[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
श्रीदेवीभगावताच्या पूर्वार्धातील देवी भगवतीचे महात्म्य व तिच्याविषयीच्या दिव्यकथा श्रवण केल्यावर राजा जनमेजय महर्षी व्यासांस प्रमुदित होऊन म्हणाला, "हे महर्षे, सूर्य व सोमवंशातील राजांचा वंश विस्तार आपण मला विस्ताराने सांगा. मी ऐकण्यास उत्सक झालो आहे. कारण ते सर्व त्या पराशक्तीचे उपासक होते असे म्हणतात. देवीच्या भक्तांचे चरित्र ऐकणे कोणाला बरे कंटाळवाणे होईल ?"
जनमेजयाचा प्रश्न ऐकून व्यासमुनी प्रफुल्लित चेहर्याने म्हणाले, "हे राजा, सूर्यवंश व सोमवंशातील राजाचा विस्तार मी आता तुला विस्ताराने सांगतो ते ऐका.
हे राजा, विष्णूच्या नाभिकमलापासून उत्यन्न झालेल्या ब्रह्मदेवाने दुर्लभ अशा त्या महादेवीची उपासना केली. त्यामुळे प्रसन्न होऊन तिने वर दिल्यानंतर ब्रह्मदेव सृष्टीची उत्पत्ती करू शकला. त्याने निरनिराळ्या प्रकारची स्थिर सृष्टी व चरात्मक सृष्टी निर्माण केल्यावरही त्याला मानवी सृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य झाले नाही. मानवी सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवाने मनःपूर्वक खूप विचार केला व अखेर त्याने मानवी सृष्टी निर्माण केली. पण त्या महात्म्याने निर्माण केलेल्या मानवीसृष्टीचा विस्तार वेगाने होईना.
भृगु, मरीची, अंगिरा, वसिष्ठ, पुलह ऋतु व पुलस्त्य हे सात मानसपुत्र त्याने मानवी सृष्टीचा भाग म्हणून निर्माण केले. ते सातही जण सर्वत्र सुविख्यात आहेत. ब्रह्मदेवाच्या क्रोधापासून रुद्र, मांडीपासून नारद आणि अंगुष्ठापासून दक्ष उत्पन्न झाले. तसेच सनकादिक इतर मुनीही त्याने निर्माण केले. शिवाय डाव्या अंगठ्यापासून निर्माण झालेली सर्वांगसुंदर कन्या ही दक्षाची पत्नी होय. तीच सर्व पुराणात वीरिणी म्हणून प्रसिद्ध आहे. तिलाच असिक्ती या प्रसिद्ध नावाने ओळखतात. नारद हे तिच्या ठिकाणी पुन्हा उत्पन्न झाले. वास्तविक तोच पूर्वीचा ब्रह्मदेवाचा मानवपुत्र नारद होय. पण त्यालाही पुन्हा जन्म घ्यावा लागला.
हे ऐकून जनमेजय म्हणाला, "पण महर्षे, आपणच सांगितले की नारद हा ब्रह्मदेवाचा पुत्र होता. असे असता तो दक्षाची पत्नी वीरिणी हिचे ठिकाणी कसा उत्पन्न झाला ?" त्याचे सविस्तर वर्णन करून माझी शंका दूर करा. ब्रह्मपुत्र नारदाची दक्षपत्नीच्या ठिकाणी पुनर्जन्माने उत्पत्ती होणे हे विचित्रच नव्हे का ? नारदाचा पूर्व देह कसा सुटला ? त्याला कोणाचा शाप झाला ? विद्वत्तापूर्ण असलेल्या त्या नारदाला पुनर्जन्म का बरे घ्यावा लागला ?"
व्यास म्हणाले, "स्वयंभू ब्रह्मदेवाने आपल्या अंगठ्यापासून उत्पन्न झालेल्या दक्षाला मानवी सृष्टीचा विस्तार व्हावा म्हणून प्रजा उत्पन्न करण्यास सांगितले. ब्रह्मदेवाची आज्ञा मानून त्या प्रतापशाली दक्षाने आपली पत्नी वीरिणी हिचे ठिकाणी अतिशय बलसंपन्न असे पाच हजार पुत्र निर्माण केले. म्हणून त्याला प्रजापती म्हणतात. प्रजेचा विस्तार व्हावा याच हेतूने ह्या पुत्रांची झालेली उत्पत्ती पहाताच देवर्षी नारद दैवाची प्रेरणा म्हणून म्हणा पण कुत्सिततेने हसत म्हणाला, "हे पराक्रमी दक्षपुत्रांनो, तुम्हालाही तुमच्या पित्याने प्रजेचा वेगाने विस्तार करण्याची आज्ञा दिली आहे.
पण लक्षात ठेवा, भूमीचा विस्तार समजून घेतल्यावाचून तुम्हाला प्रजा उत्पन्न करण्याची बुद्धी झाली नाही म्हणजे बरे ! नाहीतर नक्कीच लोकनिंदेस तुम्ही सर्वजण पात्र ठराल. पृथ्वीचा विस्तार किती आहे हे विचारात घेतल्यावरच तुमच्या प्रजोत्पत्तीला यश येईल. नाहीतर यश मिळणार नाही. अरे, भूमीचा आवाका समजला नाही तरीही तुम्ही जर प्रजोत्पत्ती करण्यास सिद्ध झालात तर तुम्हाला सिद्धी प्राप्त होण्याची शक्यता नाही."
नारदाचे बोलणे ऐकून ते दक्षपुत्र आपापसात विचार करू लागले. कदाचित दैवगतीमुळे म्हणा अथवा नारदाच्या भाषणाने म्हणा, त्यांचा विचार विनिमय सुरू झाला. खरोखरच नादर योग्य तेच सांगत आहे. पृथ्वीचे प्रमाण समजल्यावर प्रजा उत्पन्न करणे आपणाला सुखावह होईल असे ते एकमेकांस सांगू लागले. अखेर भूमीचा शोध घेण्यासाठी पूर्ण विचार करून ते इतस्ततः निघून गेले. निरनिराळ्या दिशेलाच ते चालते झाले. कुणी पश्चिमेला गेले तर कुणी अतिउत्साहाने उत्तरेला गेले.
इकडे पुत्र निघून गेल्याचे लक्षात येताच दक्षाला तीव्र दःख झाले. आणखी प्रजा उत्पन्न करण्याचा विचार करून त्याने आणखी पुत्र निर्माण केले व त्यांना प्रजोत्पादनाची आज्ञा दिली. त्या पुत्रांनी प्रजोत्पादनाची सिद्धता केली. पण तेवढ्यात नारद तेथे प्राप्त झाला.
नारद म्हणाला, "अरे दक्षपुत्रांनो, तुम्ही अगदीच पोरकट दिसता. भूमीचा विस्ताराचे प्रमाण विचारात न घेता तुम्ही का प्रजोत्पादन करीत आहात ? त्यामुळे अत्यंत त्रास होणार आहे."
त्यांना नारदाचे बोलणे पूर्णपणे पटले व तेही पूर्ण विचाराअंति आपल्या भ्रात्यांप्रमाणेच निरनिराळ्या दिशेला पृथ्वीचा शोध घेण्यासाठी निघून गेले.
आपले सर्व उत्पन्न केलेले पुत्र निघून गेल्याचे पाहून दक्ष अत्यंत संतापला. पुत्रांच्या वियोगाने दुःखी होऊन शोकमग्न दक्षाने नारदाला शाप दिला.
दक्ष म्हणाला, "हे दुष्टबुद्धे, तूच माझ्या पुत्रांचा नाश केलास. प्रायःश्चित्त म्हणून तुझाही नाश होईल. अरे पापात्म्या, तुलाही गर्भवास प्राप्त होईल आणि केवळ तूच माझे पुत्र नाहीसे केलेस यास्तव माझा पुत्र म्हणूनच तू पुन्हा जन्म पावशील."
असा शाप झाल्यावर देवर्षी नारद नाश पावून पुन्हा वीरिणीचे ठिकाणी जन्म पावला. यानंतर पुत्रासंबंधी शोक करण्याचे दक्षाने सोडून दिले व त्याने वीरिणीचे ठिकाणी साठ कन्या उत्पन्न केल्या. त्यातील तेरा कन्या महात्म्या काश्यप यालाच दक्षाने अर्पण केल्या. उरलेल्या सत्तेचाळीस कन्यापैकी दहा धर्माला अर्पण केल्या, सोमाला सत्तावीस दिल्या, भृगूला दोन, अरिष्टनेमीला चार, दोघींना कृशाश्वाला दिले आणि दोघींचा अंगिरसाबरोबर विवाह करून दिला.
यानंतर हे जनमेजया, देव व दानव हे ह्यांचेच पुत्र व पौत्र होत. तेच प्रतापशाली होऊन आपापसात युद्ध करू लागले व एकमेकांचे विरोधक बनले.
ते सर्व रागद्वेषादी सर्व गुणावगुणांनी युक्त असल्याने एकमेकांना पराकोटीचा विरोध करू लागले. ते सर्वजण शूर व अतिमायावी उत्पन्न होऊनही सर्व मोहव्याप्त झाले.