[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
हरिश्चंद्र राजा जलोदराच्या विकाराने त्रस्त झाला. शिवाय पुत्रवियोगाचे दुःखही त्याला अतीव झाले होते. इकडे वनात निघून गेलेल्या राजपुत्राला आपल्या पित्याला जडलेल्या रोगाची वार्ता समजताच त्याने पित्याकडे परत जाण्याचे ठरविले. कारण आपल्या पित्याविषयी त्याचे प्रेम अत्यद्भुत असे होते.
संवत्सर उलटून गेल्यावर तो पित्याच्या दर्शनासाठी आदरयुक्त मनाने वनातून निघाला. आपल्या पित्याचे दर्शन घेण्यास उत्सुक झालेल्या राजपुत्राला वाटेतच इंद्राने विप्राचे रूप घेऊन अडविले व युक्तीप्रयुक्तीने राजपुत्राला पित्याकडे जाण्यापासून परावृत्त केले.
इंद्र म्हणाला, "हे राजपुत्रा, राजनीती दुर्घट असून तुला त्याची काहीही जाण नाही. केवळ तू मूढ असल्यानेच सांप्रत राजाकडे जाण्यासाठी उतावीळ झाला आहेस. पण हे राजपुत्रा, तुझा पिता वेदांतपारंगत अशा ब्राह्मणांकडून यज्ञ करवील व तुझा प्रज्वलित अग्नीमध्ये होमकार्यास्तव बली देईल. खरोखरच सर्व जीवांना आपला प्राण अत्यंत प्रिय असतो. केवळ त्याचसाठी ते पुत्र, भार्या, धन जोडीत असतात. अरे, स्वतःच्या प्राणाच्या रक्षणासाठी तो राजा, विधिपूर्वक तुझे होमात हवन करील व रोगमुक्त होण्याचा प्रयत्न करील. म्हणून तू यावेळी राजाकडे न जाता तुझा पिता स्वर्गवासी झाल्यावर तू तेथे जा व सुखाने राज्य कर."
विप्ररूपी इंद्राचे हे योग्य भाषण श्रवण करून राजपुत्र आणखी एक संवत्सर वनातच वास्तव्य करून राहिला. त्याने पित्याकडे जाण्याचे मनात आणले नाही. पण पुढे आपल्या पित्याला दुःख भोगावे लागत असल्याने त्याचे जे हाल होत आहेत त्याची वार्ता श्रवण करताच राजपुत्राने मृत्यूस तयार होऊन पित्याकडे जाण्याचे मनात ठरविले.
तो पुन्हा वनातून पित्याकडे जाण्यास निघाला असता इंद्राने पुन्हा विप्रवेषाने त्याला परावृत्त केले.
इकडे राजा रोगाने पीडित झाल्यामुळे वसिष्ठमुनींना रोगनाशासाठी उपाय विचारू लागला. तेव्हा महाविचारी ब्रह्मपुत्र वसिष्ठ म्हणाले, "हे राजा, आता यावर एकच उपाय कर. तू एक पुत्र विकत घे आणि त्या पुत्राच्या योगाने तू यज्ञ कर, म्हणजे तू शापापासून मुक्त होऊन तुझी व्याधी नाहीशी होईल. शास्त्राप्रमाणे पुत्रांचे दहा प्रकार सांगितलेले आहेत. तेव्हा विकत घेतलेला पुत्र क्रीतपुत्र म्हणून शास्त्रसंमत आहे. राज्यातील कोणीही ब्राह्मण द्रव्यलोभाने आपला पुत्र तुला विकत देईल. त्या पुत्राच्या योगाने यज्ञ करून वरुणास संतुष्ट कर, म्हणजे तो तुला सुख प्राप्त करून देईल."
महात्म्या वसिष्ठगुरूचे भाषण ऐकून राजाला आनंद झाला. नंतर आपल्या प्रधानाला बोलावून पुत्र विकण्यास तयार असलेल्या ब्राह्मणाचा शोध करण्यास त्याला सत्वर पाठविले.
त्या राज्यात अजीगर्त नावाचा एक ब्राह्मण रहात होता. तो अत्यंत गरीबीत आपले दिवस कंठीत होता. त्याला तीन पुत्र होते. त्या निर्धन ब्राह्मणाकडे जाऊन प्रधान त्याला म्हणाला, "हे द्विजा, तुला शुनःपुच्छ, शुनःशेप व शुनो-लांगूल या नावांचे तीन पुत्र आहेत. त्यापैकी कोणताही एक पुत्र तू मला विकत दे. मला सांप्रत यज्ञकर्तव्य आहे. याबद्दल मी तुला शंभर गायी देण्यास तयार आहे."
प्रधानाचे बोलणे ऐकून भुकेने व्याकुळ झालेल्या अजीगर्ताने विचार करून आपल्या तीन पुत्रांपैकी एक पुत्र विकण्याचे ठरवले. त्याचा थोरला पुत्र आता कर्ता झाल्यामुळे त्याला देण्यास त्याचे मन होईना. धाकटयास विकत देण्यास मातेने नकार दिला. म्हणून शेवटी मधला पुत्र शुनःशेप याला विकत देण्याचे ठरविले. प्रधानाकडून शंभर गायी घेऊन अजीगतनि आपला पुत्र शुनःशेप यास प्रधानास विकत दिले.
शुनःशेपाचा स्वीकार करून राजाने नरमेध यज्ञाची तयारी केली. त्या शुनःशेपाला पशु ठरवून वधस्तंभाला बांधण्यात आले. आपल्यावर कसले तरी संकट ओढवले आहे हे जाणून तो दीनवदन होऊन रडू लागला. त्याचे सर्वांग थरथर कापू लागले. त्या बालकाची ती दयनीय अवस्था पाहून यज्ञमंडपातील मुनीही अत्यंत आक्रोश करू लागले.
राजाने नरमेधयज्ञ करण्यासाठी शुनःशेपाला यूपास बांधले. पण त्या शोकविव्हल बालकाचा वध करण्यासाठी मारेकरी हातात शस्त्र घेईनात. तो वधकर्म करणारा म्हणाला, "अरेरे, अत्यंत करुणवदन होऊन रोदन करीत असलेल्या या गरीब ब्राह्मण पुत्राचा मी कदापिही वध करणार नाही. असे सांगून तो निघून गेला.
राजा चिंतेने व्यग्र होऊन ब्राह्मणांना म्हणाला, "हे धर्मपंडितांनो, आता हा यज्ञ कसा पुरा कराल ?"
तेव्हा सर्व ब्राह्मण मंडळी आपापसात कलकलाट करू लागली. शुनःशेप तर जोरजोराने आक्रोश करीत होता. सर्वजण शोकाकुल झाले होते. त्या बालकाचा वध करण्यास कोणीच पुढे येईना. अखेर अजीगर्त उठला व राजासमोर येऊन म्हणाला, "हे नृपश्रेष्ठा, मी तुझे यज्ञकार्य करतो. तू शांत हो. पण मला विपुल द्रव्य मात्र दे म्हणजे मी सत्वर या पशूचा वध करतो. मला धनाची गरज असल्याने तुझे हे यज्ञकार्य मी खचित पूर्णत्वास नेईन. हे राजा, दुःख भोगलेला आणि निर्धन माणूस हा अत्यंत निर्दय झालेला असतो. त्याच्या ठिकाणी दयेचा पाझर फुटत नाही हे निश्चित समज. राजाने आनंदित होऊन त्या ब्राह्मणाला आणखी शंभर गायी देण्याचे वचन दिले. तेव्हा अत्यंत लोभी होऊन शुनःशेपाचा पिता आपल्या पुत्राचा वध करण्यास तयार झाला.
अजीगर्त शुनःशेपाचा वध करण्यास सिद्ध झाल्याचे पाहून व शुनःशेपाचे रडणे ऐकून तेथील उपस्थित असलेले सर्व प्रजाजन, पंडित व्याकुळ झाले व दुःखाने आक्रोश करू लागले. ते सर्वजण अजीगर्ताची निर्भर्त्सना करू लागले. ते म्हणाले, "अहो, खरोखरच प्रत्यक्ष पुत्राचा वध करणारा हा ब्राह्मण नसून केवळ पशुतुल्य, क्रूर कर्मरत असलेला साक्षात चांडाळच आहे. हा नीच अत्यंत पापी असून जणू काय पिशाच्चच आहे. द्रव्यलोभाने हा कुलनाशक आपल्या पुत्राचाही वध करीत आहे.'
अरे, महापाप्या, चांडाळा, तुझा धिक्कार असो. तू केवढे हे घोर पातक करीत आहेस. अरे प्रत्यक्ष पुत्राचा वध करून प्राप्त झालेल्या धनापासून तुला कसले सुख लाभणार आहे ? अरे, आपला स्वतःचा आत्माच आपल्या शरीरापासून पुत्ररूपाने उत्पन्न होतो हे वेदांततत्व तू जाणतोस. तरीही तू पापबुद्धीने आपल्या आत्म्याचा वध करण्यास का बरे उद्युक्त झाला आहेस ?"
अशाप्रकारे तेथील जन अजीगर्त्याची निंदा करू लागताच सर्वत्र गडबड उडाली. त्याचवेळी विश्वामित्राला दया येऊन तो राजाजवळ गेला व राजाला म्हणाला, "हे राजा, अत्यंत दुःखवेगाने रडत असलेल्या ह्या दीनवदन शुनःशेपाला मुक्त कर. तुझा ऋतु पूर्ण होऊन तुझ्या रोगाचाही नाश होईल. हिंसा हे महापातक असून दया हे सर्वोत्कृष्ट पुण्य आहे. हे राजा, कामी पुरुषांना बरे वाटावे म्हणून विधीने यज्ञाची प्रेरणा केली आहे. तेव्हा विचार करून तू स्वतःच्या शरीररक्षणासाठी दुसर्याचा प्राण घेऊन नाश करण्याचे महापाप करू नकोस. आपले शुभ होण्याची इच्छा करणार्या पुरुषास हे योग्य नव्हे. सर्व भूतांचे ठिकाणी दया दाखवून, इंद्रियांचे दमन करून, संतुष्ट चित्ताने राहिल्यास परमेश्वर प्रसन्न होत असतो. हे राजेश्वरा, सर्व प्राणिमात्र आत्मरूप आहेत असे समजावे. प्रत्येक प्राण्याला आपला जीव प्रिय आहे. तू सुद्धा स्वतःचा देह सुस्थितीत रहावा म्हणून या बिचार्या बालाची हत्या करण्यास प्रवृत्त झाला आहेस.
हे राजा, स्वतःच्या सुखाचे स्थान जो देह, त्याचे रक्षण तू करू इच्छितोस तशी इच्छा या बालकाला होणार नाही का ? हे राजा, त्याचे व तुझे पूर्वजन्मीचे तर वैर नाही ना ? त्यामुळेच का तू या निरपराध बालकाचा वध करीत आहेस ? कोणतेही वैर नसताना जो माणूस निरपराध प्राण्याचा वध करतो, तो वधलेला जीव दुसर्या जन्मी त्या वध करणार्याचाही वध करतो.
केवळ स्वतःच्या सुखासाठी धनाची अपेक्षा करणारा हा शुनःशेपाचा पिता तुला पुत्र अर्पण करिता झाला. तो खरोखरच अत्यंत दुष्ट, दुराचारी व दुर्बुद्धी आहे. एकदा तरी गयागमन, अश्वमेधयाग, नीलवृषोत्सर्ग करील अशी इच्छा धरून आपल्याला जास्त पुत्र होण्याची इच्छा धरावी.
हे राजा, आपल्या राज्यात पापकर्म करणार्या दुसर्या प्रत्येक दुष्टाच्या पापाचा सहावा भाग राजाला भोगावा लागतो. म्हणून पापकर्म करणार्यास राजाने त्यापासून परावृत्त केले पाहिजे. तू सुप्रसिद्ध अशा सूर्यवंशात जन्मास येऊनही राजा त्रिशंकूचा पुत्र होऊनही, ह्या पुत्र विकणार्या द्विजाचा निषेध का केला नाहीस ?
हे राजा, तू आर्य असूनही अनार्यांप्रमाणे वागत आहेस. हे तुला अत्यंत अयोग्य आहे. तेव्हा माझ्यासारख्या मुनिवचनाचा मान राखून तू या जणू काय मुनिपुत्राचीच मुक्तता कर. त्यामुळे तुझ्याही देहाला निश्चितपणे सुखप्राप्ती होईल.
हे राजा, अविचाराने शाप प्राप्त होऊनही मी चांडाळ झालेल्या तुझ्या पित्याला त्याच देहाने स्वर्ग प्राप्त करून दिला. म्हणून तू माझे प्रेम विचारात घेऊन तू माझे ऐक आणि या दुःखी बालकाला सत्वर मुक्त कर. राजा, ह्या राजसूयतुल्य यज्ञामध्ये मी याचक होऊन तुला विनंती करीत आहे. हे राजा, याचनाभंगाचे पातक तू जाणतोस ना ? अशाप्रकारच्या यज्ञात याचकांच्या सर्वच मागण्या राजाने पूर्ण कराव्यात, नाहीतर तुला निश्चित पातक लागेल."
विश्वामित्राचे बोलणे ऐकून राजा हरिश्चंद्र म्हणाला, "हे गाधेयमुने, हे विश्वामित्रा, मी जलोदराने अत्यंत दुःख भोगीत आहे; म्हणून मी या पुत्राला मुक्त करणार नाही. हे मागणे सोडून आपण काहीही मागा, मी आपले मनोरथ पूर्ण करीन. पण यावेळी मला या कार्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करू नका."
राजाचे हे बोलणे ऐकून विश्वामित्राने शुनःशेपाच्या म्लान वदनाकडे पाहिले. राजाबद्दल अत्यंत तिरस्कार उत्पन्न होऊन विश्वामित्र अत्यंत क्रोधायमान व संतप्त झाला.