[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
मांधाता राजा अशाप्रकारे जन्माला आला. त्याने राज्यावर आल्यावर सर्व पृथ्वी पादाक्रांत केली व चक्रवर्ती महाराजा झाला. त्याच्या भयाने चोर, दरोडेखोर वगैरे दुष्ट प्रवृत्तीचे लोक रानावनात पळून गेले व गुहेत वास्तव्य करून राहू लागले. त्याचा हा पराक्रम अवलोकन करून राजा मांधाताला इंद्राने त्रसदस्यु असे दुसरे नाव दिले. शशबिंदु नावाचा एक धर्मात्मा राजा त्यावेळी राज्य करीत होता. त्याने आपली कन्या बिंदुमति मांधाताला अर्पण केली. ती राणी बिंदुमति महापतीव्रता होती. मांधातापासून तिला पुरूकुत्स व मुचुकुंद असे दोन तेजस्वी पुत्र झाले. हे दोन्ही पुत्र महापराक्रमी उत्पन्न झाले. पुरूकुत्स राजाला अरण्य नावाचा सत्प्रवृत्त पुत्र झाला. तो पितृभक्त म्हणून विख्यात होता. अरण्यला बृहदश्व हा पुत्र झाला.
बृहदश्वाने धर्मतत्पर राहून राज्य केले. पुढे त्याला हर्यश्व नावाचा पुत्र झाला. हर्यश्व हा धार्मिक व परमार्थाची आवड असलेला होता. तो सदाचारी असल्याने त्याची फार प्रसिद्धी झाली. हर्यश्वला तिधन्वा व तिधन्वाचा पुत्र अरुण अशी ही परंपरा आहे. अरुण हा सच्छील होता. त्याने धर्माने राज्य केले. त्यालाच सत्यव्रत नावाचा प्रसिद्ध पुत्र झाला.
पूर्वी तो मंदबुद्धी व विषयासक्त होता. तो अत्यंत भोगलोलूप होता. तो स्वेच्छाचारी असल्याने तो दुरात्मा राजपुत्र अनेक विप्रांच्या भार्या बळजबरीने हरण करी. एकदा एका ब्राह्मणाचा विवाहविधी चालू होता. सत्यव्रत राजपुत्र कामातुर होऊन तेथे गेला व त्याने विवाहात विघ्न आणले. अखेर सर्व ब्राह्मण एकत्र जमले व "आमचा या राजपुत्राने घात केला." असे सांगण्यासाठी राजा अरुण याच्याकडे गेले. त्यांचा आक्रोश ऐकून राजा अरुण दुःखी झालेल्या नागरिकांना म्हणाला, "हे सज्जनहो, मनात कोठलीही शंका न ठेवता आपण माझ्या पुत्राने आजवर केलेली दुष्कृत्ये विस्ताराने कथन करा. कारण तो राजपुत्र असल्याने त्याचेबद्दल चहाडी करण्यास लोक घाबरतात. पण आता तुम्ही घाबरू नका. तुम्हा सर्वांना अभय आहे." राजाचे धीराचे शब्द ऐकून ब्राह्मण पुढे सरसावले. त्यांनी त्या विनयसंपन्न राजाला शुभाशीर्वाद दिले. एक ब्राह्मण राजाला म्हणाला,
"हे राजश्रेष्ठा, तू पराक्रमी आहेस. अनेक राजे तुला घाबरतात. पण तुझ्या पुत्राने आज महाभयंकर कृत्य केले आहे. ते अनुचित कृत्य पापवासनेमुळे त्याने केले. आज त्याने विवाह समारंभातून विवाहीत वधूला बलात्काराने पळवून नेले आहे. राजा, राजपुत्राला हे करणे शोभत नाही. जनतेने राजावर विश्वास कसा ठेवावा ? आम्ही आता आश्रयासाठी कोणीकडे जावे ?"
त्या विप्रांचे सत्य भाषण ऐकून राजाला अपार दुःख झाले. आपला पुत्र इतका दुराचारी निघाला म्हणून त्याचे मन उद्विग्न झाले. त्याने सत्वर पुत्राला बोलावून घेतले. राजा स्वतः परम धार्मिक असल्याने त्याला आपल्या पुत्राचे दुष्कृत्य सहन झाले नाही. तो पुत्राला म्हणाला, "हे दुष्ट सुव्रता, तू अत्यंत मंदबुद्धी आणि दुराचारी निपजलास. तू आजवर जी दुष्ट कृत्ये केलीस त्यामुळे आपल्या कुळाचे नाव तू व्यर्थ घालविलेस. हे कुलांगार पापात्म्या, तू माझ्या डोळ्यासमोर राहू नकोस. हे नीच अविचारी पुत्रा, तू सत्वर येथून चालता हो. इतकेच काय पण माझ्या राज्यात कोठेही वास्तव्य न करता राज्याबाहेर कोठेही तुझे हे काळे तोंड कर."
पित्याचा अनावर झालेला क्रोध पाहून सत्यव्रताने राजाला पुन्हा पुन्हा विचारले, "हे तात, मी आता कुणीकडे जाऊ सांगा."
राजा म्हणाला, "निर्लज्ज पुत्र, तू चांडालांच्याच सहवासात जाऊन रहाण्याच्या योग्यतेचा आहेस. तू एका द्विजस्त्रीचा अपहार केला आहेस. असले दुष्ट कृत्य फक्त चांडालच करू शकतो. इतरांना असले पाप करण्याचे धाडस होत नाही. म्हणून तू त्यांच्यातच मिसळून सुखाने विषयोपभोग घे. हे कुलनाशका, तुझ्यासारख्या दुष्ट पुत्रामुळे मी आजपासून निपुत्रिक म्हणून राहीन. पण तू येथून पाहिजे तिकडे चालता हो. हे दुरात्म्या, मी आजवर मिळवलेली किर्ती तू धुळीला मिळवली आहेस. कुळाच्या नावलौकिकाला तू काळोखी फासली आहेस."
राजा अरुणाने वसिष्ठ मुनींच्या संमतीने आपल्या पुत्राला राज्याबाहेर घालविले. वसिष्ठांनी अनुमती दिल्यामुळे सत्यव्रताला बाहेर पडावे लागले म्हणून तो वसिष्ठमुनीवर राग धरूनच घरातून बाहेर पडला. तो चांडाळांच्या समुदायात येऊन वास्तव्य करू लागला. हातात धनुष्यबाण व कवच धारण करून तो नित्य हिंडू लागला. एवढा धर्मशास्त्रज्ञ वसिष्ठमुनी, पण त्यांनीही सत्यव्रताला घालवून देण्यापासून परावृत्त केले नाही म्हणून सत्यव्रत वसिष्ठांबद्दल अढी बाळगून होता.
सत्यव्रताचा पिता अरुण हा पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या करण्यास वनात गेला. केवळ अधर्म घडला आहे असा विचार करून इंद्राने त्या राज्यात बारा वर्षे पाऊस पाडला नाही. त्यामुळे सर्वत्र दुष्काळ पडला. जिकडे तिकडे हाहाःकार उडाला. याचवेळी त्य्या देशात आपल्या स्त्रीला ठेवून विश्वामित्र कौशिकी नदीचे तीरावर महातपश्चर्या करण्यास गेला होता. पण भयंकर दुष्काळाने ती विश्वामित्रपत्नी अत्यंत त्रस्त झाली व दुःखी होऊन अतिशय घाबरून गेली. शिवाय बालकाला अत्यंत भूक लागल्यामुळे तो सदैव रडत आहे, त्याची क्षुधा निवारण करणे अशक्य आहे हे समजून ती स्त्री अधिकच दुःख करू लागली. ती शोकमग्न होऊन विचार करू लागली, काय करावे ? राजा तर नगरात नाही. आता मी कोणाकडे जाऊन याचना करावी ? आता येथे उपजीविकेचे दुसरे साधनही नाही. आता या पुत्राला कोण वाचवील ? पती जवळ नसल्याने आपणास काय करणे शक्य आहे ? बालक तर सदैव रडत आहे. खरोखरच माझ्या जीविताला धिक्कार असो. माझे पती समर्थ असूनही माझे दुःख का बरे जाणत नाहीत ? ते निघून गेल्यामुळे मजवर केवढा वाईट प्रसंग प्राप्त झाला आहे. पतीशिवाय मी या बालकाचे पोषण आता कसे करावे ? आता मला कोण सहाय्य करील ? क्षुधेने व्याकुळ होऊन सर्वच पुत्र आता मरणार तर नाहीत ना ? आता खरोखर या दारुण संकटाचे वेळी मी एका पुत्राचा विक्रय करून थोडेसे द्रव मिळविते आणि इतरांचे दुःखनिवारण करते व पोषण करते.
अशा संकट प्रसंगी हाच एक उपाय योग्य आहे. अशा या दुर्दैवी अवस्थेत सर्व पुत्रांना मरू देणे इष्ट नव्हे. म्हणून हृदय वज्रासारखे कठीण करून एक पुत्र विकणे प्राप्त आहे. अशाप्रकारे त्या साध्वीने खूप विचार केला व एका पुत्राच्या गळ्यात दर्भाची दोरी बांधून ती घरातून निघाली.
इतर पुत्रांचे पोषण व्हावे म्हणून मधल्या पुत्राची विक्री करण्याकरता ती रस्त्याने जात होती. तिचे दुःख अनिवार होत होते. वात्सल्याने डोळ्यातून अश्रुधारा वाहात होत्या. पण तिने अंतःकरण घट्ट केले होते. तरीही पावले जड पडत होती. अशा वेळी सत्यव्रताचे लक्ष त्या दुर्दैवी स्त्रीकडे गेले. तो सहृदयतेने त्या मुनिपत्नीला म्हणाला, "हे कल्याणी, तू काय करीत आहेस ? हा पुत्र का रडत आहे ? तू या पुत्राची कोण आहेस ? याच्या गळ्यात दोरी बांधून तू कसला निर्णय केला आहेस ? हे चारुगात्री, तू मला सत्य असेल ते सत्वर सांग."
सत्यव्रताचे बोलणे ऐकून ती मुनिभार्या म्हणाली, "राजपुत्रा, मी विश्वामित्राची पत्नी आहे. हा माझाच मध्यम पुत्र आहे. सांप्रत दुष्काळामुळे मी अत्यंत संकटात आहे. माझे पति तपश्चर्येसाठी दूर गेले आहेत. माझ्या इतर पुत्रांचे पोषण व्हावे म्हणून मन घट्ट करून मी हा माझा औरस पुत्र विक्रीसाठी नेत आहे. मी तसे केले नाही तर माझे सर्वच पुत्र क्षुधेने व्याकुळ होऊन मरतील. आता मी करू तरी काय ?"
तिचे हृदयद्रावक शब्द ऐकून सत्यव्रत म्हणाला, " हे पतिव्रते, तुझा पति वनातून येईपर्यंत मी तुझ्या पुत्रांचे पोषण करतो. तू त्यांचे रक्षण कर. मी तुम्हा सर्वांच्या उदरभरणाची तजवीज आताच करतो. तू चिंता करू नकोस. मी रोज तुझ्या आश्रमाजवळ असलेल्या वृक्षाजवळ नित्य काहीतरी भक्ष्य बांधून परत जाईन. तू त्यायोगे सर्वांचा उदरनिर्वाह कर. मी हे सत्य सांगत आहे. विश्वास ठेव."
राजपुत्राचे समाधानाचे शब्द ऐकून मुनिपत्नी परत आश्रमात आली. तिने आपल्या पुत्राला बंधमुक्त केले पण त्यावेळेपासून तो पुत्र गलबंधनामुळे गालव म्हणून प्रसिद्ध पावला व महातपस्वी झाला. सत्यव्रताने वचन दिल्याप्रमाणे विश्वामित्रांच्या पत्नीचे व पुत्रांचे पोषण केले. त्यामुळे ती मुनिभार्या आनंदाने आपल्या आश्रमात सुखाने वास्तव्य करू लागली.
सत्यव्रत वनात जाऊन शिकार करीत असे व मृग, वराह, महिष इत्यादि श्वापदे मारून तो विश्वामित्रांच्या आश्रमाजवळ वृक्षावर बांधून ठेवीत असे. अशा या दुष्काळातही उत्तम प्रकारचे भक्ष्य मिळत आहे म्हणून आनंदित होऊन ती मुनीभार्या आपल्या पुत्राची क्षुधा यथेच्छ शमवीत असे. त्यामुळे तिलाही अतिशय समाधान प्राप्त झाले होते.
अरुण राजा तपश्चर्येस गेला असता इकडे अयोध्या नगरीचे, राजाच्या अंतःपुराचे व सर्व राज्याचे संरक्षण वसिष्ठ मुनींनी केले.
तो धर्मात्मा सत्यव्रतही उपजीविकेसाठी पशूहत्या करू लागला व पित्याच्या आज्ञेप्रमाणे वनात राहू लागला. पण पुनः काहीतरी कारण घडल्यामुळे त्याने वसिष्ठ मुनीबद्दल अधिकच राग धरला. सत्यव्रताचा जेव्हा राजाने त्याग केला तेव्हा राजाला त्यापासून परावृत्त करणे शक्य असूनही वसिष्ठ मुनींनी तसे केले नाही. हे त्याच्या रागाचे मुख्य कारण होते. शिवाय सप्तपदी कर्माचे वेळीच पाणिग्रहण मंत्राची समाप्ती होते व त्यापूर्वीच सत्यव्रताने ब्राह्मण कन्येचा अपहार केला होता. तेव्हा परस्त्रीचा अपहार केला नाही हेही त्या वसिष्ठ मुनींना पूर्णपणे ठाऊक होते. तरीही पित्याचे निवारण वसिष्ठांनी केले नाही म्हणून त्यांचा सत्यव्रताला अतिशय राग येत असे. शिवाय आता दुसरे एक क्रोधाचे कारण उपस्थित झाले होते.
एकदा अरण्यात मृगांचा अभाव होता. सत्यव्रताला कोठेच मृग आढळले नाहीत. त्याच वेळी वसिष्ठ मुनींची दुभती गाय सत्यव्रताच्या दृष्टीस पडली. क्षुधा झालेल्या सत्यव्रताने पूर्वीचा क्रोध मनात आणून वसिष्ठांच्या गाईचा वध केला व तिचे मांस विश्वामित्र मुनींच्या आश्रमाजवळ झाडाला नेऊन बांधले व स्वतःही एकटेपणी भक्षण केले. पण इकडे विश्वामित्र पत्नीला हे गोमांस आहे न समजल्यामुळे नित्याप्रमाणे मृगमास समजून तिने ते आपल्या पुत्रांना खाऊ घातले.
सत्यव्रताने आपल्या दुभत्या गाईचा वध केला हे वसिष्ठ मुनींनी जाणले व त्यामुळे ते अत्यंत क्रोधायमान झाले. अत्यंत संतप्त होऊन ते सत्यव्रताला म्हणाले, "हे पापात्म्या, तू एखाद्या पिशाच्च्याप्रमाणे वर्तणूक करून धेनुवधाचे पातक केले आहेस. गोवध, स्त्रीहरण व पितृक्रोध अशी तीन प्रकारची नीच पापे तू केली आहेस. म्हणून तू पिशाच्च होशील. तुझ्या मस्तकावर सत्वर तीन क्रूर शंकू उठतील. आपले पिशाच्च रूप सर्व प्राणिमात्रांना दाखवून तू सर्वत्र संचार करू लागशील आणि तू त्रिशंकू म्हणून भूमीवर प्रसिद्ध होशील."
वसिष्ठ मुनींनी सत्यव्रताला शाप दिल्यावर तो विश्वामित्र मुनींच्या आश्रमाजवळ राहून घोर तपश्चर्या करू लागला. तेथे एका मुनिपुत्राने त्याला एक सुंदर मंत्र प्राप्त करून दिला. तो त्या मंत्राचा अविरत जप करीत राहिला आणि उत्कृष्ट प्रकृति कल्याणी जी भगवतीदेवी हिचे मनोमन चिंतन करून तो राहू लागला."