[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
जनमेजय म्हणाला, ''हे भगवान, त्या निर्जन वनात वाघ - सिंहादि हिंस्र पशूंपासून त्या बालकाचे रक्षण कुणी केले ? त्याचे पुढे काय झाले ?''
व्यास म्हणाले, ''हे राजा, लक्ष्मीनारायण तेधून निघून गेल्यावर चंपक नावाचा विद्याधर तेथे आला. तो आपल्या मदनालसा नावाच्या स्त्रीसह तेथे क्रीडा करीत होता. त्याने तो अनुपम देवपुत्र अवलोकन केला. त्याने विमानातून खाली उतरून त्या भूमीवर पडलेल्या पुत्राला हातात घेतले. त्याला फार आनंद झाला होता.
चंपकने तो बालक आपल्या पत्नीला दिला. तिनेही विस्मित होऊन त्याचा स्वीकार केला. त्या बालकाला पोटाशी धरून तिने त्याची चुंबने घेतली. तो आपलाच पुत्र आहे असा विचार करून ते दोघेही विमानात आरूढ झाले. तेव्हा मदनालसा म्हणाली, ''हे कांत, या बालकाला येथे कोणी टाकले ? मला वाटते, त्या भगवान शंकरानेच हा बालक आपल्याला दिला आहे.''
चंपक म्हणाला, ''मी इंद्रालाच जाऊन विचारतो की हा बालक देव, दानव, गंधर्व यांपैकी कोण आहे ? त्यानंतर मी त्याच्या अनुज्ञेने याला पुत्रवत सांभाळीन.''
असे म्हणून चंपक त्या बालकासह इंद्राकडे गेला व हात जोडून त्याला म्हणाला, "हे देवाधिपते, कालिंदी व तमसा याच्या संगमाच्या पवित्र ठिकाणी हा बालक मला सापडला आहे, पण त्याच्याबद्दल मला अधिक काही समजले नाही. आपली अनुज्ञा असल्यास मी याला धर्मशास्त्रानुसार आपला पुत्र करीन."
इंद्र म्हणाला, ''हे चंपका, हा पुत्र अश्वरूप धारण करणार्या वासुदेवाचा आहे. ययातीच्या तुर्वसू नावाच्या पुत्राला अर्पण करण्याकरता हा पुत्र उत्पन्न केला आहे. हरीची आजच त्याला तशी प्रेरणा होईल. म्हणून तू या बालकाला सत्वर घेऊन जा. तेथे या बालकाला सोडून दे. कारण तेथे बालक नाही असे दिसताच त्याला दुःख होईल. हा बालक एकवीर या नावाने विख्यात होईल.''
हे ऐकताच चंपकने त्या बालकाला सत्वर येथे नेऊन सोडले व तो स्वस्थानी निघून गेला. इकडे लक्ष्मीसह विष्णू राजाकडे गेले. राजाने विष्णूला साष्टांग नमस्कार घातला. विष्णूने राजाला अभय दिले. त्याने वासुदेवाचे स्तवन केले. राजा तुर्वसू म्हणाला, "हे देवाधिदेवा, हे कृपानिधे, आज आपले दुर्लभ दर्शन मला लाभले, पण हे देवा, मी अपेक्षा करणारा असल्याने आपल्या दर्शनास योग्य नाही."
विष्णू प्रसन्न होऊन म्हणाले, ''हे राजा, तू वर माग. तुझी इच्छा मी पूर्ण करीन."
हे ऐकून राजा विष्णूला म्हणाला, ''हे मुरारे, पुत्रासाठी मी तप केले. म्हणून मला पुत्राची अपेक्षा आहे.''
विष्णू म्हणाले, ''हे ययातीपुत्रा, कालिंदी व तमसेच्या संगमावर मी तुझ्यासाठी एका पुत्राला सोडले आहे. माझ्यापासून तो लक्ष्मीला प्राप्त झाला. म्हणून तू त्या तेजस्वी पुत्राचा स्वीकार कर."
असे सांगून ते वैकुंठाला निघून गेले. इकडे तुर्वसू हरीच्या सांगण्यावरून रथारूढ होऊन त्या ठिकाणी गेला. तेथे भूमीवर खेळत असलेल्या बालकाला पाहून राजाला आनंद झाला. तो बालक एक अंगठा तोंडात धरून आनंदाने क्रीडा करीत होता. हरिवर्म्याला अतिशयच आनंद झाला.
राजाने आवेगाने त्याला हृदयाशी धरून त्याचे मस्तक हुंगले, आनंदाश्रूंनी त्याचा कंठ भरून आला. राजा म्हणाला, ''हे पुत्रा, तुझा लाभ झाल्यामुळे माझे पुनामक नरकापासूनचे भय आता नाहीसे झाले. तुझी माता भगवती लक्ष्मी तुला येथे सोडून गेली. श्रीधराने माझ्यासाठीच तुला उत्पन्न केले आहे."
असे म्हणून राजा त्या पुत्राला घेऊन स्वगृही निघून गेला. राजा नगराजवळ आल्यावर राजाचे मंत्री, पुरोहित, सेवक लोक नजराणे घेऊन राजाला सामोरे आले. नागरिकांनी राजाचा सत्कार केला. राजावर पुष्पे, लाह्या यांची वृष्टी केली. नंतर राजाने आनंदाने त्या पुत्राला घेऊन राजवाडयात प्रवेश केला. आपल्या स्वरूपसुंदर राणीला तो पुत्र त्याने अर्पण केला. तेव्हा राणी म्हणाली, ''महाराज, हा स्वरूपसुंदर पुत्र आपणाला कोठे मिळाला ? खरोखर या पुत्राने माझे मन हरण केले आहे.''
राजा म्हणाला, ''हे प्रिये, हा पुत्र जनार्दनाचा अंश असून त्यानेच हा मला दिला आहे. हा लक्ष्मीचे ठिकाणी उत्पन्न झाला आहे."
राणीने त्या पुत्राचा स्वीकार केला. राजाने मोठा उत्सव केला व विधीपूर्वक त्याचे नाव एकवीर ठेवले. रूपाने व गुणाने हा पुत्र श्रेष्ठ होता. राणीनेही अत्यंत मनापासून त्या पुत्राचा सांभाळ केला.