[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
जनमेजय म्हणाला, ''भृगुपत्न्यांच्या गर्भांचा नाश होऊनही भृगुवंश पुनः कसा प्रस्थापित झाला ? हैहयांना त्यापासून काय मिळाले ? हे आपण सांगा.''
व्यास म्हणाले, "हे राजा, हिमालयावर गेलेल्या भृगुस्त्रियांनी गौरीची मृण्मयी मूर्ती नदीकिनार्यावर स्थापन केली. गौरीचे यथासांग पूजन केल्यावर त्या आमरण उपोषणास बसल्या. त्यांनी मृत्यूचा निश्चय केल्याचे अवलोकन करून एके दिवशी देवीने त्या स्त्रियांना स्वप्नात दर्शन दिले. देवी म्हणाली, "तुमच्यापैकी एका स्त्रीला माझ्या अंशाने शक्तिशाली असा एक पुत्र मांडीपासून उत्पन्न होईल. तो तुमचे कार्य पूर्ण करील.''
असे सांगून ती जगदंबिका अंतर्धान पावली. त्या वरामुळे भृगुस्त्रियांना आनंद झाला. पुढे एका भृगुस्त्रिने अत्यंत चतुराई करून उदरातील गर्भ मांडीत धारण केला.
परंतु ती तेजोमय दिसू लागली. हैहयाच्या भीतीने ती पळत सुटली. तेव्हा हैहयसुद्धा तिच्यामागे धावले. अखेर तरवारी उपसून त्यांनी तिला गाठले. गर्भरक्षणासाठी ती आक्रोश करू लागली.
आपल्या मातेला आता कुणीही त्राता नाही. ती अत्यंत भयभीत होऊन आगतिक झाली आहे हे अवलोकन करताच तो गर्भस्थ बालक एकदम क्रुद्ध झाला आणि मांडी फोडून बाहेर पडला. त्याच्या तेजाने व दर्शनाने हैहयांची दृष्टी गेली. अंध होऊन ते पर्वतावरून संचार करू लागले. त्यांनी मनात विचार केला, "काय आश्चर्य ! त्या बालकाचे दर्शन होताच आपण दृष्टीहीन झालो. खरोखरच हा त्या ब्राह्मणस्त्रीच्या पातिव्रत्याचाच प्रभाव होय. पतिव्रतेपुढे आपले शौर्य व्यर्थ होय. म्हणून आपण आता तिला शरण जाऊ.''
असा विचार करून ते त्या भृगुस्त्रीला शरण गेले व नम्रतेने म्हणाले, ''हे माते, आम्ही अपराधी आहोत, आम्हाला क्षमा कर. आम्ही पातकी आहोत. अंधत्व हे मृत्यूपेक्षाही भयंकर असते. म्हणून आता तू आम्हाला दृष्टी दे. आम्ही इथून पुढे असे नीच कृत्य कधीही करणार नाही. आम्ही भृगूंचे सेवक असून केवळ अज्ञानामुळे आमच्या हातून हे पातक घडले. आम्ही सर्व शपथा घेऊन चांगले वागू, आम्ही तुला शरण आलो आहोत.''
हैहयांचे भाषण ऐकून ती भृगुस्त्री विस्मयाने म्हणाली, ''हे क्षत्रियांनो, मी तुमच्यावर रुष्ट झाले नाही. मी तुम्हाला अंध केले नाही. माझा पुत्र भार्गव हाच तुमच्यावर अत्यंत क्रुद्ध झाला आहे. धर्मनिष्ठ, तपस्वी तसेच गर्भातील त्याचे बांधव तुम्ही मारलेत. म्हणून त्याने क्रुद्ध होऊन तुमची दृष्टी नष्ट केली. तुमच्या भयाने शंभर वर्षेपर्यंत मी हा गर्भ मांडीत धारण केला होता. त्यामुळे त्याने गर्भावस्थेतच सर्व वेदांची अंगे अभ्यासली आहेत. पितृवधामुळे संतप्त होऊन तो तुमचा वध करण्याचे इच्छित आहे.
देवी भगवतीच्या प्रसादाने हा बालक भृगुकुलात उत्पन्न झाला आहे. तेव्हा आता तुम्ही माझ्या पुत्राला शरण जा. म्हणजे तो तुमचे अंधत्व नष्ट करील.''
तेव्हा भृगुस्त्रीच्या उरूपासून उत्पन्न झालेल्या त्या और्वाला सर्व हैहय शरण गेले. त्याची स्तुती केल्यावर संतुष्ट झालेला और्व त्यांना म्हणाला, ''घडणार्या गोष्टी दैवाने निर्माण केलेल्या असतात म्हणून त्याबद्दल शोक करणे इष्ट नव्हे. तुम्ही क्रोधाचा त्याग करून स्वगृही जा. हा माझा उपदेश समजून तुम्ही पुढे चांगले वागा."
तेव्हा सर्व हैहय स्वस्थानी परत गेले. इकडे ती भृगुस्त्रीही आपल्या पुत्रासह आपल्या आश्रमात परत आली. तिने बालकांचे रक्षण केले.
जनमेजय म्हणाला, ''लोभामुळे क्षत्रियांनी दुष्ट कर्म केले. लोभामुळे दोघांचाही नाश झाला. पण त्यांना हैहय नाव का प्राप्त झाले ?''
व्यास म्हणाले, ''एकदा महातेजस्वी सूर्यपुत्र रेवंत आपल्या सुंदर उच्चैश्रवा अश्वावर आरूढ होऊन वैकुंठलोकी गेला. तेथे त्या अश्वारूढ सूर्यपुत्राला महालक्ष्मीने अवलोकन केले. सागरापासून उत्पन्न झालेल्या त्या अश्वरूप भ्रात्याला पाहून ती विस्मित झाली. त्यावेळी सूर्यपुत्राला पाहून विष्णु लक्ष्मीला म्हणाले, ''हे चारूगात्री, हा कोण येत आहे बरे ? त्याची शरीरकांती मदनाप्रमाणे असून तो त्रैलोक्याला मोहवीत आहे."
पण त्या अश्वाचेच चिंतन करीत असलेल्या लक्ष्मीने विष्णूच्या प्रश्नाला उत्तर दिले नाही. तेव्हा आपली स्त्री त्या सुंदर अश्वाकडे प्रेमाने पाहात आहे व आपल्या प्रश्नाचे उत्तर देत नाही हे पाहून विष्णु क्रुद्ध झाले. ते म्हणाले, ''हे सुलोचने, तू काय पाहात आहेस ?'' पण तरीही लक्ष्मीने उत्तर दिले नाही. तेव्हा भगवान म्हणाले, ''हे लक्ष्मी तू सर्वत्र रममाण होतेस म्हणून तू रमा या नावाने प्रसिद्ध होशील. तू चंचल असल्याने चंचला होशील. तू कोठेही स्थिर रहाणार नाहीस. मी जवळ असतानाही तू अश्वामुळे मोहवश झालीस, म्हणून तू लोभी घोडी होशील.
अशाप्रकारे शाप दिल्यावर लक्ष्मी भयभीत होऊन रडू लागली. थोडया वेळाने ती विनयाने आपल्या पतीला म्हणाली, ''हे देवाधिदेवा, हे केशवा, गोविंदा माझ्या लहानशा अपराधाबद्दल आपण शाप का दिलात ? यापूर्वी आपण असे क्रुद्ध कधीही झाला नव्हता. माझ्या ठिकाणी तुमचे अकृत्रिम प्रेम असताना आपण शत्रूला शाप देण्याचे सोडून मला शाप का दिलात ? मी आता तुमच्या समोरच प्राणत्याग करते. मी पृथ्वीवर गेल्यावर तुमच्या विरहाने जिवंत कशी राहणार ? मी शापमुक्त केव्हा होणार ?''
विष्णु म्हणाले, ''तेथे तुला माझ्यासारखा पुत्र प्राप्त होऊन माझे सान्निध्य मिळेल व तू पूर्ववत सुखी होशील."