[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
सत्यव्रताला पित्याने उत्तम बोध केला. सत्यव्रतानेही ते शांतपणे ऐकून घेऊन विनम्रभावाने, "मी तसेच वागेन" असे वचन दिले. नंतर राजाने वेदशास्त्रसंपन्न अशा ब्रह्मवृंदांना बोलावून घेतले. राज्याभिषेकाचा शुभ दिवस पाहून सर्व मांडलीक राजांना निमंत्रणे पाठविली. सर्व पवित्र तीर्थांचे उदक आणविले आणि शुभ मुहूर्तावर सत्यव्रताला राज्याभिषेक करविला व आपले राज्य त्याने सत्यव्रताला अर्पण केले.
सत्यव्रत उर्फ त्रिशंकूला राज्याभिषेक केल्यावर राजा स्वतः निर्मोही होऊन आपल्या भार्येसह वानप्रस्थाश्रम स्वीकारण्यासाठी वनात गेला. भागीरथीचे तीर्थावर राजाने घोर तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. तेव्हा देवही त्याच्यावर संतुष्ट झाले. त्या इंद्रासनाजवळ स्थान प्राप्त होऊन तो स्वतेजाने सर्वत्र झळकू लागला.
व्यासांचे बोलणे शांत चित्ताने ऐकून नंतर जनमेजय म्हणाला, "हे भगवान्, सत्यव्रताला धेनु वधामुळे वसिष्ठांकडून शाप मिळाला व त्याला पिशाच्चत्व प्राप्त झाले. असे असताना तो शापमुक्त कसा झाला ? पिशाच्चयोनी प्राप्त झालेला पुत्र सिंहासनावर बसण्यास योग्य कसा ? त्याच्या हातून कोणते पुण्यकर्म घडले म्हणून वसिष्ठांनी त्याला शापमुक्त केले ? पिशाच्च योनीत असताना पिता त्याला घरी कसे घेऊन गेला ?"
व्यास म्हणाले, "सत्यव्रताला वसिष्ठांचा शाप होऊन तो पिशाच्च झाला. त्यामुळे त्याचा वेष वाईट होऊन तो लोकांना भयप्रद झाला. त्याच्यापुढे जाणेही लोकांना अशक्य झाले. पण पुढे त्याने देवीची आराधना केली. ती त्याला प्रसन्न झाल्यामुळे तिने निमिषार्धांत सत्यव्रताला दिव्यदेहधारी केले. तो पिशाच्च योनीतून मुक्त झाला व त्याच्या पापाचाही नाश झाला. देवीच्या प्रसादाने त्याचे पूर्व दुष्कृत्य नाहीसे होऊन तो अत्यंत तेजस्वी झाला. शक्तीदेवीच्या प्रसादाने वसिष्ठ मुनींचेही मन प्रसन्न झाले व पिताही त्याच्यावरील राग विसरून गेला. सर्व चांगल्या कृत्यांची जननी ती परात्पर शक्ती असल्याने तिच्या भक्ताला नित्य सुखच लाभते."
पित्याच्या पश्चात् त्रिशंकूने धर्मतत्पर राहून राज्य करण्यास सुरुवात केली. त्याने देवदेवेश्वरी अशा सनातन शक्तीने यज्ञांनी यजन केले. तिच्या कृपेमुळे त्याला उत्कृष्ट, अतिसुंदर, शास्त्रनिर्दिष्ठ लक्षणांनी संपन्न असा दिव्य पुत्र झाला.
त्रिशंकुला मानवी देहानेच स्वर्गाला जाण्याची इच्छा झाली. म्हणून त्याने राज्याचा त्याग केला व आपल्या पुत्राला युवराज्याभिषेक करून तो वसिष्ठ मुनीच्या आश्रमात निघून गेला. तेथे गेल्यावर त्याने वसिष्ठांना पूज्य भावनेने प्रणाम केला, व विनयाने हात जोडून तो म्हणाला, "हे ब्रह्मपुत्रा, हे महाभाग्यवान तापसा, हे सर्वमंत्रविशारद मुनीश्रेष्ठा, आपण शांत चित्ताने माझी विनंती ऐकावी. महाराज, याच मानवी देहाने स्वर्गातले सर्व उपभोग भोगण्याची मला तीव्र इच्छा झाली आहे. तेथे मानवाला कधीही न मिळणार्या सुखोपभोगांचा आस्वाद घ्यावा अशा तीव्र इच्छेने मी आलो आहे.
तेथे जाऊन सुंदर अप्सरांसह नंदनवनात यथेच्छ क्रीडा करावी व देवगंधर्वांचे गायन श्रवण करीत भोग भोगावे असे मला सदैव वाटत आहे. हे मुनीश्रेष्ठ, आपण समर्थ आहात. आपल्या सामर्थ्याने जगात काहीही शक्य आहे. तेव्हा आपण माझी विनंती मान्य करावी. याच देहासह स्वर्गाचा उपभोग घेण्यासाठी मी कोणता यज्ञ करावा हे मला सांगा व तोच यज्ञ मजकडून करून घ्या व मला सत्वर देवलोकात पाठवा."
त्रिशंकूचे बोलणे ऐकून वसिष्ठ म्हणाले, "हे राजा, मानवी देह धारण करून स्वर्गात रहाता येत नाही. तेथील सर्व सुखाचा व अप्सरांना भोगण्याचा आनंद मानवी शरीराला प्राप्त होत नाही. मरणानंतरच स्वर्गप्राप्ती होत असते. तुला याच देहाने स्वर्गाचा उपभोग घेण्यासाठी पाठविण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही. तरीही तू प्रयत्न कर. मी त्या प्रयत्नांना संमति देतो. यज्ञ कर. मी तुला सहाय्य करीन. पण तुला मरणानंतरच स्वर्ग प्राप्त होईल."
वसिष्ठांच्या भाषणाने राजा दुःखी झाला. त्याला वसिष्ठ मुनींचा पुन्हा राग आला आणि संतप्त होऊन तो म्हणाला, "ब्रह्मन्, केवळ गर्व झाल्यानेच आपण अशाप्रकारचा यज्ञ मजकडून करवून घेत नसला तर मी खचितच दुसरा पुरोहित पाहीन व माझा यज्ञ पूर्ण करीन. आपण माझा मान न राखता मला आनंदलाभ मिळवून देत नाही."
राजाच्या या बोलण्याने वसिष्ठ क्रोधायमान झाले व त्यांनी राजाला शाप दिला. वसिष्ठ म्हणाले, "हे दुष्टबुद्धे, तू गर्वाने अंध झाला आहेस. तू चांडाळच हो. पापात्म्या, तुला कधीही स्वर्गाचा मार्ग सापडणार नाही. तू ह्याच देहाने सत्वर श्वपच होशील. हे गोवध दूषिता, तू ब्राह्मण पत्नी हरण करणारा दुराचारी व व्यभिचारी पुरुष आहेस. तू आजवर धर्माचा उच्छेदच केलास. हे विदूषका, हे पाप्या, तुला आताच काय, पण काही केलेस तरी मरणानंतरही स्वर्गप्राप्ती होणार नाही."
अशाप्रकारे वसिष्ठाचा शाप होताच राजा श्वपच झाला. त्याची कुंडले पाषाणमय झाली. त्याच्या देहावरील सुगंध जाऊन अत्यंत विष्ठायुक्त दुर्गंध शरीराला येऊ लागला. त्याची दिव्य वस्त्रे नीलवर्णी झाली. देहही गजवर्ण झाला.
खरोखर शक्तीची उपासना करणार्यांचा कधीही अपमान करू नये. महामुनि वसिष्ठ शक्तीचे उपासक होते. ते नित्य गायत्री जप करीत असल्यामुळे ते शक्तीचे परम भक्त होते. अशा या देवी पराशक्तिच्या उपासकाचा अपमान केल्याने त्रिशंकूचा देह अत्यंत निंद्य झाला. त्याचे रूप किळसवाणे झाले.
आपल्या देहाचे ओंगळवाणे झालेले स्वरूप पाहून राजा अतीव दुःखी झाला व परत आपल्या राजवाडयात न जाता तो रानावनात इतस्ततः भटकू लागला. तो शोकविव्हल झाला व आता काय करावे असा विचार करू लागला. माझा हा देह अत्यंत निंद्य असल्यामुळे मी आता कोठेही जाऊ शकणार नाही. असा विचार मनात येऊन तो चिंताग्रस्त झाला. खरोखर काय केले असता आपणाला या दुःखातून मुक्त होता येईल याचे त्याला स्मरण होईना. आता घरी जावे तर आपल्या किळसवाण्या देहाकडे पाहून पुत्राला शोक होईल. शिवाय श्वपच झाल्याने आता भार्याही माझा स्वीकार करणार नाही. माझा हा हीन देह पाहून माझे सचीव माझा मान राखणार नाहीत.
तसेच माझे आप्त स्वकीय या दुर्गंधी देहामुळे मला सन्निध येऊ देणार नाहीत. खरोखरच आता सर्वच माझा त्याग करतील. तेव्हा अशा अवस्थेत हे जीवन जगण्यापेक्षा मरण पत्करलेले बरे. खरेच विषप्राशन करून अथवा डोहांत उडी घेऊन आजच आत्मनाश करावा किंवा गळफास लावून घ्यावा अथवा अग्नीत देह विसर्जन करून बलात्काराने मृत्यू ओढवून घ्यावा हेच मला आता योग्य आहे, किंवा अन्नाचा त्याग करून यथाविधि देह त्याग केलेला बरा."
असा प्राणत्यागाचा विचार त्रिशंकूच्या मनात घोळू लागला. पण पुन्हा पुन्हा त्याला वाटे, अरेरे, आत्मघात करण्याने मला पुन्हा महादोष लागून पुन्हा शापित व्हावे लागेल व त्याचाही दुष्परिणाम भोगावा लागेल. तेव्हा काहीही झाले तरी मी आत्महत्या करणे योग्य होणार नाही, माझ्या पापाचे हे फळ मला याच देहाने या वनात भोगले पाहिजे. मी हे प्रायश्चित याच देहाने भोगल्याशिवाय माझ्या कुकर्माचा नाश होणार नाही. खरोखरच आजवर केलेल्या शुभाशुभ कर्माचे फळ मी आता भोगावे हे आहे. म्हणून आता मी एखाद्या पुण्य आश्रमाचे सान्निध्यात राहून तीर्थाच्या आश्रयाने त्या देवी अंबिकेचे स्मरण करीन. साधु- सत्पुरुषांच्या सेवा करीन व अशा तर्हेने काल व्यतीत करून मी माझ्या पापकर्माचा क्षय करीन. कदाचित् भाग्यामुळे मला या वनात साधु-सत्पुरुषांचा सहवासही मिळेल."
असा शेवटी विचार करून राजाने दुःखी अंतःकरणाने आपल्या नगरात जाण्याचा विचार सोडून दिला. तो स्वेच्छेने गंगेच्या तीरावर जाऊन तेथेच वास्तव्य करू लागला.
इकडे आपल्या पित्याला शाप झाल्याचे हरिश्चंद्राला समजले, तेव्हा त्याला अतीव दुःख होऊन त्याने आपल्या सचिवांना गंगेच्या तीरावर पाठविले व पित्याला घेऊन येण्यास सांगितले.
सचिव सत्वर गंगातीरावर आले. चांडाल देही राजाला अवलोकन करून ते त्याच्या समोर हात जोडून उभे राहिले. विनयपूर्वक प्रणाम करून ते राजाला म्हणाले, "हे राजा पवित्र पुत्राने आम्हाला इकडे पाठविले आहे. तेव्हा त्याच्या आज्ञेवरून आम्ही इकडे आलो आहोत. आम्ही सर्वजण त्याच्या आज्ञेनेच रहात असतो. तरी आपण आम्हाविषयी कसलाही संशय मनात बाळगू नका. आपल्या पुत्राने आपल्यासाठी दिलेला निरोप ऐकून घ्या. आपला सुपुत्र म्हणाला, "हे सचिवहो, तुम्ही माझ्या पित्याकडे जाऊन त्याला सन्मानाने इकडे आणा." तेव्हा हे राजा, त्याच्या आज्ञेने आम्ही आलो आहोत. तेव्हा आता कसलेही दुःख मनात न ठेवता आपण आपल्या नगराकडे चलावे. तेथे आम्ही सर्व सचिव व प्रजाजन आपली योग्य ती सेवाशुश्रुषा करू.
तसेच भगवान वसिष्ठ मुनींना आम्ही योग्य रीतीने वागून प्रसन्न करून घेऊ. ते प्रसन्न झाल्यावर, हे राजा, आपली दुःखे नाश पावतील. त्या गुरुदेव वसिष्ठांची योग्य संभावना करून आम्ही आपल्या दुःखाचा परिहार करण्याची त्यांना विनंती करू. हे राजा, आपल्या पुत्राने अनेक प्रकाराने विनयपूर्वक सांगितले आहे. म्हणून आपण आता सत्वर घरी चला."
आपल्या पुत्राच्या विनंतीचा निरोप येऊनही राजाने या चांडालरूप देहाने आपल्या घरी परत जाण्याचा विचार केला नाही. तेथेच वास्तव्य करण्याचा निश्चय करून तो म्हणाला, "हे सचिवांनो, तुम्ही स्वस्थ मनाने आपल्या नगराकडे परत जा आणि माझ्या या भाग्यवान सुपुत्राला सांगा -
"हे पुत्रा, आता काहीही झाले तरी मी नगराकडे परत येणार नाही. तू तत्परतेने राज्य कर. देवब्राह्मणांना योग्यतेप्रमाणे मान दे व अनेक यज्ञ पूर्ण कर. माझा हा चांडाळवेष निंदित असल्याने मला अयोध्येस येण्याची आता इच्छा नाही." हे मंत्रीजनहो, तुम्ही सत्वर नगराकडे जाऊन माझ्या त्या महापराक्रमी सत्वशील पुत्राला सिंहासनावर बसवा व त्याच्या अनुज्ञेने प्रजेला सुख लाभेल असा राज्यकारभार करा."
राजाचे बोलणे ऐकून सचिव दुःखावेगाने रडू लागले आणि राजाला प्रणाम करून सत्वर तेथून निघून आपल्या अयोध्या नगराप्रत आले, अयोध्येत येऊन पोहोचल्यावर त्यांनी एक शुभ दिवस पाहून एका सुमुहूर्तावर हरिश्चंद्राला राज्याभिषेक केला. पण हरिश्चंद्राला सदैव आपल्या पित्याची आठवण येत होती. हरिश्चंद्राने धर्मतत्पर राहून न्यायाने राज्य केले. तो सत्यवचनी म्हणून जगात प्रसिद्ध पावला.