[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
राजाचे भाषण ऐकून तो द्विजरूपी विश्वामित्र काहीसे हास्य करीत राजाला म्हणाला, "हे राजा, ह्या नदीचे पाणी म्हणजे एक पुण्यतीर्थ आहे. हे पवित्र पाणी पापाचा नाश करणारे आहे. म्हणून या उदकात स्नान करून तू शुचिर्भूत हो आणि पितरांचे तर्पण कर. हे प्रजापते, ही वेळ व हे स्थान अत्यंत शुभ आहे. म्हणून या तीर्थात स्नान करून पावन हो आणि याच ठिकाणी मला यथाशक्ती दान दे. या अशा महापुण्यकारक तीर्थावर जाऊनही जो येथे स्नान केल्यावाचून परत जातो तो आत्मघातकी आहे असे समज. अशाप्रकारचे हे स्थानमहात्म्य स्वायंभुव मनूने सांगितलेले आहे.
म्हणून हे भूपेंद्रा, या तीर्थक्षेत्रावर दान करून तू यथेष्ट पुण्य प्राप्त करून घे. नंतर मी तुला नगराचा मार्ग दाखवतो. त्याप्रमाणे तू परत जा. हे ककुस्थकुलोत्पन्ना राजा हरिश्चंद्रा, हे निष्पापा, तू दिलेल्या दानाने संतुष्ट होऊनच मी मार्ग दाखविण्यासाठी आज तुझ्याबरोबर येईन."
त्या ब्राह्मणाचे भाषण ऐकून राजाने अंगावरील वस्त्रे काढली. एका वृक्षाला अश्वाला बांधून तो मुनीवर विश्वास ठेवून स्नान करण्यास नदीत उतरला. त्या विप्राचे कपट निष्पाप राजाच्या लक्षात आले नाही. त्यांचे दैवच फिरले असल्याने राजा त्या कपटी ब्राह्मणाच्या जाळ्यात पूर्णपणे फसला. राजाने स्नान करून देवांचे व पितरांचे तर्पण केले. तो विप्रापुढे हात जोडून म्हणाला, "हे ब्राह्मणश्रेष्ठा, मी आपणास काही दान आताच देतो. गाई, भूमी, सुवर्ण, हत्ती, घोडे, रथ, पालखी यापैकी आपणास ज्याची इच्छा असेल ते आपण यावेळी मागून घ्या. मला न देता येण्यासारखे या पृथ्वीवर काहीही नाही. मी मागेल त्याला मागितलेले दान या क्षेत्रावर देण्यास तयार आहे मग कोणीही काहीही मागितले तरी चालेल. मी ज्यावेळी सर्वश्रेष्ठ असा राजसूय यज्ञ केला त्यावेळी हे व्रत मी स्वीकारलेले आहे व ते सर्व मुनींच्या साक्षीने व्रत घेतले आहे. तेव्हा हे मुनीश्वरा, आपण या पवित्र तीर्थावर आलाच आहात, म्हणून जे काही आपला मनोरथ असेल तो सत्वर सांगा, म्हणजे मी तो पूर्ण करीन." राजाचे बोलणे ऐकून विश्वामित्र म्हणाले, "हे भूपाला, मी तुझी या पृथ्वीवर पसरलेली कीर्ती ऐकत आहे व प्रत्यक्ष वसिष्ठही म्हणाले होते की हरिश्चंद्रासारखा दाता शोधूनही आढळणार नाही. सूर्यवंशात जन्मास आलेल्या त्या महाभाग्यवान व उदार त्रिशंकूचा तू पुत्र आहेस व राज्याचा सर्वाधिकारी आहेस. हे राजा, या पृथ्वीवर आजपर्यंत तुझ्यासारखा दाता खरोखरीच झाला नाही आणि पुढेही होणार नाही. म्हणून हे दानशूरा, आज मी तुझी प्रार्थना करीत आहे. हे महाभाग्यवाना, आज माझ्या पुत्राचा विवाह असल्याने तू मला विपुल द्रव्य दे."
राजा म्हणाला, "हे ब्राह्मणश्रेष्ठा, आपण यथेष्ट पुत्राचा विवाह करा. आपणास जितके लागेल तेवढे धन देण्यास मी तयार आहे."
राजाचे बोलणे ऐकून राजाला फसविण्याच्या बुद्धीने तेथे आलेल्या विश्वामित्राने गंधर्वाची माया उत्पन्न करून एक सुंदर पुत्र व दहा वर्षांची मनोहर कन्या त्याला दाखविली आणि म्हणाला, "हे राजेश्वरा, आता तूच या उभयतांचा विवाह सिद्धीस ने. राजसूय यज्ञ करून जेवढे पुण्य प्राप्त होणार आहे त्यापेक्षा अधिक पुण्य एखाद्या गृहस्थाचा विवाह करून देण्यात आहे."
अशाप्रकारे राजा त्या विश्वामित्राच्या मायेने पूर्ण मोहित झाला व त्याला होकार दिला. नंतर ब्राह्मणाने राजाला योग्य तो रस्ता दाखविताच राजा आपल्या नगराकडे परत आला. इकडे द्विजरूपी विश्वामित्र राजाची पूर्णपणे फसवणूक करून परत स्वस्थानी निघून गेला. नंतर काही वेळ निघून गेल्यावर विश्वामित्राने पुन्हा पूर्वीचेच द्विजरूप धारण केले व तो राजाकडे गेला. तो राजाला म्हणाला, "महाराजा, माझेकडे विवाहाची सर्व सिद्धता झाली आहे. आपण चलावे व माझ्या पुत्राचा दिलेल्या वचनाप्रमाणे विवाह करावा."
राजा त्वरेने अश्वारूढ होऊन विवाहस्थळी आला. तेथे विवाहवेदी वगैरे सर्व सिद्धता अगोदरच करून ठेवली होती. ब्राह्मणाने राजाला आसन देऊन स्थानापन्न केले नंतर विधीयुक्त विवाहकर्म आटोपल्यावर तो द्विजरूपी विश्वामित्र राजाला म्हणाला, "हे भूपेंद्रा, या विवाहवेदीमध्ये असतानाच तू मला योग्य असे दान दे, म्हणजे मी संतुष्ट होईन."
राजा म्हणाला, "हे द्विजश्रेष्ठा, आपण जे हवे असेल ते मागा. मी खचित ते आपणास देईन. या संसारातील कोणतीही अदेय वस्तु मागितलीत तरीही मी ती आपणाला देईन. कारण मला चांगले यश प्राप्त व्हावे एवढीच माझी इच्छा आहे. वैभवाने काही परलोकीच्या सुखाचे यश प्राप्त होत नाही. म्हणून ते जीवन व्यर्थ." विश्वामित्र अत्यंत धूर्तपणे व कपटाने म्हणाले, "तर मग हे राजा, गज, अश्व, रथ, रत्ने आदि सर्व साहित्य यांनी संपन्न असलेले तुझे सर्व राज्य ह्या ठिकाणच्या पवित्र विवाह - वेदीमध्ये या वराला अर्पण कर."
त्या विश्वामित्राच्या मायाजालात पूर्णपणे फसलेल्या राजाने ते ब्राह्मणाचे भाषण ऐकले व अत्यंत आनंदाने राजा म्हणाला, "हे ब्राह्मणश्रेष्ठा, या पवित्र विवाहवेदीत राहून मी सांगतो की, मी ऐश्वर्यासह आपले सर्व राज्य या वधूवरांना अर्पण केले आहे. त्यांनी त्याचा यथेच्छ उपभोग घ्यावा." अशाप्रकारे मागचा पुढचा विचार न करता विश्वामित्राचे कपटजाल न समजल्यामुळे राजाने राज्य दान करून टाकले.
विश्वामित्र म्हणाला, "हे राजा, तुझ्या दानाचा मी स्वीकार केला." असे म्हणून विश्वामित्र पुढे म्हणाला, "हे राजेंद्रा, दान तर दिलेस, पण आता दानाला योग्य अशी दक्षिणा मला दे. कारण दक्षिणेरहित दिलेले दान हे व्यर्थ होय. म्हणून मी मागेन ती दक्षिणा मला दे." त्या ब्राह्मणश्रेष्ठाचे ते भाषण ऐकून राजाला परम आश्चर्य वाटले. पण तसे न दर्शविता तो म्हणाला, "हे मुनिश्रेष्ठा, मी आपणास दान तर दिलेच आहे, आता त्या दानास योग्य अशी मी किती दक्षिणा आपणास देऊ ते सांगा. दान व दक्षिणा यांचे प्रमाण काय असते ? हे आपण मला निश्चिंतपणे सांगितले म्हणजे उचित अशी दक्षिणा देऊन मी हे दान पूर्ण करीन. आपण त्याविषयी निश्चिंत रहा."
विश्वामित्र म्हणाला, "हे राजन्, आता योग्य ती दक्षिणा मी तुला सांगतो. तू दिलेल्या दानासाठी मला अडीच भार सुवर्णाने पूर्ण अशी दक्षिणा दे. (सुवर्णाच्या एका तूलेत चारशे तोळे सुवर्ण असते. अशा वीस तूला दिल्या असता एक भार होतो. सांप्रत पन्नास तूला देणे इष्ट आहे.)
राजाने अत्यंत विस्मयचकित होऊन ब्राह्मणास दानावर देण्यात येणारी दक्षिणा पूर्णपणे देण्याचे वचन दिले. नंतर राजा उठून जाऊ लागला तोच राजाचा शोध करीत अरण्यात पूर्वी इतस्तः चुकलेले सैनिक राजाजवळ आले. आपला राजा दृष्टीस पडताच त्यांना फार आनंद झाला व ते प्रसन्न वदनाने राजाची स्तुति करू लागले. पण राजा विचारात मग्न होता. त्या सैनिकांनी केलेली स्तुति ऐकूनही राजाने त्यांना काहीच प्रतिसाद दिला नाही. तो झाल्या गोष्टीबद्दल विचार करीत आपल्या सैन्यासह राजधानीत परत आला. तो आपल्या अंतःपुरात गेला. त्याचे विचारचक्र जोरात फिरू लागले. तो मनाशीच म्हणाला, "आता मी काय करावे ? मी अगोदर राज्याचे दान दिले असल्याने आता मी निर्धन झालो. मग ही दक्षिणा मी आता कशाप्रकारे द्यावी ? एवढे सुवर्ण कोठून आणावे ? खरोखरच त्या द्विजश्रेष्ठाने कपटाने आपणास फसविले. आपणाला लुटले. कारण सर्व ऐश्वर्य व साधनासह मी त्याला राज्याचे दान दिले वर दानास योग्य म्हणून अडीच भार सुवर्णाची दक्षिणा देण्याचे वचन दिले. खरेच, माझी मती भ्रष्ट पावली काय ? अरेरे, त्या ब्राह्मणाने माझी घोर प्रतारणाच केली आहे. दैवाची लीला अनाकलनीय आहे. आता पुढे कसे करावे ?" अशा तर्हेने अत्यंत चिंताव्याकुळ होऊन राजा अंतःपुरात पोहोचला. राजाला चिंताग्रस्त झालेला पाहून त्याच्या शैब्या नावाच्या राणीने राजास दुःखाचे कारण विचारले. ती म्हणाली, "हे प्रभो, आज आपण इतके चिंताग्रस्त का झाला आहात ? आता खरे म्हणजे आपला पुत्र परत आला असून आपण सर्वोत्कृष्ट राजसूय यज्ञही पूर्ण केला आहे. अशावेळी आपल्याला काय चिंता आहे ते मला सांगा. महाराज, साक्षात् वरुणही आता समाधानी झाला आहे. आपणाला आता एकही शत्रू या भूमीवर नाही. असे असताना आपण शोक का करीत आहात ? या पृथ्वीवर आपणासारखा कृतार्थ राजा दुसरा नाही. माणसाला काळजी निर्माण झाली म्हणजे देह क्षीण होऊ लागतो. खरोखर चिंता म्हणजे प्रति मृत्यूच होय. म्हणून हे नृपश्रेष्ठा, आपण आपल्या चिंतेचा त्याग करा."
आपल्या प्रियेचे ते सहानुभूतीचे शब्द ऐकून राजाला किंचित बरे वाटले. त्याने आपल्या चिंतेचे सत्य तेच कारण आपल्या पत्नीस निवेदन केले. राजा शोकग्रस्त झाल्याने त्या दिवशी त्याने अन्नही घेतले नाही, त्याला सुखाने निद्रा येईना. अशा परिस्थितीत दुसरा दिवस उगवला. प्रातःकाळी सत्वर उठून राजाने स्नानसंध्यादि विधी उरकले व तसाच तो चिंता व्याकुळ होऊन विचार करीत असता विप्रवेषधारी विश्वामित्र आल्याचे सेवकांनी राजाला सांगितले. राजाला फसवून त्याचे सर्व वैभव दान घेणारा तो विप्र तेथे आला. त्याने राजाला प्रणाम केला व राजाला निष्ठूरतेने म्हणाला, "हे राजेंद्रा, तू हे सर्व राज्य मला वैभव व साधनांसह दान दिले आहेस. तेव्हा वचनाप्रमाणे तू राज्यत्याग कर आणि मला हे अर्पण कर. तद्वतच तू मला ठरल्याप्रमाणे यथाविधि दक्षिणाही सत्वर दे आणि आपला शब्द खरा कर."
राजा हरिश्चंद्र आपल्या वचनाप्रमाणे वागण्यास सिद्ध होऊन द्विजरूपी विश्वामित्रास म्हणाला, हे ब्राह्मणश्रेष्ठा, मी खरोखरीच माझे राज्य वैभवासह आपणास दिले आहे. ते आता तुमचेच झाले आहे. मी आता राज्यत्याग करून दूर दुसरीकडे कोठेही निघून जाईन. आपण त्याविषयी किंचितही संशय बाळगू नका. हे प्रभो, आपण विधिपूर्वक कर्म करून माझे सर्व राज्य, वैभव साधनासहित हरण केले आहे. म्हणून हे द्विजश्रेष्ठा, सांप्रत तुझी सुवर्णदक्षिणा देणे मला अशक्य आहे. पण तरीही मला धन मिळाल्यावर मी आपली दक्षिणा आपणाला आणून देईन. मला कोठेतरी कष्ट करून द्रव्य मिळेल व मी आपणास ते देऊन माझे वचन सत्य करीन."
राजा माधवी नावाच्या पत्नीस व पुत्रास म्हणाला, "हे प्रिय स्त्रिये, हे प्रिय पुत्रा, मी माझे सर्व राजैश्वर्य या ब्राह्मणश्रेष्ठास अर्पण केले आहे. यात फक्त तीनच व्यक्ति मुख्य आहेत. त्या म्हणजे पत्नी, पुत्र व मी. तेव्हा आता हे वैभव सोडून मी सत्वर दूर जात आहे. आता या रत्ने, सुवर्ण, गज, अश्व, रथ इत्यादि राजवैभवासह राज्याचा लाभ या मुनीने घ्यावा एवढीच प्रार्थना आहे." असे म्हणून राजाने त्या ब्राह्मणाला नम्रतापूर्वक प्रणाम केला आणि तो सत्वर वेगाने आपल्या राजगृहाबाहेर पडला. राजा निघून जाताच राजाच्या मागोमाग पत्नी व पुत्रही दुःख व्याकुळ होऊन राजाच्या मागोमाग निघाले. अशी विकल स्थिती प्राप्त होऊन हे तिघेजण मार्गातून निघून जात असता सर्व प्रजाजन दुःखाने विव्हल झाले. सर्वत्र आरडाओरडा व हाहाःकार उडाला. सर्व प्रजा राजाच्या वियोगाने आक्रोश करू लागली. प्रजाजन म्हणाले, "अरे राजेंद्रा, तुला ही बुद्धी कशी रे सुचली ? हे नृपनाथा, तू हे काय करून बसलास ? हे प्रजापते, आता वनवासात होणारे क्लेश तुला सहन तरी होतील का ? अरेरे, राजा, काय हा प्रसंग ! तुला त्या धूर्त मतलबी दैवाने खरोखरच पूर्णपणे फसविले की रे! अरेरे! आता आम्ही काय करावे ?"
अशाप्रकारे प्रजाजन आक्रोश करीत असताही तो धर्मतत्पर राजा आपल्या प्रिय पत्नी आणि पुत्रासह निघून जात असलेला पाहून राज्यातील सर्व थरातील जनता अत्यंत शोकाकुल झाली आणि त्या दान घेणार्या ब्राह्मणाची ते निंदा करू लागले. "हा ब्राह्मण कपटी आणि दुष्ट आहे." असे आपापसात म्हणू लागले.
राजा वेगाने जात असलेला पाहून तो महादुष्ट विश्वामित्र राजाजवळ गेला व "माझी दक्षिणा सत्वर देऊन टाक" किंवा "मी दक्षिणा देणार नाही" असे तरी सांग असे राजाला सारखे म्हणू लागला. तो म्हणाला, "राजा, तुला दान दिल्याचे दुःख होत असेल तर तुझे हे राजवैभव परत घे, नाही तर माझे दान दक्षिणेसहित मला दे व आपले वचन सत्य कर."
विप्राचे भाषण ऐकून आपल्या वचनास जागण्याची इच्छा असलेला राजा दीनवान झाला. त्याने नतमस्तक होऊन त्या विप्राच्या चरणावर डोके ठेवले व हात जोडून राजा विप्राशी संभाषण करू लागला.