[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
पुत्राचे जातकर्म केल्यावर राजा सुखाने त्या पुत्रासह राहू लागला. त्याला तिन्हीही ऋणातून मुक्तता झाल्याचा आनंद झाला होता. सहाव्या महिन्यात पुत्राचा अन्नप्राशन संस्कार, तिसर्या वर्षी चूडाकरण संस्कार राजाने यथासांग केले. त्यावेळी राजाने विपुल दानधर्म केला. अकराव्या वर्षी त्याचा उपनयन संस्कार करण्यात आला. राजाने त्या पुत्राला धनुर्वेदाचे शिक्षण दिले.
त्यानंतर त्याला राज्याभिषेक करण्याचे राजाने ठरविले. पुष्य नक्षत्र व रविवार असा मुहूर्त पाहून राजाने राज्याभिषेकाची तयारी केली. वेदशास्त्र ब्राह्मणांकरवी राजाने त्या पुत्राला राज्याभिषेक केला. उत्तम तीर्थाचे उदक त्यासाठी राजाने आणविले होते. नंतर राजाने ब्राह्मणांना विपुल दक्षिणा दिल्या. पुत्राच्या हाती सर्व राज्यकारभार सोपवून राजा भार्येसह स्वर्गप्राप्तीसाठी वनात गेला.
राजा वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार करून मैनाक पर्वतावर गेला. कंदमुळांवर उपजीविका करून त्याने पार्वतीची आराधना करण्यास प्रारंभ केला. शेवटी मृत्यूनंतर स्वत:च्या पुण्याईने राजा भार्येसह इंद्रलोकी गेला.
राजा इंद्रलोकी गेल्याचे कळताच एकवीराने त्याचा और्ध्वदेहिक संस्कार केला. धार्मिकतेने राज्य करीत असताना विविध विषयांचा उपभोग घेतला. एकदा तो आपल्या मंत्र्यासह मृगयेसाठी जान्हवीच्या तीरावर गेला. त्या रम्य वनात होम वगैरे होत असलेले आश्रम राजाला दिसले. तसेच भाताच्या पिकाचे रक्षण करणार्या गोपाल स्त्रिया तेथे होत्या. ते विविध कमले उमललेले सुंदर उपवन पाहून त्याला आनंद झाला.
तेथे एके ठिकाणी गंगेच्या प्रवाहात शेकडो पाकळ्यांनी युक्त असे फुललेले कमल त्याला दिसले. त्या कमलाजवळ एक सुंदर कमलाक्षी स्त्री होती. सुवर्णाप्रमाणे कांती असलेली, सुंदर केसांची, शंखाप्रमाणे कंठ असलेली, कृशोदरी, उन्नत स्तनांची, सुंदर नासिकेची अशी ती सुंदरी दुःखाने विव्हल होऊन रडत होती. ते पाहून राजा तिच्याजवळ गेला व म्हणाला, "हे सुंदरी, तू कोण आहेस ? तू का दुःख करीत आहेस ? तुला येथे कोणी आणून टाकले ? हे सुभ्रू, हे तन्वंगी, माझ्या राज्यात दुसर्याला पीडा देणारे कोण आहे ? चोर, राक्षस यांपासूनही कुणाला भय नाही. तसेच उग्र श्वापदापासून भीती नाही. असे असताना तू का बरे दुःख करीत आहेस ? दुसर्यांचे दुःख हरण करण्याचे व्रत मी घेतले आहे. म्हणून तू तुझे दुःख सोड. मी तुझी इच्छा पूर्ण करीन.''
राजाचे बोलणे ऐकून ती सुंदरी म्हणाली, "हे नृपश्रेष्ठा, दुःखाशिवाय कोण रडत बसेल ? दुसर्या एका राज्यात रम्य नावाचा एक धार्मिक राजा आहे. त्याला रुक्मिरेखा नावाची सुस्वरूप सर्वलक्षणसंपन्न भार्या आहे. पण पुत्रसंतान नसल्याने ते दांपत्य अत्यंत दुःखी आहे. त्यामुळे राणी राजाला वारंवार म्हणते, "हे नाथ, वांझ व निपुत्रिक अवस्थेत जगून माझा काय उपयोग ?''
राणीचे हे भाषण ऐकून राजाने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला. त्याने विपुल दक्षिणांनी ब्राह्मणांना संतुष्ट केले. तेव्हा अज्य होमाचेवेळी अग्नीपासून एक सुलक्षणा कन्या उत्पन्न झाली. ती सुवर्णकांतीने युक्त होती, तिचे ओठ तोंडल्याप्रमाणे होते, तिच्या भिवया मनोहर होत्या. हाताचे तळवे आरक्त होते. शरीर मृदू होते. सुंदर नेत्रांची अशी मनोहर कन्या होती.
होत्याने अग्नीपासून तिचा स्वीकार केला व तो राजाला म्हणाला, ''हे राजा, सर्वलक्षणसंपन्न असलेल्या कन्येचा तू स्वीकार कर. ही एकावलीप्रमाणे अग्नीचे हवन चालू असता उत्पन्न झाली म्हणून ही एकावली या नावाने विख्यात होईल.
हे भूपाला, हिला स्वतःच्या कन्येप्रमाणे सांभाळून तू संतुष्ट हो. प्रत्यक्ष विष्णूनेच ही कन्या तुला दिली आहे असे समज."
होत्याचे ते बोलणे ऐकताच राजा संतुष्ट झाला. त्याने कन्येचा स्वीकार केला. राजा आपल्या पत्नीला म्हणाला, ''हे प्रिये, या कन्येचा स्वीकार कर.''
ती कमलनेत्र कन्या प्राप्त झाल्यावर राणीलाही फार आनंद झाला. जातकर्मादि विधी करून राजाने नामकरण केले. ब्राह्मणांना विपुल दक्षणा दिल्या. त्या कन्येचा जन्मदिवस राजा दरवर्षी उत्साहाने साजरा करीत असे. ती सुलक्षणी कन्या सर्वांना अत्यंत प्रिय झाली.
हे राजा, मी त्या राजाच्या मंत्र्याची कन्या असून माझे नाव यशोवती आहे. मी त्या राजकन्येची प्रिय मैत्रिण आहे. सुगंधी कमले जेव्हा तिच्या दृष्टीस पडतात तेव्हा ती तल्लीन होते. तिला इतर कोठेही सुख लाभत नाही. त्या जान्हवी तीरावर फुले विपुल आहेत. तेव्हा ती बाला मला व इतर सख्यांना घेऊन जाऊ लागली.
त्यावेळी मी त्या राजाला सांगितले, ''हे राजा, आपली कन्या सुंदर कमलांसाठी दूर निर्जन सरोवराकडे जात असते.''
त्यानंतर राजाने आपल्या मंदिरातच एक सुंदर उपवन तयार केले. त्यात सुंदर कमले लावली. पण कमलांवर फारच प्रेम असल्याने ती नित्य बाहेर जाऊ लागली. तेव्हा हे अवलोकन केल्यावर राजाने हत्यारबंद शिपायांना तिच्याबरोबर जाण्यास सांगतिले.
अशारीतीने तिच्या रक्षणासाठी राजाने योग्य सिद्धता करून ठेवली. तेव्हा ती राजकन्या रोज त्या जान्हवी तीरावर जाऊ लागली.