तेति शूलपाणेः परिग्रहः ॥ १६ ॥
जगाम पद्भ्यां दुःखार्तः सह पत्न्या समाकुलः ।
पुरीं प्रविश्य स नृपो विश्वासमकरोत्तदा ॥ १७ ॥
ददृशेऽथ मुनिश्रेष्ठं ब्राह्मणं दक्षिणार्थिनम् ।
तं दृष्ट्वा समनुप्राप्तं विनयावनतोऽभवत् ॥ १८ ॥
प्राह चैवाञ्जलिं कृत्वा हरिश्चन्द्रो महामुनिम् ।
इमे प्राणाः सुतश्चायं प्रिया पत्नी मुने मम ॥ १९ ॥
येन ते कृत्यमस्त्याशु गृहाणाद्य द्विजोत्तम ।
यच्चान्यत्कार्यमस्माभिस्तन्ममाख्यातुमर्हसि ॥ २० ॥
विश्वामित्र उवाच -
पूर्णः स मासो भद्रं ते दीयतां मम दक्षिणा ।
पूर्वं तस्य निमित्तं हि स्मर्यते स्ववचो यदि ॥ २१ ॥
राजोवाच -
ब्रह्मन्नाद्यापि सम्पूर्णो मासो ज्ञानतपोबल ।
तिष्ठत्येकदिनार्धं यत्तप्रतीक्षस्व नापरम् ॥ २२ ॥
विश्वामित्र उवाच -
एवमस्तु महाराज आगमिष्याम्यहं पुनः ।
शापं तव प्रदास्यामि न चेदद्य प्रयच्छसि ॥ २३ ॥
इत्युक्त्वाथ ययौ विप्रो राजा चाचिन्तयत्तदा ।
कथमस्मै प्रयच्छामि दक्षिणा या प्रतिश्रुता ॥ २४ ॥
कुतः पुष्टानि मित्राणि कुत्रार्थः साम्प्रतं मम ।
प्रतिग्रहः प्रदुष्टो मे तत्र याञ्चा कथं भवेत् ॥ २५ ॥
राज्ञां वृत्तित्रयं प्रोक्तं धर्मशास्त्रेषु निश्चितम् ।
यदि प्राणान्विमुञ्चामि ह्यप्रदाय च दक्षिणाम् ॥ २६ ॥
ब्रह्मस्वहा कृमिः पापो भविष्याम्यधमाधमः ।
अथवा प्रेततां यास्ये वर एवात्मविक्रयः ॥ २७ ॥
सूत उवाच -
राजानं व्याकुलं दीनं चिन्तयानमधोमुखम् ।
प्रत्युवाच तदा पत्नी बाष्पगद्गदया गिरा ॥ २८ ॥
त्यज चिन्तां महाराज स्वधर्ममनुपालय ।
प्रेतवद्वर्जनीयो हि नरः सत्यबहिष्कृतः ॥ २९ ॥
नातः परतरं धर्मं वदन्ति पुरुषस्य च ।
यादृशं पुरुषव्याघ्र स्वसत्यस्यानुपालनम् ॥ ३० ॥
अग्निहोत्रमधीतं च दानाद्याः सकलाः क्रियाः ।
भवन्ति तस्य वैफल्यं वाक्यं यस्यानृतं भवेत् ॥ ३१ ॥
सत्यमत्यन्तमुदितं धर्मशास्त्रेषु धीमताम् ।
तारणायानृतं तद्वत्पातनायाकृतात्मनाम् ॥ ३२ ॥
शताश्वमेधानादृत्य राजसूयं च पार्थिवः ।
कृत्वा राजा सकृत्स्वर्गादसत्यवचनाच्च्युतः ॥ ३३ ॥
राजोवाच -
वंशवृद्धिकरश्चायं पुत्रस्तिष्ठति बालकः ।
उच्यतां वक्तुकामासि यद्वाक्यं गजगामिनि ॥ ३४ ॥
पत्न्युवाच -
राजन् माभूदसत्यं ते पुंसां पुत्रफलाः स्त्रियः ।
तन्मां प्रदाय वित्तेन देहि विप्राय दक्षिणाम् ॥ ३५ ॥
व्यास उवाच -
एतद्वाक्यमुपश्रुत्य ययौ मोहं महीपतिः ।
प्रतिलभ्य च संज्ञां वै विललापातिदुःखितः ॥ ३६ ॥
महद्दुखःमिदं भद्रे यत्त्वमेवं ब्रवीषि मे ।
किं तव स्मितसंल्लापा मम पापस्य विस्मृताः ॥ ३७ ॥
हा हा त्वया कथं योग्यं वक्तुमेतच्छुचिस्मिते ।
दुर्वाच्यमेतद्वचनं कथं वदसि भामिनि ॥ ३८ ॥
इत्युक्त्वा नृपतिश्रेष्ठो न धीरो दारविक्रये ।
निपपात महीपृष्ठे मूर्च्छयातिपरिप्लुतः ॥ ३९ ॥
शयानं भुवि तं दृष्ट्वा मूर्च्छयापि महीपतिम् ।
उवाचेदं सुकरुणं राजपुत्री सुदुःखिता ॥ ४० ॥
हा महाराज कस्येदमपध्यानादुपागतम् ।
यस्त्वं निपतितो भूमौ रङ्कवच्छरणोचितः ॥ ४१ ॥
येनैव कोटिशो वित्तं विप्राणामपवर्जितम् ।
स एव पृथिवीनाथो भुवि स्वपिति मे पतिः ॥ ४२ ॥
हा कष्टं किं तवानेन कृतं दैव महीक्षिता ।
यदिन्द्रोपेन्द्रतुल्योऽयं नीतः पापामिमां दशाम् ॥ ४३ ॥
इत्युक्त्वा सापि सुश्रोणी मूर्च्छिता निपपात ह ।
भर्तुर्दुःखमहाभारेणासह्येनातिपीडिता ॥ ४४ ॥
शिशुर्दृष्ट्वा क्षुधाविष्टः प्राह वाक्यं सुदुःखितः ।
तात तात प्रदेह्यन्नं मातर्मे देहि भोजनम् ॥ ४५ ॥
क्षुन्मे बलवती जाता जिह्वाग्रे मेऽतिशुष्यति ॥ ४६ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
सप्तमस्कन्धे हरिश्चन्द्रोपाख्यानवर्णनं नाम विंशोऽध्यायः ॥ २० ॥
राजा-राणीची शोकमग्न अवस्था -
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
राजा हरिश्चंद्र विनयपूर्वक आणि निश्चयी स्वरात म्हणाला, "हे मुनिश्रेष्ठा, आपण कसलीही चिंता करू नका. मी सुप्रसिद्ध अशा सूर्यवंशात जन्माला आलो असून मी उत्तम असा राजसूय यज्ञही केला आहे. याचकांना यथेष्ट दान करणारा मी क्षत्रिय राजा आहे. मी आजच प्रतिज्ञा करतो की आपली सुवर्णदक्षिणा दिल्याशिवाय मी अन्नग्रहण करणार नाही. हे महामुने, एकदा मी दान दिले ते नाही म्हणण्याकरिता नाही. हे सदाचारी ब्राह्मणा, मी आपला ऋणी असून ते मला मान्य आहे म्हणून मला हे ऋण फेडलेच पाहिजे. हे ब्रह्मन्, आपण निश्चिंत व्हा. मला द्रव्यप्राप्ती होईपर्यंत आपण धीर धरा. मी दिलेल्या वचनाप्रमाणे आपणास सुवर्ण दिल्याविना कदापिही राहणार नाही."
राजाचे बोलणे ऐकून विश्वामित्र धूर्तपणाने म्हणाला, "हे राजा, मी आता तुजवर विश्वास कसा धरावा ? कारण तुझे सर्व राज्य गेल्यामुळे तुला आता धनप्राप्ती कशी होणार ? तुझा सर्व द्रव्यकोश तसेच द्रव्यप्राप्तीची सर्व साधने तू अगोदरच दान दिली आहेस. मग तू आता द्रव्य आणणार कोठून ? हे राजा, तुला कुठेही द्रव्य मिळणे शक्य नाही. त्याची आता आशाच सोड. तू निर्धन आता झाल्याने तुझा छळ करणे योग्य नाही. म्हणून फक्त "मी हे देणार नाही" एवढेच सांग. मी माझ्या सर्व आशा सोडून अत्यंत समाधानाने निघून जाण्यास तयार आहे व तूही आपल्या स्त्री-पुत्रासह आपल्या वाटेने निघून जा. तेव्हा तू फक्त एवढेच म्हण की मजजवळ आता काहीही नाही, म्हणून मी तुम्हाला सुवर्ण देऊ शकत नाही. तू असे म्हणालास तरीही मी इथून जाईन."
विप्राचे भाषण ऐकून राजा पुन्हा निश्चयी शब्दात म्हणाला, "हे विप्रश्रेष्ठा, मी, माझी भार्या व माझा पुत्र सुदैवाने सुदृढ प्रकृतीचे आहोत. तेव्हा आपण काही वेळपर्यंत वाट पहा आणि कसलीही चिंता न करता स्वस्थ रहा. हे ब्राह्मणा, वेळ पडल्यास आम्ही आमची ही शरीरे विकून तुझे ऋण फेडून टाकू, पण ऋणात राहणार नाही. माझे वचन तू सत्यच समज. हे प्रभो, विपेंद्रा, आता आम्ही त्या संपन्न व सर्वोत्तम अशा वाराणसी नगरीप्रत सत्वर जातो. तेथे आपण येऊन एखादे धनिक गिर्हाईक पहा. आमची विक्री करा. आम्ही त्यांचे सेवक होऊन राहू. आम्ही तिघेही त्यांचे दास होऊ. हे महामुने, हे भूदेवा, आपण आम्ही तिघांचीही विक्री करून आपली अडीच भाराची दक्षिणा घेऊन समाधानाने रहा."
असे विश्वामित्राला वचन देऊन ज्या क्षेत्री भगवान शंकर उमेसह वास्तव्य करीत आहेत अशा वाराणसी नगरात राजा आपली पत्नी व आपला पुत्र यांच्यासह प्रवेश करता झाला. ते नगर मनोहर आणि अतीव सुंदर असलेले पाहून त्यांना फार आनंद झाला. त्यामुळे त्या आल्हाददायक नगरीच्या केवळ दर्शनानेही आपण कृतकृत्य झालो असे राजास वाटले. नंतर त्या पवित्र भागिरथी तीरावर जाऊन राजा आपल्या पुत्र व पत्नीसह सुस्नान करून शुचिर्भूत झाला. सर्व नित्याचे विधी पूर्ण करून त्याने एका मार्गाने त्या नगरीत प्रवेश करण्याचे निश्चित केले.
अशाप्रकारचे राज्यवैभव सोडून पदयात्रा करीत तो भाग्यवान राजा आपल्या भार्या आणि पुत्रासह त्या नगरात आला. या नगरीचा अधिपती प्रत्यक्ष भगवान शूलपाणीच असल्याने मानवाचे तेथे अधिपत्य नव्हते. त्या नगरात प्रवेश करताच राजाला अपार दुःख झाले. पण त्याने विचार केला, या नगरात मी जरी निरुपयोगी असलो तरी मला किंमत प्राप्त होईल असे वाटते. अशाप्रकारे तेथील मार्गाने पुढे चालत असताना दक्षिणेची आशा असलेला तो विप्रश्रेष्ठ राजाला मार्गातच दिसला. राजाला येत असलेले पाहून तो विप्र राजाजवळ आला. राजाने विप्र समीप आल्याचे पाहून त्याला विनम्र भावाने प्रणिपात केला व हात जोडून तो त्या विप्राला म्हणाला,
"हे महामुने, हे ब्राह्मणोत्तमा, मी, माझी प्रिय पत्नी व माझा हा उत्तम पुत्र यांपैकी आपली दक्षिणा पूर्ण होण्यासाठी ज्याचा अवश्य उपयोग होईल, त्याचा आपण स्वीकार करावा. ज्या योगाने आपली मनोकामना पूर्ण होईल तो मार्ग आपण आम्हाला सांगावा. हे ब्रह्मन्, आम्ही आपल्या श्रेष्ठ चरणांचे दास आहोत."
राजाचे भाषण ऐकून विप्रवेषधारी विश्वामित्र म्हणाला, "हे राजा, तुझे शुभ होवो. तू दिलेल्या शब्दाप्रमाणे आता एक महिना उलटून गेला आहे. म्हणून तुला जर तुझ्या वचनाचे व प्रतिज्ञेचे स्मरण राहिले असेल तर आजच मला माझी दक्षिणा दे."
विप्राच्या बोलण्याने खिन्न होऊन राजा म्हणाला, "हे ज्ञानसंपन्न व तपोनिष्ठ ब्राह्मणा, आजचा दिवस उलटल्यावर एक महिना पूर्ण होईल. तेव्हा आजचा दिवस संपूर्ण होईपर्यंत आपण कृपावंत होऊन वाट पहावी. हा दिवस उलटल्यावर मात्र आपण वाट पहात राहू नका हे सत्यच सांगतो."
विश्वामित्र म्हणाला, "हे राजा, तुझे बोलणे योग्य आहे. मी आजचा दिवस वाट पाहून पुन्हा उद्या येईन. पण त्यावेळी मात्र दक्षिणा दिली नाहीस तर माझी प्रतारणा केलीस असे समजून तुला निश्चितपणे शाप दिल्यावाचून रहाणार नाही."
असे बोलून तो ब्राह्मण निघून गेल्यावर हरिश्चंद्र स्वतःशी विचार करू लागला, "याला आता मी दिलेल्या वचनाप्रमाणे कोठून दक्षिणा देणार ? खरोखर, कोणाकडून तरी उसने द्रव्य घेऊन याची दक्षिणा पूर्ण करावी असे मित्रसुद्धा मला नाहीत. बरे, याचना करणे हे विहित नाही. कारण दान, अध्ययन आणि यजन ही तीनच विहितकर्मे राजासाठी म्हणून सांगितलेली आहेत. धर्मशास्त्राप्रमाणे या राजाच्या तीनच वृत्ती असल्यामुळे याचना करता येत नाही. शिवाय दक्षिणा न देता देहत्याग करावा तर ब्राह्मणाचे ऋण राहून त्याचे द्रव्य अपहरण केल्याचा महादोष प्राप्त होऊन पुढील जन्मात अत्यंत नीच कृमीप्रमाणे अधम योनी मला प्राप्त होईल. मी पापी ठरेन किंवा माझी पिशाच्च योनीत गणना होईल. तेव्हा आता स्वतःची विक्री करून ऋणमुक्त होणे हा एकच उपाय शिल्लक राहतो."
अशाप्रकारे अगदी म्लानवदन होऊन दीनपणे राजा खाली मान घालून विचार करीत असल्याचे पाहून राणीला अतीव दुःख झाले. अत्यंत अश्रुपूर्ण नेत्रांनी आणि सद्गदित शब्दांनी ती आपल्या पतीला स्पष्टपणे म्हणाली,
"हे महाराज, आपण व्यर्थ काळजी करू नका. आपण जो विहित धर्म असेल त्याचेच सांप्रत आचरण करावे. हे महाभाग्यवान, आपण संसारभ्रष्ट झालो आहोत. त्यामुळे आपली सांप्रतची स्थिती ही प्रेताप्रमाणेच आहे, म्हणून त्याज्य आहोत. हे पुरुषश्रेष्ठा, स्वतःचे वचन सत्यस्थितीत उतरविणे हाच सर्वात श्रेष्ठ असा धर्म आहे. वचनपालनासारखा दुसरा धर्म नाही. आपले वचन जर असत्य झाले तर आजवर अनुसरलेले अग्निहोत्र, ज्ञान व दान ही सर्व कर्मे निष्फल होतील. धर्मशास्त्राप्रमाणे सुबुद्ध पुरुषासाठी स्वसंरक्षणास्तव हाच खरा धर्म सांगितला आहे. असत्यामुळे आपण मूढ होऊन आपला नाश होतो. एवढा महापराक्रमी ययाति राजा त्याने शंभर अश्वमेध व राजसूय यज्ञ केले. तो एकदाच असत्य वचन वदला म्हणून सत्वर स्वर्गभ्रष्ट होऊन खाली पडला."
राणीचे धर्मतत्पर भाषण ऐकून राजा म्हणाला, "हे गजगामिनी ! हा पुत्र आपला वंश पुढे चालवील यावर श्रद्धा ठेऊन हे महामती, प्रिये तू योग्य वाटत असेल ते सांप्रत मला निवेदन कर, तू स्पष्टपणे इष्ट तेच सांग." तेव्हा राणी म्हणाली, "हे महाराजा, पुत्रप्राप्तीसाठी स्त्रियांची आवश्यकता असते. त्याप्रमाणे आपणांस पुत्र प्राप्ती झालेलीच आहे. आता माझा काही उपयोग नाही. तेव्हा आपण यावेळी माझी विक्री करून ब्राह्मणाची दक्षिणा देऊन टाका म्हणजे असत्य वदल्याचा दोष आपणावर येणार नाही." आपल्या प्रिय पत्नीचे हे भाषण श्रवण करताच राजा दुःखावेग अनावर होऊन मूर्च्छित झाला, पण थोडयाच वेळाने सावध होऊन शोकाने तो आक्रोश करू लागला. तो सद्गदित झाल्याने अत्यंत कष्टाने आपल्या पत्नीस म्हणाला, "हे कल्याणी, तुझे आताचे बोलणे हे अंतःकरणाला जाळणारे असून महादुःख प्राप्त करून देणारे आहे. सुंदरी, मी पापी आहे. पण तुझ्याशी आजवर केलेले प्रेमालाप मी कसे विसरू ? हर हर, हे सुहास्यवदने, हे प्रिये, काय तुझे हे विपरीत बोलणे ! हे अयोग्य आहे. हे भामिनी, अशाप्रकारचे दारुण्य दुःखदायक शब्द तुझ्याने बोलवते तरी कसे ?" राजाला आपल्या पत्नीच्या विक्रीच्या विचाराने धैर्य न राहून तो पुन्हा मूर्च्छित झाला आणि वेगाने भूमीवर पडला.
राजा मूर्च्छित होऊन भूमीवर कोसळल्यामुळे राणीला अतिशयच दुःख झाले. राजाच्या निस्तेज वदनाकडे पाहून ती कोमलांगी करुणतेने म्हणाली, "अहो महाराज, काय झाले हे ? कोणत्या दुष्ट संकल्पामुळे आपणावर हे भयानक संकट कोसळले आहे ? खरोखर फक्त राजैश्वर्य भोगण्याच्या योग्यतेचे असे आपण, दुर्दैवाच्या फेर्यामुळे एखाद्या दीन रंकाप्रमाणे भूमीवर पडला आहात. अहो, आजवर आपण कोटयवधि ब्राह्मणांना द्रव्यदान दिलेत. असा हा दानशूर, माझा प्राणसखा राजा आज भूमीवर की हो पडला आहे ! अरेरे, हे दुष्ट दैवा, या पृथ्वीपतीकडून तुझा असा कोणता घोर अपराध घडला होता की त्यासाठी तू या भूपेंद्राला महाभयंकर दुःखावस्थेत लोटून दिलेस ?"
अशाप्रकारे विलाप करणार्या राणीला दुःखाचा भार सहन न झाल्यामुळे ती स्वरूपसुंदरी कोमलांगी मूर्च्छित होऊन भूमीवर पडली. माता व पिता दोघेही मूर्च्छित पडलेले अवलोकन करून त्या बालकाला अपार दुःख झाले. क्षुधेने व्याकुल होऊन तो म्हणाला, "तात, तात, मला खायला काहीतरी द्या हो ! हे माते, मला सत्वर भोजन दे ना ! मला अत्यंत भूक लागली असून जीभही सांप्रत सुकून गेली आहे."
त्या पुत्राचा शोक पाहून व त्या तिघांची झालेली करुण अवस्था पाहून प्रत्यक्ष पशुपक्ष्यांनाही अत्यंत गहिवरून आले.