[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
एकदा हरिश्चंद्र राजा मृगयेसाठी वनात गेला होता. मृगयेच्या निमित्ताने हिंडत असताना त्याला एक सुंदर बाला रडत बसलेली एके ठिकाणी दिसली. हरिश्चंद्राला तिची दया आली आणि तो दयाळू राजा तिच्याजवळ गेला व तिला अभय देऊन म्हणाला, "हे कमलपत्रतुल्य विशाल नयने, हे सुंदरी, तू येथे एकटी बसून का रडत आहेस ? तुला सांप्रत कसले दुःख प्राप्त झाले आहे ? तुला इतकी पीडा कोणाकडून दिली गेली आहे ? तुझे जे दुःख असेल ते मनमोकळेपणाने मला सांग हे अरण्य निर्जन व भयानक आहे. तू येथे कशी आलीस ? तुझा पिता कोण आहे ? तुझा पती कोठे आहे ? हे सुंदरवदने, तु आपले सर्व दुःख निवेदन कर. माझ्या राज्यात, कोणत्याही परस्त्रीला राक्षसदेखील त्रस्त करू शकत नाहीत. म्हणून तू सत्वर सांग. ज्याने तुला त्रास दिला असेल त्याचा मी वध करीन. हे कृशोदरी, हे सुमध्यमे, स्त्रीला त्रास देणारा पापबुद्धी पुरुष माझ्या देशात कोणीही नाही. तेव्हा तू आपले दुःखाचे खरे कारण सांग."
राजाचे हे अभयाचे भाषण ऐकून त्या बालेने आपले अश्रू पुसले व ती त्या राजश्रेष्ठाला म्हणाली, "हे राजा, ज्या अष्टमहासिद्धी आहेत, त्यापैकी मीही एक सिद्धी आहे. मी प्राप्त व्हावे म्हणून तो कुशिकवंशज महामुनी विश्वामित्र या वनात महातपश्चर्येस बसला आहे. त्यांच्या घोर तपामुळे मला अत्यंत त्रास होत आहे. तेव्हा हे राजा, मी काय करू ? हे सुव्रतराजा, तुझ्या देशात सर्व सुखांची समृद्धी असूनही मी मात्र या देशात दुःखी आहे. माझ्यासारख्या सुंदर स्त्रीला त्या मुनीपासून अत्यंत त्रास ह्या तुझ्या राज्यातच भोगावा लागत आहे, हे निश्चित आहे तेव्हा आता मला तरणोपाय कोणता ?".
राजा म्हणाला. "हे विशालनयने, तू स्वस्थ चित्ताने रहा. यापुढे तुला दुःख होईल असे मी घडू देणार नाही. मी स्वतः त्या मुनीचे निवारण करून तुझे दुःख नाहीसे करीन."
त्या बालिकेला असे स्पष्ट वचन देऊन राजा अतिशय त्वरेने मुनीश्रेष्ठ विश्वामित्रांकडे जाऊन उभा राहिला. त्याच्यापुढे अत्यंत विनम्र होऊन तो दयाळू राजा हात जोडून म्हणाला, "हे मुनीश्वरा, आपण असे हे घोर तप करून देहाला का बरे त्रास करून घेत आहात ? हे महामते, आपण सांप्रत हे तप कशासाठी आरंभिले आहे ? हे गाधिनंदना, आपण मला सत्य असेल ते सांगा. मी आपले मनोरथ निश्चित पुरे करीन. तेव्हा आपण हे तप सोडून उठा. इथून पुढे तपश्चर्या पुरे. हे सर्वज्ञा, ज्या तपामुळे इतरांना पीडा होऊन त्रास होईल असे घोर तप यापुढे माझ्या राज्यात कोणीही करू नये."
राजाने विश्वामित्राचा निषेध केला व त्याला तपश्चर्या पुरी करण्यास सांगितले. तो परत आपल्या घरी गेला. इकडे कौशिक मुनीही क्रुद्ध झाला व तप सोडून निघून गेला. तो आश्रमात परत आल्यावर या सर्व प्रसंगावर विचार करू लागला. वसिष्ठांबरोबर लावलेला पण, राजाचे अनुचित कृत्य आणि आता आपला केलेला निषेध ह्याबद्दल पुन्हा पुन्हा विचार करून कोपिष्ट झालेल्या त्या मुनीने राजाचा पूर्णपणे छळ करण्याचा निश्चय केला. कोणकोणत्या मार्गाने राजाचा छळ करावा याबद्दल त्याने विचार करून त्याने अघोरी रूप धारण करणार्या एका दानवाला भयानक सूकराचे रूप दिले व हरिश्चंद्राच्या राज्यात पाठविले. तो महाबलाढय व भयानक सूकर राजधानीजवळ जाऊन प्रचंड गर्जना करीत सुटला. ते धिप्पाड रानडुक्कर राजाच्या उपवनात पोहोचले. तेथे जाऊन त्या भीति उत्पन्न करणार्या सूकराने उपवनातील रक्षकांना त्रस्त करून तो राजधानीजवळ गेला.
सूकर जवळ येत असलेला पाहून त्या उपवनातील मालती, कदंब, जुई यांची बेटे सारखी थरथर कापू लागली. त्या सूकराच्या पावलांच्या हादर्याने ती उन्मळून पडतात की काय अशी भीती निर्माण झाली. तो महाबलाढय सूकर दातांनी भुई उकरू लागला. मोठमोठे वृक्ष त्याने धडका देऊन कोसळून पाडले. चंपक- केतकीची बेटे, मालतीची झाडे, कण्हेर, वाळा इत्यादी शुभ व मृदु वृक्ष व वेली तो उपटून टाकू लागला. त्याने सर्वत्र विध्वंस सुरू केला. मुचुकुंद, अशोक, बकुळ, तिलक वगैरे प्रचंड वृक्ष त्याने मुळापासून उखडून टाकले.
सूकराने राजाच्या उपवनाचा नाश करण्याचे कार्य चालू केले ते अवलोकन करून रक्षक हातात प्रचंड शस्त्रे घेऊन सूकराला मारण्यासाठी धावले. तेथील माळी तर दुःखाने हाहाःकार करीत आक्रोश करू लागले. त्या सूकरावर चोहोबाजूंनी रक्षकांनी हल्ला चढविला. पण अशाप्रकारे बाणांचे आघात होत असूनही तो कामतुल्य, तेजस्वी व प्रचंड शरीर असलेला वराह न घाबरता त्या रक्षकांनाही त्रस्त करू लागला.
अखेर सर्व रक्षक दमले व श्रांत होऊन अत्यंत घाबरून गेले. त्यांना काय करावे हे न सुचल्याने ते गोंधळले व थरथर कापू लागले. ते राजाकडे जाऊन त्याला शरण गेले व "आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा" असे राजाला म्हणू लागले. अत्यंत घाबरून गेलेले ते उपवनाचे माळी व रक्षक यांना पाहून राजाने विचारले,
"अहो रक्षकांनो, माळ्यांनो, तुम्ही एवढे का घाबरला आहात ? कशाची भीती वाटल्यामुळे तुम्ही मजकडे आला आहात ? मी देवदानवांनाही भिणारा नाही. असे असताना तुम्हाला कोणी त्रास दिल्यामुळे तुम्ही भयाने पळत आलात ते सत्वर सांगा, म्हणजे त्या दुर्दैवी शत्रूचा मी माझ्या बाणाने त्वरित वध करीन. या जगात पापबुद्धीने अथवा दुष्ट बुद्धीने ज्याने माझ्याशी शत्रुत्व पत्करले असेल तो दानवच काय, पण देव जरी असला तरी माझ्या सुतीक्ष्ण बाणांनी त्याचा वध केल्यावाचून मी निश्चित रहाणार नाही. म्हणून हे सेवकांनो, तो शत्रू कोठे आहे ? तो कोणते रूप घेऊन आला आहे ? त्याचे सामर्थ्य किती आहे ? ते सत्वर मला सांगा."
राजाचे निर्भय भाषण ऐकून माळी व रक्षक म्हणाले, "हे राजा, सांप्रत आपल्यापुढे आलेला शत्रु हा देव, दैत्य, मानव, यक्ष, किन्नर, गंधर्व यापैकी कोणीही नाही. पण आपल्या उपवनात आलेल्या एका महाबलाढय सूकराने वनाचा विध्वंस करून उच्छेद मांडला आहे. त्याने आपल्या कोमल फुलवेली दातांनी उपटून टाकल्या. प्रचंड वृक्ष तो धडक देऊन पाडीत आहे. तेव्हा महाराज, आम्ही बाण, दगड, काठी या सर्व शस्त्रांनी त्याच्यावर भयंकर प्रहार केले. पण तो यत्किंचितही न घाबरता आमच्याच अंगावर धावून येऊन आम्हाला मारण्याचा प्रयत्न करू लागला."
आपल्या सेवकांचे भाषण ऐकून राजा संतप्त झाला. एका सूकराने एवढा उच्छेद मांडावा हे त्याला सहन झाले नाही. सत्वर अश्वारूढ होऊन तो उपवनाप्रत आला. जाताना त्याने गज, अश्व, रथ, पदाति असे प्रचंड सैन्य बरोबर घेतले. तेथे गेल्यावर आपल्या उपवनाचा नाश करणारा एक प्रचंड सूकर त्याला दिसला. सूकर राजाला पाहून गुरगुरू लागला. आपल्या उपवनाची ही हानी पाहून राजा अतिशय संतप्त झाला, धनुष्याला बाण जोडून तो सूकराच्या वधासाठी वेगाने उपवनात घुसला व सूकराच्या जवळ गेला. शस्त्र घेऊन अंगावर चालून येणार्या पुरुषाला पहाताच सूकर चिडला व मोठमोठया गर्जना करीत तो राजाच्या अंगावर धावून आला. राजाने नेम धरून त्या सूकरावर एक अत्यंत तीक्ष्ण बाण सोडला. पण अत्यंत चपलतेने तो बाण चुकवून सूकर वेगाने कोठे तरी पळून गेला व दिसेनासा झाला. राजाने त्याचा पाठलाग सुरू केला. सूकर दिसताच राजा वेगाने बाण सोडीत असे. पण क्षणार्धात तो सूकर बाण चुकवून दिसेनासा होई. अशा तर्हेने प्रचंड गर्जना करीत सूकर पुढे धावत होता व क्रुद्ध होऊन राजा त्याचा पाठपुरावा करीत होता. वायुतुल्य वेग असलेल्या अश्वावर स्वार होऊन राजा सूकराच्या मागे धावत होता. धनुष्य सरसावून तो सूकराचा पाठलाग करीत होता.
राजाच्या सैन्यानेही सूकराच्या शोधासाठी सर्वत्र धावाधाव सुरू केली. त्यामुळे राजाचे सैन्य सर्व रानोमाळ पांगले. राजा एकटाच त्या सूकराचा शोध घेत त्याच्या मागोमाग गेला. अखेर त्या सूकराचा पाठलाग करीत राजा महाभयंकर अशा निर्जन व निबिड अरण्यात येऊन पोहोचला.
राजाचा घोडाही थकला होता व राजालाही अत्यंत भूक व तहान लागली होती. पण एवढे करूनही तो सूकर कोठेच दिसेना, म्हणून राजाला काळजी वाटू लागली एवढया निबिड अरण्यात वाट चुकल्यामुळे राजा दीन झाला व मूढासारखा एक ठिकाणी उभा राहून तो विचार करू लागला. आता पुढे काय करावे ? कुणीकडे जावे ? आता राजाला कोणीही साथीदार नव्हता व वनातील मार्गही माहीत नव्हता. म्हणून कसे करावे याविषयी राजा चिंता करू लागला.
अशाप्रकारे उद्विग्न मनाने घोर काळजी करीत असता त्या राजाला समोरच स्वच्छ पाण्याने दुथडी भरून वहात असलेली एक उत्कृष्ट नदी दिसली. ती नदी पाहून तो आनंदित झाला. नदीतीरावर त्याने घोडयास पाणी पाजले व स्वतःही खाली उतरून ते निर्मल उदक पिऊन त्याने आपली तृषा शमविली.
तहान भागल्यामुळे राजाला पुष्कळच हुषारी प्राप्त झाली व समाधान वाटले. नंतर आता नगराकडे परत जावे असा विचार करून तो मार्ग शोधू लागला. पण तेथे दिशांचेही ज्ञान न झाल्यामुळे तो मोहवश झाला. इतक्यात समोरून एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप धारण करून विश्वामित्र ऋषी राजाकडे येऊ लागला. त्या द्विजाला येत असताना पाहून राजाने विनम्रतेने त्या द्विजाला प्रणाम केला व त्या द्विजापुढे हात जोडून उभा राहिला. नम्रतेने उभ्या राहिलेल्या नृपाला पाहून तो ब्राह्मण म्हणाला,
"हे राजा, तुझे कल्याण असो. पण या घनदाट अरण्यात तू का बरे आलास ? हे राजेश्वरा तू कोणता हेतु मनात बाळगून या भयाण निर्जन वनांत प्रवेश केलास ? तू सत्य तेच मला विस्ताराने कथन कर." राजा पूर्वीच्याच विनयाने म्हणाला, "हे मुनिश्रेष्ठा, एक महाबलाढय सूकर माझ्या उपवनात शिरला. त्याने तेथील कोमल पुष्पवेलींचा व वृक्षांचा विध्वंस केला. त्या दुष्टाचा वध करण्यासाठी मी सैन्य घेऊन नगरातून बाहेर पडलो. पण तो पशु मायावी असला पाहिजे. तो अत्यंत वेगवान प्राणी आहे. तो माझी दृष्टी चुकवून कोठे तरी नाहीसा झाला. त्याचा पाठलाग करीत, शोध काढीत मी येथे येऊन पोहोचलो. माझे सैन्यही त्याच्या शोधात कोणीकडे तरी निघून गेले आहे. अखेर क्षुधेने व तृष्णेने व्याकुळ झालेला मी सैन्याची चुकामूक होऊन येथवर आलो. आता माझे सैन्य कुणीकडे गेले व माझ्या नगराचा मार्ग कोणता आहे हे मला सांगता येत नाही. म्हणून हे प्रभो, आपणच मला मार्ग दाखवा. खरोखरच माझे सुदैव म्हणून आपली या निर्जन वनात भेट झाली. हे द्विजश्रेष्ठा, माझे नाव हरिश्चंद्र असून मी सुप्रसिद्ध अयोध्येचा राजा आहे. मी राजसूय यज्ञासारखे यज्ञ करून याचकांना इच्छित असेल ते देत असतो. तेव्हा हे विप्रश्रेष्ठा, आपणाला जर धनाशा असेल तर आपण मजबरोबर नगरात येऊन मजकडून विपुल धन घेऊन जावे."