श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
सप्तमः स्कन्धः
द्वाविंशोऽध्यायः


हरिश्चन्द्रस्य पत्‍नीपुत्रविक्रयवर्णनम्

व्यास उवाच -
स तया नोद्यमानस्तु राजा पत्‍न्या पुनः पुनः ।
प्राह भद्रे करोम्येष विक्रयं ते सुनिर्घृणः ॥ १ ॥
नृशंसैरपि यत्कर्तुं न शक्यं तत्करोम्यहम् ।
यदि ते भ्राजते वाणी वक्तुमीदृक्सुनिष्ठुरम् ॥ २ ॥
एवमुक्त्वा ततो राजा गत्वा नगरमातुरः ।
अवतार्य तदा रङ्गे तां भार्यां नृपसत्तमः ।
बाष्पगद्‍गदकण्ठस्तु ततो वचनमब्रवीत् ।
भो भो नागरिकाः सर्वे शृणुध्वं वचनं मम ॥ ४ ॥
कस्यचिद्यदि कार्यं स्याद्दास्या प्राणेष्टया मम ।
स ब्रवीतु त्वरायुक्तो यावत्स्वं धारयाम्यहम् ॥ ५ ॥
तेऽब्रुवन्पण्डिताः कस्त्वं पत्‍नीं विक्रेतुमागतः ।
राजोवाच -
किं मां पृच्छथ कस्त्वं भो नृशंसोऽहममानुषः ॥ ६ ॥
राक्षसो वास्मि कठिनस्ततः पापं करोम्यहम् ।
व्यास उवाच -
तं शब्दं सहसा श्रुत्वा कौशिको विप्ररूपधृक् ॥ ७ ॥
वृद्धरूपं समास्थाय हरिश्चन्द्रमभाषत ।
समर्पयस्व मे दासीमहं क्रेता धनप्रदः ॥ ८ ॥
अस्ति मे वित्तमतुलं सुकुमारी च मे प्रिया ।
गृहकर्म न शक्नोति कर्तुमस्मात्प्रयच्छ मे ॥ ९ ॥
अहं गृह्णामि दासीं तु कति दास्यामि ते धनम् ।
एवमुक्ते तु विप्रेण हरिश्चन्द्रस्य भूपतेः ॥ १० ॥
विदीर्णं तु मनो दुःखान्न चैनं किञ्चिदब्रवीत् ।
विप्र उवाच -
कर्मणश्च वयोरूपशीलानां तव योषितः ॥ ११ ॥
अनुरूपमिदं वित्तं गृहाणार्पय मेऽबलाम् ।
धर्मशास्त्रेषु यद्‌ दृष्टं स्त्रियो मौल्यं नरस्य च ॥ १२ ॥
द्वात्रिंशल्लक्षणोपेता दक्षा शीलगुणान्विता ।
कोटिमौल्यं सुवर्णस्य स्त्रियः पुंसस्तथार्बुदम् ॥ १३ ॥
इत्याकर्ण वचस्तस्य हरिश्चन्द्रो महीपतिः ।
दुःखेन महताऽऽविष्टो न चैनं किञ्चिदब्रवीत् ॥ १४ ॥
ततः स विप्रो नृपतेः पुरतो वल्कलोपरि ।
धनं निधाय केशेषु धृत्वा राज्ञीमकर्षयत् ॥ १५ ॥
राज्ञ्युवाच -
मुञ्च मुञ्चार्य मां सद्यो यावत्पश्याम्यहं सुतम् ।
दुर्लभं दर्शनं विप्र पुनरस्य भविष्यति ॥ १६ ॥
पश्येह पुत्र मामेवं मातरं दास्यतां गताम् ।
मां मास्प्राक्षी राजपुत्र न स्पृश्याहं त्वयाधुना ॥ १७ ॥
ततः स बालः सहसा दृष्ट्वाऽऽकृष्टां तु मातरम् ।
समभ्यधावदम्बेति वदन्साश्रुविलोचनः ॥ १८ ॥
हस्ते वस्त्रं समाकर्षन् काकपक्षधरः स्खलन् ।
तमागतं द्विजः क्रोधाद्‌ बालमप्याहनत्तदा ॥ १९ ॥
वदंस्तथापि सोऽम्बेति नैव मुञ्चति मातरम् ।
राज्ञ्युवाच -
प्रसादं कुरु मे नाथ क्रीणीष्वेमं हि बालकम् ॥ २० ॥
क्रीतापि नाहं भविता विनैनं कार्यसाधिका ।
इत्थं ममाल्पभाग्यायाः प्रसादं कुरु मे प्रभो ॥ २१ ॥
ब्राह्मण उवाच -
गृह्यतां वित्तमेतत्ते दीयतां मम बालकः ।
स्त्रीपुंसोर्धर्मशास्त्रज्ञैः कृतमेव हि वेतनम् ॥ २२ ॥
शतं सहस्रं लक्षं च कोटिमौल्यं तथापरैः ।
द्वात्रिंशल्लक्षणोपेता दक्षा शीलगुणान्विता ॥ २३ ॥
कोटिमौल्यं स्त्रियः प्रोक्तं पुरुषस्य तथार्बुदम् ।
सूत उवाच -
तथैव तस्य तद्वित्तं पुरः क्षिप्तं पटे पुनः ॥ २४ ॥
प्रगृह्य बालकं मात्रा सहैकस्थमबन्धयत् ।
प्रतस्थे स गृहं क्षिप्रं तया सह मुदान्वितः ॥ २५ ॥
प्रदक्षिणां तु सा कृत्वा जानुभ्यां प्रणता स्थिता ।
बाष्पपर्याकुला दीना त्विदं वचनमब्रवीत् ॥ २६ ॥
यदि दत्तं यदि हुतं ब्राह्मणास्तर्पिता यदि ।
तेन पुण्येन मे भर्ता हरिश्चन्द्रोऽस्तु वै पुनः ॥ २७ ॥
पादयोः पतितां दृष्ट्वा प्राणेभ्योऽपि गरीयसीम् ।
हाहेति च वदन् राजा विललापाकुलेन्द्रियः ॥ २८ ॥
वियुक्तेयं कथं जाता सत्यशीलगुणान्विता ।
वृक्षच्छायापि वृक्षं तं न जहाति कदाचन ॥ २९ ॥
एवं भार्यां वदित्वाथ सुसम्बद्धं परस्परम् ।
पुत्रं च तमुवाचेदं मां त्वं हित्वा क्व यास्यसि ॥ ३० ॥
कां दिशं प्रति यास्यामि को मे दुःखं निवारयेत् ।
राज्यत्यागे न मे दुःखं वनवासे न मे द्विज ॥ ३१ ॥
यत्पुत्रेण वियोगो मे एवमाह स भूपतिः ।
सद्‌भर्तृभोग्या हि सदा लोके भार्या भवन्ति हि ॥ ३२ ॥
मया त्यक्तासि कल्याणि दुःखेन विनियोजिता ।
इक्ष्वाकुवंशसम्भूतं सर्वराज्यसुखोचितम् ॥ ३३ ॥
मामीदृशां पतिं प्राप्य दासीभावं गता ह्यसि ।
ईदृशे मज्जमानं मां सुमहच्छोकसागरे ॥ ३४ ॥
को मामुद्धरते देवि पौराणाख्यानविस्तरैः ।
सूत उवाच -
पश्यतस्तस्य राजर्षेः कशाघातैः सुदारुणैः ॥ ३५ ॥
घातयित्वा तु विप्रेशो नेतुं समुपचक्रमे ।
नीयमानौ तु तौ दृष्ट्वा भार्यापुत्रौ स पार्थिवः ॥ ३६ ॥
विललापातिदुःखार्तो निःश्वस्योष्णं पुनः पुनः ।
यां न वायुर्न वाऽऽदित्यो न चन्द्रो न पृथ्ग्जनाः ॥ ३७ ॥
दृष्टवन्तः पुरा पत्‍नीं सेयं दासीत्वमागता ।
सूर्यवंशप्रसूतोऽयं सुकुमारकराङ्गुलिः ॥ ३८ ॥
सम्प्राप्तो विक्रयं बालो धिङ्‌मामस्तु सुदुर्मतिम् ।
हा प्रिये हा शिशो वत्स ममानार्यस्य दुर्नयः ॥ ३९ ॥
दैवाधीनदशां प्राप्तो न मृतोऽस्मि तथापि धिक् ।
व्यास उवाच -
एवं विलपितो राज्ञोऽग्रे विप्रोऽन्तरधीयत ॥ ४० ॥
वृक्षगेहादिभिस्तुङ्गैस्तावादाय त्वरान्वितः ।
अत्रान्तरे मुनिश्रेष्ठस्त्वाजगाम महातपाः ॥ ४१ ॥
सशिष्यः कौशिकेन्द्रोऽसौ निष्ठुरः क्रूरदर्शनः ।
विश्वामित्र उवाच-
या त्वयोक्ता पुरा राजन् राजसूयस्य दक्षिणा ॥ ४२ ॥
तां ददस्व महाबाहो यदि सत्यं पुरस्कृतम् ।
हरिश्चन्द्र उवाच -
नमस्करोमि राजर्षे गृहाणेमां स्वदक्षिणाम् ॥ ४३ ॥
राजसूयस्य यागस्य या मयोक्ता पुरानघ ।
विश्वामित्र उवाच -
कुतो लब्धमिदं द्रव्यं दक्षिणार्थे प्रदीयते ॥ ४४ ॥
एतदाचक्ष्व राजेन्द्र यथा द्रव्यं त्वयार्जितम् ।
राजोवाच -
किमनेन महाभाग कथितेन तवानघ ॥ ४५ ॥
शोकस्तु वर्धते विप्र श्रुतेनानेन सुव्रत ।
ऋषिरुवाच -
अशस्तं नैव गृह्णामि शस्तमेव प्रयच्छ मे ॥ ४६ ॥
द्रव्यस्यागमनं राजन् कथयस्व यथातथम् ।
राजोवाच -
मया देवी तु सा भार्या विक्रीता कोटिसम्मितैः ।
निष्कैः पुत्रो रोहिताख्यो विक्रीतोऽर्बुदसंख्यया ।
विप्रैकादशकोट्यस्त्वं सुवर्णस्य गृहाण मे ॥ ४८ ॥
सूत उवाच -
तद्वित्तं स्वप्लमालक्ष्य दारविक्रयसम्भवम् ।
शोकाभिभूतं राजानं कुपितः कौशिकोऽब्रवीत् ॥ ४९ ॥
ऋषिरुवाच -
राजसूयस्य यज्ञस्य नैषा भवति दक्षिणा ।
अन्यदुत्पादय क्षिप्रं सम्पूर्णा येन सा भवेत् ॥ ५० ॥
क्षत्रबन्धो ममेमां त्वं सदृशीं यदि दक्षिणाम् ।
मन्यसे तर्हि तत्क्षिप्रं पश्य त्वं मे परं बलम् ॥ ५१ ॥
तपसोऽस्य सुतप्तस्य ब्राह्मणस्यामलस्य च ।
मत्प्रभावस्य चोग्रस्य शुद्धस्याध्ययनस्य च ॥ ५२ ॥
राजोवाच -
अन्यद्दास्यामि भगवन् कालः कश्चित्प्रतीक्ष्यताम् ।
अधुनैवास्ति विक्रीता पत्‍नी पुत्रश्च बालकः ॥ ५३ ॥
विश्वामित्र उवाच -
चतुर्भागः स्थितो योऽयं दिवसस्य नराधिप ।
एष एव प्रतीक्ष्यो मे वक्तव्यं नोत्तरं त्वया ॥ ५४ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां सप्तमस्कन्धे
हरिश्चन्द्रस्य पत्‍नीपुत्रविक्रयवर्णनं नाम द्वाविंशोऽध्यायः ॥ २२ ॥


हरिश्‍चंद्र आपल्या पत्‍नीची व पुत्राची विक्री करतो -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

राणीने राजाला धर्मतत्परतेची जाणीव देऊन पुन्हा पुन्हा आपली विक्री करण्यास सांगितले. तिच्या बोलण्यावर राजाने विचार केला. तो आपल्या प्रिय पत्‍नीला म्हणाला, "हे प्रियतम कल्याणि, तुझे म्हणणे सांप्रत योग्यच आहे. तेव्हा प्रत्यक्ष दुष्ट लोकही जे करणार नाहीत, त्यांनाही जे कृत्य करायचे धैर्य होणार नाही, असे कृत्य अत्यंत निर्दय होऊन मी आज करतो. मी पशुतुल्य वृत्तीने तुझी विक्री करतो. तूही हे क्रूर कर्म करण्यासाठी मला आग्रहपूर्वक संमती देत आहेस, म्हणून मन दगडाप्रमाणे कठीण करून निर्दय मनाने मी ते कार्य करीन."

असे म्हणून तो राजराजेश्‍वर अत्यंत खिन्न वदनाने आपल्या पुत्र व भार्येसह नगरातील आतील भागात गेला. तेथे जाऊन राजाने आपल्या पत्‍नीस राजमार्गात मध्येच उभे केले. अत्यंत सद्‌गदित होऊन गहिवरलेल्या कंठाने तो कापर्‍या शब्दात म्हणाला, "हे सर्वमान्य नागरिक जनहो, आपण सर्वांनी येथे येऊन माझे म्हणणे संपूर्ण ऐकून घ्या. मला विप्राचे ऋण असून त्यातून मुक्त होण्यासाठी मी माझ्या या प्राणप्रिय भार्येची विक्री करीत आहे. हे सज्जनहो, ह्यास्तव मला माझ्या ऋणाइतके द्रव्य देऊन हिला दासी म्हणून विकत घ्यावे. ज्याला ही दासी म्हणून हवी असेल त्याने येथे येऊन सत्वर बोलावे."

राजाच्या भाषणाने विस्मित होऊन एक पंडित म्हणाला, "हे सुव्रता, आपल्या पत्‍नीची विक्री करण्यास सिद्ध झालेला तू आहेस तरी कोण ? ते सत्वर सांग."

राजा दुःखाने व्याप्त होऊन विनयाने म्हणाला, "अहो, खरोखरच मी कोण आहे असे आपण मला का बरे विचारता ? मी प्रत्यक्ष माझ्या पत्‍नीचा विक्रय करीत आहे. या माझ्या कृतीवरून आपणास समजलेच आहे. अहो, खरोखरच मी अत्यंत निर्दय असा चांडाळच आहे. मी मनुष्य नाही. अत्यंत कठीण हृदय असलेला मी क्रूरकर्मा राक्षस आहे. म्हणूनच हे अत्यंत नीच आणि भयंकर पापकर्म मी करीत आहे."

राजाचे हे बोलणे संपते न संपते तोच एका वृद्ध ब्राह्मणाचा वेष घेऊन विश्‍वामित्र तेथे प्राप्त झाला आणि तो अत्यंत कठोर होऊन हरिश्‍चंद्रास म्हणाला, "अरे, ती स्त्री मला अर्पण कर. दासी म्हणून मी तिचा स्वीकार करीन. मी तुला विपुल धन देऊन या स्त्रीला विकत घेण्यास तयार आहे. माझ्याजवळ विपुल द्रव्य असून मी धनसंपन्न आहे. ही सुंदरी मला फारच आवडली आहे. माझ्या घरातील सर्व कामे करणे हीला शक्य नसले तरी तू हीस मला दे. यासाठी मी तुला किती धन देऊ ते मला सत्वर सांग."

त्या वृद्ध द्विजाने हरिश्‍चंद्राला असे विचारले असता राजा अत्यंत व्याकुळ झाला. दुःखामुळे त्याचे अंतःकरण विदीर्ण झाले. कंठ दाटल्यामुळे तो काहीच उत्तर देऊ शकला नाही.

तो स्तब्ध झाल्याचे अवलोकन करून तो द्विज पुन्हा म्हणाला, "हे पुरुषा, धर्मशास्त्रात स्त्री व पुरुष यांचे योग्यतेनुरूप मूल्य सांगून ठेवले आहे. त्याला अनुसरून तुझ्या या स्त्रीचे कर्म, वय, रूप, शील ह्यांचा विचार करून योग्य असेल ते द्रव्य घेऊन तू ही स्त्री मला विकून टाक. आता योग्यतेनुरूप मूल्य सांगतो ऐक.

बत्तीस लक्षणांनी संपन्न असलेली, कामामध्ये तत्पर असलेली, शील व गुण यात सर्वोत्तम अशा स्त्रीचे मूल्य एक कोटी आहे व या सर्व लक्षणांनी युक्त अशा पुरुषाचे मूल्य दहा कोटी आहे असे धर्मशास्त्र सांगते."

त्या ब्राह्मणाचे बोलणे ऐकून राजा अत्यंत कष्टी झाला व दुःखावेग अनावर झाल्याने एकही शब्द न बोलता तसाच स्थिर राहून त्याने मान खाली घातली.

राजाची स्थिती अवलोकन करून त्या ब्राह्मणाने पुढे होऊन एका वल्कलावर योग्य ते द्रव्य ठेवले आणि क्रूरतेने त्याने राणीचे केस धरून तिला ओढले.

राणी व्याकुळ होऊन म्हणाली, "हे ब्राह्मणश्रेष्ठा, मला सोडा. फक्त किंचित कालच मला मुक्त करा. माझ्या या लाडक्या पुत्राला मी एकदाच भेटते. हे ब्राह्मणा, आता मला या सुकुमार पुत्राचे दर्शन पुन्हा घडणार नाही. हे राजपुत्रा, पहा रे, मी आता दासी झाले आहे. हे बाळा, तू मला चुकूनही स्पर्श करू नकोस. कारण मी दासी झाल्यामुळे राजपुत्राला स्पर्श करण्यास अयोग्य झाले आहे."

आपल्या मातेचे ते दुःख पाहून राजपुत्राला रडू कोसळले, "अग आई, अग आई" असे म्हणत तो तिच्यामागे धावू लागला. त्याच्या डोळ्यात अपार अश्रू दाटून आले होते. आपल्या प्रिय मातेजवळ येऊन त्याने तिचे वस्त्र धरले आणि तो तिला ओढू लागला. मस्तकावर जावळ असलेला तिचा पुत्र अडखडून रस्त्यात पडला. ते बालक मातेच्या मागे निघाले आहे व तिला ओढीत आहे हे पाहून त्या ब्राह्मणाने रागाने त्या बालकाला यथेच्छ ताडन केले. पण मार बसत असताही त्या राजपुत्राने मातेला सोडले नाही. तो सारखा "आई, आई" म्हणून रडू लागला.

अखेर राणी अत्यंत दुःखाने ब्राह्मणाला म्हणाली, "हे महाभाग्यवान ब्राह्मणा, आपण मजवर दयाळू होऊन एक उपकार करा. या पुत्रालाही आपण विकत घ्या. कारण आपण मला एकटीलाच विकत घेतलेत तरी पुत्रविरहित होऊन दुःखमग्न अशी मी आपणाला कशी उपयोगी पडणार ? हे प्रभो, ह्या बालकाच्या सहवासाशिवाय मला काम करणे सुचणार नाही. म्हणून माझ्यासारख्या दुर्दैवी अबलेवर आपण उपकार करून या बालकालाही विकत घ्यावे."

ब्राह्मण पुन्हा राजासमोर येऊन म्हणाला, "हे राजा, मी तुला अधिक द्रव्य देतो. हे घे व हा पुत्र मला देऊन टाक. धर्मशास्त्रांनी स्त्री पुरुषांचे मूल्य काहींनी शंभर, काहींनी हजार तर काहींच्या मते लक्ष आणि काहींनी कोटी असे सांगितले आहे. पण दुसर्‍या पंडितांनी बत्तीस लक्षणांनी संपन्न असलेल्या स्त्री-पुरुषांचे मूल्य स्त्रीस एक कोटी व पुरुषास दहा कोटी असे सांगितले आहे."

असे धर्मशास्त्राप्रमाणे मूल्यमापन करून त्या ब्राह्मणाने राजाच्या पुढे असलेल्या वस्त्रावर आणखी द्रव्य ठेवले आणि त्या पुत्राला व मातेला एकत्र बांधून तो त्यांना ओढीत ओढीत आनंदाने आपल्या घराकडे जाण्यास सिद्ध झाला.

तेव्हा राणीने पतीला एक प्रदक्षिणा घातली. त्याच्यापुढे नम्रतेने गुडघे टेकून ती डोळ्यात पाणी आणून अत्यंत करुणवदन झालेल्या आपल्या प्रिय पतीला उद्देशून म्हणाली, "अहो देवाधिदेव, माझे जर काही पूर्व सुकृत असेल, जर माझ्याकडून काही पुण्यकारक दाने घडली असतील, जर मी पवित्र होऊन अग्नीमध्ये हवन केले असेल, तसेच ब्राह्मणांना यथेच्छ अन्नदान व वस्त्रदान करून काही पुण्य संपादन केले असेल तर त्या पुण्याच्या योगाने पुढील जन्मी मला राजा हरिश्‍चंद्र हाच पती पुन्हा लाभो." असे म्हणून ती मनमोकळेपणाने रडू लागली आणि रडत रडतच तिने आपल्या प्रिय पतीच्या चरणावर विरह दुःखाने व्याकुळ होऊन मस्तक ठेवले.

आपली प्राणप्रिय भार्या दुःखी होऊन आपल्या चरणावर पडली असल्याचे अवलोकन करताच अरेरे असे म्हणून राजा विलाप करू लागला. त्याची सर्व इंद्रिये व्याकुळ होऊन तो अत्यंत करुणवदन होऊन आक्रोश करू लागला. तो रुदन करीत म्हणाला,

"हाय रे दुर्दैवा, सत्यशील व गुणसंपन्न असलेली माझी ही प्रिय पत्‍नी आता माझ्यापासून दुरावणार का ! वृक्षाची छाया कधी वृक्षाला सोडते का हो !"

असे म्हणून अत्यंत दुःखाने राजाने आपल्या प्रियेस दृढ आलिंगन दिले व पुत्राला हृदयाशी कवटाळून तो म्हणाला, "हाय रे पुत्रा, तूही आता मला सोडून जाणार ना !"

हर हर, हे ब्राह्मणा आता मी कोठे जाऊ ? कोण बरे आता माझ्या दुःखाचे निवारण करील ? राज्य गेले, आता प्रिय पत्‍नीचा व लाडक्या पुत्राचा वियोग झाला. मी आता वनवासी झालो. आता खरोखर हे दुःख मला असह्य होत आहे."

असे राजा स्वतःशी म्हणू लागला व आक्रोश करू लागला. आपल्या पत्‍नीकडे पाहून तो पुन्हा म्हणाला, "खरोखरीच इहलोकामध्ये भाग्यवान पुरुषांच्या उपभोगासच स्त्रिया योग्य आहेत. हे सुशीला, तुझ्या पदरी दुःखाचा पर्वत बांधून मी तुला सोडून देत आहे. हे प्रिये, विवाहाच्या प्रसंगी राज्य सुखाला योग्य असा व इक्ष्वाकुकुलात जन्मलेला असा मी तुला अनुरूप व योग्य वाटलो म्हणून तू माझा विश्‍वासाने स्वीकार केलास, पण दुर्दैवाने आज तुला दासी व्हावे लागत आहे. हर हर, हे देवी, आता अत्यंत दुःखी होऊन शोकसागरात मी बुडून जात असता मला जुन्या आख्यायिका सांगून कोण बरे वर काढील ?"

अशाप्रकारे व्याकुळ होऊन राजा बोलत असताना त्या विप्राने त्या राणीला व पुत्राला चाबकाचे फटके मारले व असह्य वेदनांचे प्रहार करून तो ब्राह्मण त्यांना नेऊ लागला. अशाप्रकारे दुर्दशा होऊन ब्राह्मणाने त्यांना ओढीत नेत असलेले अवलोकन करून राजाने अपार विलाप केला व दीर्घ उसासे सोडले. करुण मुखाने तो म्हणाला, "केवढे हे दुर्दैव प्राप्त झाले, किती दारुण प्रसंग हा ! वायु, आदित्य, चंद्र व कोणीही मर्त्य यांपैकी एकालाही जिच्या मुखदर्शनाचा लाभ कधीही मिळाला नाही ती ही प्रिया आज दास्यत्व पत्करून फटके स्वीकारित आहे. अति सुकुमार हस्तांगुली असलेला, सूर्यकुलात जन्मास आलेला हा राजपुत्र, दुर्दैवाने ह्याचीही विक्री झाली. खरोखरच माझ्यासारख्या मूर्खाचा धिक्कार असो.

हे प्रियतमे, हे सुपुत्रा, हे लाडक्या, मी अत्यंत नीच होऊन तुमच्यावर केवढा अन्याय केला हा ! खरोखरच इतके दुर्दैव प्राप्त झाल्यावरही मला मृत्यू का नाही आला ? खरोखर, माझा धिक्कार असो."

अशाप्रकारे राजा करुणालाप करीत असताना त्या ब्राह्मणाने निर्दय होऊन त्या स्त्री-पुत्राला ओढून नेले व मार्गातील उंच घरे व प्रचंड वृक्षामुळे लवकरच तो दिसेनासा झाला. राजा दीनवदन होऊन तेथेच स्थिर झाला होता.

एवढयात तो महातपस्वी, मुनिश्रेष्ठ कौशिक विप्रवेषाने आपल्या शिष्यांना बरोबर घेऊन तेथे आला. सांप्रत तो अत्यंत क्रूर व भयंकर भासत होता. अति निष्ठुर होऊन तो हरिश्‍चंद्राला म्हणाला, "हे महाशूरा, हे राजा, अजूनही तू सत्याचा आश्रय करून रहाणार असशील, आपले वचन पालन करणारा असशील तर प्रत्यक्ष राजसूय यज्ञाइतके पुण्य मिळवून देणारी ती राज्यदानावरील दक्षिणा तू मला सत्वर दे."

हरिश्‍चंद्र म्हणाला, "हे मुनीवर्या, मी आपणाला प्रणाम करतो. हे निष्पापा, मी आपणास राज्यदान केल्यावर दक्षिणा देईन असे जे बोललो होतो ती ही दक्षिणा मी आणली आहे. ती आपण स्वीकारा."

राजाचे बोलणे ऐकून विचार करून तो कपटी विश्‍वामित्र म्हणाला, "अरे राजा, हे द्रव्य तर तू पूर्वीच मला दान केले आहेस. मला यज्ञ करण्यासाठी तू द्रव्य देण्याचे कबूल केले होतेस. अरे, त्या तीर्थावर पुण्यस्नान करून तूच म्हणालास, हे ब्रह्मन्, आपण यज्ञासाठी द्रव्य मागा." तुला या शब्दांचे विस्मरण झाले काय ? तेव्हा हे राजा, हे द्रव्य यज्ञासाठी म्हणून मी स्वीकारीन. पण राज्यदानावरील ती योग्य अशी दक्षिणा सांप्रत तू दे. तू आता मला अडीच भार सुवर्ण दे.

हे राजेंद्रा, तुला हे द्रव्य कसे प्राप्त झाले ? तू हे कसे मिळविलेस तेही मला सत्वर सांग."

राजा विप्रापुढे हात जोडून म्हणाला, "हे निष्पाप, हे प्रतापी ब्राह्मणश्रेष्ठा, हे द्रव्य मी कसे मिळवले ते सांगून काय उपयोग आहे. आणि आपणास त्याचे काय कर्तव्य आहे ? ते सांगण्याने मला अधिक दुःख प्राप्त होईल."

विश्‍वामित्र म्हणाले, "अरे राजेंद्रा, असे असेल तर हे द्रव्य मी मुळीच स्वीकारणार नाही. हे द्रव्य निंद्य आहे. अनिंद्य असलेले द्रव्य मला दे. म्हणूनच हे द्रव्य तू कसे मिळविलेस ते मला सांग."

राजा विकलांग होऊन उत्तरला, "महाराज, माझी प्राणप्रिय स्त्री पूज्य असूनही मी कोटी द्रव्य घेऊन तिला विकले आहे. तसेच माझा अत्यंत लाडका रोहित नावाचा पुत्र, मी दहा कोटीला विकला तेव्हा हे द्रव्य मला प्राप्त झाले. एकूण अठरा कोटी सुवर्ण आपण स्वीकारावे. हे मुने, हे द्रव्य विपुल आहे. ह्या द्रव्याचा स्वीकार करून आपण मला दोन्ही ऋणातून सत्वर मुक्त करा."

राजाचे भाषण ऐकून मुनिश्रेष्ठ म्हणाला, "हे राजेश्‍वरा, स्त्रीचा विक्रय करून हे द्रव्य फारच थोडे प्राप्त झाले आहे. ह्याने तू ऋणमुक्त कसा होणार ?"

असे म्हणून तो कौशिकमुनी संतप्त झाला व दुःखव्यग्र झालेल्या राजाला म्हणाला, "हे राजा, ही एवढीच दक्षिणा मला यज्ञाला योग्य वाटत नाही. माझ्या यज्ञाची दक्षिणा जास्त आहे. यासाठी तू आणखी द्रव्य मिळव व सत्वर माझी दक्षिणा पूर्ण कर.

हे क्षत्रियाधमा, तुला असे वाटते का की ही दक्षिणा माझ्या योग्यतेची आहे म्हणून ? माझ्या तपःश्‍चर्येचा आणि ब्राह्मणत्वाच्या उग्र सामर्थ्याचा प्रभाव किती विलक्षण आहे याचे सामर्थ्य आताच अवलोकन कर. ही दीर्घकाल तपःश्‍चर्या केल्यामुळे मला प्राप्त झालेले सामर्थ्य पहा व मी केलेल्या शुद्ध अध्ययनाचा चमत्कार पाहून तू माझ्या योग्यतेप्रमाणे मला दक्षिणा दे."

राजा दुःखार्त होऊन म्हणाला, "हे ब्राह्मणश्रेष्ठा, मी आपणाला आणखीही द्रव्य देईन. आताच मी माझ्या स्त्रीची आणि पुत्राची विक्री केली आहे. आपण थोडा वेळ धीर धरावा. आपले वचन मोडणार नाही."

विश्‍वामित्र म्हणाला, "हे राजा, ठीक तर, पण लक्षात ठेव. आजच्या दिवसाचा हा एकच प्रहर शिल्लक राहिला आहे. तो प्रहर उलटेपर्यंतच मी थांबेन. पण त्यानंतर मात्र मी तुझा एकही शब्द ऐकण्यास तयार होणार नाही याची आठवण ठेव."



अध्याय बाविसावा समाप्त

GO TOP