[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
जनमेजय म्हणाला, ''हे मुने, लक्ष्मी घोडी कशी झाली ? ती पतिविना कोठे राहात होती ? ती त्या हरीशिवाय किती दिवस राहिली ? तिने पुढे काय केले ? ती पुनः वासुदेवाकडे केव्हा गेली ? तिला पुत्रलाभ केव्हा झाला ? हे आपण मला सांगा.''
व्यास म्हणाले, ''विष्णूने आपल्या पत्नीला शाप दिल्यामुळे तो रेवंत भयभीत झाला. त्याने लांबूनच त्या हरीला प्रणाम केला. तो सत्वर निघून गेला. त्याने आपल्या पित्यास सर्व वृत्तांत निवेदन केला.
लक्ष्मीने विष्णूला वंदन केले व ती सत्वर मृत्युलोकी गेली. जेथे सूर्यपत्नीने तप केले होते तेथे ती घोडीच्या रूपाने राहू लागली. तेथे राहून तिने भगवान शंकराचे ध्यान केले. पंचमुख, दहा हात, अर्धा देह गौरीचा कर्पुरतुल्य वर्ण, नीलकंठ, त्रिनेत्र अशा महादेवाचे तिने चिंतन केले. घोडीच्या रूपाने राहून लक्ष्मीने दारुण तप केले.
हजार वर्षांनी महादेव प्रसन्न झाला व पार्वतीसह तेथे येऊन लक्ष्मीला म्हणाला, "हे कल्याणी, तू कशासाठी तप करीत आहेस ? तुझा पती जगात श्रेष्ठ असून सर्वज्ञ आहे. तेव्हा त्या मुक्तिदायक श्रीहरीला सोडून तू माझे का ध्यान करीत आहेस ? पती हेच स्त्रियांचे दैवत आहे. पतिसेवा हाच स्त्रियांचा धर्म आहे. भगवान नारायणाचीच सर्वांनी सेवा करावी असे असताना तू माझे चिंतन का करतेस ?''
लक्ष्मी म्हणाली, ''हे महेश्वरा, पतीने मला शाप दिल्यामुळे मी आपणाला शरण आले आहे. मला शापमुक्त करा. मला उःशाप सांगताना विष्णू म्हणाले, "तुला पुत्र झाल्यावर तू शापमुक्त होशील. नंतर तुझे वैकुंठात वास्तव्य घडेल." त्यांच्या या शब्दावरून मी तप करीत आहे. तुमची आराधना करीत आहे. तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा. पति समागमाशिवाय मला पुत्रलाभ होणार नाही. सांप्रत ते वैकुंठात आहेत. माझा पती व तू यात द्वैत नाही. हे त्रिपुरनाशका, तुम्ही दोघामध्ये ऐक्य असल्याचे मी श्रीहरीकडूनच ऐकले आहे. म्हणून तू माझी इच्छा पूर्ण कर.''
शिव म्हणाले, ''हे देवी, आमच्यातील हा ऐक्यभाव तुला कसा समजला ? कारण देव, ऋषी, ज्ञानी हे सुद्धा आमच्यातील ऐक्य जाणत नाहीत. तेव्हा इतरांना समजण्यास दुर्लभ असा आमच्यातील ऐक्यभाव तुला कसा माहीत झाला ?''
लक्ष्मी प्रसन्न मनाने म्हणाली, ''हे देवा, एकदा एकांतात हरी पद्मासन घालून ध्यान करीत होते. तेव्हा विस्मित होऊन मी विचारले, "हे देवाधिदेवा, समुद्रमंथनातून मी बाहेर आल्यावर सर्व देवांना प्रथम अवलोकन केले. त्यात आपण सर्वश्रेष्ठ आहात असे मला वाटले. म्हणून मी आपला स्वीकार केला. असे असता आपण कोणाचे ध्यान करीत आहात, हे मला सांगा.''
विष्णू म्हणाले, ''हे कांते, सत्वर संतुष्ट होणार्या त्या गिरिजावल्लभाचे मी ध्यान करीत आहे. कधी कधी तो माझे ध्यान करतो. मी त्या शिवाचा प्रिय प्राण आहे. तसाच तोही माझा प्रिय प्राणच आहे. तेव्हा आम्हा उभयतांत भेद नाही. महेश्वराचा द्वेष करणारे माझाच द्वेष करतात."
"तेव्हा विष्णूनेच हे मला सांगितले आहे. आपण विष्णूला प्रिय आहात म्हणून मी आपले ध्यान केले. म्हणून माझ्या पतीशी माझा संयोग होईल असे सत्वर करा."
संभाषणातले गर्भित जाणणार्या महेश्वराने तिला आश्वासन दिले. तो म्हणाला, "तुझ्या तपामुळे मी संतुष्ट झालो आहे. माझ्या प्रेरणेने प्रत्यक्ष हरी अश्वरूपाने तुजकडे येईल. तो कामविव्हल होऊन तुझ्याशी समागम करील अशी मी प्रेरणा देईन. तुला त्याच्याचसारखा तेजस्वी पुत्र होईल.
पुत्रप्राप्तीनंतर तू पतीसह वैकुंठात जाशील. हयग्रीव या नावाने तो पुत्र कीर्तिवान होईल. त्याच्यापासून पुढे हैहय वंश भूतलावर विस्तार पावेल.''
लक्ष्मीला वर दिल्यावर शंकर पार्वतीसह अंतर्धान पावले. लक्ष्मीने मनात त्या श्रीहरीचे चिंतन केले. ती त्याचे नित्य स्तवन करू लागली.