[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
सर्वच प्रजाजनांनी असे निश्चयपूर्वक सांगितल्यावर राजा अत्यंत चिंताग्रस्त झाला. त्याने काही गोडीगुलाबीने तर काही रागाने स्वजनांपाशी चौकशी सुरू केली. सर्वच प्रजा व आपला पिता अत्यंत त्रस्त झाला आहे हे अवलोकन करून आपण केलेल्या कर्माबद्दल सुकन्येच्या मनात शंका आली. आपण काट्याने वारूळ फोडले याचे तिला स्मरण झाले. तेव्हा अत्यंत घाबरून ती पित्याकडे गेली व म्हणाली, हे तात, मी माझ्या सख्यांसह खेळत असता पुष्पलतांनी वेढलेले एक वारूळ मला दिसले. वारुळाच्या छिद्रातून दोन ज्योती मला दिसल्यावर ते काजवे आहेत असे समजून मी त्या ज्योतींचा काट्याने वेध केला. तेव्हा तो काटा उदकाने भिजलेला मला दिसला व वारुळातून 'हाय, हाय"असे क्षीण झालेले शब्द मला ऐकू आले. मला वाटते, मी काही ते चांगले कृत्य केले नाही. ते खरोखरच काय आहे ? याबद्दल माझ्या मनांत संदेह निर्माण झाला आहे."
आपल्या सुकन्येचे ते बोलणे शर्यातीने विचारपूर्वक ऐकल्यावर आपल्या कन्येकडूनच मुनींचा अपराध घडला असावा असा संशय येऊन राजा सत्वर वारुळाकडे वेगाने निघून गेला. तेथे गेल्यावर त्याने ते वारुळ फोडले, तेव्हा आत असलेले अत्यंत कष्टी व असहाय झालेले च्यवनमुनी त्याला दिसले. राजाने त्यांच्यापुढे साष्टांग नमस्कार घालून तो हात जोडून नम्रपणे उभा राहिला व तो महामुनी च्यवन भार्गवाला म्हणाला, "हे महामुने, अजाणतेपणी माझ्या मुलीचे हातून अत्यंत घोर पातक घडले. आपण तिला क्षमा करावी. हे ब्रह्मन्, मुनींना रागद्वेषादी भावना होत नसतात असे आम्ही ऐकतो. म्हणून माझ्या सुकन्येचा अपराध विसरून तिला क्षमा करा."
अशाप्रकारे राजाचे विनययुक्त व सखेदाचे भाषण ऐकून च्यवनमुनी म्हणाले, "राजा, मी यतूकिंचितही क्रोधिष्ठ होत नाही. आता हेच पहा ना, तुझ्या कन्येने अत्यंत पीडा दिली. पण तरीही मी तुला अथवा तिला शाप दिलेला नाही. पण हे राजा, माझ्यासारख्या निरपराध तापसाच्या नेत्रांना अपार पीडा होत आहे व याच घडलेल्या प्रमादामुळे तुलाही दुःख भोगावे लागत आहे. प्रत्यक्ष देवीच्या भक्ताचा अपराध केल्यावर प्रत्यक्ष शंकर जरी एखाद्याचा त्राता असला तरीही पुरुषाला सुख होणार नाही. हे राजेश, मी नेत्रहीन झालो असून जरेने कष्टी झालो आहे. मी करू तरी काय ! हे राजा, आता माझी कोण सेवा शुश्रुषा करणार ?"
राजा म्हणाला, "हे मुनिवर्या, आपण त्याची अगदी चिंता करू नका, माझे पुष्कळ सेवक असून आपली ते नित्य सेवा करतील. पण आपण या अपराधाची क्षमा करावी. महामुने, आपल्यासारखे तापसी क्षमाशील असल्याने त्यांचा राग अत्यंत अल्प वेळ टिकतो."
च्यवनमुनी म्हणाले, "राजा, मी तर अंध झालो. मज जवळ दुसरे माणूस नाही. आता मला तपश्चर्या कशी करता येईल ? शिवाय तुझे सेवक माझे काय चांगले करणार आहेत ? हे राजा, तुला खरेच माझी क्षमा व्हावी अशी इच्छा असेल तर माझे मागणे मान्य कर. तू तुझी सुकन्या मला अर्पण कर. कारण हे राजा, मी त्यामुळेच संतुष्ट होईन. मी तपश्चर्या करीत असता ती माझी नित्य सेवा करील. असे झाले तर तुला, तुझ्या सर्व सैनिकांना व मलाही निश्चित सुख प्राप्त होईल. तेव्हा हे राजा, योग्य तो विचार करून तू मला कन्या दे. त्यात कोणताही दोष नसून मी तपस्वी आहे व ब्रह्मचर्य व्रतस्थ आहे."
च्यवनमुनींचे भाषण ऐकताच राजा चिंताव्याकुळ झाला आणि काहीच न बोलता, होकार अथवा नकार न देता, स्तब्ध होऊन विचार करू लागला.
माझी सुंदर एकच कन्या या कुरूप, अंध व वृद्ध अशा तपस्वयाला कशी देऊ ? त्यात मला काय सुख होणार ? स्वतःचे योग्य-अयोग्य समजणार्या कोणत्या पुरुषाला आपल्या कन्येच्या संसारसुखाची हानी करावीशी वाटेल ? अशा या अंध, वृद्ध पतीबरोबर ती यौवना गदनव्याकुल झाल्यावर कसा काळ काढू शकेल ? कारण तारुण्य हे फार अवघड आहे. कोणत्याही स्त्रीला, त्यातून राजकन्येला, मदनाच्या बाधेचे निवारण करणे केवळ अशक्य आहे. आपल्या बरोबरीचा पती लाभूनही जर त्यांना कित्येकदा अनुपम रतीसुख मिळत नाही, तर अशा वृद्ध, अंध पतीकडून कसे सुख मिळेल व सुस्वरूप युवतीला यावर संयम करणे कसे साध्य होईल ? रूपसंपन्न स्त्रीला तर दुष्ट प्रवृतीचे लोक फसवतातच. फार काय, गौतमीच्या पत्नीला - प्रत्यक्ष अहल्येला - इंद्राने फसविले. अधर्म हातून घडला म्हणून गौतम मुनीने पत्नीला शाप दिला. तेव्हा कितीही त्रास मला झाला तरी मी गाझी सुंदर कन्या याला देऊ शकणार नाही.
अशाप्रकारे पूर्ण विचार केल्यावर शर्याति खिन्न मनाने राजवाड्यात परत आला. त्याने जड अंतःकरणाने आपल्या मंत्रीगणांना बोलावून घेतले व तो म्हणाला, "हे मंत्रीगणांनो, आता मला तुम्हीच सल्लामसलत द्या. मी माझी मुलगी त्या वृद्ध, अंध च्यवनाला द्यावी की दुःख भोगावे ते आता तुम्ही मला सांगा. तुम्ही सर्वजण एकत्रितपणे विचार करा व मला योग्य ते सांगा."
सर्व मंत्री विचारपूर्वक म्हणाले, "हे राजा, हा प्रसंग अत्यंत दुर्धर आहे. आम्ही याचा कसा निर्णय करणार ? ही अती सुकोमल सुकन्या दुर्भाग्याला द्यावी, हे योग्य नाही."
अशाप्रकारे मंत्रीगण व आपला पिता केवळ आपल्यामुळे संकटात पडल्याचे अवलोकन करून ती लावण्यवती सुकन्या अत्यंत हास्यवदन होऊन म्हणाली, "हे तात, माझ्यासाठी आपण सर्वजण का बरे चिंताग्रस्त झाला आहात ? माझ्यामुळेच आपण अत्यंत दुःखी व उदास झाला आहात. मी आताच त्या मुनींकडे जाऊन माझ्यामुळे त्रस्त झालेल्या मुनींची सेवा करून त्यांचे समाधान करीन. वेळ पडल्यास मी माझा आत्मा त्यांना अर्पण करीन. आपण सर्वांनी त्यासाठी दुःखाने व्याकुळ होण्याचे खरेच काही कारण नाही. मी माझे सर्वस्व अर्पण करून त्या मुनींना प्रसन्न करून घेईन."
आपल्या सुविचारी मुलीचे भाषण राजाने व त्याच्या मंत्र्यांनी श्रवण केले व राजा म्हणाला, "हे सुकन्ये, तुझे म्हणणे खरे आहे. पण तुझ्यासारखी कोमलांगी कृश अबला त्या निर्जन वनामध्ये जाऊन त्या क्रोधिष्ठ, अंध व वृद्ध अशा मुनीला कशी प्रसन्न करून घेणार ? तू रतीप्रमाणे सुंदर आहेस म्हणून तुझ्या सुखासाठी मीच तत्पर रहायला हवे. तसे न होता त्या वृद्ध तपस्व्याला मी माझी कन्या कशी देऊ ? वास्तविक कोणत्याही पित्याने आपली कन्या तरुण वयाच्या, बल व धनसंपन्न अशा सुंदर पुरुषालाच अर्पण केली पाहिजे. निर्धनाला कधीही अर्पण करू नये. हे सुंदर कन्ये, तुझे रूप व त्या मुनींचे रूप यात किती तरी अंतर आहे ? त्याचे वय विवाहास योग्य नाही. तो वनात रहाणारा आहे. तू तरुण व राजवाड्यात राहिलेली आहेस. तेव्हा हे कमलनयने, तू त्या झोपडीत जाऊन रहावेस अशी मी कशी इच्छा करू ? त्यापेक्षा मला व त्रस्त सैनिकांर मरण प्राप्त झाले तरी चालेल, पण मी तुझ्यासारखा कन्येला वृद्ध अंधाला अर्पण करणार नाही. दैवात असेल तेच होईल. मी कदापीही धीर सोडणार नाही. सुकन्ये, तू निश्चिंत रहा. मी तुला अंधास देणार नाही. हे राज्य, हा देह जावो अथवा राहो, पण त्या अंध मुनींना मी कन्या अर्पण करणार नाही."
पित्याचे निश्चयाचे भाषण ऐकून सुकन्या प्रसन्न मनाने म्हणाली, "हे तात, आपण माझी खरेच चिंता करू नका. आपण निश्चिंत होऊन मला त्या मुनीस अर्पण करा. माझ्या एकटीसाठी सर्वांना दुःख द्यावे हे योग्य नव्हे. मी अत्यंत संतुष्ट मनाने त्या निबिड वनात राहून पतीची परमसेवा करीन. हे निष्पाप राजेश, मी पतिव्रता धर्म नीटपणे आचरणात आणीन. हे तात, मी विषयभोगाची इच्छ करीत नाही. मी स्थिरचित्त आहे."
सुकन्येचे विचारयुक्त भाषण ऐकून मंत्र्यांना विस्मय वाटला. राजाही प्रसन्न झाला. सुकन्येला घेऊन शर्याति राजा मुनीकडे गेला व साष्टांग प्रणिपात घालून तो म्हणाला, "हे महाभाग्यवान, आपण आपल्या सेवेसाठी माझ्या या कन्येचा स्वीकार करा."
असे म्हणून राजाने आपल्या कन्येचा विवाह त्या अंध च्यवन भार्गवाबरोबर लावून दिला. त्या राजकन्येचे पाणीग्रहण केल्यावर च्यवन मुनी संतुष्ट झाला. राजाने मुनीला विपुल धन दिले, दास-दासी व अमूल्य नजराण अर्पण केला. पण मुनीने इतर कशाचाही स्वीकार केल नाही. स्वतःच्या शुश्रुषेसाठी त्याने फक्त सुकन्येचा स्वीकार केला व त्याने प्रसन्न होऊन राजाला व सर्व सैनिकांना उःशाप देऊन पीडारहित केले. त्यामुळे त्या सर्वांना अत्यंत आनंद झाला.
कन्यादान करून राजा घराकडे निघाला असता सुकन्या म्हणाली, "हे तात, हे माझे अलंकार व भारी महावस्त्रे मला नको आहेत. ती आपण घेऊन जाव मला एक मृगाजिन वल्कले द्या. मी मुनीपत्नीचा वेष वापरूनच एकनिष्ठेने तपश्चर्या करीन व पतीची सेवा करीन. त्यामुळे संपूर्ण त्रैलोक्यात माझी ख्याती होईल. परलोकसुख मिळावे म्हणून मी उत्कृष्ट वागणूक ठेवणार आहे. मी सुंदर व तरुण असले व पती जरी वृद्ध असले तरीही मी शीलभ्रष्ट होणार नाही. याबद्दल आपण निश्चिंत असा. वसिष्ठांची पत्नी अरुंधती ज्याप्रमाणे पतिव्रता म्हणून सर्वत्र प्रसिद्धी पावली त्याचप्रमाणेच मीही होईन. महाराज, अत्रि मुनींची भार्या अनसूया हिच्याप्रमाणे मीसुद्धा कीर्ति मिळवीन व त्रैलोक्यात विख्यात होईन."
धर्मशील राजाने आपल्या कन्येचे म्हणणे ऐकून तिला तापसाचा वेष आणून दिला. पण तो वेष परिधान केलेल्या कन्येला पाहून राजाला अपार रडू कोसळले. ती तापसवेष परिधान केलेली आपली रूपसंपन्न कन्या अवलोकन करताच राजा अत्यंत खिन्न झाला व तेथेच उभा राहिला. राजाप्रमाणे त्याच्या सर्व भार्याही अत्यंत दुःखाने रोदन करू लागल्या आणि थरथरत्या शरीरांनी त्यांनी आपल्या कन्येचा निरोप घेतला. आपल्या कन्येला तेथे ठेवून राजा आपल्या भार्या व मंत्रिगणांसह राजधानीकडे परत आला.