[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
व्यासांनी पुढील कथाभाग जनमेजयास सांगण्यास सुरुवात केली. हरिश्चंद्र राजाने केलेल्या पुत्रोत्सवाचे वर्णन करून व्यास म्हणाले, "हे जनमेजया, अशाप्रकारे हरिश्चंद्र राजाने मोठया उत्साहाने पुत्रोत्सव सुरू केला. राजा आनंदात मग्न होता. त्याचा तो उत्सव चालू असता प्रत्यक्ष वरुण विप्र वेषाने तेथे आला. त्याने राजाचे कल्याण व शुभ चिंतिले. विप्रवेषधारी वरुण म्हणाला, "हे सत्यवचनी हरिश्चंद्रा, तुला वर देणारा मी वरुण आहे. माझ्या प्रसादामुळे तुला हा पुत्र झाला आहे. तेव्हा आता तू वचन दिल्याप्रमाणे सत्वर माझे यजन कर. हे राजा, माझ्या वरदानामुळे तुला दुःसह असलेले व्यंध्यत्व आज नाहीसे झाले आहे. म्हणून तू पूर्वी कबूल केल्याप्रमाणे आपला शब्द सत्य स्वरूपात आण."
वरुणाचे भाषण ऐकून राजाला दुःख झाले व तो विचार करू लागला, आता काय करावे ? नुकत्याच जन्मास आलेल्या त्या कमलमुख पुत्राचा मी वध कसा करू ? हा बलाढय लोकपाल तर विप्राचा वेष धारण करून आताच येथे प्राप्त झाला आहे. नेहमी शुभफलाची इच्छा करणार्याने देवाची अवहेलना कशी करावी ? शिवाय कोणताही प्राणी असला तरी अपत्यप्रेम महान आहे. ते नाहीसे करता येणे शक्य नाही. आता मी याचा परिहार कसा करू ? याप्रमाणे मनात फार विचार केला. अखेर धीर धरून राजा अत्यंत नम्रतेने व मृदु स्वराने वरुणाला म्हणाला, "हे सुरेश्वरा, हे करुणासागरा, खरोखरच मी आपणास दिलेल्या शब्दाप्रमाणे विधिपूर्वक वेदोक्त यज्ञ करीन व विपुल प्रमाणावर दक्षिणाही वाटीन हे अगदी सत्य. पण एकटया पुरुषास यज्ञ करता येत नाही. आपल्या पत्नीसह पुरुषाने यज्ञ करावा. सांप्रत पुत्राची माता जननशौचात आहे. पुत्र झाल्यावर पित्यास दहा दिवस व मातेस एक महिन्याने शुद्धी प्राप्त होते. तोपर्यंत ते कोणतेही शुभ कार्य करण्यास अपवित्र असतात. हे वरुणदेवा, आपण तर सर्वज्ञ आहात. आपण शाश्वत धर्म जाणता. हे जलाधिपते, ह्या कठीण प्रसंगी आपण मजवर दया करा. हे परमेश्वरा, फक्त या समयापुरती तरी आपण मला क्षमा करा.
हे राजाचे भाषण वरुणाने ऐकले व तो विचारपूर्वक म्हणाला, "हे धर्मज्ञा, खरोखरच तुझे म्हणणे अत्यंत योग्य आहे. यास्तव तुझे कल्याण असो. आता मी परत जातो. तू तुझा पुत्रजन्मोत्सव आनंदाने पार पाड. पण हे राजा, एक महिना संपताच मी परत येईन. त्यावेळी तू यज्ञाची सर्व तयारी करून ठेव."
असे सांगून तो जलाधिपती वरुण तेथून सत्वर निघून गेला. हरिश्चंद्र राजा अत्यंत आनंदित झाला. त्याने घागरीप्रमाणे ज्या गाईची कास आहे अशा अनेक गाई दान दिल्या. कोटयावधी गाई सुवर्णाने अलंकृत करून ब्राह्मणांस अर्पण केल्या. तसेच कित्येक तीलपर्वत त्याने वेदशास्त्रसंपन्न अशा ब्राह्मणांना दान दिले.
आपल्या सुपुत्राच्या मुखदर्शनाने हरिश्चंद्र राजा पूर्णपणे सुखावला. त्याने आपल्या पुत्राचे नाव रोहित असे ठेवले. यथाविधि नामाधिकरण समारंभ पार पाडल्यावर एक महिन्याने वरुण पुन्हा विप्रवेष धारण करून हरिश्चंद्राकडे आला. तो हरिश्चंद्राला म्हणाला, "हे राजराजेश्वरा, तू वचन दिल्याप्रमाणे एक महिना उलटून गेल्यावर मी आलो आहे. आता माझे सत्वर यजन कर."
वरुणराजा आल्याचे पाहून हरिश्चंद्र अत्यंत शोकविव्हल झाला. त्याने खूप विचार केला आणि अत्यंत धीर धरून त्याने वरुणाचे आदरातिथ्य केले. वरुणाची यथाविधि पूजा करून राजा नम्रभावाने हात जोडून वरुणापुढे उभा राहिला. तो वरुणास म्हणाला, "हे जलाधिपते, आपल्या आगमनाने आज माझे घर पवित्र झाले. आपल्या शुभ दर्शनाने मला अतीव आनंद झाला आहे. आता मी दिलेल्या वचनाप्रमाणे यथाविधि यजन करणे आवश्यक होते. पण आताच यज्ञ करण्याने मला दोष लागेल. कारण दंतविहिन पशु यज्ञाला योग्य होत नाही. तस्मात् या पुत्राला दंत प्राप्त होईपर्यंत आपण थांबा. त्यानंतर अत्यंत समारंभाने मी आपले यजन करण्यासाठी महाऋतु करीन. आपण यावर विश्वास ठेवा."
हरिश्चंद्राचे धर्मतत्पर भाषण ऐकून वरुणालाही त्याचे म्हणणे पूर्णपणे पटले व तो हरिश्चंद्राचे विचार मान्य करून तेथून चालता झाला. वरुण समाधान पावून निघून गेल्याचे अवलोकन करताच राजा हरिश्चंद्र अतिशय आनंदित झाला आणि पुन्हा आपल्या संसारसुखाचा उपभोग घेत क्रीडा करू लागला.
पुढे काही दिवसांनी राजपुत्रास दंतप्राप्ती झाली. राजपुत्रास दंतोत्पत्ति झाल्याचे जाणून वरुण पुन्हा विप्रवेषाने राजाकडे आला. राजाने त्याला सन्मानपूर्वक आसन दिले, अर्ध्य देऊन त्याचा उचित गौरव केला आणि विनयपूर्वक हात जोडून राजा म्हणाला, "हे सुरेश्वरा, हे वरुण देवा विपुल महादक्षिणांनी युक्त असा महायज्ञ मी आता खचितच आनंदाने केला असता. पण या बालकाचे चौल होणे आवश्यक आहे. कारण तो आज गर्भावस्थेतील केसांनी युक्त असल्याने तो यज्ञार्थ पशु म्हणून अयोग्य आहे. तेव्हा हे करुणाकरा, याचे चौल होईपर्यंत आपण थांबा. याचे चौल होताच मी सत्वर महायज्ञ करीन. महाराज, आपण सनातन धर्म जाणणारे आहात. त्यामुळे माझे हे बोलणे आपणास योग्यच वाटेल. माझ्याकडून अधर्म न व्हावा एवढीच माझी इच्छा आहे."
"हे धर्मज्ञ राजा, मी यावेळीसुद्धा परत जातो. पण तू शब्द दिल्याप्रमाणे वर्तणूक करण्यास टाळाटाळ करीत आहेस हे योग्य नव्हे. तुझ्याजवळ यज्ञसामग्री सिद्ध असताना तू काहीतरी धर्मकारण काढून माझी प्रतारणा करीत आहेस. हे तुला शोभणारे नव्हे, केवळ पुत्रमोहाने तू युक्त झाला असल्याने मला वेळोवेळी तू फसवीत आहेस. हे राजा, तू इक्ष्वाकु वंशात जन्म घेतलेला आहेस. तुला असत्य भाषण करणे योग्य नव्हे. तुझ्या कुळाची परंपरा तू रक्षण कर. तू शक्यतो लवकर या पुत्राचा चूडाकरण विधि करून घे आणि माझे सत्वर यजन कर, नाही तर मी संतप्त होऊन तुला खरोखरच शाप देईन, हे ध्यानात घे."
असे सांगून वरुण त्वरेने राजप्रासादातून निघून गेला. राजाही समाधानाने पुन्हा आनंदात काळ काढू लागला. यथावकाश राजाने आपल्या पुत्राचा चूडाकरण विधि केला. त्यावेळी खूप मोठा उत्सव चालू असता वरुणदेव पुन्हा विप्रवेष घेऊन अयोध्यापति हरिश्चंद्राकडे आला. त्यावेळी राजाचे जवळच राणी पुत्राला मांडीवर घेऊन बसली होती. यावेळी वरुण जरी विप्रवेषाने आला होता तरी तो प्रतिअग्नीप्रमाणे भासत होता, त्याला पहाताच राजा शोकाने विव्हल झाला. तरीही त्याने मनात धीर धरून वरुणाचे स्वागत करून त्याला उत्तम आसन दिले. राजाने त्याचे विधिपूर्वक पूजन केले व नम्रतेने वरुणापुढे हात जोडून तो म्हणाला, "महाराज, आपल्याला दिलेल्या वचनाप्रमाणे मी आज यजन कार्य करतो. पण सुरवरा, माझी एक नम्र विनंती आहे ती आपण केवळ ऐकून घ्या. हे प्रभो, खरोखरच आपणास माझे बोलणे ऐकून घेणे योग्य वाटत असेल तरच मी बोलतो."
वरुण म्हणाला, "राजा, शब्दाप्रमाणे तू आपले कर्तव्य पार पाड. पण तुझे भाषण मी श्रवण करतो." राजा म्हणाला, "हे सुरेश्वरा, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांना संस्कृत झाल्यावरच द्विजत्व प्राप्त होते. त्यापूर्वी ते शूद्र असतात असे धर्मपंडितांचे म्हणणे आहे. तेव्हा शूद्र बालक स्वामीकर्म करण्यास आज योग्य नाही. म्हणून उपनयन झाल्यावर हा बालक यजनविधीस योग्य होईल. वेदात सांगितलेल्या सिद्धांतात असे स्पष्ट म्हटले आहे. तसेच राजा अकराव्या वर्षी, ब्राह्मण आठव्या वर्षी, वैश्य बाराव्या वर्षी उपनयनास योग्य होतो. त्याच वेळी त्यांचे उपनयन करावे असे शास्त्र सांगते. हे दयाधन सुरेश्वरा, आपण सहानुभूतीने विचार करा आणि मजवर कृपा करणार असाल तर या पुत्राचे उपनयन होईपर्यंत आपण थांबा, म्हणजे उपनयनाने याला द्विजत्व प्राप्त झाल्यावर या पुत्ररूप पशूच्या साह्याने मी उत्कृष्ट यज्ञ करीन. हे धर्ममार्तंडा, हे सर्वशास्त्रपारंगता, हे लोकपाला, हे प्रभो, आपणास माझे भाषण योग्य आहे असे वाटत असेल तर आपण स्वस्थानी जा व मजवर दया करा. यावेळी मला क्षमा करा."
राजाचे ते योग्य असे भाषण ऐकून विचारी वरुण अत्यंत दयाशील होऊन सत्वर निघून गेला. त्यामुळे राजाही सुप्रसन्न होऊन उत्सवात मग्न झाला. आता पुन्हा पुत्राचे सुख आपणाला काही कालपर्यंत लाभणार म्हणून तो आनंदाने पुत्रसान्निध्यात रममाण झाला.
राजा आपली राजकर्तव्ये पार पाडू लागला. धर्मतत्पर राहून तो प्रजाजनांना सुख देऊ लागला. अशाप्रकारे राजपुत्राला दहा वर्षे पूर्ण झाली. आता तो उपनयनास योग्य झाल्याचे अवलोकन करून राजाने आपल्या राजवैभवाला साजेल अशा थाटात समारंभ उत्सव करण्याचे ठरविले. धर्मशास्त्र जाणणारे ब्राह्मण व सचिव यांच्या सल्याने त्याने उपनयन विधीची उत्तम तयारी केली. पुत्राला अकरावे वर्ष प्राप्त होताच राजाने व्रतबंधविधी कसा पार पाडायचा याची काळजीपूर्वक मनामध्ये आखणी केली. व्रतबंधाचा समारंभ सुरू होऊन राजपुत्राचा उपनयनविधि योग्यप्रकारे पार पडला. पुत्राचे उपनयन होऊन त्याला द्विजत्व प्राप्त झाल्याचे अवलोकन करताच वरुण अकस्मितपणे विप्रवेष धारण करून तेथे उपस्थित झाला. राजाने प्रसन्न वदनाने त्याचे स्वागत केले, त्याला शुभासन दिले व तो हात जोडून वरुणाला म्हणाला, "हे सुरेश्वरा, आपल्या कृपाप्रसादाने मला हा पुत्र लाभला आणि माझे वंध्यत्व नाहीसे झाले. माझा दुःखाचाही नाश झाला. याचे उपनयन केल्यामुळे याला आता द्विजत्व प्राप्त झाले असून हा आता यज्ञायोग्य पशु झाला आहे हे खरेच. पण हे धर्मज्ञा, आता शुभकाल पाहून विपुल अशा महादक्षिणांनी युक्त असा उत्तम महायज्ञ करण्याची माझी इच्छा आहे. माझ्या या बोलण्याचे मी सत्यतेने पालन करीन. तेव्हा आता समावर्तन कर्म झाल्यावर मी अत्यंत समारंभपूर्वक आपले यजन करून आपले मनोरथ सिद्धीस नेईन. म्हणून यावेळी मजवर दया करून थोडे दिवसपर्यंत थांबा."
वरुण रागाने म्हणाला, "राजा, तू धर्मज्ञाचा आव आणून वेळोवेळी मला काहीतरी कारणे सांगत आहेस. तुझी कारणे योग्य व संयुक्तिक असली तरी त्यामुळे माझी नित्य फसवणूक होत आहे. पण तरीही राजेंद्रा, मी आज विश्वास ठेवून परत जात आहे. तू समावर्तनकर्म करशील त्याचवेळी मी परत येईन."
असे बोलून वरुण त्वेषाने निघून गेला. राजालाही आनंद झाला. आपले कार्य करण्यास तो तत्पर राहू लागला. पण वरुण नित्यनेमाने प्रत्येक शुभकर्माचे वेळी यज्ञकार्य मनात धरून येत असतो हे जाणून तो अतिशय चतुर असलेला राजकुमार स्वतःशीच विचार करू लागला. खरोखरच प्रत्यक्ष देव येथे असताही आपला पिता दःखी का होतो ? वरुणाच्या आगमनामुळे प्रत्येक वेळी आपल्या पित्याची शोकविव्हल अवस्था होते याचे कारण काय ?
पण राजकुमाराला राजाचे दुःखाचे कारण कळले नाही. तेव्हा विचार करून तो विश्वासू लोकांना राजाच्या दुःखाचे कारण युक्तीप्रयुक्तीने विचारू लागला. तेव्हा त्याला राजाच्या दुःखाचे खरे कारण कळले.
आपला वध होणार हे लक्षात येताच राजपुत्राने मंत्रीपुत्राच्या सहकार्याने राजप्रसादातून दूर पळून जायचे ठरविले व योग्य संधी पाहून तो दूर वनात निघून गेला. कोणालाही जाणीव न देता आपला पुत्र यथेष्ट दूर कुठे तरी निघून गेला. हे समजताच राजाने शोकाकुल होऊन त्याच्या शोधासाठी सर्वत्र दूत पाठविले.
इकडे समावर्तनाचा काल प्राप्त होताच वरुण राजाकडे आला. अत्यंत क्रोधायमान होऊन तो सारखे राजाला म्हणू लागला, "राजा, आता त्वरित यज्ञ कर." राजा शोकाने व्याकुळ झाला होता.
राजा हात जोडून विनम्र भावाने म्हणाला, "महाराज, आता मी स्वामीकार्य कसे पार पाडू ? भयग्रस्त होऊन माझा पुत्र कोठेतरी निघून गेला आहे. तो कोठे गेला आहे हे मलाही अद्यापि ज्ञात नाही. हे जलाधिपते, दुर्गम पर्वत प्रदेशावर व इतर मुनींच्या आश्रमातही माझे दूत राजपुत्राचा शोध करीत आहेत पण तो सापडला नाही. तेव्हा हे सुरेश्वरा, पुत्र निघून गेल्यामुळे मी आता कसे कर्तव्य करावे ते आपण मला सांगा. हे सर्वज्ञा, आपण जाणताच आहात की यात माझा काहीही दोष नाही."
राजाचे हे शोकविव्हल भाषण ऐकूनही आपली वेळोवेळी फसवणूक केल्यामुळे वरुण संतप्त झाला होता त्याने राजाला सत्वर शाप दिला. वरुण म्हणाला, "हे राजा, मला वचन देऊनही तू माझी नित्य फसवणूक केलीस, म्हणून तू दुर्धर अशा जलोदर व्याधीने पीडला जाशील."
राजाला शाप देऊन वरुण निघून गेल्यावर राजाला जलोदराचा असाध्य विकार जडला. त्यामुळे राजा दुःखी झाला.