[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
अश्विनीकुमारांचे ते मदनविव्हल भाषण ऐकून ती साध्वी सुकन्या थरथर कापू लागली. ती पतिव्रता असल्याने असले भाषण ऐकणेही तिला पाप वाटत होते. ती पूर्णपणे भयभीत झाली व सूर्यपुत्रांना म्हणाली,
"हे देवपुत्रांनो, तुम्ही मला देवाप्रमाणेच पूज्य आहात. तुम्ही साक्षात् देवच असल्याने तुम्हाला अंतर्ज्ञानाने सर्व परिस्थिती समजते. तुम्ही सर्वज्ञ आहात. तुमच्यासारख्यांनी एका पतिव्रतेला असले बोलणे योग्य नव्हे. माझ्यासारख्या नीतीधर्माने वागणार्या सत्प्रवृत्ती स्त्रीबरोबर आपण असले भाषण कसे बरे केलेत ? हे देवांनो, माझ्या पित्याने सर्व विधीपूर्वक मला त्या महान तपस्वी मुनीला अर्पण केले आहे. तेव्हा आपण सांगत असलेल्या अविचाराच्या मार्गाचे अवलंबन करणे खरोखरच योग्य नव्हे. प्रत्यक्ष भगवान सूर्य हा सर्वसाक्षी आहे. तो कश्यपपुत्र तुमचा पिता आहे. त्यादेखत तुम्ही मजजवळ असले शब्द उच्चारणे तुमच्यासारख्या देवांना शोभत नाही.
हा सर्व संसार असार असून हे जग म्हणजे माया आहे. सुखोपभोग खोटे आहेत. मी आहे या स्थितीत अत्यंत समाधानात आहे. कारण मी माझा धर्म पालन करीत आहे. धर्माने घालून दिलेली बंधने आपण जाणत आहात. पतीचा त्याग करणे हे कुलीन स्त्रीचे लक्षण नव्हे. पतीविना परपुरुषाचा स्वीकार कोणती साध्वी स्त्री करील ? तेव्हा हे देवपुत्रांनो, तुम्ही त्वरित येथून चालते व्हा. नाहीतर मी तुम्हाला शाप दिल्याविना खचित रहाणार नाही. मी पतीभक्त असून त्याच्याशी एकनिष्ठ आहे. महापराक्रमी शर्याति राजाची मी कन्या आहे. याचा आपणाला विसर पडू देऊ नका."
अशा तर्हेचे सुकन्येचे तीव्र भाषण ऐकताच देवपुत्र अश्विनीकुमार विस्मयचकित झाले व मुनींच्या शापवाणीची आठवण होऊन ते घाबरून गेले. ते अत्यंत नम्रतेने व स्वतःला सावरून घेत म्हणाले, "हे कोमलांगी, खरोखरच तुझी पतीनिष्ठा व धर्मपरायणता पाहून आम्ही संतुष्ट झालो आहोत. आम्ही तुला प्रसन्न झालो असल्याने तुला हवा तो इच्छित वर मागून घे. हे कल्याणी, तुझे चांगले व्हावे, म्हणून आम्ही तुला हवे ते देण्यास तयार आहोत. आम्ही देवांचेही वैद्य असल्याने तुझ्या पतीला नुसते तारुण्यच काय पण रूपसौंदर्यही प्राप्त करून देऊ. ह्यावर विश्वास ठेव. अशाप्रकारे तुझा पती रूपयौवनसंपन्न झाल्यावर तू आम्हा तिघांपैकी कोणाही एकाचा पती म्हणून स्वीकार कर. आम्ही तुझ्या पतीला खचित सुंदर करू तेव्हा विचार कर."
अश्विनीकुमारांचे हे मर्मभेदी व अद्भुत भाषण ऐकून सुकन्या आपल्या पतीजवळ गेली व अश्विनीकुमारांबरोबर आपला झालेला संवाद तिले आपल्या देवतुल्य पतीला निवेदन केला. ती म्हणाली, "हे भूगुनंदना, आज मी दिव्यदेहधारीव रूपयौवनसंपन्न मनोहर अशा अश्विनीकुमारांना पाहिले. ते दोघे सूर्यपुत्र या वनात सांप्रत आले आहेत. मला पाहून ते दोघेही माझ्या सुंदर देहाविषयी आसक्त झाले व अत्यंत मदनविव्हल होऊन ते म्हणाले,
"आम्ही देवांचे वैद्य आहोत. तुझ्या पतीला आम्ही रूपयौवनसंपन्न तर करूच, शिवाय पुन्हा दृष्टी प्राप्त करून देऊ. पण त्यावर त्यांनी एक दुष्ट अशी अट आहे. ते म्हणाले, तुझा पती देहाने व रूपाने आमच्यासारखा दिसेल असे आम्ही करू व पुढे तू पती शोधून घे किंवा तिघांपैकी कोणाही एकाचा पती म्हणून स्वीकार कर. त्यांचे हे विचित्र भाषण ऐकून मी आपणाला ही दुर्घट घटना निवेदन करावे म्हणून आले आहे. तेव्हा आता मी काय करावे हे आपण निवेदन करावे. हे नाथ, देवाचे कपट मी जाणत नाही. देवाची माया अनाकलनीय आहे. तेव्हा अशा प्रसंगी पतिव्रता धर्माला योग्य असे मी कसे वागावे हे मला सांगा, म्हणजे मी तसेच करीन."
आपल्या एकनिष्ठ व सेवातत्पर पत्नीचे भाषण ऐकून च्यवन विचार करून म्हणाले, "व्रतस्थ प्रिये, तू आता त्वरेने त्या देववैद्य अश्विनीकुमारांकडे जा व त्यांना येथवर घेऊन ये. नंतर तू त्यांच्या म्हणण्याप्रमाणे होकार दे. विलंब करू नकोस. तू कसलीही चिंता न करता त्यांचे ऐक." पतीची आज्ञा घेऊन सुकन्या देवपुत्र अश्विनीकुमारांकडे येऊन म्हणाली, "सुरवरांनो आपण आताच माझ्या पतीकडे चलावे. तुम्ही जे सांगाल तसे मी करीन. तुमच्या अटी मला मान्य आहेत. खरेच तुम्ही सत्वर माझ्या पतीला रूपयौवनसंपन्न करा व दिव्यदृष्टी प्राप्त करून द्या."
तिचे भाषण ऐकताच अश्विनीकुमारांनी सरोवरातील उदकात काही दिव्य औषधे मिसळली. नंतर त्यांनी सुकन्येला सांगितले, "हे मानिनी, आता तू तुझ्या पतीला त्या जलात नेऊन ठेव, म्हणजे तो दिव्यदेहधारी होईल."
सुकन्येने आपल्या प्रिय पतीला सत्वर त्या सरोवरात नेऊन बसविले व ती परत काठावर आली. अश्विनीकुमार त्वरेने त्या सरोवरात शिरले. थोड्याच वेळाने सर्वांनी बुडी घेतली व लवकरच ते तिघेहीजण सरोवरातून बाहेर पडले. त्या तिघांचे तेजःपुंज असे देह अत्यंत एकसारखे दिसत होते. त्यांच्यात थोडाही उणेपणा नव्हता. तिघेही प्रसन्न व शांत होते. त्या तिघांचेही अवयव सारखेच असल्याने रूपाने अतुल होते. सर्वजण दिव्य वस्त्रे व भूषणांनी मंडित होते.
सरोवरातून बाहेर पडताच ते तिघेही आपल्या एकाच आवाजात सुकन्येला म्हणाले, "हे सुमुखी, हे वरवर्णिनी, हे अमलवदने, हे कल्याणी, आम्हा तिघांपैकी तुला हवा वाटेल त्या कोणासही तू पती म्हणून वर. तुझे ज्याच्यावर अधिक प्रेम असेल त्याचा तू स्वीकार कर."
ते त्या तिघांचेही सम आवाजातले बोलणे ऐकून व त्या तिघांचेही रूप, गुण, वय व वेष सारखेच असलेले पाहून ती बिकट संभ्रमात पडली. आपला पती कोणता हेच तिला उमजेना. आपले पातिव्रत्य भंग तर पावणार नाही ना ! असाही प्रश्न तिच्यापुढे निर्माण झाला. ती भयभीत झाली. आता तिघांपैकी कोणाला पती म्हणून स्वीकारावे याबद्दल ती चिंतन करू लागली. खरोखरच देवांनी चांगलीच कपटमाया केली आहे. आता काय करावे बरे ? खरेच माझे पातिव्रत्य भंग होत असेल तर माझा मृत्यूच जवळ आला असे म्हणावे लागेल. पतीविना कोणालाही, मग ते देव असले तरी मी वरणार नाही. मी पतीशी एकनिष्ठ राहीन.
अशाप्रकारे संभ्रम प्राप्त झाल्यावर तिने देवीचे चिंतन करावे असा विचार केला. त्या वृकोदरी विश्वेश्वरीचे, त्या सर्वोत्कृष्ट कल्याणीचे, त्या सर्व फलदायिनी भगवती देवीचे ध्यान करण्यास सुकन्येने सुरुवात केली.
"हे जगन्माते, मी आज अत्यंत दुःखद स्थितीत असून खिन्न होऊन तुला शरण आले आहे. हे मोक्षदायिनी देवते, आता तूच फक्त माझ्या पातिव्रत्याचे रक्षण करण्यास समर्थ आहेस. मी तुझ्या चरणांना नम्रतेने प्रणाम करते. हे कमलोद्भवे, हे शंकरवल्लभे, हे विष्णूप्रिये, हे लक्ष्मी, हे वेदमाते, हे सरस्वती, हे देवी, तुला नमस्कार असो.
हे भगवती, हे सर्व चराचर विश्व तूच निर्माण करतेस, तूच याचे रक्षण करतेस व योग्य काली तूच याचा लय करतेस. तूच भगवान विष्णू महेश्वर व ब्रह्मदेव यांची खरोखर जननी आहेस. अज्ञानी जनांना तूच ज्ञानस्पर्श करून ज्ञानी करतेस व सूज्ञांना मोक्ष प्राप्त करून देतेस. तूच सारसर्वस्व असून आद्यप्रकृती तूच आहेस. म्हणून त्या पूर्ण अशा परम-पुरुषाला तुझे दर्शन प्रिय असते. निर्मल अंतःकरणाल्या सर्व प्राण्यांना तूच भुक्ती, मुक्ती देतेस. तूच अज्ञानी जनांना दुःख व पीडा देतेस आणि योगी जनांना सिद्धी, कीर्ती व जय प्राप्त करून देतेस. मी अत्यंत संकटात असून हे देवी, तुझ्या चरणावर मी नत झाले आहे. म्हणून हे भगवती माते, यातील माझे पतीराज कोणते याचे मला मार्गदर्शन कर. खरोखर देवांनी कपट करून मला मोहात पाडले आहे. तेव्हा अशा या दुर्घट अवस्थेत मी माझ्या पतीला कसे बरे ओळखू ? हे सर्वसाक्षी देवते, तूच माझ्या पातिव्रत्याचे रक्षण कर. मला माझा पती कोणता हे सत्वर दाखव."
अशाप्रकारे सुकन्येने त्या शुभफलदायिनी देवीचे स्मरण व स्तवन केले. तेव्हा त्या सुख देणार्या देवीने दिव्य असे ज्ञान सुकन्येच्या हृदयात निर्माण केले. तेव्हा त्यातला आपला पति कोणता हे तिला अचूक ओळखता आले व तिने आपल्या पतिचाच स्वीकार केला.
अशाप्रकारे एका दिव्य परीक्षेत ती यशस्वी झाली असता प्रसन्न झालेले अश्विनीकुमार तिला निरनिराळे दिव्य आशीर्वाद देऊन परत जाण्यास निघाले.
आपल्या पतिनिष्ट पत्नीला च्यवनमुनींनी प्रसन्न होऊन अनेक शुभ वर दिले.
च्यवनमुनींना रूप व विशालनेत्र अशी पतिव्रता भार्या व सुरेख यौवन प्राप्त झाल्याने अत्यंत आनंदित होऊन ते अश्विनीकुमारांना म्हणाले, "हे सुरश्रेष्ठहो, आपण खरोखर अनपेक्षितपणे मला हे रूपसौंदर्य देऊन अत्यंत उपकृत केले आहे. तुमच्या कृपाप्रसादामुळे मला आता संसारातील सर्व सुखे प्राप्त होणार आहेत. या अनुपमेय सुखप्राप्तीमुळे काय बोलावे हेच मला समजत नाही. ती सुंदर केशसंभाराने युक्त असलेली भार्या माझ्यासारख्या अंध वृद्धाला लाभल्यावर मी सुखावाचून दुःखी राहूनच त्या अरण्यात वास्तव्य करीत होतो. मला प्रत्यही दारुण दुःख होत असे. तुम्ही मला त्या दुष्ट अवस्थेतून मुक्त करून हे उत्कृष्ट नेत्र, हे दुर्लभ यौवन व अद्वितीय असे रूप प्राप्त करून दिले आहेत. त्याचे उपकार न फिटण्यासारखे असले तरी कृतज्ञताबुद्धीने मी आता बोलतो आहे, ते आपण श्रवण करा.
हे देवपुत्रांनो, आपल्या उपकारकर्त्या मित्रावर जे कृतज्ञ मनाने पुन्हा उपकार करीत नाहीत ते पुरुष धिक्कार करण्यासच योग्य होत. प्रत्येक पुरुषाने उपकारकर्त्याचे ऋणी रहावे. म्हणून आपली जर काही इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यास मी तयार आहे. आपण सांगा. देव-दानवांनाही दुर्लभ असे तुमचे कोणतेही मनोरथ मी पूर्ण करीन. म्हणून आपली इच्छा मला कथन करा. तुम्ही केलेल्या या पुण्यकारण कृत्याने मी संतुष्ट झालो आहे."
प्रसन्न झालेल्या मुनीचे भाषण ऐकून अश्विनीकुमारांनी एकमेकात विचारविनिमय केला. ते मुनीश्रेष्ठाला म्हणाले, "हे महामुने, तो सर्वलक्षी, सर्वसाक्षी असा सूर्य आमचा पिता आहे. त्यामुळे आम्हाला सर्व काही मनाप्रमाणे मिळत असते. पण हे मुनीवर्या, देवांच्याबरोबर सोमपान करावी अशी आमची एक इच्छा राहून गेलेली आहे. पूर्वी एकदा ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी इंद्राने मेरूपर्वतावर यज्ञ केला. त्यावेळी ज्या पात्राने सोमपान करतात. ते चमसपात्र आम्ही वैद्य असूनही घेतल्यामुळे इंद्राने आमचा निषेध केला. म्हणून हे धर्माज्ञा, तापसा ती आमची अपूर्ण राहिलेली इच्छा तू पूर्ण कर. तुझ्यात सामर्थ्य असेल तर तेवढेच आमचे मनोरथ पूर्ण कर. आमची ही दुर्लभ इच्छा जाणून तू आम्हाला सोमपानाची झालेली इच्छा सोमपान देऊन पूर्ण कर. देवांसह सोमपान करण्याची आमची इच्छा तूच शेवटास नेशील याबद्दल आम्हाला विश्वास वाटतो."
च्यवन म्हणाले, "हे देवपुत्रांनो, मी वृद्ध व अंध असूनही तुम्ही माझा कायापालट करून मला रूपसंपन्न व यौवनाने परिपूर्ण केले. केवळ त्या योगानेच मला माझ्या या सुंदर भार्येची खरी प्राप्ती झाली. म्हणून त्या इंद्राच्या रागद्वेषास न जुमानता मी तुम्हाला सोमपान करवीन. त्या महातेजस्वी शर्याति राजाच्या यज्ञात मी तुमची इच्छा पूर्ण करीन. हे माझे वचन सत्य समजा."
नंतर हे प्रिय भाषण ऐकल्यावर अश्विनीकुमार समाधानाने स्वर्गाकडे निघून गेले व च्यवन भार्गव मुनीही आपल्या सुंदर भार्येसह आश्रमात आले.