जनमेजय उवाच -
वसिष्ठेन च शप्तोऽसौ त्रिशङ्कुर्नृपतेः सुतः ।
कथं शापाद्विनिर्मुक्तस्तन्मे ब्रूहि महामते ॥ १ ॥
व्यास उवाच -
सत्यव्रतस्तथा शप्तः पिशाचत्वमवाप्तवान् ।
तस्मिन्नेवाश्रमे तस्थौ देवीभक्तिपरायणः ॥ २ ॥
कदाचिन्नृपतिस्तत्र जप्त्वा मन्त्रं नवाक्षरम् ।
होमार्थं ब्राह्मणान्गत्वा प्रणम्योवाच भक्तितः ॥ ३ ॥
भूमिदेवाः शृणुध्वं वै वचनं प्रणतस्य मे ।
ऋत्विजो मम सर्वेऽत्र भवन्तः प्रभवन्तु ह ॥ ४ ॥
जपस्य च दशांशेन होमः कार्यो विधानतः ।
भवद्भिः कार्यसिद्ध्यर्थं वेदविद्भिः कृपापरैः ॥ ५ ॥
सत्यव्रतोऽहं नृपतेः पुत्रो ब्रह्मविदांवराः ।
कार्यं मम विधातव्यं सर्वथा सुखहेतवे ॥ ६ ॥
तच्छ्रुत्वा ब्राह्मणास्तत्र तमूचुर्नृपतेः सुतम् ।
शप्तस्त्वं गुरुणा प्राप्तं पिशाचत्वं त्वयाधुना ॥ ७ ॥
न यागार्होऽसि तस्मात्त्वं वेदेष्वनधिकारतः ।
पिशाचत्वमनुप्राप्तं सर्वलोकेषु गर्हितम् ॥ ८ ॥
व्यास उवाच -
तन्निशम्य वचस्तेषां राजा दुःखमवाप ह ।
धिग्जीवितमिदं मेऽद्य किं करोमि वने स्थितः ॥ ९ ॥
पित्रा चाहं परित्यक्तः शप्तश्च गुरुणा भृशम् ।
राज्याद्भ्रष्टः पिशाचत्वमनुप्राप्तः करोमि किम् ॥ १० ॥
तदा पृथुतरां कृत्वा चितां काष्ठैर्नृपात्मजः ।
सस्मार चण्डिकां देवीं प्रवेशमनुचिन्तयन् ॥ ११ ॥
स्मृता देवीं महामायां चितां प्रज्वलितां पुरः ।
कृत्वा स्नात्वा प्रवेशार्थं स्थितः प्राञ्जलिरग्रतः ॥ १२ ॥
ज्ञात्वा भगवती तं तु मर्तुकामं महीपतिम् ।
आजगाम तदाऽऽकाशं प्रत्यक्षं तस्य चाग्रतः ॥ १३ ॥
दत्त्वाथ दर्शनं देवी तमुवाच नृपात्मजम् ।
सिंहारूढा महाराज मेघगम्भीरया गिरा ॥ १४ ।
देव्युवाच -
किं ते व्यवसितं साधो हुताशे मा तनुं त्यज ।
स्थिरो भव महाभाग पिता ते जरसान्वितः ॥ १५ ॥
राज्यं दत्त्वा वने तुभ्यं गन्तास्ति तपसे किल ।
विषादं त्यज हे वीर परश्वोऽहनि भूपते ॥ १६ ॥
नेतुं त्वामागमिष्यन्ति सचिवाश्व पितुस्तव ।
मत्प्रसादात्पिता च त्वामभिषिच्य नृपासने ॥ १७ ॥
जित्वा कामं ब्रह्मलोकं गमिष्येत्येष निश्चयः ।
व्यास उवाच -
इत्युक्त्वा तं तदा देवी तत्रैवान्तरधीयत ॥ १८ ॥
राजपुत्रो विरमितो मरणात्पावकात्ततः ।
अयोध्यायां तदाऽऽगत्य नारदेन महात्मना ॥ १९ ॥
वृत्तान्तः कथितः सर्वो राज्ञे सत्वरमादितः ।
श्रुत्वा राजाथ पुत्रस्य तं तथा मरणोद्यमम् ॥ २० ॥
खेदमाधाय मनसि शुशोच बहुधा नृपः ।
सचिवानाह धर्मात्मा पुत्रशोकपरिप्लुतः ॥ २१ ॥
ज्ञातं भवद्भिरत्युग्रं पुत्रस्य मम चेष्टितम् ।
त्यक्तो मया वने धीमान्पुत्रः सत्यव्रतो मम ॥ २२ ॥
आज्ञयासौ गतः सद्यो राज्यार्हः परमार्थवित् ।
स्थितस्तत्रैव विज्ञाने धनहीनः क्षमान्वितः ॥ २३ ॥
वसिष्ठेन तथा शप्तः पिशाचसदृशः कृतः ।
सोऽद्य दुःखेन सन्तप्तः प्रवेष्टुञ्च हुताशनम् ॥ २४ ॥
उद्यतः श्रीमहादेव्या निषिद्धः संस्थितः पुनः ।
तस्माद् गच्छन्तु तं शीघ्रं ज्येष्ठपुत्रं महाबलम् ॥ २५ ॥
आश्वास्य वचनैरत्र तरसैवानयन्त्विह ।
अभिषिच्य सुतं राज्ये औरसं पालनक्षमम् ॥ २६ ॥
वनं यास्यामि शान्तोऽहं तपसे कृतनिश्चयः ।
इत्युक्त्वा मन्त्रिणः सर्वान्प्रेषयामास पार्थिवः ॥ २७ ॥
तस्यैवानयनार्थं हि प्रीतिप्रवणमानसः ।
ते गत्वा तं समाश्वास्य मन्त्रिणः पार्थिवात्मजम् ॥ २८ ॥
अयोध्यायां महात्मानं मानपूर्वं समानयन् ।
दृष्ट्वा सत्यव्रतं राजा दुर्बलं मलिनाम्बरम् ॥ २९ ॥
जटाजूटधरं क्रूरं चिन्तातुरमचिन्तयत् ।
किं कृतं निष्ठुरं कर्म मया पुत्रो विवासितः ॥ ३० ॥
राज्यार्हश्चातिमेधावी जानता धर्मनिश्चयम् ।
इति सञ्चिन्त्य मनसा तमालिङ्य महीपतिः ॥ ३१ ॥
आसने स्वसमीपशे समाश्वास्योपवेशयत् ।
उपविष्टं सुतं राजा प्रेमपूर्वमुवाच ह ॥ ३२ ॥
प्रेमगद्गदया वाचा नीतिशास्त्रविशारदः ।
राजोवाच -
पुत्र धर्मे मतिः कार्या माननीया मुखोद्भवाः ॥ ३३ ॥
न्यायागतं धनं ग्राह्यं रक्षणीयाः सदा प्रजाः ।
नासत्यं क्वापि वक्तव्यं नामार्गे गमनं क्वचित् ॥ ३४ ॥
शिष्टप्रोक्तं प्रकर्तव्यं पूजनीयास्तपस्विनः ।
हन्तव्या दस्यवः क्रूरा इन्द्रियाणां तथा जयः ॥ ३५ ॥
कर्तव्यं कार्यसिद्ध्यर्थं राज्ञा पुत्र सदैव हि ।
मन्त्रस्तु सर्वथा गोप्यः कर्तव्यः सचिवैः सह ॥ ३६ ॥
नोपेक्ष्योऽल्पोऽपि कृतिना रिपुः सर्वात्मना सुत ।
न विश्वसेत्परासक्तं सचिवं च तथा नतम् ॥ ३७ ॥
चाराः सर्वत्र योक्तव्याः शत्रुमित्रेषु सर्वथा ।
धर्मे मतिः सदा कार्या दानं दद्याच्च नित्यशः ॥ ३८ ॥
शुष्कवादो न कर्तव्यो दुष्टसङ्गं च वर्जयेत् ।
यष्टव्या विविधा यज्ञाः पूजनीया महर्षयः ॥ ३९ ॥
न विश्वसेत्स्त्रियं क्वापि स्त्रैणं द्यूतरतं नरम् ।
अत्यादरो न कर्तव्यो मृगयायां कदाचन ॥ ४० ॥
द्यूते मद्ये तथा गेये नूनं वारवधूषु च ।
स्वयं तद्विमुखो भूयात् प्रजास्तेभ्यश्च रक्षयेत् ॥ ४१ ॥
ब्राह्मे मुहूर्ते कर्तव्यमुत्थानं सर्वथा सदा ।
स्नानादिकं सर्वविधिं विधाय विधिवद्यथा ॥ ४२ ॥
पराशक्तेः परां पूजां भक्त्या कुर्यात्सुदीक्षितः ।
पुत्रैतज्जन्मसाफल्यं पराशक्तेः पदार्चनम् ॥ ४३ ॥
सकृत्कृत्वा महापूजां दैवीपादजलं पिबन् ।
न जातु जननीगर्भे गच्छेदिति विनिश्चयः ॥ ४४ ॥
सर्वं दृश्यं महादेवी द्रष्टा साक्षी च सैव हि ।
इति तद्भावभरितस्तिष्ठेन्निर्भयचेतसा ॥ ४५ ॥
कृत्वा नित्यविधिं सम्यग्गन्तव्यं सदसि द्विजान् ।
समाहूय च प्रष्टव्यो धर्मशास्त्रविनिर्णयः ॥ ४६ ॥
सम्पूज्य ब्राह्मणान्पूज्यान्वेदवेदान्तपारगान् ।
गोभूहिरण्यादिकं च देयं पात्रेषु सर्वदा ॥ ४७ ॥
अविद्वान्ब्राह्मणः कोऽपि नैव पूज्यः कदाचन ।
आहारादधिकं नैव देयं मूर्खाय कर्हिचित् ॥ ४८ ॥
न वा लोभात्त्वया पुत्र कर्तव्यं धर्मलङ्घनम् ।
अतः परं न कर्तव्यं क्वचिद्विप्रावमाननम् ॥ ४९ ॥
ब्राह्मणा भूमिदेवाश्च माननीयाः प्रयत्नतः ।
कारणं क्षत्रियाणां च द्विजा एव न संशयः ॥ ५० ॥
अद्भ्योऽग्निर्ब्रह्मणः क्षत्रमश्मनो लोहमुत्थितम् ।
तेषां सर्वत्रगं तेजः स्वासु योनिषु शाम्यति ॥ ५१ ॥
तस्माद्राज्ञा विशेषेण माननीया मुखोद्भवाः ।
दानेन विनयेनैव सर्वथा भूतिमिच्छता ॥ ५२ ॥
दण्डनीतिः सदा कार्या धर्मशास्त्रानुसारतः ।
कोशस्य संग्रहः कार्यो नूनं न्यायागतस्य ह ॥ ५३ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां सप्तमस्कन्धे
सत्यव्रताय राजनीत्युपदेशवर्णनं नामैकादशोऽध्यायः ॥ ११ ॥
पित्याचा सत्यव्रताला उपदेश -
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
जनमेजयाने व्यास मुनींना विचारले, "हे मुनीवर्या, आता वसिष्ठांच्या शापापासून त्रिशंकू मुक्त कसा झाला ही कथा मला विस्ताराने सांगा."
व्यास जनमेजयाला पुढील कथा सांगू लागले. ते म्हणाले, "अशा तर्हेने सत्यव्रत शापित झाला. त्याला पिशाच्चत्व प्राप्त झाले. पण त्याही अवस्थेत त्याने देवीची उपासना केली व देवीची भक्ती करीत तो विश्वामित्रांच्या आश्रमाजवळ वास्तव्य करून राहू लागला. त्याने नवाक्षर मंत्राचा जप केला व नंतर होमासाठी तो ब्राह्मणांकडे गेला. अत्यंत पूज्यभक्तीने तो हात जोडून म्हणाला, "हे भूदेवांनो, मी राजपुत्र सत्यव्रत आहे. आपण माझे म्हणणे ऐकून घ्या. मी नवाक्षर मंत्राचा जप केला आहे. आता मला होम करायचा आहे. त्यासाठी आपण माझे ऋत्विज व्हा व मला सहाय्य करून मला सुखप्राप्ती व्हावी म्हणून होम शेवटास न्या. आपण वेदवेत्ते असून दयाळू आहात. तेव्हा मजवर एवढे उपकार करा."
सत्यव्रताचे भाषण ऐकून ब्राह्मण त्याला म्हणाले, "हे राजपुत्रा, तुला वसिष्ठापासून शाप झाल्याने तू सांप्रत पिशाच्च झाला आहेस. चांडाळांना वेदांचा अधिकार नसल्याने तुला होम करता येणार नाही. लोकांनी निंदिलेले पिशाच्चत्व तुला प्राप्त झाले आहे."
ब्राह्मणांचे ते निर्वाणीचे भाषण ऐकून सत्यव्रताला अतिशय दुःख झाले. तो स्वतःशीच म्हणाला, "धिक्कार असो माझ्या जीविताला, आता मी काय करू ? पित्याने माझा त्याग केला. गुरूंनी शाप देऊन मला पिशाच्च केले. मी वनात राहून करू तरी काय ? राज्यभ्रष्ट तर झालो आहेच. आता मी कोणत्या मार्गाने जावे ? माझे जीवन व्यर्थ आहे. आता देहाचा नाश करणेच योग्य !"
राजपुत्र सत्यव्रताने असा विचार करून वनात जाऊन काष्ठे जमविली. त्यांची विस्तीर्ण चिता तयार केली. चिता पेटवून त्यात प्रवेश करण्यासाठी त्याने देवी चंडिकेचे स्मरण केले. स्नान करून त्याने महामाया जी पराशक्ती तिचे चिंतन केले व प्रज्वलित झालेल्या चितेसमोर तो हात जोडून चिता प्रवेश करण्याच्या पावित्र्यात उभा राहिला.
राजपुत्र चिता प्रवेश करीत आहे हे अवलोकन करून प्रत्यक्ष भगवती देवी आकाशात अवतीर्ण झाली. तिने सत्यव्रताला दर्शन दिले व सिंहारूढ झालेली ती देवी मेघगंभीर वाणीने सत्यव्रताला म्हणाली,
"हे साधो, तू मनात काय योजले आहेस ? हे वीरपुत्रा, तू शांत हो. सांप्रत तुझा पिता वृद्ध झाला आहे. तो लवकर राज्यत्याग करून वनात तपश्चर्येसाठी निघून जाणार आहे व तो तुला निःसंशय राज्य देणार आहे. तेव्हा तू देहत्याग करू नकोस. असला अविचार न करता स्थिर रहा. लवकरच म्हणजे परवाचे दिवशी तुझे मंत्री तुला नगरात नेण्याकरता येतील. मी तुला प्रसाद दिला आहे. तुझा पिता त्यामुळेच तुला राज्यासनावर अभिषेक करील आणि तो काम जिंकून ब्रह्मलोकी जाईल. हे सत्य ध्यानात ठेव."
असे म्हणून ती देवी तेथेच अंतर्धान पावली. सत्यव्रताने अग्निप्रवेश करण्याचे विचार मनातून काढून टाकले.
इकडे अयोध्येला जाऊन नारदमुनींनी राजाला सत्यव्रताला देवीचा प्रसाद झाल्याचा इतिहास कथन केला. ते ऐकून व आपला पुत्र मरणास प्रवृत्त झाल्याचे श्रवण करून राजा अतिशय खिन्न झाला व शोक करू लागला. तो धर्मात्मा राजा आपल्या मंत्रीजनांना म्हणाला, "हे सचिवहो, माझ्या पुत्राचे हे अतिशय दुष्ट असे चरित्र सर्वांना माहीतच आहे. त्याने उग्र तपश्चर्या केली आहे. तो बुद्धिमान असूनही मी त्याचा त्याग करून त्याला वनात पाठवले. तो परमार्थतत्पर पुत्र राज्यपदाला आता योग्य झाला आहे असे मला वाटते. केवळ माझी आज्ञा पालन करण्याकरता तो वनात निघून गेला व तेथे धनहीन होऊनही क्षमाशीलवृत्तीने वागून तो ज्ञानप्राप्ती करू लागला. असे असताही वसिष्ठांनी त्याला शाप देऊन पिशाच्च बनविले. म्हणून त्याने दुःखाने अग्निप्रवेश करण्याचे ठरविले, पण त्या महादेवीनेच त्याला त्यापासून परावृत्त केले आहे. तेव्हा आता त्याचा छळ न करता तुम्ही सत्वर जाऊन त्याला येथे घेऊन यावे, त्याला योग्य ते वचन देऊन येथे आणा. त्या प्रजाहिततत्पर पुत्राला राज्याभिषेक करून मी वनात जाणार आहे. त्याच्याविषयीचा माझा क्रोध शांत झाला आहे. यापुढे मी निश्चिंत मनाने तपश्चर्या करणार आहे."
अशा तर्हेने राजाचे मन द्रवले व सत्यव्रताला परत आणण्यासाठी त्याने आपल्या मंत्र्यांना पाठविले. मंत्रीजन सत्यव्रताकडे आले व त्याचे योग्य आश्वासनांनी समाधान करून त्यांनी राजपुत्राला अयोध्येस परत आणले. त्याचा सन्मान केला. यावेळी सत्यव्रताची अवस्था विचित्र होती. त्याचा चेहरा म्लान व दीन झाला होता. त्याच्या मस्तकावर जटाभार होता. वस्त्रे मलिन झाली होती. तो गंभीर असूनही अत्यंत चिंताग्रस्त झाला होता. आपल्या पुत्राची ही अवस्था अवलोकन करताच राजाला दुःख झाले. तो मनात म्हणाला,
"अरेरे ! मी धर्मतत्पर असूनही माझ्या या बुद्धिमान व राज्याला योग्य अशा पुत्राला वनात धाडले. किती निष्ठूर झालो मी ! असा विचार करून राजाने सत्यव्रताला प्रेमालिंगन दिले आणि मायेने आश्वासन देऊन आपल्या जवळील आसनावर बसविले. नंतर तो नीतिशास्त्र जाणणारा राजा गद्गदलेल्या स्वराने म्हणाला, "हे प्रिय पुत्रा, तू धर्मावर बुद्धी स्थिर ठेव. ब्राह्मण, तपस्वी, सत्पुरुष यांचा मान ठेव. न्यायमार्गानेच धनप्राप्ती कर. तू कधीही असत्य वाणी उच्चारू नकोस. वाईट मार्गाने जाऊ नकोस. शिष्ट सांगतील त्याचाच अनुग्रह कर. तापसांचा सन्मान करून दुष्ट चोरांचा वध करीत जा."
हे पुत्रा, आपले कार्य सिद्धीस जावे म्हणून इंद्रियांवर जय प्राप्त कर. सचिवांचा आदर ठेवून त्यांचेशी गुप्त चर्चा कराव्यात. आपण अति पराक्रमी असलो तरीही क्षुल्लक शत्रूची कधीही उपेक्षा करू नकोस. परासक्त व विनयी नाही अशा मंत्र्यावर कधीही विश्वास ठेवू नकोस. शत्रू असो वा मित्र असो, आपले हेर सर्व ठिकाणी ठेवावेत. सदा धर्मरत राहून नित्य दानधर्म करावा. निष्कारण वाद करू नये. महर्षींची आदराने पूजा कर. स्त्रिया, स्त्रैण, द्यूत खेळणारे जुगारी ह्यांच्यावर कधीही विश्वास ठेवून राहू नकोस.
मृगया, द्यूत, मद्य, गायन व वारांगना ह्या बाबतीत कधीही आसक्ती धरू नकोस. तू त्यांच्यापासून नित्य परावृत्त रहा. तसेच प्रजाजनांचेही त्यापासून रक्षण कर. कोणत्याही परिस्थितीत बाह्म मुहूर्तावर उठून स्नानादि नित्य कर्मे यथाविधी कर व नंतर चांगली दीक्षा घेऊन भक्तिभावाने त्या देवी पराशक्तीची आराधना कर.
हे सुपुत्रा, पराशक्तीच्या चरणाचे पूजन केल्याने जन्माचे सार्थक होते. एकदा जरी पुरुषाने महापूजा करून त्या भगवतीच्या चरणाचे तीर्थ प्राशन केले तरी त्या भाग्यवान् पुरुषाला पुनः जन्म घ्यावा लागत नाही. तो मुक्त होतो. दृश्य, द्रष्टा, साक्षी हे सर्वकाही ती देवीच आहे. अशी खात्री बाळगून तू निर्भय वृत्तीने रहा."
आपले नित्यविधी योग्यप्रकारे उरकल्यावर मगच सभेत जात जा. ब्राह्मणांकडून धर्मशास्त्रांचा निर्णय समजावून घेऊन वेदांतपारंगत अशा पूज्य ब्राह्मणांची मनोभावे पूजा करून भूमिदान, सुवर्णदान करून गाईचे दान करावे. अविद्वान ब्राह्मणांची कधीही पूजा करू नकोस. हे पुत्रा, लोभासाठी धर्मतत्त्व सोडू नकोस. ब्राह्मण हे भूदेव आहेत म्हणून त्यांचा अपमान करू नकोस.
क्षत्रियांचा अभ्युदय करणारे हे ब्राह्मणच आहेत ही गोष्ट सत्य आहे. उदकापासून अग्नी, ब्राह्मणीपासून क्षत्रिय व पाषाणापासून लोह उत्पन्न झाले आहे. ह्यांचे तेज सर्वगामी आहे. म्हणून स्वतःच्या उत्पत्तीस्थानाचे ठिकाणी पराक्रम दाखवू नये. तेथे शांत असावे. म्हणून अभ्युदयाची इच्छा करणार्या राजाने विनयाने दान करून गुणी जनांचा विशेषतः ब्राह्मणांचा मान ठेवावा. धर्मशास्त्राला अनुसरूनच दंडनीतीचा वापर करावा. अत्यंत न्याय्य मार्गाने प्राप्त झालेल्या धनाचा तू आपल्या कोशागारात संग्रह कर."