व्यास उवाच
इति तस्य वचः श्रुत्वा मातुश्च प्रार्थनं तथा ।
निःशङ्कोऽहं तदा जातः कार्ये तस्मिञ्जुगुप्सिते ॥ ५६ ॥
अम्बिकायां प्रवृत्तोऽहमृतुमत्यां मुदा निशि ।
मयि विमनसायां तु तापसे कुत्सिते भृशम् ॥ ५७ ॥
शप्ता मया सा सुश्रोणी प्रसङ्गे प्रथमे तदा ।
अन्धस्ते भविता पुत्रो यतो नेत्रे निमीलिते ॥ ५८ ॥
द्वितीयेऽह्नि मुनिश्रेष्ठ पृष्टो मात्रा रहः पुनः ।
भविष्यति सुतः पुत्र काशिराजसुतोदरे ॥ ५९ ॥
मयोक्ता जननी तत्र व्रीडानम्रमुखेन ह ।
विनेत्रो भविता पुत्रो मातः शापान्ममैव हि ॥ ६० ॥
तया निर्भर्त्सितस्तत्र कठोरवचसा मुने ।
कथं पुत्र त्वया शप्ता पुत्रस्तेऽन्धो भविष्यति ॥ ६१ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां षष्ठस्कन्धे
अम्बिकायां नियोगात्पुत्रोत्पादनाय गर्भधारणवर्णनं नाम चतुर्विंशोऽध्यायः ॥ २४ ॥
विक्षेपशक्तीचे कारण -
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
जनमेजय म्हणाला, ''हे भगवान, पण तो सर्वांचा नियंता भगवान हरी अश्व कसा झाला ? तो स्वतंत्र असतांना परतंत्र का झाला ?. हे आपण मला निवेदन करा."
व्यास म्हणाले, ''हे राजा, नारदापासून ऐकलेले हे आख्यान मी तुला निवेदन करतो. एकदा नारदमुनी आपले सुस्वर वीणावाद्य वाजवीत माझ्या आश्रमात आले. ते शम्याप्रास नावाचे सरस्वतीचे पवित्र स्थान आहे.
मी नारदाला आसन दिले आणि त्यांच्याजवळ बसलो. मी नारदमुनींना तोच प्रश्न केला. मी म्हणालो, "हे मुनिश्रेष्ठा, या असार संसारात प्राण्यांना सुख आहे कोठे ? कोणत्याही योनीत सुख नाही. आता माझेच पाहा ना ! द्वीपात जन्म होताच माझ्या मातेने माझा त्याग केला. आश्रय नसताही मी देव बलावर वाढलो. नंतर मी उग्र तप केले. पुत्रप्राप्तीसाठी शंकराची तपश्चर्या केली. पुढे मला शुक नावाचा ज्ञानसंपन्न पुत्र झाला. मी त्याला सर्व वेदांचे सार शिकविले. तो नंतर या लोकातून त्या लोकात हिंडू लागला. त्याच्या विरहाने मी दुःखी झालो. तरी शेवटी तो मला सोडून निघून गेला. नंतर मी कुरुजांगल देशात जाऊन मातेचे स्मरण केले. नंतर शंतनुराजाने तिचा स्वीकार केल्याचे ऐकून मी सरस्वतीच्या तीरावर आश्रम बांधून तेथेच राहू लागलो.
शंतनूच्या पश्चात भीष्माने तिचे पुत्रासह रक्षण केले. चित्रांगदाला भीष्माने राज्यावर बसविले. पुढे राजा मृत झाला. सत्यवती दुःखी झाली. तेव्हा मी व भीष्माने तिला धीर दिला. नंतर भीष्माने विचित्रवीर्याला राज्याभिषेक केला. नंतर काशीराजाच्या दोन कन्यांना भीष्माने जिंकून आणले व विचित्रवीर्याचा त्यांच्याशी विवाह केला. पण तो निपुत्रिक अवस्थेत मरण पावला. तेव्हा काशीराजाच्या कन्या पतिवियोगामुळे अतीव दुःखी होऊन सासूला म्हणाल्या, "सासूबाई, आम्ही पतीबरोबर सहगमन करून स्वर्गाला जातो."
पण माझ्या मातेने आपल्या सुनांना त्यापासून परावृत्त केले. नंतर राजाचे और्ध्वदेहिक केले. पुढे मातेने माझे स्मरण केल्यामुळे मी तेथे गेलो. तेव्हा पुत्रशोकाने विव्हल झालेल्या मातेला मी म्हणालो, ''हे माते, तू माझे का स्मरण केलेस ? मी तुझे कोणते कार्य करू ?''
माता म्हणाली, ''हे पुत्रा, वंशच्छेद होऊ नये म्हणून मी तुला आवाहन केले आहे. तू ह्या वंशाचा उद्धार कर. या यौवनसंपन्न माझ्या सुनांशी तू समागम करून त्यांचे ठिकाणी पुत्र उत्पन्न कर. त्यामुळे तुला दोष लागणार नाही."
मातेच्या भाषणाने मी चिंताक्रांत झालो व लज्जित होऊन नम्रपणाने म्हणालो, ''परदारासेवन हे महापातक आहे. मी धर्मज्ञानी असून असा व्यभिचार कसा करू ? अन्यायाने कुलरक्षण करणे योग्य नाही."
तेव्हा माता शोकव्याप्त होऊन म्हणाली, ''हे पराशरपुत्रा, वंशरक्षण व्हावे अशी माझी इच्छा आहे. माझ्या आज्ञेमुळे तुला दोष लागणार नाही. गुरुजनांचे वचन हा शिष्टाचार प्रमाण मानून तू हे कार्य कर. म्हणजे शोकाने संतप्त झालेल्या तुझ्या मातेला सुख होईल.''
त्यावेळी गंगानंदन भीष्म धर्मनिर्णय जाणून मला म्हणाला, ''हे निष्पापा, मातेच्या आज्ञेमुळे तुला दोष लागणार नाही.''
हे त्यांचे भाषण ऐकून मी ऋतुस्नात झालेल्या अंबिकेशी रत झालो. पण तपस्व्यांबद्दल उदासीन असलेल्या तिला पाहून मी म्हणालो, "तू यावेळी डोळे मिटलेस म्हणून तुला अंध पुत्र होईल.''
तेव्हा दुसर्या दिवशी मातेने विचारले, ''हे पुत्रा, काशिराजाच्या कन्येच्या ठिकाणी पुत्र होईल ना.''
मी लज्जित होऊन म्हणालो, "माझ्या शापामुळे तिला अंधपुत्र होईल."
ते ऐकताच अत्यंत कठोर शब्दांनी मातेने माझी निर्भर्त्सना केली.