[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
हरिश्चंद्र राजाने विश्वामित्राच्या विनंतीचा अव्हेर करताच विश्वामित्रांना फारच दुःख झाले. ते भयाने व्याकूळ होऊन रोदन करीत असलेल्या शुनःशेपाजवळ गेले. त्यांनी त्याला धीर दिला. ते म्हणाले, "हे पुत्रा, तू चिंता करू नकोस. मी तुला वरुणाचा मंत्र देतो. तू मनात त्या मंत्राच्या सहाय्याने वरुणाचे चिंतन कर. त्या मंत्राचा जप करीत राहिल्यास तुझे निश्चितपणे व चिरंतन असे कल्याण होईल. माझ्या आज्ञेने तुझे शुभ होईल."
विश्वामित्राने शुनःशेपाला वरुण मंत्राचा उपदेश केला. दुःखाने भयग्रस्त झालेल्या त्या बालकाने विश्वामित्राने सांगितल्याप्रमाणे त्या वरुणमंत्राचा स्पष्टाक्षरांनी जप केला. या पुत्राने केलेल्या वरुणाच्या जपामुळे प्रसन्न होऊन साक्षात् वरुण तेथे अवतीर्ण झाला व त्या पुत्रासमोर उभा राहिला. प्रत्यक्ष वरुणराज प्राप्त झाल्याचे अवलोकन करताच तेथील जन विस्मित झाले व त्या सुरेश्वराच्या दर्शनाने आनंदनिर्भर होऊन सर्वजण वरुणाची स्तुति करू लागले.
जलोदराने पीडित झालेल्या हरिश्चंद्राने आश्चर्यचकित होऊन वरुणाच्या चरणांना स्पर्श करून प्रणाम केला आणि हात जोडून नतमस्तक होऊन तो वरुणाची स्तुति करू लागला, "हे देवाधिदेवा, हे कृपानिधे, हे करुणासागरा, खरोखर मी पापी आहे. मी मूढ, महाअपराधी, व कृपण आहे. तरीही आपण आज दर्शन देऊन मला पुनीत केले आहे. हे सुरेश्वरा, मी पुत्राची लालसा धरल्याने आपली अवहेलना केली. यास्तव आपण कृपाळु होऊन मला क्षमा करावी. माझ्यासारख्या दुर्बुद्धीयुक्त पुरुषाचा आपण सुरेश्वर असल्यामुळे अपराध मनात ठेवणार नाही. कार्यतत्पर पुरुष इतरांच्या दोषाकडे लक्ष देत नाही.
हे प्रभो, केवळ नरकाला भिऊन मी पुत्राची इच्छा धरली व आपली फसवणूक केली. पुत्र नसल्यास सद्गति व स्वर्ग प्राप्त होत नाही. या धर्मवाक्याला भिऊन मी आपला अपराध केला आहे. हे देवाधिदेवा, आपण ज्ञानी आहात. आपणासारख्याने माझ्यासारख्या अज्ञ पुरुषाचा दोष लक्षात ठेवू नये. महाराज, सांप्रत मी दुःखी आहे व रोगग्रस्त झालो असून पुत्राकडूनदेखील माझी फसवणूक झाली आहे.
हे महाराज, हे प्रभो, हे कृपासागरा, खरोखरच मृत्यूला भिऊनच माझा पुत्र कोठेतरी वनात गेला आहे व अजूनही मला त्याचे ठिकाण समजलेले नाही. केवळ नाईलाज होऊन मी हा द्विजपुत्र विकत घेतला आहे व आपणाला संतुष्ट करण्यासाठी मी या क्रीत पुत्राच्या योगाने आपले यजन करीत आहे. आपल्या दर्शनाने मी कृतकृत्य झालो असून आपल्या दयाघन कृपावर्षावामुळे सांप्रत माझी जलोदराची पीडा नाहीशी झाली आहे."
दुर्धर असा रोग जडलेल्या त्या दुःखी राजाचे करुण भाषण ऐकून तो दयाळू वरुण राजाला म्हणाला, "हे राजा, माझी स्तुति करीत असलेल्या त्या शुनःशेपाला सत्वर मुक्त कर. तुझा यज्ञ सिद्धीस गेला आहे असे मी समजतो आणि त्यामुळे समाधानाने तुला मी आज रोगमुक्त करीत आहे. आता तू रोगमुक्त हो. असे सांगून सर्वासमक्ष वरुणाने राजाला रोगमुक्त केले व त्याचा देह सुस्थित केला. त्या महादयाळु वरुणाने त्या द्विजपुत्र शुनःशेपाला सत्वर मुक्त केले. ते अवलोकन करताच सर्व यज्ञमंडपात आनंदीआनंद झाला. सर्वांनी वरुणाचा जयघोष केला. अत्यंत असाध्य रोगापासून मुक्त झाल्याने राजाला अत्यानंद झाला. शुनःशेपही वधस्तंभापासून मुक्त झाला व प्रसन्नचित्त झाला.
त्यानंतर त्या धर्मतत्पर राजाने तो यज्ञ पूर्ण केला. त्यानंतर शुनःशेप हात जोडून तेथील सर्व उपस्थित सभासदांना म्हणाला, "हे सभ्यहो, तुम्ही सर्वजण धर्मज्ञ आहात. तेव्हा आता वेदशास्त्राच्या आज्ञेप्रमाणे आपण मजबद्दल धर्मनिर्णय करावा. हे सर्वज्ञांनो मी आता कोणाचा पुत्र झालो आहे ? आता माझा पिता कोण ? आपण जो निर्णय द्याल त्याला मी शरण होऊन मान्य करीन."
तेव्हा त्याचे बोलणे ऐकून सभासदात वादविवाद सुरू झाला. "हा अजीगर्ताचाच पुत्र आहे. कारण हा त्याच्याच शरीरापासून उत्पन्न झाला असून त्याचे पालनही अजिगर्त्यानेच केले आहे. तेव्हा हा दुसर्या कोणाचाही पुत्र असणे कसे संभवनीय आहे ?" अशाप्रकारे एक विचार पुढे आला.
हा एक विचार लक्षात घेऊन वामदेव म्हणाला, "अहो, केवळ द्रव्यलोभाने त्या पित्याने तो पुत्र विकला आहे तेव्हा ज्याने धन देऊन त्याला विकत घेतले त्या राजाचा हा पुत्र होय याविषयी कोणीही शंका धरू नये किंवा ज्या वरुणाने त्याला संकटमुक्त करून जणू काय पुनर्जन्म प्राप्त करून दिला त्या वरुणाचा हा पुत्र होऊ शकेल. शास्त्रवचनच आता मी सांगतो.
"अन्नदाता भयत्राता तथा विद्याप्रदश्च यः ।
वित्तदो जन्मदश्चैव पंचैते पितरः स्मृतः ॥"
(जो अन्नदाता असतो, जो भय नाहीसे करणारा असतो, जो ज्ञानदान करतो, जो द्रव्य देतो, अथवा जो जन्म देतो तो जनक होय, असे हे पाच प्रकारचे पिते असतात.)
ते ऐकून काही म्हणाले, हा पुत्र जनकाचा, काहींनी आग्रह धरला हा पुत्र राजाचा. काहींच्या मते हा वरुणाचा पुत्र होय. थोडक्यात त्यांच्यात एकवाक्यता होईना. तेव्हा मोठा वादविवाद झाला. पण काहीही धर्मसंमत निर्णय झाला नाही.
त्यामुळे सर्वांनाच संभ्रम पडला. सर्व सभासद एकमेकात वादविवाद करू लागले. पण अखेरपर्यंत कोणीच निर्णय देऊ शकले नाही. तेव्हा सर्वजण वसिष्ठ मुनींना म्हणाले, "हे भगवन्, आपण सर्वज्ञ आहा. तेव्हा श्रुतींना संमत होईल असा आपण निर्णय सांगा."
ते महाबुद्धीमान, सर्वज्ञ व सर्वमान्य असे गुरु वसिष्ठ संपूर्ण विचारपूर्वक म्हणाले, "हे महाभाग्यवान सभासदांनो, आता मी श्रुतिसंमत असा निर्णय सांगतो. तो तुम्ही ऐका. असे पहा की, स्नेहरहित होऊन धनसंग्रहाच्या लोभाने त्याच्या जन्मदात्याने - पित्याने - हा पुत्र विकून टाकला. तेव्हाच ज्याने विकत घेतला त्याचा हा पुत्र झाला. पण राजाने स्वसंरक्षणासाठी याला यज्ञस्तंभापाशी बांधले तेव्हा राजाचाही पुत्रावरील हक्क नाहीसा झाला, अखेर या पुत्राने वरुणाची आराधना केली, त्यामुळे वरुणाने संतुष्ट होऊन याला मुक्त केले. पण म्हणून हा वरुणाचा पुत्र आहे असे म्हणणे योग्य नव्हे. कारण मंत्रांच्या योगाने जो ज्या देवाचे स्तवन करतो, त्याला देव प्रसन्न होऊन प्राण, धन, राज्य, पशु अथवा इच्छित असे प्राप्त करून देतो. प्रसन्न झालेल्या प्रत्येक देवतेचा हा धर्मच आहे. म्हणून महान संकट प्राप्त झाले असता ज्याने दयार्द्र होऊन या पुत्राला वरुणाचा महातेजस्वी मंत्रोपदेश दिला व अत्यंत दारुण संकटप्रसंगी याचे रक्षण केले त्या विश्वामित्राचाच हा पुत्र होय."
अशाप्रकारे वसिष्ठांचा निर्णय शिष्टसंमत झाला. विश्वामित्रांनीही पितृवात्सल्याने प्रेरित होऊन त्या शुनःशेपाचा उजवा हात धरून "घरी चल" असे म्हणून त्याला घेऊन विश्वामित्र सत्वर घरी निघून गेला. शुनःशेपही विनाविलंब विश्वामित्रांबरोबर वेगाने चालता झाला. वरुण प्रसन्न चित्ताने स्वस्थानी गेला. राजा रोगमुक्त झाल्याने यथाशक्ती आपल्या प्रजेची सेवा करून आनंदाने राज्य करू लागला.
इकडे यज्ञमंडपातील सर्व वृत्तांत व वरुणाने प्रसन्न होऊन आपल्या पित्याला मुक्त केल्याचे ऐकून कुमार रोहित प्रसन्न झाला व त्या दुर्गम अशा वनपर्वतापासून पुनः परत अयोध्येस येण्यास निघाला, तो अयोध्या नगरीजवळ आल्याचे अवलोकन करताच दूतांनी राजाला पुत्र परत आल्याचे वर्तमान सांगितले. तेव्हा हरिश्चंद्र राजा अत्यानंदित होऊन पुत्राला परत आणण्यास त्याच्याकडे गेला.
समोरून पित्याला येत असलेला पाहून रोहिताला प्रेमाचे भरते आले. त्याला काहीही सुचेना. त्याने दुःखपूर्ण नेत्रांनी व अश्रूंनी व्याकुळ होऊन आपल्या पित्यापुढे भूमीवर लोटांगण घातले. तेव्हा राजानेही प्रेमभरित होऊन त्याला उचलून पोटाशी धरले. त्याच्या मस्तकाचे अवघ्राण करून आपल्या पुत्राचे शुभवर्तमान विचारले. पुत्राला मांडीवर बसवून राजाने आनंद व्यक्त केला व नेत्रातून वाहणार्या उष्ण अश्रूंनी पुत्राचे मस्तक भिजवून टाकले.
पुढे राजाने पुत्रासह उत्तम प्रकारे राज्य केले. नंतर लवकरच त्या नृपश्रेष्ठाने राजसूय नावाचा महायज्ञ केला. यज्ञात राजाने वसिष्ठ गुरूंची अग्रपूजा केली व त्यांनाच आपले मुख्य ऋषि केले. तो उत्कृष्ट असा महायज्ञ समाप्त झाल्यावर इंद्राने सन्मानपूर्वक निमंत्रण दिल्यामुळे गुरु वसिष्ठ त्या रमणीय अशा इंद्रलोकी गेले. महामुनी विश्वामित्रही वसिष्ठांबरोबर तेथे गेला. ते दोघेही काही काल देवलोकात एकत्र राहिले.
हरिश्चंद्राने यज्ञप्रसंगी वसिष्ठ मुनींची अग्रपूजा केल्याचे ऐकून विश्वामित्राला अत्यंत आश्चर्य वाटले व महादुःख झाले. त्याने इंद्रसभेत एकदा वसिष्ठांना विचारले, "हे महाभाग्यवान मुने, आपणाला ही महापूजा कशी प्राप्त झाली ? ही अग्रपूजा कोणी, कुठे व केव्हा केली ?"
वसिष्ठ महर्षी आनंदाने विश्वामित्रास सांगू लागले. ते म्हणाले, "हे विश्वामित्रमुने, महाप्रतापी अयोध्यापती जो हरिश्चंद्र राजा तो माझा यजमान आहे हे सर्वश्रुतच आहे. त्या राजाने विपुल व महादक्षिणेने युक्त असा राजसूय यज्ञ केला. तो खरोखर सत्यवादी, व्रतस्थ, दातृत्व असलेला धर्मशील व प्रजाहिततत्पर असा राजा आहे. सांप्रत त्याच्यासारखा एकही राजा पृथ्वीवर आढळणार नाही. तेव्हा हे कौशिका, त्याने केलेल्या राजसूय यज्ञात मला हा अग्रपूजेचा मान मिळाला. त्या हरिश्चंद्रासारखा सत्यवचनी राजा पूर्वी झाला नाही, पुढेही होणार नाही." वसिष्ठांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर तो महाकोपिष्ट विश्वामित्र रागाने लाल झाला. तो वसिष्ठाला म्हणाला.
"हे मुने, हा तुमचा व्यर्थ दुराभिमान आहे. त्याने वरुणाला वचन देऊन फसविले आहे. अशा त्या कपटी व असत्य भाषण करणार्या राजाची आपण विनाकारण स्तुती करीत आहात. हे महामते, मी तपाने, अध्ययनाने आजवर मिळविलेले सर्व पुण्य पणास लावतो. तसेच आपणही तपःसामर्थ्याने मिळविलेले पुण्य पणास लावा म्हणजे आपण ज्याची या स्वर्गातही अति स्तुती करीत आहात, तो राजा असत्यवादी, अदाता व महादुष्ट आहे हे मी सिद्ध करतो.
मी जर तसे सिद्ध करून दाखविले नाही तर माझे सर्व पुण्य नाहीसे होईल व मी तसे सिद्ध केल्यास आपले सर्व पुण्य नाहीसे होईल, असाच आपण पण लावू. याप्रमाणे दोघांनीही अभिमानाने हा पण लावला व तो पराकोटीचा कोपिष्ट मुनी विवाद करीतच वसिष्ठांसह पृथ्वीवर आला, दोघही आपापल्या आश्रमात निघून गेले.