[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
नारद म्हणाले, ''हे मुनिश्रेष्ठा, मायाबल हे मुनींनाही आकलनीय नाही. सर्व चराचर जगत् मायेने मोहित झालेले आहे. मी एकदा श्रीहरीच्या दर्शनासाठी माझे वीणावाद्य वाजवीत व सुस्वर साम गायन करीत सत्यलोकापासून श्वेतद्वीपात गेलो. तेथे देवाधिदेव विष्णु मला दिसले.
वक्षावर कौस्तुभमण्याचा प्रकाश पडला होता. त्याने पितांबर परिधान केला होता. इतरही रत्ने शरीरावर झळकत होतीच. लक्ष्मीसह ते क्रीडा करीत होते. मला पाहताच लक्ष्मी लज्जेने भगवंताजवळून निघून गेली. ती अतिशय श्रेष्ठ अशी स्त्री होती. रूप, यौवन यांचा तिला अभिमान होता. वस्त्रातूनही तिची स्तनाग्रे दिसत होती. त्या लक्ष्मीला आत गेल्याचे पाहून मी म्हणालो, "हे देवाधिदेवा, मला येत असल्याचे पाहून लक्ष्मी आपल्याजवळून उठून का गेली ? मी प्रत्यक्ष इंद्रियदमन केलेला तपस्वी आहे.''
माझे गर्वयुक्त भाषण ऐकून तो मधुर वाणीने म्हणाला, "हे नारदा, स्त्रीने पतीशिवाय इतरांचे आसपास असू नये अशी नीती आहे. आहारशून्य, जितेंद्रिय, तपस्वी, योगी या सर्वांनाही माया अजिंक्य आहे, म्हणून तू आता जसे बोललास तसे पुनः बोलू नकोस. अरे, प्रत्यक्ष शिव वगैरे देवसुद्धा या मायेला जिंकू शकले नाहीत. देव, मानव अथवा कोणीही या अनादि मायेवर विजय मिळवू शकणार नाही. प्रत्येकजण मायेच्या आधीन असतो. कर्माप्रमाणेच सर्व घडत असते. कालाचा महिमा जाणणे दुर्घट आहे.''
तेव्हा मी वासुदेवाला म्हणालो, ''हे रमापते, मायेचे स्वरूप कसे आहे ? तिचे वसतिस्थान कोणते ? आपण मला मायेचे दर्शन घडवा."
विष्णु म्हणाले, "माया त्रिगुणात्मक असून सर्व जगदाधारभूत असते. तिने हे सर्व जग व्यापले आहे. तिला अवलोकन करण्याची तुझी इच्छा असल्यास गरुडावर आरोहण करून आपण तिकडे जाऊ. तिला तू अवलोकन केल्यावर मात्र तिच्याविषयी मनात संशय ठेवू नकोस.''
नंतर मी व जनार्दन गरुडावर आरुढ होऊन वायुवेगाने निघालो. नद्या, सरोवरे, नगरे इत्यादी अवलोकन करीत करीत आम्ही कान्यकुब्ज देशासमीप येऊन पोहोचलो. तेथे कमल, हस्त, चक्रवान यांनी विभूषित असे एक दिव्य सरोवर आम्हाला दिसले. ते सुंदर सरोवर पाहून विष्णु म्हणाले,
"हे नारदा, हे सुंदर सरोवर तू अवलोकन कर. आता आपण त्या श्रेष्ठ अशा कान्यकुब्ज नावाच्या नगरात जाऊ असे म्हणून त्यांनी मला उतरवले व आपणही मला घेऊन पुढे चालू लागले. थोडयाशा विश्रांतीनंतर विष्णू म्हणाले, "आता तू स्नान करून शुचिर्भूत हो. नंतर मीही तसे करीन.''
नंतर आम्ही स्नाने करून शुद्ध झालो. त्याचवेळी मला एकाएकी स्त्रीत्व प्राप्त झाले. माझे वस्त्र व वीणा घेऊन तो हरी अवकाश मार्गाने निघून गेला. इकडे मलाही पूर्वस्थितीचे विस्मरण झाले. मी मोहिनीच्या रूपाने त्या जलाशयातून बाहेर पडलो.
याप्रमाणे मला स्त्रीत्व प्राप्त झाल्यावर मी विहार करीत असता तालध्वज नावाचा राजा अचानक मला दिसला. तो मदनाप्रमाणे सुंदर व दिव्य अलंकारमंडित होता. तेव्हा पूर्णपणे आकर्षक असा मला तो म्हणाला,
"हे कल्याणी, तू कोण ? देव, मनुष्य, गंधर्व यांपैकी तू कुणी आहेस का ? तू येथे एकटी का ? तू विवाहित आहेस का ? हे कामिनी, मलाच पती वरून तू उत्कृष्ट सुखाचा उपभोग घे."