[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
तालध्वजाचे भाषण ऐकून केवळ देहविस्मृतीमुळे मी म्हणालो, ''मी कोण ? कुठली ? याबद्दल मलाही काहीच माहिती नाही. मी तरी काय करू ? मी निराधार आहे. तू धर्मवेत्ता आहेस. तुला योग्य वाटेल ते तू कर. हे राजा, मी तुझ्या आधीन आहे. तूच माझे रक्षण कर.''
याप्रमाणे मी राजाला सांगितले असता कामातुर होऊन तो आपल्या सेवकांना म्हणाला, ''हिच्यासाठी रेशमी कपडयाने आच्छादलेली पालखी घेऊन या.''
ते ऐकून सेवकांनी एक सुंदर व दिव्य अशी पालखी आणली. मी पालखीत जाऊन बसले. त्यामुळे राजालाही आनंद झाला. पुढे त्याने सुमुहूर्तावर माझे विधिपूर्वक पाणिग्रहण केले. मी त्याला प्रिय झाल्याने त्याने माझे नाव सौभाग्यसुंदरी असे ठेवले. कामशास्त्रातील भोगांप्रमाणे तो माझ्याशी रत होऊ लागला. राजकार्य व नित्य कार्ये सोडून तो माझ्याशीच क्रीडा करू लागला.
त्याच्याशी रममाण झाल्यामुळे मलाही पूर्वदेहाचे स्मरण घडले नाही. हा माझा पती असून मी याची प्रिय राणी आहे असे मलाही वाटू लागले. राजा संपूर्णतः माझ्या आधीन होऊन राहिला. मला वाटू लागले, माझे जीवन खरोखर सफल होय. मीसुद्धा सुखावल्यामुळे त्याच्यासह अहोरात्र क्रीडा केली. आत्मज्ञान, वेदांत वगैरे सर्व गोष्टींचा विसर पडून मी त्याच्याशी रममाण झालो. अशा अवस्थेत एखाद्या क्षणाप्रमाणे बारा वर्षे निघून गेली.
पुढे माझ्या ठिकाणी गर्भ राहिल्याने राजाने आनंदाने सर्व संस्कार केले. माझे डोहाळे त्याने मला वारंवार विचारले, पण लज्जित होऊन मी काहीच सांगितले नाही. पूर्ण दिवस भरताच एका शुभदिनी मला पुत्र झाला. तेव्हा राजा अत्यंत आनंदित झाला.
पुढे दोन वर्षांनी पुनः मला दुसरा सुलक्षणी पुत्र झाला. थोरल्या पुत्राचे नाव वीरकर्मा व धाकटयाचे नाव सुधन्वा ठेवण्यात आले. असे मला बारा पुत्र झाले. मी मोहाने त्यांचे पालन केले. पुढे आणखी आठ पुत्र झाले. तेव्हा तर मला कृतकृत्य वाटू लागले. यथावकाश राजाने त्या पुत्रांचे यथाविधी विवाह केले. पुढे पुत्रपौत्रांच्या सुखात मी पूर्णपणे रमून गेल्यामुळे माझा परिवार वाढला.
अशा रितीने मी मोहवश झालो. कधी कधी मला ऐहिक दुःखे प्राप्त होत असत. पुत्रांमध्ये व स्नुषांमध्ये केव्हा तरी कलह होत. मी संतप्त होत असे. अशा रितीने मला या नश्वर संसारात अनेक दुःखे भोगावी लागली.
माझे पुत्र बलाढय आहेत असे वाटून मला अहंकार निर्माण झाला. माझे पुत्र, नातू घरात क्रीडा करू लागले. तो सर्व संसार पाहून मला धन्यता वाटत असे. पण मला त्या भगवंताच्या मायेने फसवले आहे असे मात्र कधीही वाटले नाही. मी पतिव्रता व राजपत्नी असल्याने धन्य व मान्य होतो.
एकदा एक मोठा राजा आपले सैन्य घेऊन माझ्या पतीशी युद्धास प्रवृत्त झाला. त्याने आमच्या नगराला वेढा दिला. पुढे माझे पुत्र, नातू त्याच्याशी युद्ध करू लागले. पण दुर्दैवाने माझ्या सर्व पुत्रांचा रणात वध झाला. राजा पराभूत होऊन परत आला. माझे पुत्र, नातू युद्धात मारले गेल्याचे ऐकून मला दुःख झाले. मी आक्रोश करीत रणभूमीवर गेलो. त्या मृत पुत्रांना पाहून मी म्हणालो, "हे पुत्रांनो, तुम्ही मला सोडून कोठे रे गेलात ? दैवाने असा घात का केला ?''
अशा रीतीने मी आक्रोश करीत असताना भगवान विष्णु वृद्ध द्विजाचे रूप घेऊन तेथे आले व मला म्हणाले, "हे सुंदरी, तू मोहावश झाल्यामुळे दुःख करीत आहेस. पती, पुत्र, गृह हे सर्व भ्रम आहेत. अज्ञानाचा त्याग करून तू आत्मगतीचा विचार कर आणि दुःख न करता स्थिरचित्त हो. हे स्त्रिये, धर्मशास्त्राच्या रक्षणासाठी तू स्नान करून त्या पुत्रांना तिलांजली दे. तीर्थावर तू स्नान कर."
त्या विप्राने मला बोध केल्यावर तो विप्र पुढे चालू लागला. मीही तीर्थावर जाण्यास निघालो. पुरुषतीर्थावर त्या हरीने मला नेले. तो म्हणाला, ''हे गजगामिनी, या सरोवरात स्नान कर. पुत्रांचे और्ध्वदेहिक कर. कित्येक जन्मांतले तुझे भ्राते, पुत्र असे कोटयावधी आप्त मृत झालेले आहेत. सर्वांना ताप देणारा हा संसार काल्पनिक आहे. तू आता कुणाकरता दुःख करणार ?''
हे ऐकून मी स्नानासाठी सरोवरात बुडी मारली. मी उदकातून वर येताच पुनः पूर्ववत् पुरुष झालो. समोर माझी वीणा हातात घेतलेले श्रीहरी उभे होते.
त्या श्रीहरीला पाहताच मला सर्व काही स्मरण होऊ लागले. मी पूर्वी हरीसह येथे आलो होतो, मोहाने मला स्त्रीत्व प्राप्त झाले; असे मला स्मरण होत असतानाच श्रीहरी म्हणाला, "हे नारदा, तू कसला विचार करीत आहेस ?''
पण त्यावेळी मला स्त्रीत्व व पुनः पुरुषत्व कसे प्राप्त झाले याबद्दल मी आश्चर्ययुक्त झालो होतो."