[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
त्या सुंदरीचे भाषण ऐकून राजा म्हणाला, ''हे सुंदरी, मीच तो आहे. तुझ्या बोलण्यामुळे मला आता विरहाचे दुःख होत आहे. मदनबाणांमुळे माझे मन विव्हल झाले आहे. एकावलीचे गुणवर्णन ऐकून माझे चित्त वेधून गेले आहे. "हैहय पतीशिवाय मी इतरांना वरणार नाही." हा राजकन्येचा निश्चय ऐकून मी तिचा दास झालो आहे. तेव्हा आता मी काय करू तेवढे मला सांग.
हे सुलोचने, त्या राक्षसाच्या नगरीचा मार्ग मला सत्वर सांग म्हणजे त्या क्रूर राक्षसाचा वध करून मी एकावलीची सुटका करीन व तिला लवकर शोकमुक्त करीन.''
राजाचे हे भाषण ऐकून यशोवती आनंदित झाली. ती राजाला म्हणाली, ''हे राजेंद्रा, मी तुला भगवतीचा सिद्धिदायक मंत्र देते. त्यायोगे तुला राक्षसाचे नगर मी दाखवू शकेन म्हणून तू आता मजबरोबर तिकडे चल. तो राक्षस बलाढय आहे. म्हणून तू खूप मोठे सैन्य बरोबर घे आणि माझ्या सखीला सोडव."
असे म्हणून दत्तात्रेयापासून प्राप्त झालेला योगेश्वरी महामंत्र तिने राजाला दिला. त्यामुळे हैहय सर्वज्ञ झाला. तो सत्वर त्या नगराकडे जाण्यास निघाला. भुजंगांनी रक्षण केलेल्या प्रतिपाताळ नगरीत तो येऊन पोहोचला. त्या राजाला पाहून कालकेतूचे दूत भयग्रस्त झाले व राजाकडे गेले. त्यावेळी राजा कामविव्हल होऊन एकावलीची प्रार्थना करीत होता. त्याचवेळी दूत येऊन म्हणाले, "हे राजा, एकावलीची सखी यशोवती एका राजपुत्राला घेऊन सैन्यासह येत आहे. तो राजपुत्र इंद्रपुत्र जयंत किंवा शिवपुत्र कार्तिकेय यांच्याप्रमाणे भासत आहे. तेव्हा या देवतुल्य राजपुत्राशी युद्ध कर अथवा राजकन्येला सोडून दे.''
दूतांचे भाषण ऐकून कालकेतू क्रुद्ध झाला, त्याने आयुधांसह सुसज्ज असलेले प्रचंड सैन्य पाठविले. नंतर तो कालकेतू एकावलीला म्हणाला, ''हे सुंदरी, तुझ्यासाठी कोठला राजपुत्र सैन्यासह येत आहे ? तो तुझा पिता आहे की दुसरा कोणी आहे ? हे सत्वर सांग.
तो जर तुझा पिता असेल तर त्याच्याशी युद्ध न करता मी त्याला सन्मानाने येथे आणीन. आदरपूर्वक विविध रत्ने व भूषणे यांनी त्याची पूजा करीन. पण जर दुसरा कुणी असेल तर संग्रामात मी त्याचा वध करीन. हे विशालनयने, मी सर्वांना अजिंक्य आहे.''
एकावली म्हणाली, ''हे राजा, मला तर काहीही माहीत नाही. पण हा माझा पिता अथवा भ्राता नसून कोणीतरी दुसराच आहे. तो का आला आहे हेही मला समजत नाही."
राजा म्हणाला, ''ती यशोवती त्या वीराला घेऊन येत आहे. ती मोठी उद्योगी आहे. तिने ही घटना घडवून आणली. कारण माझ्याशी युद्ध करील असा मला कोणीही शत्रू नाही.''
त्याचवेळी पुन: दूत तेथे येऊन राजाला म्हणाले, ''अहो महाराज, सैन्य अगदी जवळ आले तरी आपण स्वस्थ का बसलात ?''
ते ऐकताच कालकेतू रथारूढ होऊन नगराबाहेर पडला. त्याचवेळी एकवीरही अश्वारूढ होऊन तेथे प्राप्त झाला. इंद्र व वृत्रासूर यांच्या युद्धाप्रमाणे त्यांचे प्रचंड युद्ध झाले. युद्धामुळे आकाश व्याप्त झाले. त्या लक्ष्मीपुत्राने कालकेतूवर गदेचा प्रहार केला. त्याबरोबर तो प्रचंड राक्षस एखाद्या पर्वताप्रमाणे कोसळला व मृत झाला. इतर राक्षससैन्य भयाने पळून गेले.
नंतर यशोवती आवेगाने एकावलीकडे गेली व तिला म्हणाली, ''हे सखे, राजपुत्र एकवीराने भयंकर युद्ध करून त्या दुष्टाचा वध केला. श्रमाने व्याकुळ झाल्यामुळे विजयी राजा सीमेवरच थांबला होता. तुझ्या दर्शनाची इच्छा करीत आहे. म्हणून तू त्या मदनतुल्य राजाला दर्शन दे. मी त्याला गंगेच्या तीरावर सर्व वृत्तांत कथन केला आहे, तेव्हा तोही विरहामुळे व्याकुळ झाला आहे.''
यशोवतीचे हे भाषण ऐकताच एकावली लज्जित झाली आणि राजपुत्राकडे जाण्यास निघाली. पालखीत बसून ती सीमेवर आली. त्यावेळी तिचे वस्त्र व मुख मलीन झाले होते. नंतर अधोमुख होऊन त्या कन्येने राजपुत्राला दर्शन दिले. त्याचवेळी यशोवती म्हणाली, ''हे राजपुत्रा, ही कन्या तुझ्या आधीन असून हिचा पिताही ही कन्या तुलाच अर्पण करण्याची इच्छा करीत आहे. म्हणून तू हिला पित्याकडे पोहोचव म्हणजे तो विधीपूर्वक तुमचा विवाह करील.''
ते ऐकून राजपुत्राने दोघींनाही त्यांच्या नगराकडे पोहोचवले. राजालाही कन्या परत आल्यामुळे आनंद झाला, यशोवतीने सर्व वृत्तांत राजाला निवेदन केला. राजाने एकवीराचा सत्कार केला आणि विपुल नजराणे देऊन दोघांचाही यथाविधी विवाह केला.
तो लक्ष्मीपुत्र तिचा स्वीकार करून आपल्या नगराकडे परत गेला. तेथे त्याने अनेक प्रकारे विषयोपभोग घेतले. पुढे त्यांना कृतवीर्य नावाचा पुत्र झाला. तो पुढे फार प्रसिद्धी पावला.