[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
दाईचे ते भाषण ऐकून राजा आपल्या कैकयी नावाच्या भार्येला म्हणाला, "हा वानरमुखी नारद कन्येने वरला आहे. या कुरुप भिक्षेकर्याला कन्या कशी द्यावी ? तेव्हा तू एकांतात तिचे मन वळवण्याचा प्रयत्न कर.''
तेव्हा माता आपल्या कन्येला म्हणाली, ''तू रूपवान असून निर्धन व कुरूप वानरमुखी नारदावर कशी मोहित झालीस ? त्या निंद्य पुरुषावर तू कसे प्रेम केलेस ? तुला राजपुत्रच योग्य वर आहे. तुझे भाषण ऐकून तुझा पिताही दुःखी झाला आहे. विवाहसमयी तुला नारदाजवळ बसलेली पाहून राजाला संतापच होईल. तुलाही त्या दुर्मुखाशी भाषण करण्यात आनंद वाटणार नाही.''
दमयंती म्हणाली, ''रूपवान असूनही मूर्ख असेल तर त्या पुरुषाचा काय उपयोग ? मधुर गायनावर वनातील हरणीसुद्धा लुब्ध होतात, पण अरसिक मनुष्याचा धिक्कार असो. नारद स्वरांची विद्या जाणतात. शंकराशिवाय ती इतरांना अवगत नाही. गुणहीन पुरुषाशी संबंध येण्यापेक्षा गुणांची जाण असणारा भिक्षुक श्रेष्ठ होय. स्वर, मूर्छना यांचे विविध प्रकार जाणणारा पुरुष दुर्बल असला तरी श्रेष्ठ होय. गंगा व सरस्वतीप्रमाणेच गायन करणारा पुरुष कैलासाची प्राप्ती करून देतो.
स्वरज्ञान जाणणारा पुरुष देवच असतो; पण गायन न जाणणारा पशुतुल्य होय. गायनाने लुब्ध होणारा विषारी सर्प देखील श्रेष्ठ असतो. सुस्वर गीतामुळे लहान मुलेही संतुष्ट होतात. गायनाची जाण नसलेल्यांचा धिक्कार असो.
हे माते, नारदाचे गुण माझ्या पित्याला माहीत आहेत. मी नारदाला मनाने वरले आहे. गानविद्यासंपन्न पुरुष अश्वमुखी असला तरी तो प्रिय होय. म्हणून तुम्ही आनंदाने मला नारदाला अर्पण करा.''
नारदमुनींना वरण्याचा कन्येचा निश्चय पाहून राणी पतीला म्हणाली, "सुमुहूर्तावर आपण कन्येचा व नारदमुनींचा विवाह करून द्यावा. तो सर्वज्ञ असून कन्येने त्यालाच वरले आहे.''
नारद म्हणाले, "राणीचे भाषण ऐकून राजा संजयाने हा विवाह विधिपूर्वक पूर्ण केला. अशारीतीने मी स्त्रीचा स्वीकार केला. पण माझ्या वानरमुखामुळे मी खिन्न होतो. पण दमयंती मात्र प्रसन्न होती. तिने त्याबद्दल कधीही दुःख केले नाही. पुढे अनेक तीर्थक्षेत्रे हिंडल्यावर पर्वतमुनी मला भेटण्यास आला. मी त्यांचे यथोचित पूजन केले. पण माझ्याकडे पाहून तो कष्टी झाला.''
व्यास म्हणाले, ''दोघांचेही मामा भाच्याचे नाते होते. त्यामुळे दयाळु पर्वतमुनी म्हणाला, ''हे नारदा, मी रागाने दिलेल्या शापातून तुला आज मुक्त करीत आहे. माझ्या तपाने तुझे मुख मनोहर होईल.''
असे उ:शाप देताच नारदाचे मुख मनोहर झाले. राजकन्या संतुष्ट होऊन मातेला म्हणाली, "तुझा तेजस्वी जावई शापमुक्त झाला आहे. तो पूर्ववत मनोहर झाला आहे.''
नंतर राजाराणी मुनींच्या दर्शनाला आली. राजाने समाधानाने पर्वतमुनी व नारद यांना विपुल द्रव्य व रत्ने दिली. हे माझे मुखपरिवर्तन म्हणजे मायेचेच बलमाहात्म्य होय. या मायेमुळेच देहधारी प्राण्याला सुख लाभत नाही. कारण कामक्रोधादि षड्रिपु जिंकणे अशक्य आहे. सत्त्व, रज, तम या तीन गुणांमुळेच देहप्राप्ती होते.
हे व्यासमुने, एकदा तर विष्णूबरोबर हास्यविनोद करीत असतांना मी एकाएकी स्त्री झालो. त्यावेळी मी एका राजाची भार्या झाल्यावर मला पुत्रही झाले.''
व्यास म्हणले, ''नारदाच्या या भाषणाने मी विस्मित होऊन विचारले, "पण आपणाला स्त्रीत्व कसे प्राप्त झाले ? आपण पुन: पुरुष कसे झाला ? कोणत्या राजापासून आपणाला पुत्र झाले ?" मायेचे सामर्थ्य आपण सांगत असल्याने ते कथामृत ऐकूनही माझे मन तृप्त होत नाही.''