रेवतीचा बलदेवाशी विवाह - इश्वाकु कुलाची निर्मिती -
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
जनमेजय म्हणाला, "हे ब्रह्मन्, मी असे ऐकले महे की ब्रह्मवेत्त्या व शांत ब्राह्मणालाच फक्त ब्रह्मलोक प्राप्त होतो. दुसरा कुणी ब्रह्मलोकी गेल्याचे ऐकिवात नाही. अशी वस्तुस्थिती असताना रेवतराज आपली शुभ कन्या रेवती हिला घेऊन ब्रह्मलोकी कसा गेला ? हे महामुने, माझ्या मनात फारच संशय दाटून राहिला आहे. कारण ब्रह्मलोक प्राप्त होणे मनुष्यास केवळ अशक्यच असताना द्युलोकापासून त्या सत्यलोकापर्यंत राजा आपल्या कन्येसह येऊन पोहोचला हे आश्चर्य नव्हे काय ? वास्तविक पहाता ब्रह्मवेत्त्यालाच स्वर्ग प्राप्त होतो हे खरे असून सर्व शास्त्रेही तसेच सांगतात. तेव्हा स्वतः तेथपर्यंत गेलेल्या राजाचे व त्याच्या कन्येचे पुन्हा भूलोकावर आगमन कसे संभवनीय आहे ? तेव्हा मृत नसताही जिवंतपणी शरीरधारी ते उभयता "ब्रह्मदेवाला विचारण्यासाठी तेथपर्यंत गेले कसे व तेथून परत आले कसे ? खरोखरच हे महर्षे, मी गोंधळून गेलो आहे. आपण माझ्या संशयाचे निवारण करा."
व्यासांनी सांगितले, "हे राजन् देवलोक मेरु पर्वताच्या शिखरावर वसलेले आहेत. इंद्रलोक, अग्नीलोक, संयमनी नगरी तसेच सत्यलोक, वैकुंठ लोक ही सर्व देवांची वसतीस्थाने मेरु पर्वताच्या उंच शिखरावर आहेत. अरे, प्रत्यक्ष अर्जुनही इंद्रलोकी जाऊन पाच वर्षेपर्यंत इंद्रलोकी राहिला होता व तेथे स्वर्गलोकी राहूनही तो परत या लोकी प्राप्त झाला. तो मनुष्ययदेहानेच इंद्राचे सान्निध्यात राहिला होता हे विदीतच आहे. त्यानंतर ककुस्थ व इतर कित्येक राजे स्वर्गामध्ये जाऊन तेथे काही कालपर्यंत वास्तव्य करून परत आले होते. इतकेच काय, पण प्रत्यक्ष दैत्यही इंद्रलोक जिंकून तेथे जाऊन राज्य करीत होते हे मी तुला सांगितलेच आहे. तात्पर्य, देवांप्रमाणे तुल्यबल असलेले मानवही योग्यता असल्याने देवलोकी जाऊन राहू शकतो व दैत्यही आपल्या बलाने देवलोक प्राप्त करून घेतात. हे राजेंद्रा, आता पूर्वीचीच घटना तुला सांगतो.
महाभिष नावाचा पराक्रमी राजा स्वसामर्थ्याने ब्रह्मलोकी गेला होता. त्यावेळी तेथे आलेल्या सुंदर गंगेला त्याने पाहिले. एवढ्यात दुर्देवाने वार्यामुळे तिच्या शरीरावरचे वस्त्र उडून गेले. ती सुंदरवदना नग्न झाली. राजा महाभिषाने अनिमिष नेत्राने तिचे अवलोकन केले. तिनेही राजाकडे प्रेमपूर्ण नजरेने पाहिले. राजाची कामवासना जागृत झाली व तो गंगेकडे पाहून हसला. गंगेनेही कामातुर होऊन हसून प्रतिसाद दिला. ते अवलोकन करताच कुद्ध होऊन ब्रह्मदेवाने त्या उभयतांना शाप दिला व त्या शापामुळे उभयतांना भूमीवर परत यावे लागले. ते दोघही काही काळपर्यंत स्वर्गापासून च्युत झाले.
तसेच देवांना दैत्यांनी अनेक वेळा त्रस्त केल्यामुळे देव वेळोवेळी विष्णूलोकावर गेले होते. ह्या घटनाही हे जनमेजया, मी तुला सांगितल्या आहेत.
थोडक्यात सांगायचे तर हे राजा, जे पुण्यवान असतात तेच स्वर्गलोकी जाऊ शकतात. तसेच स्वतःच्या तपःसामर्थ्यावर ऋषीमुनी स्वर्गलोकी जातात व परत येतात. केवळ पुण्याच्याच जोरावर मानवांना स्वर्ग प्राप्त होत असतो. शिवाय यज्ञयाग केल्याने ज्यांची अंतःकरणे शुद्ध झाली आहेत अशांनाही स्वर्गलोकी जाता येते. तेव्हा रेवतराज रेवतीला घेऊन ब्रह्मलोकात गेला याविषयी संशय निर्माण होण्याचे कारण नाही."
जनमेजयाचे व्यासांच्या भाषणाने समाधान झाले व आनंदी मनाने तो म्हणाला, "हे महर्षे, आता मला सर्व काही समजले. पुण्य हेच स्वर्गात जाण्याचे कारण होय. आता हे मुने, मला पुढील कथाभाग सांगा. रेवतराजा ब्रह्मलोकी कन्येसह जाऊन पोहचल्यावर तेथे त्याने काय केले ? ब्रह्मदेवाला राजाने काय विचारले ? ब्रह्मदेवाने राजाचे कोणत्या उत्तराने समाधान केले ? अखेरीस रेवतीचा कोणाबरोबर विवाह झाला ? हे सर्व ऐकण्याची माझी इच्छा, हे भगवान महर्षे, आपण पूर्ण करा."
व्यास सांगू लागले, "राजा, आता ऐक तर मग. जेव्हा तो तेथे प्राप्त झाला त्यावेळी ब्रह्मलोकी गायन चालले होते. त्यामुळे ब्रह्मदेवापुढे त्याला प्रश्न उपस्थित करण्यास वेळच मिळाला नाही. तेव्हा राजाही आपल्या कन्या रेवतीसह गायन ऐकू लागला. सुरलोकीच्या त्या गायनाने रेवतराजा व रेवती दोघेही तल्लीन झाली. अशाप्रकारे बराच कालपर्यंत गायन चालले होते. गायन संपल्यावर राजा रेवताने पुढे जाऊन आदराने ब्रह्मदेवाला साष्टांग प्रणाम केला. आपली कन्या रेवती त्याने ब्रह्मदेवास दाखविली तिच्या विवाहाविषय मार्ग दाखविण्याची ब्रह्मदेवास विनंती केली."
राजा रेवत म्हणाला, "हे सुरेश्वरा, ही माझी कन्या रेवती सर्वलक्षणसंपत्र असून सांप्रत ती उपवर झाली आहे तेव्हा तिच्यासाठी योग्य असा वर आपण सुचवा. ही सुंदर कन्या कोणाला अर्पण करू हे आपणास विचारण्यासाठी मी येथे आलो आहे. तेव्हा माझी काळज दूर करा.
हे ब्रह्मन्, मी पुष्कळ कुलीन राजपुत्रांचे बाबतील हिच्यासाठी विचार केला व प्रत्यक्ष पाहिलेही. पण माझा मनाला हिच्या योग्य असा एकही वर आढळेना. तेव्ह हे देवाधिपते, आता मी आपणालाच शरण येऊन विचारीत आहे. आपण सर्वज्ञ आहात. म्हणून एखादा सुयोग्य राजपुत्र कोण आहे ते मला सांगा. तो कुलीन, प्रतापी, सर्व गुणलक्षणांनी युक्त, धर्मशील, महान दातृत्व अंगी असलेला असा हवा आहे. हे भगवान माझी ही कन्या अवलोकन करून आता योग्य वर दाखवा."
राजाचे भाषण ब्रह्मदेवाने शांत चित्ताने ऐकून घेतले कालगतीचा विचार करून ब्रह्मदेव हसत म्हणाला, "हे राजा, तू ज्या राजपुत्राचा योग्य वर म्हणून विचार केल होतास ते सर्वजण यावेळी आपल्या पित्यासह, बांधवांसह सर्व स्वजनांसह कालाधीन झाले आहेत. आजच या नव्या मन्वंतरातील सत्ताविसावे द्वापारयुग सुरू झाले आहे. शिवाय हे राजा, तुझे वंशजही मृत झाले आहेत. तुझी राजधानीची व राज्याची दैत्यांनी दाणादाण उडवून टाकली आहे. सोमवंशातील उग्रेसन नावाचा बलाढ्य व सुप्रसिद्ध असा मथुरेचा राजा राज्य करीत होता. तो बंदिस्त असून त्यावेळी तेथे ययातिवंशात जन्म पावलेला उग्रसेनाचा पुत्र महाबलाढ्य कंस राजा राज्य करू लागला आहे तो अत्यंत देवद्वेष्टा आहे.
कंसाच्या अंतः करणात दैत्याचा अंश असल्याने त्या पापात्म्याने प्रत्यक्ष आपल्या पित्याला कारागृहात डांबून ठेवून राज्य बळकावले आहे. अत्यंत मदोन्मत्त व गर्विष्ठ होऊन तो राज्य करीत आहे. त्या माजलेल्या कंसाच्या त्रासाने पृथ्वी दुःखी झाली असून ती यावेळी ब्रह्मदेवालाच शरण गेली आहे. कारण त्या दुष्ट राजाच्या सैन्याचा भार तिला सहन होईनासा झाला आहे. त्यामुळे ती व्याकुळ झाली आहे.
म्हणून पृथ्वीवर अंशरूपाने परमेश्वराचा अवतार होईल असे सुरश्रेष्ठांनी सांगितले होते. कमलाप्रमाणे नेत्र असलेला वासुदेवाचा पुत्र कृष्ण देवस्वरूप देवकीचे पोटी जन्मास आला आहे. नराचा सखा सनातन धर्मपुत्र जो नारायण तो गंगातीरावरील बद्रिकाश्रमात दुर्घट तपश्चर्या करीत होता. तोच यदुकुलात जन्म घेऊन वासुदेव या नावाने सुप्रसिद्ध झाला आहे.
हे रेवत राजा, त्या महात्म्या कृष्णाने पापात्म्या कंसाचा वध करून पुन्हा उग्रसेनाला राज्य मिळवून दिले. त्यामुळे कंसाचा सासरा महाबलाढ्य दैत्य जरासंध अत्यंत क्रोधायमान होऊन कृष्णाशी त्याने मथुरेत येऊन युद्ध केले. पण महापराक्रमी जरासंधाचा कृष्णाने युद्धात पराभव केला. त्यामुळे चिडून जाऊन प्रचंड सैन्य घेऊन जरासंधाने एक यवन कृष्णाशी युद्ध करण्यासाठी पाठविला. पण कृष्णाने आपले सर्व यादव सैन्य बंदोबस्तासाठी मथुरेत ठेवले व स्वतः त्या यवनाला सामोरा गेला. युद्ध करून त्याने यवनाला सैन्यासह पिटाळून लावले.
आज आपल्या बंधूसह तो पराक्रमी कृष्ण मथुरेत वास्तव्य करीत आहे. कृष्णाचा हलायुध बलदेव नावाचा श्रेष्ठ बंधू आहे. तो मुसलधारी असून प्रत्यक्ष शेषाचा अंश असून अत्यंत बलशाली आहे. म्हणून मला वाटते, तोच एकमेव वीरश्रेष्ठ तुझ्या रेवती नावाच्या कन्येस सुयोग्य वर आहे. म्हणून त्या संकर्षणाला तू आपली कन्या सत्वर निश्चयी मनाने अर्पण कर. आपली कन्या त्या महाप्रतापी बलदेवाला अर्पण केल्यावर हे राजा तू मनोरथ पूर्ण करणार्या व देवांचे विश्रांतीस्थान असलेल्या बद्रिकाश्रमात वास्तव्य करून अखेरपर्यंत तपश्चर्या कर."
अशाप्रकारे पद्ययोनी ब्रह्मदेवाने राजाला योग्य मार्ग दाखविला. राजा रेवत आपली कन्या रेवती हिला बरोबर घेऊन सत्वर द्वारकेस आला. आपली सुलक्षणी कन्या आनंदाने रेवतराजाने बलदेवास अर्पण केली आणि तीव्र तपश्चर्या करण्यासाठी तो बद्रिकाश्रमात गेला. अखेर कालगतीमुळे नदीकिनारी त्याने देहत्याग केला व स्वर्गाला गेला."
जनमेजय अधिकच विस्मयचकित झाला. तो म्हणाला, "हे महर्षे, आपण काय आश्चर्य सांगत आहात. अहो, आपल्या कन्येला इष्ट वर मिळावा म्हणून गेला असता त्याची तेथे एकशे आठ युगे गेली. तरीही त्याची कन्या वृद्ध न होता उपवर अशी यौवनसंपन्नच कशी राहिली ? राजाही जरेने दुर्बल कसा झाला नाही ? शिवाय एवढा मोठा काल जाईपर्यंत त्याला आपले आयुष्य पुरले कसे ?"
राजाच्या शंका ऐकून व्यासांना हसू आले. ते कौतुकमिश्रित स्वराने राजाला म्हणाले, "हे निष्पापा, ब्रह्मलोकी वृद्धत्व, क्षुधा, तृषा, मृत्यु, भय, ग्लानी हे सर्व कधीही प्राप्त होत नाहीत. यांची तेथे भीति नसते. त्यामुळे रेवतराजा आपल्या कन्येसह होता तसाच राहिला. दोघांनाही वार्धक्य अथवा मृत्यू यापासून भय निर्माण झाले नाही. आता मी तुला शर्यातीच्या वंशातील राजाची कथा सांगतो ऐक.
शर्याति राजा तपश्चर्येसाठी मेरू पर्वतावर गेला. इकडे राक्षसांनी त्याची संतती मारण्यास सुरुवात केली. तेव्हा भयभीत झालेले शर्यातीचे वंशज कुशस्थली सोडून इतस्ततः भटकू लागले. त्याच वेळी वैवस्वत मनूला शिंक येऊ लागली आणि त्यातूनच घाणेंद्रियापासून त्याला एक अत्यंत बलशाली असा महापराक्रमी पुत्र झाला. तो पुढे ईक्ष्वाकु म्हणून विख्यात झाला. त्यानेच सूर्यवंश पुढे चालवला. नारदाने उपदेश देऊन त्याला शक्तिदीक्षा दिली.
आपल्या वंश रक्षणासाठी त्याने देवीचे निरंतर ध्यान केले. त्यानंतर इक्ष्वाकुला शंभर पुत्र झाले. त्यापैकी विकुक्षी हा ज्येष्ठ पुत्र अति पराक्रमी झाला. इक्ष्वाकु राजाने अयोध्येत जाऊन वास्तव्य केले. त्याने आपले पन्नास बलाढ्य पुत्र उत्तरेकडील देशांचे रक्षण करण्यास नेमले.
तसेच आपल्या अठ्ठेचाळीस पुत्रांना त्याने दक्षिण देशांचे रक्षण करण्यासाठी रवाना केले. व त्याने उरलेल्या दोन पुत्रांना स्वतःच्या सेवेसाठी जवळ ठेवले. इक्ष्वाकु राजाने धर्मतत्पर राहून पुष्कळ कालपर्यंत राज्य केले.