[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
शंकर कैलासावर निघून गेल्यावर त्यांनी चित्ररूप नावाच्या गणाला वैकुंठाला पाठवले. ते म्हणाले, ''हे चित्ररूपा, तू हरीला लक्ष्मीच्या दुःखाविषयी निवेदन कर. माझा निरोप हरीला सांग.''
चित्ररूप सत्वर वैकुंठाला गेला. तो तेथे हरीच्या दारावर असलेल्या जयविजयांना म्हणाला, "मला शिवांनी काही निरोप देऊन पाठवले आहे असे हरीला जाऊन सांग."
तेव्हा जय हरीकडे गेला. त्याने शिवाकडून दूत आल्याचे हरीला सांगितले. तेव्हा त्याचे कारण अंतर्यामी जाणून हरी म्हणाला, "त्या रुद्रसेवकाला घेऊन ये.''
चित्ररूप आत गेल्यावर विष्णूला प्रणिपात करून त्याच्यासमोर उभा राहिला. तेव्हा हरी हसतच चित्ररूपाला म्हणाले, ''हे निष्पाप, देवाधिदेव शंकर पत्नीसह सुखी आहेत ना ? त्यांनी तुला येथे का पाठवले ? शंकराचे काय काम आहे ते निवेदन कर."
दूत म्हणाला, ''हे गरुडध्वजा, आपणाला अनाकलनीय असे काय आहे ? मी काय आपणाला सांगायला हवे ? तरीही प्रभूच्या आज्ञेने मी आपणाला त्यांचा निरोप निवेदन करतो.
हे प्रभो, देव मानव, यक्ष, किन्नर यांनी तिचे ध्यान करावे, जिच्याशिवाय भूतलावर पुरुष सुखी होणार नाही अशी ती तुझी पत्नी कालिंदीच्या तीरावर तप करीत आहे. ज्याच्या भार्येला दुःख प्राप्त होते त्याच्या जीविताचा धिक्कार असो. त्याचे शत्रूही त्याची निंदा करतात. म्हणून आपण प्रियेचा स्वीकार करून उभयतांनी सुखी रहावे. हे विष्णो, मला देखील स्त्रीविरहजन्य दुःखाचे स्मरण होत आहे.
हे कमलनयना, दक्षयज्ञात माझी भार्या मृत झाल्यावर मी अत्यंत दुःखी झालो. दुष्कर तप केल्यावर ती पर्वतकन्या होऊन मला प्राप्त झाली. हे देवा, आपण लक्ष्मीचा त्याग करून हजार संवत्सर उलटले आहेत. म्हणून तू तिचा स्वीकार कर. अश्वरूपाने तू लक्ष्मीशी संयोग कर आणि तिला पुत्रप्राप्ती झाल्यावर तिच्यासह वैकुंठाला ये.''
शिवाचा निरोप ऐकल्यावर श्रीहरीने दूताला परत पाठवले. सुंदर अश्वाचे रूप घेऊन ते कालिंदी व तमसा यांच्या संगमाकडे गेले. तेथे तपश्चर्या करणार्या आपल्या अश्वरूप पत्नीला त्यांनी पाहिले. तिने त्याला अवलोकन केले व हा विष्णुच आहे असे जाणले. तेव्हा त्या ठिकाणी दोघांचाही समागम झाला. त्यामुळे ती हरिप्रिय घोडी गर्भिणी झाली. पुढे तिच्या पोटी सुंदर बालकाचा जन्म झाला. तेव्हा भगवान हसतमुखाने तिला म्हणाले, ''हे सुलोचने, आता तू पूर्वदेह धारण कर. या बालकाला तेथेच ठेवून आता आपण वैकुंठाला जाऊ.''
लक्ष्मी म्हणाली, ''हे नाथ, ह्या बालकाला येथे अनाथासारखे सोडून मी कशी जाऊ ? या एकाकी अरण्यात याची अवस्था कशी होईल ? मातेला आपल्या पुत्राचा त्याग कसा करता येईल ?''
असे त्यांचे बोलणे चालू असतानाच दोघेही दिव्यदेहधारी होऊन स्वर्गातून आलेल्या विमानात आरूढ झाले. तेव्हा लक्ष्मी म्हणाली, "हे नाथ, या पुत्राचा स्वीकार करा. हा पुत्र आपल्याप्रमाणेच तेजस्वी असून मला प्राणप्रिय आहे. याला घेऊन आपण स्वर्गात जाऊ.''
हरी म्हणाले, ''हे प्रिये, तू निश्चिंत राहा. या पुत्राला येथे सुखप्राप्ती होईल. तसेच त्याच्या योगाने येथे मला देवकार्य करायचे आहे. ते तुला सांगतो.
ययातीचा पुत्र तुर्वसू हा हरिवर्मा या नावाने प्रसिद्ध आहे. तो पुत्रप्राप्तीसाठी एका पुण्यतीर्थावर तप करीत आहे. त्याच्या तपाची शंभर वर्ष उलटली आहेत. तेव्हा त्याच्यासाठी हा पुत्र मी निर्माण केला आहे. वैकुंठास गेल्यावर मी त्या राजाला प्रेरणा करीन. नंतर या बालकाचा राजा पुत्राप्रमाणे सांभाळ करील.''
असे सांगून बालकाच्या रक्षणाची सिद्धता करून आपल्या प्रियेसह ते वैकुंठास निघून गेले.