[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
व्यास म्हणाले, ''हे राजा, माझे भाषण ऐकल्यावर नारदमुनी हसून म्हणाला, ''हे पुराणपुरुषा, तू मला काय विचारतो आहेस ? सर्व जग मायेने वेष्टित असून मोहाशिवाय या संसारात दुसरे काही नाही. लोक मला ज्ञानी समजतात, पण मीही शंकेने व्यग्र आहे. म्हणून मी तुला आता सत्य घटनाच निवेदन करतो. पूर्वी मला भार्येकरता फारच दुःख भोगावे लागले.
एकदा मी व पर्वतमुनी भूतलावर आलो. तीर्थक्षेत्रे, मुनींचे आश्रम, पवित्र स्थले वगैरे पाहात पाहात आम्ही पृथ्वीवर फिरू लागलो. स्वर्गात निघण्यापूर्वी आम्हा दोघांत पण ठरला होता. "आपल्या मनातील शुभ अथवा अशुभ विचार कथन करायचे."
अशा निश्चयाच्या शपथा घेऊन आम्ही हिंडत असता संजय नावाच्या राजाच्या सुंदर नगराजवळ आलो. तो ग्रीष्मकाल संपण्याचा सुमार होता. राजाने भक्तीने आमची पूजा केली. आम्ही त्याच्याकडे राहिलो. पावसाळ्यात मार्गाने चालणे कठीण असते म्हणून ब्राह्मणाने आठच महिने प्रवास करावा.
राजाने आपल्या दमयंती नावाच्या सुंदर कन्येला आमची सेवा करण्यास सांगितले. ती सतत उद्योगी राहून आमची सेवा करीत होती. आम्हाला सर्व वस्तु वेळच्या वेळी देत होती. आम्हीही वेदव्रततत्पर होऊन राजगृही राहिलो. तेव्हा मी वीणेच्या सुराबरोबर गायत्र नावाचा साम गात असे. माझ्या गाण्यामुळे ती कन्या मजवर प्रेम करू लागली. मला तिच्याविषयी मोह उत्पन्न झाला.
तेव्हापासून ती कन्या माझ्या व पर्वतमुनीच्या सेवेमध्ये वेगळेपणा ठेवू लागली. त्याच्या कारणाबद्दल पर्वतमुनी विचार करू लागला. तो एकदा मला म्हणाला, ''हे नारदा, राजकन्या तुझ्यावर प्रेम करीत आहे हे खरे ना ? कारण ती माझ्याशी वागताना वेगळेपणाने वागते. तुलाही तिच्याबद्दल प्रेम वाटू लागल्याचे मला दिसत आहे. कारण नेत्र, मुख यांच्या हावभावावरून तसे वाटते. तेव्हा तू खरे सांग. आपल्या शपथेचे स्मरण ठेव.''
ते ऐकून मी म्हणालो, ''आम्ही एकमेकावर प्रेम करू लागलो आहोत हे खरे."
ते ऐकताच पर्वतमुनी क्रुद्ध झाला. माझा धिक्कार करून तो म्हणाला, ''हे मित्रद्रोही नारदा, शपथ घेऊनही तू फसवलेस, म्हणून माझ्या शापामुळे वानरमुख होशील.''
त्याच क्षणी मी वानरमुखी झालो. त्यामुळे मीही क्रुद्ध होऊन म्हणालो, ''तुझे स्वर्गात गमन होणार नाही. तू मृत्यूलोकीच राहशील.''
असे आम्ही शाप दिल्यावर पर्वतमुनी खिन्न होऊन निघून गेला. मी वानरमुख झाल्याचे पाहून राजकन्या निराश झाली.
व्यास म्हणाले, ''मी नारदमुनींना म्हणालो, "आपली शापमुक्ती कशी झाली ? तसेच तुमची पुन: भेट घडली की नाही याविषयी मला विस्ताराने सांगा."
नारद म्हणाले, ''हे मुने, मायेचे चरित्र मी काय सांगू ? ते अतर्क्य आहे. पर्वतमुनी गेल्यावर ती कन्या पूर्ववत माझी सेवा करीत राहिली. पण वानर मुख झाल्यामुळे मी फार दुःखी झालो.
पुढे राजकन्येचा विवाहकाल प्राप्त झाल्यावर राजा सचिवाला म्हणला, ''हे सचिवा, माझ्या कन्येसाठी योग्य वर शोधून आण. तो शूर गुणवान कुलवान असावा.''
प्रधान म्हणाला, ''अनेक राजपुत्र गुण व कुलसंपन्न आहेत. आपणाला इष्ट वाटेल त्याला आपण कन्या द्यावी.''
तेव्हा दमयंतीने दाईकडून आपल्या मनातला भाव पित्याला कळविला. दाई राजाला म्हणाली, "महाराज, कन्या म्हणते, महाबुद्धिमान नारदाला मी वरले आहे. तेव्हा त्याच्याशी माझा विवाह होणे योग्य होय. मी नारदाशिवाय कुणालाही पती वरणार नाही. कारण मी त्याच्या नादसागरामध्ये तल्लीन झाले आहे.''