[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
देवराज इंद्राला हा अपमान सहन झाला नाही. तो अत्यंत संतप्त होऊन म्हणाला, "हे च्यवनभार्गवा, हे ब्रह्मवधो, अजूनही तू देवांची अमर्यादा करू नकोस. नाहीतर तू देवांचा द्वेष करतोस असेच आम्ही समजू व देवांचा द्वेष करणार्या तुझा मी निश्चितपणे वध करीन."
च्यवनभार्गवही आता हट्टास पेटले होते. त्यांनी इंद्राला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर इंद्राला देता आले नाही. अश्विनीकुमारांना सोमपानास पात्र न होण्याचे कारण इंद्राजवळ नव्हते. तो फक्त संतापाने लाल झाला होता. च्यवनभार्गव म्हणाले, "हे देवेंद्रा, ह्या अश्विनी कुमारांनी प्रत्यक्षात माझा कायापालट करून मला देवाप्रमाणे रूपयौवनसंपन्न केले आहे. त्यांचा तू अपमान करू नकोस. हे सुरश्रेष्ठा, तूच फक्त सोमग्रह करीत नाहीस. इतर देव मात्र सोमाग्रहाचा स्वीकार निश्चिंत मनाने करीत आहेत. हे अश्विनीकुमारही देवच असून तेही शत्रूनाशक आहेत. मग अशा सूर्यपुत्रांना सोमपानाचा अधिकार का नसावा ? हे इंद्रा काहीही झाले तरी मी यांना सोमपान करवणारच हे तू नीट ध्यानात घे."
इंद्र तिरस्काराने व चिडून म्हणाला, "हे मंदबुद्धे महर्षे, अरे खरोखर यज्ञात वैद्य हे सोमपानाला योग्य नसतात. तेव्हा यांना सोमपान करवून तू विनाकारण आमची इच्छा डावलत आहेस व वृथा आमचा रोष पत्करत आहेस. तेव्हा तुझा हा उद्दामपणा पाहून मी आताच तुझा वध करीन हे समजून अस. आता तुला प्रायःश्चित दिल्याविना मी रहाणार नाही." इंद्र त्वेषाने बोलत होता.
पण च्यवनमुनींनी इंद्राच्या भाषणाची यत्किंचितही तमा बाळगली नाही. उलट इंद्राचा अत्यंत तीव्रतेने तिरस्कार करून त्याची निर्भर्त्सना केली आणि स्वस्थ मनाने त्याने श्विनीकुमारांजवळ जाऊन त्यांना सोमपात्र दिले. अश्विनिकुमारांनी आपल्या हातात ते सोमपात्र घेतल्याचे पाहून बलदैत्याचा नाश करणारा तो देवेंद्र च्यवन मुनीना म्हणाला, हे च्यवना, केवळ स्वार्थांध होऊन तू हे काय करीत आहेस ? स्वतःच्या स्वार्थासाठी जर तू हे कृत्य केलेस तर तुला दुसरा विश्वरूपच समजून मी तुझ्यावर माझे शत्रूनाशक वज्र खचितच सोडून प्रहार करीन." पण तरीही च्यवनभार्गवाने इंद्राचे काही न ऐकता अश्विनीकुमारांकडून यथाविधी सोम घेवविला. त्याचवेळी इंद्राने आपले प्रभावी व तेजस्वी वज्र सर्वांसमक्ष च्यवनभर्गावावर उगारले. पण आपल्या महातपश्चर्येच्या सामर्थ्यावर च्यवनाने त्या वज्राचे स्तंभन केले आणि तो महापराक्रमी तपस्वी च्यवन कृत्येच्या साह्याने इंद्राचाही वध करण्यास प्रवृत्त झाला. शिजवलेल्या हविर्द्रव्याचा त्याने अग्नीमध्ये मंत्र म्हणून होम केला.
च्यवनाच्या मंत्र व तपसामर्थ्याने तेथे एक कृत्या उत्पन्न झाली व तिच्याबरोबर एक मद नावाचा महाबलाढ्य असा दैत्य अवतीर्ण झाला. तो शरीराने अत्यंत धिप्पाड व बलवान व क्रूर होता. सर्व प्राण्यांना भय निर्माण करण्याचे सामर्थ्य त्याच्या ठिकाणी होते. त्याच्या सर्व दाढा अत्यंत तीक्ष्ण होत्या. त्यापैकी चार दाढा तर शंभर योजनेपर्यंत लांब होत्या व बाकीचे दात दहा योजने लांब होते. त्याचे हात पर्वताप्रमाणे पुष्ट होते. त्याचा चेहरा कमालीचा उग्र व लांबरुंद होता. त्याची अत्यंत अद्भुत अशी भयंकर जिव्हा आकाश चाटीत होती. पर्वताच्या शिखराप्रमाणे उंच असलेली त्याची मान अत्यंत कठीण होती. त्याची नखे वाघापेक्षाही तीक्ष्ण होती तर केस अत्यंत भयाकारी होते. काजळासारख्या काळ्याकभिन्न देहावरील ते महाभयंकर मुख विक्राळ भासत होते. नेत्रात जणू काय दावाग्नीच भडकला होता. त्याचा एक ओठ आकाशात भिडला होता तर दुसरा जमिनीवर लोंबत असून खालपर्यंत टेकला होता. अशाप्रकारचा तो महाभयंकर असुर त्या ठिकाणी प्राप्त झाला होता.
त्याचा तो अक्राळविक्राळ देह पाहून सर्व देव तर भयभीत झालेच, पण इंद्रालाही त्याच्याबरोबर युद्ध करावे की नाही असा संभ्रम पडून त्याच्या मनात भीती, उत्पन्न झाली. त्या महाभयंकर राक्षसाने प्रथम इंद्राचे वज्र गिळून टाकले व अत्यंत निर्भय होऊन तो इंद्रालाही गिळून टाकण्याच्या पवित्र्यात इंद्रासमोर प्राप्त झाला. आकाश व्यापलेल्या त्या दैत्याने अत्यंत अघोर दृष्टीने इंद्राकडे पाहिले. तो आता सर्व तिन्ही लोक गिळून टाकतो की काय अशी भीती सर्वांच्या मनात उत्पन्न झाली. अत्यंत संतप्त होऊन तो प्रलयकारी दैत्य इंद्रावर धावून गेला. त्याचवेळी सर्व देव, "अरेरे, घात झाला" असे म्हणून आक्रोश करू लागले.
इंद्राने दुसरे वज्र राक्षसावर सोडण्याचा विचार केला, पण त्याच्या हाताचे स्तंभन झाल्यामुळे हाताची हालचाल होईना. इंद्राचे सामर्थ्यच लयाला गेले. त्या कालदैत्याला नीट अवलोकन करताच प्राप्तकाळ हा महाभयंकर व कठीण आला हे त्याने ओळखले व आपल्या गुरूचे स्मरण करून मनात गुरूची स्तुती केली.
बृहस्पति गुरूची स्तुती करताच तो त्वरेने तेथे प्राप्त झाला. तो इंद्रावर महाभयंकर प्रसंग ओढावला असल्याचे त्याच्या लक्षात आले. आता काय करावे याचा विचार करून तो इंद्राला म्हणाला, "हे सुरश्रेष्ठा इंद्रा, कोणत्याही अस्त्राने अथवा तुझ्यानेही याचा नाश होणे शक्य नाही. प्रत्यक्ष यज्ञकुंडातून हा मददैत्य निर्माण झाला असून महर्षी च्यवन मुनींच्या तपःसामर्थ्याची ही साक्षच आहे. तेव्हा याचे निवारण वज्राने होणार नाही.
तु इतर देवांसह या भयंकर शत्रूचा नाश करूच शकणार नाहीस. म्हणून सांप्रत वेळ बरी नाही. तू आता त्या महापराक्रमी च्यवनभार्गवांनाच शरण जाणे इष्ट आहे. त्यांच्याच मंत्रसामर्थ्याने हा दैत्य उत्पन्न झाला. हा मुनी आदिमाया जी देवी भगवती तिचा निःसीम उपासक आहे. तेव्हा अशा या महाशक्ती देवीच्या भक्ताचा क्रोध निवारण करण्यास देव असमर्थ आहेत. केवळ त्या देवीच्या उपासनेमुळेच याला एवढे सामर्थ्य प्राप्त झाले आहे."
गुरूचे हे भाषण ऐकून आता दुसरा उपाय नही हे समजताच इंद्र अत्यंत भयभीत होऊन च्यवन मुनीपुढे येऊन उभा राहिला. अत्यंत नम्र भावाने इंद्राने च्यवनमुनींना साष्टांगर नमस्कार घातला व तो विनंतीच्या सुरात मुनीला म्हणाला, "हे मुनीश्रेष्ठा, मला क्षमा करा आणि आपणच निर्माण केलेल्या या असुरापासून माझे रक्षण करा. हे सर्वज्ञा, मी आपल्या आज्ञेत रहाण्यास तयार आहे. पण आपण प्रसन्न होऊन या महादैत्याचे निवारण करा. हे धर्मपरायणा, हे तपोनिधे आपण केलेला प्रयत्न कधी व्यर्थ जाणार नाही. आपल्या हातून व्यर्थ जाणारे कर्म कदापीही होणार नाही हे मी जाणतो तेव्हा आपण माझे संकट निवारण करा. हे महाभाग, आपल्या इच्छेप्रमाणे हे अश्विनीकुमार उभयता पुढे नित्यसोमपायी होतीलच. पण आपला श्वशूर शर्याति राजा याचीही अपार कीर्ति होईल.
हे मुनिवर्य, केवळ आपल्या तपश्चर्येचे सामर्थ्य अजमावावे म्हणूनच मी हे कर्म केले. आज आपले बल प्रत्ययाला आले. मी आपल्या बलाची परीक्षा घेतली मला क्षमा करा आणि मजवर कृपादृष्टी ठेवून या मददैत्याचा संहार करा. त्यामुळे देवांचे सर्वथैव कल्याणच होणार आहे आपण देवांचे कल्याण करण्यास सांप्रत समर्थ आहात.
अखेर इंद्र शरण आलेला पाहून त्या परमार्थ तत्पर दयाळ च्यवनाने इंद्राला धीर दिला आणि त्या दैत्याचे आपल्या मंत्रसामर्थ्या तत्काळ दमन केले. त्या भार्गवाने तो मद स्त्रिया, मद्य, द्यूत व मृगया यांचे ठिकाणी विभागला. असे मदाचे विभाग करून च्यवनाने इंद्राचे भय नाही केले. सर्व देवांनाही हायसे वाटल्यावर राजा शर्यातीचा यज्ञ पूर्ण झाला.
या यज्ञात भार्गव मुनींनी आपल्या तपोबलानें महात्म्या इंद्राला व अश्विनीकुमारांना सोम अर्पण केला. ते सूर्यपुत्र, आर्य अश्विनीकुमार, च्यवनाच्या तपोबलाने सोमपायी झाले. ते सरोवरही यज्ञामुळे भूषित होऊन च्यवनमुनींच्या आश्रमाची सर्व पृथ्वीवर ख्याती झाली. राजा शर्याति तर च्यवनभार्गवावर अत्यंत संतुष्ट झाला व अभिमानाने आपल्या सचिवांसह नगराकडे निघून गेला. मनुपुत्र शर्यातीने धर्मतत्पर राहून अनेक वर्षे राज्याचा उपभोग घेतला. पुढे त्याला आनर्त नावाचा पुत्र झाला. आनर्तास रेवत नावाचा पुत्र झाला. रेवताने शत्रूचा नाश करून समुद्रामध्ये कुशस्थली नावाची सुंदर नगरी उभारून तो तेथे वास्तव्य करून राहिला. आपल्या पित्याच्या नावाने सिद्ध असलेल्या आनर्त प्रभृती देशांवर त्याने पुष्कळ काळपर्यंत राज्य केले. रेवत पर्वताच्या आश्रयाने राजाने सर्व देशांवर राज्य केले.
रेवताला शंभर पुत्र झाले. त्याचा ककुघ्नि नावाचा जेष्ठ पुत्र होता, तसेच सर्वलक्षणसंपन्न अशी रेवती नावाची कन्या होती. कन्या उपवर झाल्यावर रेवत राजा तिजसाठी योग्य वराचा विचार करू लागला.
कन्या कोणाला द्यावी याविषयी त्याने पुष्कळ विचार केला, पण शेवटी देवमान्य ब्रह्मदेवाकडे जाण्याचे ठरवून तो रेवतीसह ब्रह्मलोकी गेला.
ब्रह्मलोकी देव, यज्ञ, छंद, पर्वत, नद्या, समुद्र साक्षात दिव्यरूप धारण करून तेथे उभे होते. तसेच ऋषी, सिद्ध गंधर्व, पन्नग, चारण हे सर्व पुरातन लोकही हात जोडून ब्रह्मदेवाची स्तुती करीत होते.