[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
व्यास म्हणाले, ''हे जनमेजया, मला नारदांनी त्या मायेचे वैभव कथन केले होते. तेच मी तुला आता निवेदन करतो."
नारद म्हणाले, ''नंतर मला त्या सरोवराजवळ तसेच सोडून विष्णु गरुडारूढ होऊन परत निघाले. जाताना ते म्हणाले, ''हे नारदा, आता तू इच्छेप्रमाणे कोठेही जा. असे म्हणून ते वैकुंठाप्रत गेले. मीही पित्याच्या स्थानाकडे गेलो. मी त्या अद्भुत घटनेचा विचार करीत होतो. नंतर पित्याला नमस्कार करून मी चिंताक्रांत होऊन तेथे उभा राहिलो. तेव्हा पिता म्हणाला, ''हे पुत्रा, तू चिंतातुर का झाला आहेस ? तुझी कुणी फसवणूक केली का ? तू काही विचित्र पाहिलेस का ? तू असा खिन्न का ?''
नारदांनी सर्व वृत्तांत आपल्या पित्याला कथन केला. नारद पुढे म्हणाला, ''स्त्रीत्व प्राप्त होताच माझी स्मृती नष्ट झाली. असे का व्हावे ? मायेचे सामर्थ्य मला समजले नाही. मोहामुळेच ज्ञानहानी होत असते. आता मला बरे वाईट समजले आहे. हे तात, आपण मायेवर कसा विजय मिळवलात ?''
तेव्हा ब्रह्मदेव हसत म्हणाले, ''देव, मुनी, तपस्वी इत्यादी सर्वांनीच मायेवर विजय मिळवलेला नाही. तिचे सामर्थ्य अद्भुत आहे. तीच जगाची उत्पत्ती, स्थिती व लय करीत असते. म्हणून हे पुत्रा, तू मायेसंबधाने शोकविव्हल होऊ नकोस. कारण आपण सर्वच मायेने मोहित होत असतो.''
नारद म्हणाले, ''हे व्यासमुने, माझ्या पित्याने अशाप्रकारे माझे निवारण केले. नंतर मी त्याविषयी विचार न करण्याचा निश्चय केला. तीर्थयात्रेसाठी मी संचार करू लागलो. सांप्रत मी या ठिकाणी आलो आहे.''
"हे व्यासा, कौरवांच्या नाशामुळे तुला झालेल्या मोहमय दुःखाचा तू त्याग कर व सुखाने कालक्रमणा कर, प्रत्येकाला आपण केलेल्या कर्माचे फळ भोगावेच लागते.''
व्यास म्हणाले, ''हे जनमेजया, मला उपदेश देऊन नारदमुनी निघून गेले. पुढे सारस्वतकल्पात मी सरस्वतीच्या तीरावर वास्तव्य केले. केवळ काल व्यतीत करण्यासाठी मी या सर्वोत्तम देवीभागवताची रचना केली.''
हे पुराण संशयनिवृत्ती करणारे आहे. त्यात विविध आख्याने आहेत. तसेच वेदप्रामाण्याने हे परिपूर्ण आहे. हे राजा, ही महामाया ब्रह्मापासून स्तंभापर्यंत सर्व प्राण्यांना, देवांना, असुर, मानव यांना सहज खेळवीत असते. इंद्रादि सर्व चराचर जगत् मायेच्या तालावर नाचत असते.
माया त्रिगुणात्मक असून कार्य कारण भावाने युक्त आहे. मायेमुळे भिन्न भिन्न स्वभावांचे गुण निर्माण झाले आहेत. शांत, घोर व मूढ असे त्या प्रत्येकात तीन प्रकार आहेत. पुरुषही गुणयुक्त असल्यामुळे तो गुणावाचून कसा संभवणार ?
हे राजा, मृत्तिकेशिवाय घट संभवत नाही; तसेच देव, मनुष्य अथवा तिर्यगप्राणी यांपैकी कोणीही गुणाशिवाय नाही. ब्रह्मा, विष्णु, महेश हेही त्रिगुणांच्याच आश्रयाने आहेत. त्यामुळे मनुष्य सुखी वा दुःखी असतो.
ब्रह्मदेव सत्त्वगुणी असल्याने तो शांत, ज्ञानी, दयाळू आहे. तो समाधीयुक्त आहे. पण जेव्हा तो रजोगुणी होतो तेव्हा घोररूपी होऊन कशावरच प्रेम करीत नाही. तो तमोगुणी असताना अत्यंत दुःखी व उदास तसेच मूढ होतो.
त्याचप्रमाणे माधव सत्त्वगुणी असताना शांत व प्रेमळ असतो. पण तो रजोगुणी झाल्यावर त्याच्याजवळ शांतता व प्रेम राहात नाही. त्यावेळी लक्ष्मीही राजस वा तमोगुणांनी युक्त होते.
रुद्रही सत्त्वगुणांने युक्त असतांना प्रेममय व शांत असतो. पण रजोगुणी झाल्यावर त्याचे ठिकाणी प्रेम, दया हे भाव नसतात. तमोगुणाचे वेळी तो उदास व दुःखी होतो.
हे नृपश्रेष्ठा, ब्रह्मा, विष्णु, महेश तसेच सूर्यवंश, सोमवंशातील राजे, हे सर्वजण गुणाचे आधीन असतात. तेव्हा इतर गुणाधीन आहेत यात आश्चर्य कोणते ? देव, असुर यांच्यासह हे सर्व जग मायाधीन आहे यात संशय नाही.
प्रत्येक देहधारी प्राणी मायाधीन होऊनच सर्व कर्मे करीत असतो. ज्ञानस्वरूप परतत्त्वाचे ठिकाणी माया वास करीत असते. परतत्त्वाच्या प्रेरणेने ती सर्वांमध्ये व्यापून राहते. म्हणून त्या ज्ञानस्वरूप व सच्चिदानंद रूप परमात्म्याचे व सर्वाची अदिष्ठात्री जी भगवती परमेश्वरी तिचेच प्रत्येकाने ध्यान व चिंतन करावे म्हणजे प्राणी मुक्त होतो.
भक्तांच्या हृदयास साक्षात्कार निर्माण करून ती भगवती मायेचा नाश करते. ती ईश्वरी सर्व ब्रह्मांडाची अधिष्ठात्री आहे. म्हणून तिला भुवनेशी म्हणतात.
चित्त आसक्त होऊन राहिल्यास शुद्ध ज्ञान संभवत नाही. मायेचा नाश करणारी सच्चिदानंदरूपिणी देवीच आहे. चंद्र, सूर्य, अग्नी हे तमाचा नाश करतात. मायागुणाचा नाश करण्यास महेश्वरी अंबेशिवाय कुणीही समर्थ नाही. म्हणून तिची अत्यंत भक्तीने व प्रेमाने आराधना करावी.
हे नृपश्रेष्ठा, तू विचारल्याप्रमाणे वृत्रासुरवध, भगवतीमाहात्म्य इत्यादींविषयी मी तुला उत्तम रीतीने निवेदन केले. आता आणखी काय ऐकू इच्छितोस ?
हे सुव्रता, मी तुला सांप्रत पुराणाचा पूर्वार्ध निवेदन केला. प्रसंगविशेषकरून मी तुला देवी भगवतीचे महात्म्यही सांगितले. हे श्रीमायेचे रहस्य कधीही कुणाला सांगू नये. भक्त, शांत, देवीभक्तीविषयी तत्पर, गुरुनिष्ठा अशा शिष्यालाच आणि पुत्रालाच हे सर्वदा निवेदन करावे.''
सूत म्हणतात, ''ऋषिश्रेष्ठांनो, हे देवीमहात्म्य सर्व कथांचे सार असून वेदांशी बरोबरी करणारे आहे. हे सत्त्वगुणयुक्त असलेले उत्तम पुराण आहे. हे पुराण जो सद्बुद्धीने, भक्तियुक्त श्रद्धेने श्रवण अथवा पठण करतो तो या जगात धन्य होय. त्याला संपत्ती व ज्ञानाच्या ऐश्वर्याचा लाभ होतो.
अध्याय एकतिसावा समाप्त
षष्ठः स्कन्धः समाप्त
श्रीमद्देवीभागवतमहापुराण पूर्वार्ध सम्पूर्णम्