[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
त्रिशंकूची कथा ऐकून जनमेजय विस्मित झाला. अनेक शंकाकुशंकांनी व्याप्त होऊन त्याने व्यासांना विचारले, "हे मुनिश्रेष्ठ, हरिश्चंद्र राजाला राज्यावर बसविले हे मी श्रवण केले. पण त्रिशंकूचे पुढे काय झाले ? तो त्या शापापासून मुक्त झाला किंवा नाही का तसाच चांडाल देहानेच त्याला पुढे वनात मृत्यु आला ? हे सर्व चरित्र आपण विस्ताराने सांगा."
व्यास म्हणाले, "इकडे हरिश्चंद्राला राज्याभिषेक झाला हे ऐकून त्रिशंकूला समाधान झाले व संतुष्ट मनाने त्याने कल्याणीचे चिंतन सुरू केले. भगवती देवी आदिशक्ती हिची आराधना करण्यात राजाने आपला काळ घालविला. अशाप्रकारे त्याने आपला सर्व वेळ तपश्चर्या व देवीचे चिंतन यातच व्यतीत करण्यास सुरुवात केली. त्या परात्पर देवीच्या चिंतनाने राजाचे मन थोडेसे स्थिर झाले व त्या परमशक्तीच्या आराधनेत तो आपल्या दुःखाचा भाग विसरू लागला. अशाप्रकारे त्रिशंकूने आपले भवितव्य निश्चिंत केले.
इकडे महामुनी विश्वामित्र आपली उग्र तपश्चर्या संपवून परत आपल्या भार्येकडे आला. त्या मुनीश्वर कौशिकाला आपली पत्नी व आपले सुपुत्र पहाण्याची इच्छा होऊन तो सत्वर अयोध्येकडे आला.
अयोध्येला येऊन पोहोचल्यावर आपले स्वजन सुस्थितीत आहेत हे पाहून त्याला परमसंतोष झाला. विश्वामित्र अत्यंत बुद्धिमान होता. आपली सेवा करणार्या पतिव्रता व सत्त्वशील भार्येला तो बुद्धिमेरू म्हणाला, "हे सुलोचने, राज्यात सर्वत्र दुष्काळ पडला असताना, लोकांची अन्नान्नदशा झाली असताना तू कसा काळ सहन केलास ? खरोखरच त्या दुर्भिक्षात तू या बालकांचे पालनपोषण कसे केलेस ? हे प्रिये, तुला कोणी सहाय्य केले ते मला सत्वर सांग. कारण मी अत्यंत घोर अशा तपश्चर्येस बसलो असल्याने त्यावेळी येथे येऊ शकलो नाही. कोणत्याही स्थितीत तपश्चर्या पूर्ण करायची ह्याच विचाराने मी गेलो होतो. अशावेळी इकडे पावसाअभावी अत्यंत दुष्काळ पडला. तेव्हा हे सर्वोत्कृष्ट स्त्रिये, धनधान्याशिवाय तू या आपल्या पुत्रांचे रक्षण कसे केलेस ? तेथे पडलेल्या दुर्भिक्षाच्या अनेक कथा माझ्या कानावर येत होत्या व मीही चिंतेत पडलो होतो. पण तपामुळे तेथून मी परत आलो नाही. मी खूप विचार केला. खरेच, आपण तेथे गेलो तरी परिस्थितीत काय फरक पडणार ? म्हणून न गेलेलेच बरे असा विचार करूनच मी न येण्याचा निश्चय केला, हे सुंदरी, एकदा वनात तपाचरण करीत असता मला अत्यंत भूक लागली. तीव्र क्षुधेमुळे मी अत्यंत पीडित झालो व काहीतरी भक्षण करावे म्हणून चोरी करण्याच्या उद्देशाने मी एका चांडाळाच्या घरात शिरलो. तेथे तो चांडाळ शांतपणे निद्राधीन झाला होता. आता काय करावे असा क्षणभर विचार करून मी त्या चांडाळाच्या घरातील पाकगृहाचा शोध करू लागलो व काहीतरी भक्षणासाठी घ्यावे म्हणून आत शिरलो. तेथे एका भांडयाचे झाकण मी उघडले. त्यात कुत्र्याचे शिजविलेले मांस होते. पण भुकेने व्याकुळ होऊन मी ते मांस भक्षण करणार इतक्यात तो चांडाळ जागृत झाला व माझ्याकडे संशयाने पाहून म्हणाला,
"कोण आहेस तू ? एवढया भयाण रात्री अगदी निर्भयपणाने तू माझ्या घरात कशाकरता शिरलास ? तुझे माझ्याकडे काय काम आहे ? कशाचा मोह धरून तू ते भांडयाचे झाकण काढीत आहेस ? तू चोर आहेस का ? सांग."
अशाप्रकारे त्या चांडाळाने मला तीव्र शब्दात विचारले. तो सत्वर माझ्याजवळ येऊन उभा राहिला. त्यावेळी मी क्षुधेने अधिकच व्याकुळ झालो होतो. त्यामुळे माझा कंठ दाटून आला. तशाच जड स्वरात मी म्हणालो, "हे महाभागा ! मी एक तपश्चर्या करणारा ब्राह्मण ऋषी आहे. सांप्रत मी क्षुधेने व्याकूळ झालो आहे. भुकेमुळे मी आता गलितगात्र झालो असून केवळ पोटासाठी चोरी करून भक्ष मिळवावे म्हणून चोरीच्याच उद्देशाने मी तुझ्या घरात शिरलो आहे व तुझ्या भांडयातून काही भक्ष असल्यास पहावे म्हणून मी शोध करीत आहे. तेव्हा हे महामते, मी चोर असलो तरी क्षुधेने त्रस्त झालेला मी आज अतिथि झालो आहे असे समज व अत्यंत भुकेलेल्या मला तू हे भक्षण करण्याची अनुमति दे. हे उत्तम प्रकारे शिजविलेले मांस भक्षण करून मी माझी क्षुधा शांत करीन."
माझे हे भाषण श्रवण करून तो चांडाळ विचार करू लागला आणि अत्यंत निश्चयी स्वरात म्हणाला, "हे ब्राह्मणा, मला क्षमा कर. तू सर्व वर्णात श्रेष्ठ अशा ब्राह्मण कुळात जन्माला आला आहेस. यास्तव हे अभक्ष्य भक्षण करू नकोस. त्यातून मी चांडाळ असून हे चांडाळगृह आहे हे तू विसरू नकोस. अरे, खरोखरच दुर्लभ अशा मनुष्ययोनीत तू जन्मलास. त्यातून सर्वोत्कृष्ट अशा द्विज घराण्यात तू उत्पन्न झालास. हे द्विजा हा ब्राह्मणजन्म अत्यंत दुर्लभ आहे. हे भाग्यवान, तुला हे समजत कसे नाही ? अरे, ज्याला पुण्यलोक प्राप्त करून घ्यायचे असतील त्याने हा तामसी असलेला दुष्ट आहार स्वीकारू नये. मनूने, सात अंत्यज दुष्कर्मामुळे, हे अग्राह्य म्हणून सांगितले. तेव्हा याचा नीट विचार कर.
हे द्विजश्रेष्ठा, मी कर्माने चांडाळ असल्याने मी निंद्य आहे व निःसंशय मी त्याज्य आहे. म्हणून माझ्या घरातील या अभक्ष्य भक्षणापासून तुला परावृत्त करीत आहे. तुला वाटेल, या भक्षाच्या लोभाने मी तुला प्रतिकार करतो आहे. पण तसे नाही. मी अत्यंत सद्भावनेने हे कथन करीत आहे. खरोखरच वर्णाश्रम भंगल्याचा दोष तुला प्राप्त होऊ नये, तुझे ब्राह्मणत्व दूषित होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे आणि म्हणून मी अगदी मनःपूर्वक तुला हे आग्रहाने सांगत आहे. हे द्विजा, तू माझे ऐक."
चांडाळाचे धर्मतत्पर भाषण श्रवण करताच मी विस्मयचकित झालो. मी म्हणालो, "हे धर्मपरायणा, तू खरोखरच सत्य बोलतो आहेस. पण हे चांडाळा, तू जरी निर्मळ आणि थोर बुद्धीस अनुसरून हे बोलत असलास तरी संकट प्रसंगी योग्य धर्म कोणता आचरणात आणावा हे आता ऐक. आपणाला पुण्यकर्मे करण्यासाठी देह जगविणे आवश्यक असते. अशा वेळी फक्त पुण्यासाठी देह जगेल असे कोणतेही कर्म करण्यास प्रत्यवाय नाही. पण ती संकटाची वेळ गेली असता त्यानंतर मात्र प्रायश्चित्त घेऊन शुद्ध व्हावे. आपत्कालाव्यतिरिक्त पापकर्म केल्यास चांगली गति प्राप्त होत नाही. पण आपत्काली जरी हातून जाणूनबुजून एखादे पातक घडले तरी दुर्गादेवी प्राप्त होत नाही, पण क्षुधार्त होऊन प्राणहत्या झाली तर नरकाची प्राप्ती होते. म्हणून क्षुधेच्छु पुरुषाने कोणत्याही मार्गाने आपली क्षुधा- तृप्ती करावी. म्हणूनच मीसुद्धा देह रक्षणार्थ हे चौर्यकर्म करीत आहे. अवर्षणामुळे दुष्काळ पडल्यास चोरी करणारास पातक लागत नाही, पण वर्षाकाळ असूनही असले हीन कर्म केल्यास निश्चित पातक लागते."
विश्वामित्रांनी ही घटना सांगून ते पुढे म्हणाले, "हे कांते, मी असे बोलतो न बोलतो तोच चमत्कार झाला. आकाशात विजा कडाडू लागल्या आणि मुसळधार पाऊस धरणीवर कोसळू लागला. तो आनंदाचा वर्षाव पाहून मी स्तिमित होऊन वेगाने त्या घरातून बाहेर पडलो. आता हे सुंदरी, तू या वनात काल कसा काढलास ते कथन कर."
विश्वामित्राचे बोलणे संपल्यावर ती प्रियभाषिणी विश्वामित्रपत्नी पतीला म्हणाली, "हे मुनिश्रेष्ठा, आपण तपश्चर्येला निघून गेल्यावर मी काल कसा व्यतीत केला हे ऐका. इकडे पर्जन्याअभावी सर्वत्र दुष्काळ प्राप्त झाला. आपली बालके क्षुधेमुळे व्याकुळ झाली. त्यांना काहीतरी भक्ष शोधून द्यावे म्हणून मी वनात इकडेतिकडे हिंडू लागले. खूप प्रयत्न करून ह्या वनातून त्या वनात हिंडूनही मला काहीही भक्ष्य मिळाले नाही. केवळ साव्यावर काही महिने कसे तरी गुदरले. पण तेही संपले.
अखेर पूर्ण विचार करून हे कांत, मी एखाद्या धनवानाला आपला एक पुत्र विकावा व त्यातून प्राप्त होणार्या द्रव्यावर इतर पुत्रांचे पोषण करावे असे ठरविले. कारण दुर्भिक्षामुळे नगरात भिक्षा मिळणे सर्वस्वी अशक्य झाले. अरण्यात शोधूनही सावे आढळेनात. पर्जन्य न पडल्यामुळे वृक्षांवर फळे आली नाहीत. जमिनीत मुळे उगवली नाहीत. मुले तर क्षुधार्त होऊन तळमळू लागली. मुले नित्य रोदन करू लागली. त्यांचे हाल पाहून आता काय करावे ? जावे तरी कोठे ? या क्षुधार्त मुलांचे कसे समाधान करावे ? या एकाच विचाराने मी व्याकुळ झाले. अखेर एक पुत्र विकण्याचा मी निश्चय केला. कारण त्याशिवाय आता मजजवळ दुसरा मार्गच नव्हता. मी तरी काय करणार ?
फार दुःखद अंतःकरणाने मी ह्या आक्रोश करणार्या मधल्या पुत्रांस एखाद्या धनिकाला विकायचे ठरवून कोणत्याही प्रकारची लज्जा मनात न बाळगता पुत्रास घेऊन मी घराबाहेर पडले. पुत्राच्या विक्रीसाठी आतुर होऊन मी मार्ग आक्रमीत असता रस्त्यातच धर्मात्म्या सत्यव्रताने माझा मार्ग रोधून मला विचारले, "अहो बाई, हा कुणाचा बालक आहे ? याचे रडण्याचे कारण मला सांगा."
मी काकुळतीने त्याला म्हणाले, "हे राजा, घरात आता अन्न नाही. कोठेही मिळण्याची शक्यता नाही. तेव्हा माझ्या इतर बालकांचे तरी पोषण व्हावे म्हणून ह्या माझ्या मुलाला विक्रीसाठी मी नेत आहे."
माझे हे भाषण ऐकताच दयार्द्र राजा गहिवरला. तो म्हणाला, "हे विप्रस्त्रिये, तू कसलीही चिंता न करता आपल्या त्या बालकाला घेऊन घरी परत जा. तुझी व तुझ्या बालकांची भोजनाची मी नित्य व्यवस्था करीन. महर्षी विश्वामित्र परत येईपर्यंत मी तुझ्या घरी अन्न पोहोचवीन."
असे मला त्याने वचन दिले, तेव्हा मी बालकासह घरी परत आले. यानंतर तो दयाळु राजपुत्र सत्यव्रत रोज वनांतील श्वापदे, मृग, सूकरादि प्राण्यांची शिकार करून आणू लागला. आपल्या ह्या आश्रमाजवळील वृक्षावर आणलेली शिकार बांधून ठेवून तो परत जात असे. हे कांत, केवळ त्याचे हे अनंत उपकार झाल्यानेच मी व आपली बालके जिवंत राहिली व मी या बालकांचे यथेच्छ पालन केले आणि ते दुःख आम्ही तरून गेलो. पण दैवगती फिरल्यामुळे माझ्यासाठी त्या राजपुत्र सत्यव्रताला वसिष्ठ मुनीपासून शापच प्राप्त झाला. एक दिवस सत्यव्रताला एकही शिकार मिळाली नाही. तेव्हा वसिष्ठांची धेनु त्याच्या दृष्टीस पडली. त्याने तिचा वध करून तिचे मांस आमच्यासाठी आणले. पण त्यामुळे वसिष्ठ मुनी क्रुद्ध झाले व त्यांनी सत्यव्रताला शाप दिला. त्यामुळे शापभ्रष्ट होऊन राजा चांडाळ झाला आणि त्याला त्रिशंकू हे नाव प्राप्त झाले. हे कौशिका, त्याच्यासाठी मला फार दुःख होत आहे, त्या धर्मात्म्या सत्यव्रताला चांडाळत्व प्राप्त होण्यास आपण कारण झालो आहोत, म्हणून मी चिंताग्रस्त आहे. तेव्हा हे प्रिया, आपण महान तपःसामर्थ्याच्या बळावर त्या राजाचे शापापासून रक्षण करावे अशी माझी इच्छा आहे. आपण ती पूर्ण करा."
आपल्या पत्नीने दीनवदन होऊन केलेले ते भाषण श्रवण करून विश्वामित्रास वाईट वाटले व पत्नीचे सांत्वन करण्याच्या उद्देशाने तो म्हणाला, "हे कमलनयने, खरोखरच सत्यव्रताने संकटसमयी तुझ्यावर फारच उपकार केले आहेत. हे जाणून मी माझ्या सामर्थ्याने त्या राजाला शापातून मुक्त करीन, माझे तप व माझी विद्या यामुळे मी त्या धर्मात्म्याच्या दुःखाचा निश्चितपणे नाश करीन हे तुला सत्य सांगत आहे." विश्वामित्राने आपल्या प्रिय पत्नीला निश्चयपूर्वक वचन दिले. तो परमार्थतत्पर असा विश्वामित्र मुनी सत्यव्रताच्या शापाचा नाश करण्याचे कारणासंबंधी विचार करू लागला. अखेर विश्वामित्र मुनी चांडाळ होऊन महारवाडयात रहात असलेल्या दीनवदन झालेल्या सत्यव्रत राजाकडे गेला. आपल्याकडे येत असलेल्या महान मुनीला अवलोकन करताच राजाला आश्चर्य वाटले आणि अत्यंत वेगाने पुढे येऊन त्या मुनींच्या चरणावर त्याने साष्टांग प्रणिपात केला.
त्या नतमस्तक झालेल्या राजाचा हात धरून विश्वामित्राने त्याला वर उचलले आणि राजाचे सांत्वन करून तो म्हणाला, "हे राजेंद्रा, तू माझ्या पत्नीवर आणि बालकांवर अत्यंत उपकार केले आहेस आणि माझ्याचसाठी तुला मुनीकडून शाप भोगावा लागत आहे. तेव्हा मी तुझ्यासाठी काय करू ते सांग. तुझे कोणतेही मनोरथ मी पूर्ण करीन." त्रिशंकु म्हणाला, "हे मुनीश्रेष्ठा, पूर्वी मी राज्यत्याग करून वसिष्ठगुरूंकडे गेलो व त्यांना म्हणालो, "मुनिवर्य, मला याच शरीराने स्वर्गप्राप्ती होऊन तेथील अप्सरांसह नंदनवनांत क्रीडा करण्याची इच्छा आहे. म्हणून आपण माझ्यासाठी योग्य ते अनुष्ठान करावे व मला याच देहाने इंद्रलोकी पाठवावे." असे मी अत्यंत विनयपूर्वक त्यांना सांगितले, तरीदेखील महर्षी वसिष्ठ माझ्यावर अत्यंत क्रुद्ध झाले व ते म्हणाले, "हे दुर्बुद्धे, ह्या मानवी देहाने तू स्वर्गाला जाऊ शकणार नाहीस." त्यांच्या या उद्गाराने स्वर्गप्राप्तीसाठी आणि तेथे भोग भोगण्याच्या अतीव इच्छेने आतुर होऊन मी म्हणालो, "हे निष्पाप, तुला मजसाठी यज्ञ करायचा नसेल तर मी दुसरा पुरोहित पाहीन आणि अत्यंत अद्भुत असा सर्वोत्कृष्ट यज्ञ करीन."
माझे हे बोलणे ऐकल्याबरोबर त्याच क्षणी ते संतापाने बोलले, "हे पामरा, तू सत्वर श्वपच होशील. त्यांचा हा शाप होऊन मी पुनरपि चांडाळ झालो आहे. विश्वामित्रमुने, मला झालेल्या शापाचे कारण मी आपणाला सविस्तर कथन केले. आता आपणच माझ्या या दुःखाचा परिहार करण्यास समर्थ आहात. माझे दुर्दैव दूर करून आपण मला या शापातून मुक्त करावे." राजा त्रिशंकूचे बोलणे ऐकून विश्वामित्र राजाच्या शापाचे निवारण कोणत्या मार्गाने करावे याचा विचार करू लागले.