श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
सप्तमः स्कन्धः
चतुर्दशोऽध्यायः


वरुणकृपया शैव्यायां पुत्रोप्तत्तिवर्णनम्

व्यास उवाच -
विचिन्त्य मनसा कृत्यं गाधिसूनुर्महातपाः ।
प्रकल्प्य यज्ञसम्भारान्मुनीनामन्त्रयत्तदा ॥ १ ॥
मुनयस्तं मखं ज्ञात्वा विश्वामित्रनिमन्त्रिताः ।
नागताः सर्व एवैते वसिष्ठेन निवारिताः ॥ २ ॥
गाधिसूनुस्तदाज्ञाय विमनाश्चातिदुःखितः ।
आजगामाश्रमं तत्र यत्रासौ नृपतिः स्थितः ॥ ३ ॥
तमाह कौशिकः क्रुद्धो वसिष्ठेन निवारिताः ।
नागताः ब्राह्मणाः सर्वे यज्ञार्थं नृपसत्तम ॥ ४ ॥
पश्य मे तपसः सिद्धिं यथा त्वां सुरसद्मनि ।
प्रापयामि महाराज वाञ्छितं ते करोम्यहम् ॥ ५ ॥
इत्युक्त्वा जलमादाय हस्तेन मुनिसत्तमः ।
ददौ पुण्यं तदा तस्मै गायत्रीजपसम्भवम् ॥ ६ ॥
दत्त्वाथ सुकृतं राज्ञे तमुवाच महीपतिम् ।
यथेष्टं गच्छ राजर्षे त्रिविष्टपमतन्द्रितः ॥ ७ ॥
पुण्येन मम राजेन्द्र बहुकालार्जितेन च ।
याहि शक्रपुरीं प्रीतः स्वस्ति तेऽस्तु सुरालये ॥ ८ ॥
व्यास उवाच -
इत्युक्तवति विप्रेन्द्रे त्रिशङ्कुस्तरसा ततः ।
उत्पपात यथा पक्षी वेगवांस्तपसो बलात् ॥ ९ ॥
उत्पत्य गगने राजा गतः शक्रपुरीं यदा ।
दृष्टो देवगणैस्तत्र क्रूरश्चाण्डालवेषभाक् ॥ १० ॥
कथितोऽसौ सुरेन्द्राय कोऽयमायाति सत्वरः ।
गगने देववद्वा यो दुर्दर्शः श्वपचाकृतिः ॥ ११ ॥
सहसोत्थाय शक्रस्तमपश्यत्पुरुषाधमम् ।
ज्ञात्वा त्रिशङ्कुमपि स निर्भर्त्स्य तरसाब्रवीत् ॥ १२ ॥
श्वपच क्व समायासि देवलोके जुगुप्सितः ।
याहि शीघ्रं ततो भूमौ नात्र स्थातुं त्वयोचितम् ॥ १३ ॥
इत्युक्तः स्खलितः स्वर्गाच्छक्रेणामित्रकर्शन ।
निपपात तदा राजा क्षीणपुण्यो यथामरः ॥ १४ ॥
पुनश्चुक्रोश भूपालो विश्वामित्रेति चासकृत् ।
पतामि रक्ष दुःखार्तं स्वर्गाच्चलितमाशुगम् ॥ १५ ॥
तस्य तत्क्रन्दितं राजन् पतितः कौशिको मुनिः ।
श्रुत्वा तिष्ठेति होवाच पतन्तं वीक्ष्य भूपतिम् ॥ १६ ॥
वचनात्तस्य तत्रैव स्थितोऽसौ गगने नृपः ।
मुनेस्तपःप्रभावेण चलितोऽपि सुरालयात् ॥ १७ ॥
विश्वामित्रोऽप्यपः स्पृष्ट्वा चकारेष्टिं सुविस्तराम् ।
विधातुं नूतनां सृष्टिं स्वर्गलोकं द्वितीयकम् ॥ १८ ॥
तस्योद्यमं तथा ज्ञात्वा त्वरितस्तु शचीपतिः ।
तत्राजगाम सहसा मुनिं प्रति तु गाधिजम् ॥ १९ ॥
किं ब्रह्मन् क्रियते साधो कस्मात्कोपसमाकुलः ।
अलं सृष्ट्या मुनिश्रेष्ठ ब्रूहि किं करवाणि ते ॥ २० ॥
विश्वामित्र उवाच -
स्वं निवासं महीपालं च्युतं त्वद्‌भुवनाद्‌ विभो ।
नयस्व प्रीतियोगेन त्रिशङ्कुं चातिदुःखितम् ॥ २१ ॥
व्यास उवाच -
तस्य तं निश्चयं ज्ञात्वा तुराषाडतिशङ्‌कितः ।
तपोबलं विदित्वोग्रमोमित्योवाच वासवः ॥ २२ ॥
दिव्यदेहं नृपं कृत्वा विमानवरसंस्थितम् ।
आपृच्छ्य कौशिकं शक्रोऽगमन्निजपुरीं तदा ॥ २३ ॥
गते शक्रे तु वै स्वर्गं त्रिशङ्कुसहिते ततः ।
विश्वामित्रः सुखं प्राप्य स्वाश्रमे सुस्थिरोऽभवत् ॥ २४ ॥
हरिश्चन्द्रोऽथ तच्छ्रुत्वा विश्वामित्रोपकारकम् ।
पितुः स्वर्गमनं कामं मुदितो राज्यमन्वशात् ॥ २५ ॥
अयोध्याधिपतिः क्रीडां चकार सह भार्यया ।
रूपयौवनचातुर्ययुक्तया प्रीतिसंयुतः ॥ २६ ॥
अतीतकाले युवती न सा गर्भवती ह्यभूत् ।
तदा चिन्तातुरो राजा बभूवातीव दुःखितः ॥ २७ ॥
वसिष्टस्याश्रमं गत्वा प्रणम्य शिरसा मुनिम् ।
अनपत्यत्वजां चिन्तां गुरवे समवेदयत् ॥ २८ ॥
दैवज्ञोऽसि भवान्कामं मन्त्रविद्याविशारदः ।
उपायं कुरु धर्मज्ञ सन्ततेर्मम मानद ॥ २९ ॥
अपुत्रस्य गतिर्नास्ति जानासि द्विजसत्तम ।
कस्मादुपेक्षसे जानन् दुःखं मम च शक्तिमान् ॥ ३० ॥
कलविंकास्त्विमे धन्या ये शिशुं लालयन्ति हि ।
मन्दभाग्योऽहमनिशं चिन्तयामि दिवानिशम् ॥ ३१ ॥
व्यास उवाच -
इत्याकर्ण्य मुनिस्तस्य निर्वेदमिश्रितं वचः ।
सञ्चिन्त्य मनसा सम्यक् तमुवाच विधेः सुतः ॥ ३२ ॥
वसिष्ठ उवाच -
सत्यं ब्रूहि महाराज संसारेऽस्मिन्न विद्यते ।
अनपत्यत्वजं दुःखं यत्तथा दुःखमद्‌भुतम् ॥ ३३ ॥
तस्मात्त्वमपि राजेन्द्र वरुणं यादसां पतिम् ।
समाराधय यत्‍नेन स ते कार्यं करिष्यति ॥ ३४ ॥
वरुणादधिको नास्ति देवः सन्तानदायकः ।
तमाराधय धर्मिष्ठ कार्यसिद्धिर्भविष्यति ॥ ३५ ॥
दैवं पुरुषकारश्च माननीयाविमौ नृभिः ।
उद्यमेन विना कार्यसिद्धिः सञ्जायते कथम् ॥ ३६ ॥
न्यायतस्तु नरैः कार्य उद्यमस्तत्त्वदर्शिभिः ।
कृते तस्मिन्भवेत्सिद्धिर्नान्यथा नृपसत्तम ॥ ३७ ॥
इति तस्य वचः श्रुत्वा गुरोरमिततेजसः ।
प्रणम्य निर्ययौ राजा तपसे कृतनिश्चयः ॥ ३८ ॥
गङ्गातीरे शुभे स्थाने कृतपद्मासनो नृपः ।
ध्यायन्पाशधरं चित्ते चचार दुश्चरं तपः ॥ ३९ ॥
एवं तपस्यतस्तस्य प्रचेता दृष्टिगोचरः ।
कृपयाभून्महाराज प्रसन्नमुखपङ्कजः ॥ ४० ॥
हरिश्चन्द्रमुवाचेदं वचनं यादसां पतिः ।
वरं वरय धर्मज्ञ तुष्टोऽस्मि तपसा तव ॥ ४१ ॥
राजोवाच -
अनपत्योऽस्मि देवेश पुत्रं देहि सुखप्रदम् ।
ऋणत्रयापहारार्थमुद्यमोऽयं मया कृतः ॥ ४२ ॥
नृपस्य वचनं श्रुत्वा प्रगल्भं दुःखितस्य च ।
स्मितपूर्वं ततः पाशी तमाह पुराः स्थितम् ॥ ४३ ॥
वरुण उवाच -
पुत्रो यदि भवेद्‌राजन् गुणी मनसि वाञ्छितः ।
सिद्धे कार्ये ततः पश्चात्किं करिष्यसि मे प्रियम् ॥ ४४ ॥
यदि त्वं तेन पुत्रेण मां यजेथा विशङ्‌कितः ।
पशुबन्धेन तेनैव ददामि नृपते वरम् ॥ ४५ ॥
राजोवाच -
देव मे मास्तु वन्ध्यत्वं यजिष्येऽहं जलाधिप ।
पशुं कृत्वा सुतं पुत्रं सत्यमेतद्‌ब्रवीमि ते ॥ ४६ ॥
वन्ध्यत्वे परमं दुःखमसह्यं भुवि मानद ।
शोकाग्निशमनं नॄणां तस्माद्देहि सुतं शुभम् ॥ ४७ ॥
वरुण उवाच -
भविष्यति सुतः कामं राजन् गच्छ गृहाय वै ।
सत्यं तद्वचनं कार्यं यद्‌ब्रवीषि ममाग्रतः ॥ ४८ ॥
व्यास उवाच -
इत्युक्तो वरुणेनासौ हरिश्चन्द्रो गृहं ययौ ।
भार्यायै कथयामास वृत्तान्तं वरदानजम् ॥ ४९ ॥
तस्य भार्याशतं पूर्णं बभूवातिमनोहरम् ।
पट्टराज्ञी शुभा शैव्या धर्मपत्‍नी पतिव्रता ॥ ५० ॥
काले गतेऽथ सा गर्भं दधार वरवर्णिनी ।
बभूव मुदितो राजा श्रुत्वा दोहदचेष्टितम् ॥ ५१ ॥
कारयामास विधिवत्संस्कारान्नृपतिस्तदा ।
मासेऽथ दशमे पूर्णे सुषुवे सा शुभे दिने ॥ ५२ ॥
ताराग्रहबलोपेते पुत्रं देवसुतोपमम् ।
पुत्रे जाते नृपः स्नात्वा ब्राह्मणैः परिवेष्टितः ॥ ५३ ॥
चकार जातकर्मादौ ददौ दानानि भूरिशः ।
राज्ञश्चातिप्रमोदोऽभूत्पुत्रजन्मसमुद्‌भवः ॥ ५४ ॥
बभूव परमोदारो धनधान्यसमन्वितः ।
विशेषदानसंयुक्तो गीतवादित्रसंकुलः ॥ ५५ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां सप्तमस्कन्धे
वरुणकृपया शैव्यायां पुत्रोप्तत्तिवर्णनं नाम चतुर्दशोऽध्यायः ॥ १४ ॥


त्रिशंकूला स्वर्गप्राप्ती व हरिश्चंद्र राजाला पुत्रप्राप्ती -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

विश्वामित्र ऋषींनी राजाला शापमुक्त कसे करावे आणि राजाला स्वर्गाप्रत कसे पोहोचवावे याबद्दल खूप विचार केला. त्यांनी एक मोठा यज्ञ करायचे ठरविले. सर्व यज्ञसामग्री त्यांनी जुळविली व ब्राह्मणांना निमंत्रणे दिली. अशाप्रकारे यज्ञाची सर्व सिद्धता झाली असता ही वार्ता वसिष्ठमुनींना समजताच त्यांनी यज्ञास उपस्थित रहाण्यापासून इतर सर्व ऋषिमुनींना परावृत्त केले. त्यामुळे यज्ञास कोणीच गेले नाही. हा प्रकार लक्षात येताच महर्षि विश्वामित्र अत्यंत दुःखी होऊन उदास झाला. अखेर तो त्रिशंकूकडे गेला व त्याला म्हणाला, "हे राजेंद्रा, वसिष्ठांनी ब्राह्मणांना परावृत्त केले त्यामुळे माझ्या यज्ञास कोणीही ब्राह्मण आले नाहीत. पण तरीही तू चिंता करू नकोस. आता तू माझे तपःसामर्थ्य किती आहे ते पहाच. मी तुला याच देहाने स्वर्गलोकात पोहोचवतो आणि तुझी इच्छा पूर्ण करतो."

असे बोलून विश्वामित्र हातात उदक घेऊन उभे राहिले आणि आपण केलेल्या गायत्री जपाचे सर्व पुण्य त्यांनी राजाला दिले व पुण्यदानाचे उदक राजाच्या हातावर सोडून ते म्हणाले, "हे राजश्रेष्ठा, बराच काल गायत्री जप करून मी जे पुण्य प्राप्त करून घेतले आहे ते तू घे, आणि अत्यंत समाधानाने तू यथेष्ट स्वर्गारोहण कर. तेथील अमरावती नगरीत जाऊन तू तुझे मनोरथ पूर्ण करून घे. हे राजा, तुझे कल्याण होवो."

महर्षी विश्वामित्रांचे हे भाषण पूर्ण होताच त्या ऋषींच्या तपःसामर्थ्यामुळे राजा त्रिशंकू अत्यंत वेगाने तेथून उडाला व एखाद्या पक्षाप्रमाणे स्वर्गाकडे उंच जाऊ लागला. अशाप्रकारे अवकाशात संचार करीत करीत तो अमरावती नगरीप्रत येऊन पोहोचला. विश्वामित्रांच्या तपाच्या सामर्थ्याने राजा स्वर्गात आला.

असा अकल्पितपणे कोणी एक चांडाळ अत्यंत मलिन स्वरूपात स्वर्गात येऊन प्राप्त झाल्याबरोबर देवलोकांत गडबड उडाली. त्यांनी सत्वर इंद्राकडे प्रयाण केले. सर्व देव इंद्राला म्हणाले, "हे पुरंदरा, आकाशमार्गाने स्वर्गाप्रत येणारा हा कुणीतरी चांडाळ असून आम्हाला त्याचे दर्शन अगदी असह्य झाले आहे. त्याच्याकडे नुसते पहाणेही आम्हाला दुःखदायक आहे."

हे देवांचे भाषण ऐकताच इंद्र त्वरेने उठला आणि सत्वर तेथे आला. तो अधम अवस्थेतील चांडाळ त्याच्या नजरेस पडला. इंद्राने त्याला सत्वर ओळखले व त्याने त्रिशंकूची अत्यंत निर्भर्त्सना केली. अत्यंत रागाने इंद्र त्याला म्हणाला, "हे निंद्य चांडाळा, अरे तुझ्यासारख्याला स्वर्ग योग्य नसताही तू या देवलोकात का प्राप्त झालास ? तू अत्यंत त्वरेने परत भूमीवर जा. तुला स्वर्गात वास्तव्य करता येणार नाही. कारण तू चांडाळ असून तुझी येथे येण्याची योग्यता नाही."

असे इंद्राने राजाला सांगितले व त्याला स्वर्गातून ढकलून दिले. तेव्हा स्वर्गापासून च्युत झालेला त्रिशंकू वेगाने भूमीकडे येऊ लागला. खाली पडत असताना तो म्हणाला, "हे विश्वामित्रमुने, मला स्वर्गातून घालवून दिले असून आता आपण माझे रक्षण करा. मी अत्यंत दुःखविव्हल झालो आहे. हे मुनीश्रेष्ठा, मला वाचवा," खाली येत असता राजाने अत्यंत आक्रोश केला.

राजाचा आक्रोश कानी पडताच विश्वामित्रमुनि लगेच म्हणाले, "हे राजा, निश्चिंत मनाने तेथेच थांब." तेव्हा विश्वामित्रांचे हे शब्द कानी पडताच त्या महर्षीच्या तपःसामर्थ्यामुळे त्रिशंकू च्युत झाला असताही आकाशात अधांतरी तरंगत राहिला.

विश्वामित्राने विचार केला व आपल्यावर उपकार करणार्‍या राजाकरता त्याने प्रतीसृष्टी निर्माण करण्याचे ठरविले. दुसरी सृष्टी व दुसरा स्वर्ग निर्माण करण्याचा निश्चय करून त्याने उदक घेतले. त्याने भगवतीसाठी यज्ञ करण्यास सुरुवात केली. त्रिशंकूसाठी प्रतीस्वर्ग व प्रतीसृष्टी निर्माण करण्याचे विश्वामित्राने ठरविले आहे हे समजल्यावर देवराज इंद्र चिंतेत पडला. तो शचिपती खरोखरच घाबरून गेला.

इंद्र त्वरेने विश्वामित्राकडे आला. त्याने नम्रतापूर्वक विचारले, "हे महाभाग्यवान मुने, आपण हे काय आरंभले आहे ? आपणाला इतके क्रुद्ध होण्याचे काय कारण आहे ? हे महर्षे, आपण प्रतीसृष्टी निर्माण करण्याचा विचार सोडून द्या. मी आपले कोणतेही मनोरथ पूर्ण करण्यास तयार आहे !"

इंद्राचे ते भाषण ऐकून विश्वामित्र उत्तरले, "हे इंद्रा, स्वर्गापासून ढळल्यामुळे राजा त्रिशंकू अत्यंत दुःखी झाला आहे. तेव्हा त्याचे निवारण होण्यासाठी आपण अत्यंत आदराने व प्रेमाने त्रिशंकूला स्वर्गाप्रत घेऊन जा."

विश्वामित्रमुनी अत्यंत निश्चयाने म्हणाले, इंद्राने खूप प्रयत्‍न करूनही विश्वामित्र आपल्या निश्चयापासून परावृत्त होईनात. अखेर विश्वामित्रांचे तपःसामर्थ्य जाणून प्रतीसृष्टीपासून निर्माण होणारे भय लक्षात घेऊन विश्वामित्रांच्या उग्र तपोबलाने इंद्र दीन झाला व विश्वामित्राचे मागणे त्याने मान्य केले.

अवकाशात स्थिर असलेल्या त्रिशंकूचा देह इंद्राने दिव्य केला आणि त्रिशंकूला एका शुभ विमानात बसवून विश्वामित्रांचा निरोप घेऊन इंद्र स्वर्गात परत गेला. आपल्या तपोबलाने त्रिशंकूला स्वर्गप्राप्ती करून दिल्यावर विश्वामित्राला अत्यंत समाधान वाटले व ते आपल्या आश्रमात येऊन सुखाने कालक्रमणा करू लागले.

विश्वामित्राने आपल्या तपःसामर्थ्याने शापमुक्त करून आपल्या पित्याला यथेच्छ स्वर्गाप्रत पोहोचविले ही बातमी हरिश्चंद्राला समजताच त्याला अत्यंत आनंद व समाधान वाटले आणि तो अत्यंत धर्मतत्परतेने आचरण करून सुखाने राज्य करू लागला.

हरिश्चंद्र राजाला शंभर भार्या होत्या. त्यापैकी शिबिराजाची कन्या त्याची पट्टराणी होती. त्या सुंदर, मनोहर आणि रूपलक्षणसंपन्न युवतीवर त्याचे अत्यंत प्रेम असल्यानेच तो तिच्याबरोबर संसारसुखोपभोगात मग्न असे. बरेच दिवस निघून गेले. पण राजाला पुत्रप्राप्ती झाली नाही. त्या स्त्रीच्या पोटी संतान होण्याचे कुठलेही लक्षण आढळेना. तेव्हा हरिश्चंद्र राजाला अत्यंत काळजी निर्माण झाली. सर्व ऐश्वर्ये प्राप्त झालेला तो अयोध्यापती अत्यंत दुःखाकुल झाला.

अशा शोकमग्न अवस्थेत असताना तो विचारपूर्वक वसिष्ठ गुरूंच्या आश्रमात गेला. वसिष्ठ मुनींना विनम्रभावाने प्रणाम करून हात जोडून तो उभा राहिला. तो म्हणाला, "हे महर्षे, सर्व सुखे असूनही अपत्यसंभवाचे लक्षण मला दिसून येत नाही. त्यामुळे मी अत्यंत शोकमग्न झालो आहे. हे मान्या, हे धर्मज्ञा, आपण थोर असून आपले सामर्थ्य अद्‌भुत आहे. आपण मंत्रविद्या जाणत आहात. आपण दैवज्ञही आहात. सांप्रत मला पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून काय करावे अथवा कोणता यज्ञ करावा ते सांगा.

हे ब्राह्मणश्रेष्ठा, आपणास सर्व काही विदीतच आहे की अनपत्य पुरुषाला उत्तम गति मिळत नाही. हे धर्मवचन आपण जाणीत असूनही आपण माझे दुःख का बरे निवारण करीत नाही ? आपण माझ्या दुःखाची कल्पना असूनही उपेक्षा का करीत आहात ? हे मुनिश्रेष्ठा, हे येथेच पहा ना, आपल्या पिलांचे लाड पुरवीत असलेल्या या चिमण्या खरोखरीच धन्य आहेत. पण मी मात्र दुर्भागी असून दिवस - रात्र दुःखाने एकसारखा तळमळत आहे, पुत्राविषयी चिंता करीतच काळ काढीत आहे. हे वसिष्ठ गुरु, आपणाला हे योग्य आहे असे वाटते काय ? सांगा." राजाचे व्याकुळ भाषण ऐकून वसिष्ठ मुनीही चिंताग्रस्त झाले. राजाचे दुःख जाणून ते विचार करू लागले. ते राजाला म्हणाले, "हे अयोध्यापते तुझे बोलणे योग्य व सत्यच आहे. खरोखरच जगात या दुःखाशिवाय दारुण असे दुःख नाही. अनपत्य पुरुषाचे दुःख फारच घोर आहे. ह्या सर्व संसारातले हे महादुःख आहे हे तर खरेच. हे राजा पुत्रप्राप्तीसाठी तू आता यज्ञ कर व यज्ञात जलचरांचा अधिपति जो वरुण त्याची आराधना कर. तो तुला पुत्र प्राप्त करून देईल. संतान देण्यासार्ठ वरूणापेक्षा दुसरा कोणताही देव जास्त श्रेष्ठ नाही. म्हणून हे धर्मपरायणा, तू वरुणाचीच आराधना कर म्हणजे तुझे मनोरथ सफल होईल. याबद्दल विश्वास ठेव.

दैव बलवत्तर असले तरी माणसाने दैवाबरोबर प्रयत्‍नांनाही मान दिला पाहिजे. माणसाने उद्योग केला नाही तर कार्य कसे सिद्धीस जाणार ? याकरता प्राज्ञ पुरुषांनी कार्यसिद्धीसाठी उद्योग केला पाहिजे. पण तोही न्यायाने करावा. हे नृपश्रेष्ठा उद्योग केला तरच कार्य सिद्धीस जाते. नाही तर कार्यसिद्धी होत नाही."

आपल्या महातेजस्वी अशा वसिष्ठ गुरुचे भाषण ऐकल्यावर हरिश्चंद्र राजाने गुरूला नम्रतापूर्वक प्रणाम केला. व वरुणाला प्रसन्न करून घेण्याचा राजाने निश्चय केला. तेथून निघून राजा गंगेच्या तीरावर आला. त्याने एक शुभ असे स्थान शोधून काढले. तेथे जाऊन शुचिर्भूत होऊन राजाने पद्मासन घातले व तो अत्यंत दारुण तप करू लागला. वरुणाचे चिंतन करीत तो ध्यानस्थ बसला. अशाप्रकारे अत्यंत प्रखर तपश्चर्या केल्यावर वरुण राजाला प्रसन्न झाला. त्याने हरिश्चंद्रापुढे अवतीर्ण होऊन राजाला आपले कृपादर्शन दिले. त्यानंतर तो जलचरांचा अधिपती वरुण म्हणाला, "हे राजेंद्रा, हे धर्मज्ञा, मी तुझे हे घोर तप अवलोकन करून तृप्त झालो. आहे. अत्यंत संतुष्ट होऊन मी तुला वर देतो आहे. तेव्हा तुझे इच्छित असेल तो वर माग."

वरुण प्रसन्न झाल्याने राजाला अत्यानंद झाला. तो वरुणाला म्हणाला, "हे सुरेश्वरा, मला अपत्य नसल्याने मी अत्यंत दुःखी आहे. पुत्रप्राप्ती शिवाय पुरुष तिन्ही ऋणांतून मुक्त होत नाही असे शास्त्र सांगते. तेव्हा उत्तम गति प्राप्त व्हावी म्हणून मला आपण सुखदायक पुत्र प्राप्त करून द्या. केवळ ऋणमुक्त होता यावे म्हणून मी आपली प्रार्थना करीत आहे."

विनापत्य असल्याने दुःखपीडित झालेल्या त्या राजाचे भाषण ऐकून वरुण समाधानाने हसला व म्हणाला, "हे राजा, जर तुला सर्वगुणसंपन्न, सुलक्षणांनी युक्त असा तुझ्या मनाप्रमाणे अत्यंत उत्कृष्ट पुत्र प्राप्त झाला तर तू माझ्यासाठी प्रिय असे काय करशील ? हे राजा, मी तुला योग्य तेच सांगत आहे. तुला पुत्र झाल्यावर तू कसलीही शंका मनात न बाळगता त्या सुपुत्राला पशु कल्पून तू माझे यजन करण्यास सिद्ध झालास तर मी तुला पुत्रप्राप्तीसाठी योग्य वर देतो."

त्यावर निश्चयाने राजा म्हणाला, "हे देवा, केवळ वंध्यत्व नको म्हणून मला पुत्र हवा आहे. तू खरोखरच विश्वास ठेव. पुत्रप्राप्तीनंतर त्या पुत्राला पशू समजून मी निश्चिंत मनाने तुझे यजन करीन. हे देवमान्या, निपुत्र राहिल्याने केवढे दारुण दुःख भोगावे लागते ते मी भोगले आहे आणि अनुभवाने ते मला असह्य वाटत आहे. म्हणून माणसाच्या शोकरूप अग्नीचे निवारण करील असा सुलक्षणी पुत्र मला दे."

राजाचे निश्चयपूर्वक भाषण ऐकून वरुण म्हणाला, "हे राजा, हे जर तू खरे ते बोलत असशील, आता माझ्यासमक्ष तू जे बोललास ते जर सत्य करणार असशील, तर निश्चिंत मनाने तू घरी परत जा. तुला सुंदर पुत्र होईल हे मी सत्य सांगतो."

राजा वर प्राप्तीमुळे संतुष्ट होऊन घरी गेला आणि आपल्याला मिळालेल्या वरप्राप्तीची वार्ता त्याने आपल्या प्रिय अशा पट्टराणीस सांगितली. शंभर सुंदर भार्या असूनही राजाची पट्टराणी धर्मपत्‍नी व महापतीव्रता अशी ती शिबिराजाची कन्या हिला काही कालानंतर गर्भ राहिला. तिला डोहाळे लागल्याचे ऐकून राजाला परमानंद झाला. राजाने यथाविधी गर्भसंस्कार केले. नंतर दिवस पूर्ण भरताच ताराबल व ग्रहबलाने शुभ अशा दिवशी राणीला देवासारखा सुस्वरूप पुत्र झाला. पुत्रप्राप्तीमुळे राजाला आनंद झाला. नंतर शुचिर्भूत होऊन राजाने जातकर्म केले. पुष्कळ दाने दिली. पुत्र झाल्याच्या आनंदाने राजाने पुत्रजन्मोत्सव केला. गायन - वाद्यांची गडबड उडवून दिली. सर्व प्रकारची दाने केल्यामुळे त्याला धन्यधन्य वाटले.



अध्याय चवदावा समाप्त

GO TOP