[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
एके दिवशी सकाळी उठून ती सुंदरी सखींसह वनात निघाली. राजसेवक तिचे रक्षण करीत चालले होते. मीही त्यावेळी तिच्याबरोबर गेले होते. आम्ही दोघीही आनंदाने क्रीडा करीत होतो. त्याचवेळी कालकेतू नावाचा बलाढय दानव त्याठिकाणी आयुधांसह आणि अनेक राक्षसांसह प्राप्त झाला. त्याने क्रीडामग्न अशा एकावलीला पाहिले. तेव्हा मी एकावलीला म्हणाले, ''हा सांप्रत कोणीतरी राक्षस उपस्थित झाला आहे. म्हणून आपण आपल्या रक्षकांच्यामध्ये जाऊ.''
आम्ही भीतीने आमच्या रक्षकांकडे गेलो. पण कन्येला पाहून कालकेतु व्याकुल झाला. प्रचंड गदा घेऊन तो तेथे आला. त्याने आक्रोश करणार्या त्या राजकन्येला पकडले. तेव्हा मी पुढे होऊन म्हणाले, "हे दानवा, मला धर व हिला सोड.'' पण तो दानव तिला घेऊन गेला.
आमच्या रक्षकांचे व त्याचे तुमुल युद्ध झाले. अखेर आमच्या रक्षकांचा वध करून त्या कालकेतूने राजकन्येला पळविले. तेव्हा मीही माझ्या सखीच्या पाठोपाठ धावू लागले. मला येत असलेली पाहून तिला धीर आला व ती वारंवार आक्रोश करून मला हाक मारू लागली. शेवटी मी तिच्या जवळ गेले तेव्हा माझ्या गळ्यात मिठी घालून ती रडू लागली. त्यावेळी कालकेतू मला म्हणाला, ''ह्या तुझ्या सुंदर सखीला तू धीराच्या गोष्टी सांग. तसेच तिला सांग, आज आपण सुंदर नगरात जाणार आहोत. तुझ्यावर मोहित झाल्याने मी तुझा दास झालो आहे.''
असे म्हणून त्याने आम्हाला रथात बसविले व तो वेगाने स्वस्थानाकडे गेला. तेथे मला व एकावलीला एका शुभ्र गृहामध्ये ठेवून त्याने आमच्या भोवती कोटयावधी राक्षसांचा पहारा बसविला. नंतर दुसर्या दिवशी तो दानव मला एकांतात म्हणाला, "तू तुझ्या सखीला सांग की, हे सुंदरी, तू माझी पत्नी होऊन यथेष्ट सुख भोग. हे सर्व राज्य तुझेच असून मी तर तुझा दास आहे.''
तेव्हा मी म्हणाले, ''हे प्रभो, हे शब्द उच्चारण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही.''
हे ऐकून तो दुःखी झाला व माझ्या सखीला म्हणाला, ''हे कृशोदरी, तूच माझ्यावर कामाची मोहिनी टाकली आहेस. मी तुझ्या आधीन झालो असल्याने तू माझा स्वीकार कर. कारण तुझे यौवन व्यर्थ जात आहे. म्हणून पती या नात्याने तू माझा स्वीकार कर.''
एकावली म्हणाली, ''हैहय नावाच्या राजपुत्राला मी मनाने वरले आहे. माझ्या पित्यानेही तसेच ठरविले आहे. तेव्हा मी दुसरा पती वरणार नाही. माझा पिता मला ज्याला अर्पण करील तोच माझा पती.''
असे एकावलीने सांगितले असतानाही कामविव्हल झालेला पापी काही एक ऐकेना. त्याचे नगर पाताळात असून सांप्रत माझी सखी तेथेच आहे. मी मात्र दुःखव्याकुल होऊन संचार करीत आहे.''
तिचे बोलणे ऐकून एकवीर म्हणाला, ''तू त्या नगरातून कशी आलीस ? तिच्या पित्याने तिला हैहयालाच अर्पण करण्याचे कसे ठरविले ? मीच तो हैहय नावाचा राजा असून तुझी सखी जर माझ्याचसाठी ठरलेली असेल तर त्या राक्षसाचा वध करून मी तिला घेऊन येईन. मला तू ते स्थळ दाखव. तिच्या पित्याने तिला सोडवून आणण्याचा प्रयत्न का केला नाही ? तेव्हा तू मला विस्तारपूर्वक सर्व वृत्तांत सांग.''
यशोवती म्हणाली, "मला बालपणीच बीज वा ध्यान असा भगवतीचा मंत्र प्राप्त झाला आहे. तेव्हा त्या सर्वश्रेष्ठ आदिशक्तीचे मी चिंतन केले व तिच्या मंत्राचा जप केला, तेव्हा ती देवी माझ्या स्वप्नात येऊन म्हणाली, "हे कन्ये, तू सत्वर संगातीरावर जा. तेथेच तो नृपश्रेष्ठ हैहय येईल. त्या महाबलाढय एकवीराला दत्तात्रेय मुनींनी महाविद्या नावाचा माझा मंत्र दिला आहे. तो माझी उपासना करतो. तो राजा नित्य माझे चिंतन करतो. तोच या राक्षसाचा वध करून तुझे दुःख नष्ट करील. तो एकवीर सर्वशास्त्रनिपुण असल्यामुळे तो राजकन्येची सुटका करील. तोच पती तिला योग्य आहे."
नंतर मी जागृत झाले. एकावलीला सर्व वृत्तांत सांगताच ती प्रसन्न झाली. ती म्हणाली, "हे प्रिये, ती भगवती सत्यवचनी आहे."
हे राजा, त्यामुळे मी सांप्रत या स्थानी येऊन बसले आहे. महादेवीच्या प्रसादाने मला मार्गाचे ज्ञान झाले. हे राजा, माझ्या दुःखाचे कारण मी कथन केले. आता मला त्या राजपुत्राविषयी सांग.