[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
माझी माता पुनः मला म्हणाली, "हे पुत्रा आता तू दुसर्या सुनेच्या ठिकाणी पुत्र उत्पन्न होईल असे कर. कारण अंध राजा राज्याधिकारी होणे शक्य नाही.''
मातेचे भाषण ऐकून मी तेथेच राहिलो. अंबालिका ऋतुस्नात झाल्यावर लज्जित होऊन एकांतात शयनगृहात मजकडे आली. परंतु माझ्यासारखा जटिल पाहून ती पांडुरवर्णी झाली. त्यामुळे मी क्रुद्ध झालो. मी म्हणालो, "मला पाहाताच तू पांडुरवर्णी झालीस म्हणून तुला पांडुरवर्णी पुत्र होईल.''
असे म्हणून मी त्या रात्री तिच्याशी समागम केला व दुसर्या दिवशी मातेचा निरोप घेऊन निघून गेलो. पुढे यथावकाश अंध धृतराष्ट्र व पांडुरवर्णी पांडू असे दोन पुत्र जन्मास आले. पण त्या पुत्रांना पाहून खिन्न झालेली माझी माता म्हणाली, "हे द्वैपायना, हे दोन्ही पुत्र राज्याला योग्य नाहीत, म्हणून तू मला प्रिय होईल असा मनोहर पुत्र उत्पन्न कर.''
असे म्हणून माझी माता अंबिकेला म्हणाली, ''हे कन्ये, तू व्यासाला आलिंगन दे व राज्यास योग्य असा पुत्र निर्माण कर."
पण लाजेने ती काहीच बोलली नाही. मातेच्या आज्ञेवरून रात्री मी शयनगृहात गेलो. पण तेथे अलंकारानी विभूषित अशी विचित्रवीर्याची दासी अंबिकेने पाठवली होती. तिने मजबरोबर शृंगाराच्या इच्छा धरून मला मंचकावर बसविले. तेव्हा मी प्रसन्न झालो व म्हणालो, "हे शुभांगी, तुला सर्वलक्षणसंपन्न, सुस्वरूप, धर्मवेत्ता, सत्यवचनी, जितेंद्रिय असा पुत्र होईल.''
पुढे तिच्यापोटी विदुर नावाचा उत्तम पुत्र उत्पन्न झाला. पण या तिन्ही परस्त्रींच्या पुत्रांमध्ये मी मायावश झालो. त्यामुळे शुकविरहाचे दुःख मी विसरलो.
रूपहीन, निराधार असलेल्या मायेने मीही व्याप्त होऊन गेलो, यावरून त्या मायेचा त्याग करण्यास समर्थ नाही हेच खरे. कारण तेव्हापासून मला वनात शांतता लागेना. मी कधी हस्तिनापुरात तर कधी सरस्वतीच्या तीरी असा राहू लागलो. एखाद्या वेळी विचार करताना मला ज्ञान होते. मी मलाच प्रश्न विचारतो, "कोण हे पुत्र ? काय हा मोह ? खरोखर माझ्या मृत्यूनंतर हे पुत्र माझे श्राद्ध करण्यासही योग्य नाहीत. व्यभिचारापासून उत्पन्न झालेले हे पुत्र कसे सुख देणार ? खरोखर जाणीव असूनही मी या मोहात पडलो आहे."
असे विचार मनात येऊन कित्येक वेळा मला पश्चात्ताप होतो.
पुढे भीष्माच्या आज्ञेने पांडूला राज्य मिळाले. कुंती व माद्री या त्याच्या दोघी भार्या होत्या. पण पुढे पांडू दैवयोगाने शापभ्रष्ट होऊन वनात राहिला. तेव्हा मी पांडूला धीर दिला. पुढे दानधर्म, वायु, इंद्र, अश्विनीकुमार यांच्यापासून पांडूला पाच क्षेत्रज पुत्र उत्पन्न झाले. युधिष्ठिर, भीमसेन, अर्जुन हे कुंतीचे पुत्र व नकुल, सहदेव हे माद्रीचे पुत्र होत.
एकदा एकांतसमयी पांडूने माद्रीला आलिंगन दिले. शापामुळे तो तत्काल मृत झाला. माद्री सती गेली. नंतर कुंतीला पाचही पुत्रांसह ऋषींनी हस्तिनापुरात आणले व सर्वांना विदुर व भीष्म यांच्या स्वाधीन केले.
पुढे त्या पुत्रांच्या संबंधाने मलाही दुःख झाले. पण भीष्म पांडुपुत्रांचे योग्य असे पालन करीत आहे. हे पाहून मी स्वस्थ झालो. धृतराष्ट्र व विदुर हेही त्यांचा नीट सांभाळ करीत होते. पण दुर्योधनादी धृतराष्ट्राचे पुत्र क्रुर अंत:करणाचे होते. ते पांडवांशी द्वेषाने वागू लागले.
पुढे द्रोणाचार्यांना गुरूचा मान दिला. कुंतीचा प्रथमपुत्र कर्ण हा दुर्योधनाचा मित्र झाला. नंतर भीम व दुर्योधन यांच्यात विरोध निर्माण झाला. विरोध वाढू नये म्हणून धृतराष्ट्राने वारणावत नगरात पांडवांना नेऊन ठेवले, पण दुर्योधनाने पुरोचनाकडून तेथे लाक्षागृहे तयार केली.
नंतर पांडव व कुंती लाक्षागृहात दग्ध झाल्याचे ऐकून मी पुनः दुःखी झालो. त्याच्यासाठी मी रानावनांत हिंडू लागलो. कृश झालेले पांडव एकचक्रानगरीमध्ये मला दिसले, तेव्हा संतुष्ट होऊन मी त्यांना स्वयंवराकरिता द्रुपदाच्या नगरीकडे पाठविले. तेथे ब्राह्मणवेषधारी अर्जुनाने पराक्रमाने द्रुपदकन्येस जिंकले. पण मातेच्या आज्ञेवरून त्या पाचही बांधवांनी द्रौपदीशी विवाह केला. मला त्यामुळे आनंद झाला. धृतराष्ट्राने पांडवाकरता खांडवनात वसतिस्थान तयार केले. नंतर कृष्णाच्या साह्याने अर्जुनाने खांडव वन अग्नीला अर्पण केले. पांडवांनी राजसूय यज्ञ केल्यामुळे मला अत्यंत आनंद झाला.
पांडवांचे वैभव वाढू लागल्याचे पाहून दुर्योधनाने द्यूत खेळण्यास धर्मराजाला आवाहन केले. कपटाने पांडवांचे सर्वस्व जिंकून कौरवांनी द्रौपदीला अत्यंत क्लेश दिले. पांडवांना द्रौपदीसह बारा वर्षे वनवास भोगावा लागला. तेव्हा मला अपार दुःख झाले.
हे नारदा, मी धर्माचा जाणकार असूनही भ्रमामुळे सुखदुःखामध्ये मग्न झालो. तेव्हा पुत्र, माता हे सर्व कोण ? सुख कोणते ? या विचाराने मला काहीही सुचेनासे झाले आहे. हे नारदा, या प्रसंगी मी काय करावे ? माझ्या मनाला समाधान लाभत नाही. हे चंचल मन स्थिर होत नाही. म्हणून हे मुनिश्रेष्ठा, आपण माझ्या संशयाचे निवारण करून मला सुखी व निश्चिंत करा.