श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
सप्तमः स्कन्धः
चतुर्थोऽध्यायः


अश्विनीकुमारयोः सुकन्यां प्रति बोधवचनवर्णनम्

व्यास उवाच -
गते राजनि सा बाला पतिसेवापरायणा ।
बभूव च तथाग्नीनां सेवने धर्मतत्परा ॥ १ ॥
फलान्यादाय स्वादूनि मूलानि विविधानि च ।
ददौ सा मुनये बाला पतिसेवापरायणा ॥ २ ॥
पतिं तप्तोदकेनाशु स्नापयित्वा मृगत्वचा ।
परिवेष्ट्य शुभायां तु बृस्यां स्थापितवत्यपि ॥ ३ ॥
तिलान् यवकुशानग्रे परिकल्प्य कमण्डलुम् ।
तमुवाच नित्यकर्म कुरुष्व मुनिसत्तम ॥ ४ ॥
तमुत्थाप्य करे कृत्वा समाप्ते नित्यकर्मणि ।
बृस्यां वा संस्तरे बाला भर्तारं संन्यवेशयत् ॥ ५ ॥
पश्चादानीय पक्वानि फलानि च नृपात्मजा ।
भोजयामास च्यवनं नीवारान्नं सुसंस्कृतम् ॥ ६ ॥
भुक्तवन्तं पतिं तृप्तं दत्त्वाचमनमादरात् ।
पश्चाच्च पूगं पत्राणि ददौ चादरसंयुता ॥ ७ ॥
गृहीतमुखवासं तं संवेश्य च शुभासने ।
गृहीत्वाऽऽज्ञां शरीरस्य चकार साधनं ततः ॥ ८ ॥
फलाहारं स्वयं कृत्वा पुनर्गत्वा च सन्निधौ ।
प्रोवाच प्रणयोपेता किमाज्ञापयसे प्रभो ॥ ९ ॥
पादसंवाहनं तेऽद्य करोमि यदि मन्यसे ।
एवं सेवापरा नित्यं बभूव पतितत्परा ॥ १० ॥
सायं होमावसाने सा फलान्याहृत्य सुन्दरी ।
अर्पयामास मुनये स्वादूनि च मृदूनि च ॥ ११ ॥
ततः शेषाणि बुभुजे प्रेमयुक्ता तदाज्ञया ।
सुस्पर्शास्तरणं कृत्वा शाययामास तं मुदा ॥ १२ ॥
सुप्ते सुखं प्रिये कान्ता पदसंवाहनं तदा ।
चकार पृच्छती धर्मं कुलस्त्रीणां कृशोदरी ॥ १३ ॥
पादसंवाहनं कृत्वा निशि भक्तिपरायणा ।
निद्रितं च मुनिं ज्ञात्वा सुष्वाप चरणान्तिके ॥ १४ ॥
शुचौ प्रतिष्ठितं वीक्ष्य तालवृन्तेन भामिनी ।
कुर्वाणा शीतलं वायुं सिषेवे स्वपतिं तदा ॥ १५ ॥
हेमन्ते काष्ठसम्भारं कृत्वाग्निज्वलनं पुरः ।
स्थापयित्वा तथापृच्छत्सुखं तेऽस्तीति चासकृत् ॥ १६ ॥
ब्राह्मे मुहूर्ते चोत्थाय जलं पात्रं च मृत्तिकाम् ।
समर्पयित्वा शौचार्थं समुत्थाप्य पतिं प्रिया ॥ १७ ॥
स्थानाद्दूरे च संस्थाप्य दूरं गत्वा स्थिराभवत् ।
कृतशौचं पतिं ज्ञात्वा गत्वा जग्राह तं पुनः ॥ १८ ॥
आनीयाश्रममव्यग्रा चोपवेश्यासने शुभे ।
मृज्जलाभ्यां च प्रक्षाल्य पादावस्य यथाविधि ॥ १९ ॥
दत्त्वाऽऽचमनपात्रं तु दन्तधावनमाहरत् ।
समर्प्य दन्तकाष्ठं च यथोक्तं नृपनन्दिनी ॥ २० ॥
चकारोष्णं जलं शुद्धं समानीतं सुपावनम् ।
स्नानार्थं जलमाहृत्य पप्रच्छ प्रणयान्विता ॥ २१ ॥
किमाज्ञापयसे ब्रह्मन् कृतं वै दन्तधावनम् ।
उष्णोदकं सुसम्पन्नं कुरु स्नानं समन्त्रकम् ॥ २२ ॥
वर्तते होमकालोऽयं सन्ध्या पूर्वा प्रवर्तते ।
विधिवद्‌हवनं कृत्वा देवतापूजनं कुरु ॥ २३ ॥
एवं कन्या पतिं लब्ध्वा तपस्विनमनिन्दिता ।
नित्यं पर्यचरत्प्रीत्या तपसा नियमेन च ॥ २४ ॥
अग्नीनामतिथीनां च शुश्रूषां कुर्वती सदा ।
आराधयामास मुदा च्यवनं सा शुभानना ॥ २५ ॥
कस्मिंश्चिदथ काले तु रविजावश्विनावुभौ ।
च्यवनस्याश्रमाभ्याशे क्रीडमानौ समगतौ ॥ २६ ॥
जले स्नात्वा तु तां कन्यां निवृत्तां स्वाश्रमं प्रति ।
गच्छन्तीं चारुसर्वाङ्‌गीं रविपुत्रावपश्यताम् ॥ २७ ॥
तां दृष्ट्वा देवकन्याभां गत्वा चान्तिकमादरात् ।
ऊचतुः समभिद्रुत्य नासत्यावतिमोहितौ ॥ २८ ॥
क्षणं तिष्ठ वरारोहे प्रष्टुं त्वां गजगामिनि ।
आवां देवसुतौ प्राप्तौ ब्रूहि सत्यं शुचिस्मिते ॥ २९ ॥
पुत्री कस्य पतिः कस्ते कथमुद्यानमागता ।
एकाकिनी तडागेऽस्मिन् स्नानार्थं चारुलोचने ॥ ३० ॥
द्वितीया श्रीरिवाभासि कान्त्या कमललोचने ।
इच्छामस्तु वयं ज्ञातुं तत्त्वमाख्याहि शोभने ॥ ३१ ॥
कोमलौ चरणौ कान्ते स्थितौ भूमावनावृतौ ।
हृदाये कुरुतः पीडां चलन्तौ चललोचने ॥ ३२ ॥
विमानार्हासि तन्वङ्‌गि कथं पद्भ्यां व्रजस्यदः ।
अनावृतात्र विपिने किमर्थं गमनं तव ॥ ३३ ॥
दासीशतसमायुक्ता कथं च त्वं विनिर्गता ।
राजपुत्र्यप्सरा वासि वद सत्यं वरानने ॥ ३४ ॥
धन्या माता यतो जाता धन्योऽसौ जनकस्तव ।
वक्तुं त्वां नैव शक्तौ च भर्तुर्भाग्यं तवानघे ॥ ३५ ॥
देवलिकाधिका भूमिरियं चैव सुलोचने ।
प्रचलंश्चरणस्तेऽद्य सम्पावयति भूतलम् ॥ ३६ ॥
सौभाग्याश्च मृगाः कामं ये त्वां पश्यन्ति वै वने ।
ये चान्ये पक्षिणः सर्वे भूरियं चातिपावना ॥ ३७ ॥
स्तुत्यालं तव चात्यर्थं सत्यं ब्रूहि सुलोचने ।
पिता कस्ते पतिः क्वासौ द्रष्टुमिच्छास्ति सादरम् ॥ ३८ ॥
व्यास उवाच -
तयोरिति वचः श्रुत्वा राजकन्यातिसुन्दरी ।
तावुवाच त्रपाक्रान्ता देवपुत्री नृपात्मजा ॥ ३९ ॥
शर्यातितनयां मां वां वित्तं भार्यां मुनेरिह ।
च्यवनस्य सतीं कान्तां पित्रा दत्तां यदृच्छया ॥ ४० ॥
पतिरन्धोऽस्ति मे देवौ वृद्धश्चातीव तापसः ।
तस्य सेवामहोरात्रं करोमि प्रीतिमानसा ॥ ४१ ॥
कौ युवां किमिहायातौ पतिस्तिष्ठति चाश्रमे ।
तत्रागत्य प्रकुरुतमाश्रमं चाद्य पावनम् ॥ ४२ ॥
तदाकर्ण्य वचो दस्रावूचतुस्तां नराधिप ।
कथं त्वमपि कल्याणि पिता दत्ता तपस्विने ॥ ४३ ॥
भ्राजसेऽस्मिन्वनोद्देशे विद्युत्सौदामिनी यथा ।
न देवेष्वपि तुल्या हि तव दृष्टास्ति भामिनि ॥ ४४ ॥
त्वं दिव्याम्बरयोग्यासि शोभसे नाजिनैर्वृता ।
सर्वाभरणसंयुक्ता नीलालकवरूथिनी ॥ ४५ ॥
अहो विधेर्दुष्कलितं विचेष्टितं
     यदत्र रम्भोरु वने विषीदसि ।
विशालनेत्रेऽन्धमिमं पतिं प्रिये
     मुनिं समासाद्य जरातुरं भृशम् ॥ ४६ ॥
वृथा व्रतस्तेन भृशं न शोभसे
     नवं वयः प्राप्य सुनृत्यपण्डिते ।
मनोभवेनाशु शराः सुसन्धिताः
     पतन्ति कस्मिन्पतिरीदृशस्तव ॥ ४७ ॥
त्वमन्धभार्या नवयौवनान्विता
     कृतासि धात्रा ननु मन्दबुद्धिना ।
न चैनमर्हस्यसितायतेक्षणे
     पतिं त्वमन्यं कुरु चारुलोचने ॥ ४८ ॥
वृथैव ते जीवितमम्बुजेक्षणे
     पतिं च सम्प्राप्य मुनिं गतेक्षणम् ।
वने निवासं च तथाजिनाम्बर-
     प्रधारणं योग्यतरं न मन्महे ॥ ४९ ॥
अतोऽनवद्याङ्ग्युभयोस्त्वमेकं
     वरं कुरुषावहिता सुलोचने ।
किं यौवनं मानिनि सङ्करोषि
     वृथा मुनिं सुन्दरि सेवमाना ॥ ५० ॥
किं सेवसे भाग्यविवर्जितं तं
     समुज्झितं पोषणरक्षणाभ्याम् ।
त्यक्त्वा मुनिं सर्वसुखापवर्जितं
     भजानवद्याङ्ग्युभयोस्त्वमेकम् ॥ ५१ ॥
त्वं नन्दने चैत्ररथे वने च
     कुरुष्व कान्ते प्रथितं विहारम् ।
अन्धेन वृद्धेन कथं हि कालं
     विनेष्यसे मानिनि मानहीनम् ॥ ५२ ॥
भूपात्मजा त्वं शुभलक्षणा च
     जानासि संसारविहारभावम् ।
भाग्येन हीना विजने वनेऽत्र
     कालं कथं वाहयसे वृथा च ॥ ५३ ॥
तस्माद्‌भजस्व पिकभाषिणि चारुवक्त्रे
     एवं द्वयोस्तव सुखाय विशालनेत्रे ।
देवालयुषे च कृशोदरि भुङ्क्ष्व भोगान्
     त्यक्त्वा मुनिं जरठमाशु नृपेन्द्रपुत्रि ॥ ५४ ॥
किं ते सुखं चात्र वने सुकेशि
     वृद्धेन सार्धं विजने मृगाक्षि ।
सेवा तथान्धस्य नवं वयश्च
     किं ते मतं भूपतिपुत्रि दुःखम् ॥ ५५ ॥
शशिमुखि त्वमतीव सुकोमला
     फलजलाहरणं तव नोचितम् ॥ ५६ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां सप्तमस्कन्धे अश्विनीकुमारयोः सुकन्यां
प्रति बोधवचनवर्णनं नाम चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥


अश्विनीकुमार सुकन्येला मागणी घालतात -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

व्यास जनमेजयाला पुढील कथा सांगू लागले. ते म्हणाले, "राजा निघून गेल्यावर सुकन्येने पतीसेवा, अग्नीसेवा व आपला पतिव्रता धर्म याविषयी तत्पर राहून ती पतीसाठी वनात हिंडून नानाप्रकारची मधुर फळे, स्वादिष्ट मूळे आणून देऊ लागली. पाणी उष्ण करून ती आपल्या पतीला स्नान घालीत असे. त्याच्या कटीभोवती कृष्णाजीन गुंडाळून पतीला आपण तयार केलेल्या शुभ आसनावर नेऊन बसवीत असे. मुनीला नित्यकर्म करता यावे म्हणून त्याचाजवळ तीळ, यव, कुश व कमंडलू वगैरे सर्व काही ठेवीत असे. नित्यकर्म उरकल्यावर पतीला हाताला धरून उठवून ती त्याला मऊ आसनावर बसवीत असे. नंतर पूर्ण पिकलेली फळे व चांगले असे भोजन तयार करून पती तृप्त झाला म्हणजे त्याच्या हातावर आचमन देत असे. नंतर नप्रतापूर्वक वे आदरयुक्त मनाने ती त्याला पानसुपारी देई.

अशाप्रकारे सर्व नित्यक्रम झाल्यावर ती पतीला दुसर्‍या शुभ आसनावर निजवीत असे व नंतर पतीच्या आज्ञेवरून ती आपले उदरभण कर्म करीत असे. आपण फलाहार घेतल्यावर ती आपल्या पतीजवळ येऊन बसे व त्याला विचारी, "पतीदेव, आता आपली कोणती सेवा करावी याची आज्ञा द्या. मी आपली संमती घेऊन पाय चेपू का ?" अशाप्रकारे पतिव्रताधर्माचे उत्तम पालन करून ती नित्य पतीसेवातत्पर राहू लागली. सायंकालची होम-हवनादी नित्यकर्मे झाल्यावर पुन्हा पतीला फलाहार देऊन उरलेले पतीची आज्ञा घेऊन अन्न सेवन करी. पतीला मऊ आसन निद्रेसाठी तयार करी. पती शय्येवर पहुडल्यावर ती पतीचे पाय चेपीत बसे. नंतर पतीला निद्रा लागल्यावर आपण स्वतः पतीचरणजवळ निद्रा घेत ती रहात असे. उन्हाळा प्राप्त झाल्यावर पतीला शुद्धासनावर बसवून ती ताडाच्या पंख्याने वारा घालून पतीची सेवा करीत होती. त्याचप्रमाणे थंडीचे दिवस येताच सुकलेली काष्टे ती गोळा करून त्याच्या पुढ्यात त्या काष्ठांना अग्नी देऊन ती उष्णता निर्माण करीत होती व आता आपणाला थंडीचा त्रास होत नाही ना, असे पतीला विचारून त्याला थंड अगर उष्ण हवेपासून नैसर्गिक पीडा ती निर्वारण करीत होती. ती स्वतः ब्राह्म मुहूर्तावर उठून अपल्या पतीला उठवी. शौचस्थानापाशी उदक व मृत्तिका नेऊन आपल्या पतीला त्या स्थानापर्यंत ती नेऊन पोहोचवी. नंतर आपण स्वतः दूर उभी राहून योग्य ती काळजी घेत राही. अशाप्रकारे सेवातत्पर राहून पतीचा शौच्यविधी उरकताच त्याचा हात धरून ती पतीला पुन्हा आश्रमात घेऊन येई. मृत्तिका व उदक धुऊन पतीचे हात-पाय ती हळुवारपणे धुऊन काढी. नंतर पतीस चुळा भरण्यासाठी पाणी देऊन दंतकाष्ट आणून पतीला दात घासण्यासाठी देत असे. पतीला हवे असेल त्या वृक्षाचे काष्ठ ती दात घासण्यासाठी आणीत असे.

नंतर ताजे पाणी आणून ते तापवून पतीस स्नानासाठी तयार करून देई. त्याचप्रमाणे वेळेचे अवधान ठेवून होमकाल अथवा प्रातःसंध्येचा समय होताच ती पतीला कर्माविषयी जाणीव करून देई. त्यानंतर यथाविधी पूजादि होमहवन झाल्यावर आपण स्वतः देवपूजा करी. अशाप्रकारे तिने पतीच्या सेवेसाठी आपणाला सदासर्वकाळ बांधून घेतले होते. आपला पती महान तपस्वी आहे हे जाणून ती अत्यंत समाधानी वृत्तीने व नित्यनियमाने, अत्यंत आदराने व प्रेमळपणाने पतीची उत्कृष्ट सेवा करीत राहिली. पतीला यत्‌किंचितही त्रास न होईल याची ती काळजी वाही. पती हाच देव असल्याने ती अत्यंत पतिव्रता म्हणून त्याची सेवा करण्यात कधीही कंटाळत नव्हती.

अग्नीची सेवा करणे, आलेल्या अतिथींचा योग्यतेप्रमाणे आदर करणे यातही ती दक्ष होती. च्यवनमुनींना नित्य आनंदित ठेवण्याचा ती प्रयत्‍न करीत असे. एकदा सूर्यपुत्र अश्विनीकुमार सहज च्यवनमुनींच्या आश्रमाजवळ आले त्याचवेळी सुस्नात होऊन परत जात असलेली ती सुंदरी त्यांच्या अवलोकनात आली, त्यांना प्रथम ती देवकन्याच भासली. अत्यंत आदराने ते तिच्याजवळ गेले व मोहाने व्याप्त होऊन ते म्हणाले, हे सर्वांगसुंदरी, जराशी थांब, आम्ही देवपुत्र असून तुला काही विचारण्यासाठी आलो आहोत. तेव्हा तू आमच्या प्रश्नाचे उत्तर अगदी सत्य असेच दे. हे गजगामिनी, तुझा पती कोण आहे ? येथील निर्जन अशा सरोवरात स्नान करण्यासाठी तू एकटीच का आलीस ?

तुला भीती नाही का वाटत ? हे चारुलोचने, लक्ष्मीलाही लाजवील इतकी तुझी कांती तेजस्वी आहे यात संशय नाही. म्हणून हे कल्याणी, तुझी संपूर्ण माहिती विस्ताराने श्रवण करावी अशी आमची उत्कट इच्छा आहे. म्हणून तू सर्व सत्य तेच सांग. हे चंचलनयने, तुझे चरण इतके कोमल आहेत की ते भूमीवर उघडे पडल्याने त्या चरणांना भूमी बोचत असेल, म्हणून आम्हाला मनस्वी दुःख होत आहे. हे तन्वांगी, वास्तविक तुझी योग्यता विमानातच बसण्याची असल्याने तू या कठीण भूमीवर उघड्या पायांनी का चालते आहेस तेच आम्हाला समजत नाही. शिवाय या थंड अरण्यात अंगावर वस्त्रही न घेता तू का आली आहेस ते सत्वर निवेदन कर.

हे सुंदरवदने, तुझ्याबरोबर शेकडो दासी असणेच योग्य आहे. तू राजकन्या किंवा अप्सरा यापैकी कोण आहेस ते त्वरित सांग बरे ? तसेच तुझ्यासारखी सौंदर्यसंपन्न कन्या प्राप्त झाली असलेले तुझे माता-पिता खरोखरच धन्य होत. हे रूपगर्विते, तू कोणाची कन्या आहेस. हे अनघ स्त्रिये, खरोखरच तुझा पती किती भाग्यवान आहे ! त्याच्या भाग्याची तुलना करायला आम्ही देवपुत्र असूनही असमर्थ आहोत. तुझ्या चरणस्पशाने ही भूमी पवित्र होत असल्याने ही भूमी देवभूमीपेक्षाही अधिक श्रेष्ठ आहे यात संशय नाही. तुझे नित्य दर्शन घडत असलेले या अरण्यातील पशुपक्षी हे खरेच कृतार्थ होत. हे सुलोचने, आता तुझी आम्ही अधिक स्तुती करणे शक्य नाही. यास्तव आता तूच स्वतः विषयी सर्व काही विस्ताराने सांग. तसेच तुझ्या महाभाग्यशाली पतीचे दर्शन घ्यावे असेही आमच्या मनात आले आहे. त्याच्याबद्दल आमच्या मनात कमालीचा आदर निर्माण झाला आहे. हे सुहास्यवदने, आता तू सत्वर सांग."

अश्विनीकुमारांनी हर्षभरित होऊन पतिव्रता सुकन्येची स्तुती केल्यावर ती सुंदरी राजकन्या अत्यंत लज्जित झाली. ती त्या देवपुत्रांना म्हणाली, हे देवपुत्रांनो, मी शर्याति राजाची कन्या असून माझे नाव सुकन्या आहे. महातपस्वी सत्पुरुष जे च्यवनमुनी यांची मी पत्‍नी आहे. माझ्याच विनंतीवरून माझ्या पित्याने मला त्या मुनींना अर्पण केली आहे. हे देवहो, माझा पती वृद्ध झालेला असून अंधही आहे. पण तरीही अत्यंत समाधान मानून प्रसन्न चिताने मी माझ्या प्रिय पतीची दिवसरात्र सेवा करीत असते. आता तुम्ही कोण आहात व येथे आज कशासाठी आला आहात ते सांगा. येथे जवळच आश्रमात माझे पतीराज बसले आहेत. तेथे येऊन आपण आमचा आश्रम आपली पायधूळ झाडून पुनीत करा !"

पतिव्रता सुकन्येचे भाषण ऐकून अश्विनीकुमारांना अत्यंत आश्चर्य वाटले. ते म्हणाले, "हे कल्याणी, तू सांगतेस ते खरोखरच विचित्र वाटते. तू या वनात एखाद्या प्रखर विजेप्रमाणे तळपत आहेस. प्रत्यक्ष देवलोकातही तुझी बरोबरी करील अशी देवांगना आढळणार नाही. तुझे सुकोमल सौंदर्य पाहून आमच्यापुढे प्रश्न उभा राहतो. हे कोमलांगी, तुझ्या पित्याने - प्रत्यक्ष शर्याति राजाने तुझ्यासारख्या तनुलतेला एखाद्या तपस्व्याला अर्पण करण्याचे कारण काय ? खरे म्हणजे तुझ्या देहावर दिव्य व अमोल वस्त्रे शोभून दिसतील. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या सौंदर्यभूषणांनी तुझा देह अधिक शोभायमान होईल. तुझा निळसर केशसंभार हा या सांप्रतच्या तुझ्या अवस्थेला योग्य वाटत नाही. तू अजिन वस्त्र परिधान केल्यामुळे शोभून दिसत नाहीस, खरोखरच त्या विश्वकर्मा ब्रह्मदेवाचे केवढे अघोरी कृत्य हे ! हे भीरू, हे सुलोचने, हे प्रियदर्शनी, वार्धक्य प्राप्त झालेल्या अंध अशा च्यवनमुनीबरोबर विवाह करून तू त्यांचा पती म्हणून स्वीकार केलास आणि सर्व सुखांचा त्याग करून तू वनात वास्तव्य केलेस हे खरोखरच योग्य केले नाहीस.

हे नृत्यनिपुण कंते, तू यौवनसंपन्न असूनही या वेषभूषेत शोभत नाहीस. तुझा पती अतीवृद्ध असल्याने तू मदनबाणांपासून कशी दूर राहू शकशील ? तुला इंद्रियदमन करणे कसे शक्य होईल ? खरेच, तो विधाता अत्यंत निर्बुद्ध तर नाही ना ! नुकत्याच यौवनात पदार्पण केलेल्या तुला एखाद्या वृद्ध अंधाची भार्या होण्यास का बरे भाग पाडावे ? हे चारुलोचने, हे कृष्णनयने, तू अशा या जर्जर पतीला सोडून दुसर्‍या एखाद्या योग्य अशा समान पतीचा स्वीकार कर. हे कमलनयने, अंध तपस्व्याचा तू पती म्हणून स्वीकार केल्याने तुझे सर्व जीवन व्यर्थ जात आहे. हे असले अजिन वस्त्र परिधान करून तू या भयाण, निर्मनुष्य जंगलात वास्तव्य करावेस हे कदापी योग्य नाही. अशा वैराग्य अवस्थेत तुझ्यासारख्या सर्वांगसुंदरीला अवलोकन करणेही आम्हाला दुःखद वाटते. म्हणून हे आनंदितगात्री, आम्हां दोघांपैकी जो तुला इष्ट वाटेल त्याचा तू पती म्हणून स्वीकार कर. हे मानिनी, त्य वृद्ध मुनींची सेवाशुश्रूषा करण्यात तू आपले संपूर्ण आयुष्य निष्कारण वेचावेस हे योग्य नव्हे. स्वतःचे व पत्‍नीचे पोषण व रक्षण करण्यास सर्वस्वी असमर्थ व दुर्बल बनलेल्या त्या दुर्दैवी पतीचा तू आश्रय करावास हे दारुण दुःख देणारे आम्हास वाटते. म्हणून त्या दुःखी व अभागी वृद्ध अशा अंध पतीचा तू त्वरित त्याग कर आणि तुला जो प्रिय वाटेल त्या आम्हा दोघांपैकी कोणताही एका देवपुत्राचा स्वीकार करून तू नित्य सुखोपभोग घे.

आमच्यापैकी एकाशी विवाह करून तू स्वर्गातील नंदनवनात आणि निसर्गसौंदर्याने प्रफुल्लित असलेल्या त्या चैत्ररथ वनात आपल्या सुंदर नवपतीसह यथेच्छ क्रीडारत होऊन सुखी हो. कसलीही मानमान्यता नसलेल्या त्या वृद्ध व अंध पतीसमवेत तू यौवनाचा एवढा प्रदीर्घ काळ कसा व्यतीत करणार ? तू सुलक्षणी राजकन्या आहेस व संसारातील सुखोपभोगाची तुला संपूर्ण जाणीवही आहे. अशा अवस्थेत या निर्जन वनात आपला काळ कष्टप्रद कसातरी व्यतीत करून कायमच्या दुःखाची तू प्राप्ती करून घेऊ नकोस. ते तुला अखेरपर्यंत कसे शक्य होणार ?

हे कोकिळकंठी, चारुवदने, हे विशालनेत्रा राजकन्ये, हे कुशोदरी, आम्हा उभयतांपैकी एकाचा स्वीकार करून या लोकांतील उत्कृष्ट अशा सुखाचा चिरंतन उपभोग घे. या वृद्ध तपस्व्याचा त्याग कर आणि स्वर्गात राहून सर्वात्कृष्ट सुखाचा उपभोग घेत आनंदाने रहा. हे सुकेशी, हे मृगलोचने, येथे त्या अंध वृद्धाबरोबर एखाद्या तपस्विनीप्रमाणे आयुष्य वेचण्यात तुला कोणते सुख प्राप्त होणार ? त्यातून तू अत्यंत तारुण्य प्राप्त झालेली आहेस. अशा परिस्थितीत वृद्ध पतीची सेवा करण्यात होणारे दुःख तू स्वीकारीत आहेस. तुझ्या अत्यंत सुकोमल तनूला ह्मा वनांतील फळे, कंदमूळे यांचा आहार निश्चितच सुखावह नाही. तेव्हा नीट विचार कर आणि आमच्या म्हणण्यास होकार देऊन सुखेनैव स्वर्गात संचार कर."



अध्याय चवथा समाप्त

GO TOP