[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
जनमेजय म्हणाला, "भार्गवाचा वध करणारा हैहय कोणत्या कुलात जन्मास आला ? त्याने पुरोहिताशी वैर का केले ? त्या निरपराधी ब्राह्मणाचा वध कसा केला ?''
व्यास म्हणाले, ''हे राजा, कार्तवीर्यार्जुन नावाचा महाबलाढय सहस्र हात असलेला राजा हैहय कुलात जन्मला. तो दत्तात्रयशिष्य, प्रत्यक्ष श्रीहरीचाच अवतार होता. तो शक्तीचा उपासक असून ऋषींचा यजमान होता. त्याने पुष्कळ यज्ञ केले. भृगूंना विपुल दक्षिणाही दिल्या. त्याने अनेक वेळा द्रव्य दिल्यामुळे ते सधन झाले. त्यांना अश्व, रत्नेही राजाने दिली.
पुढे कार्तवीर्यार्जुनाच्या पश्चात हैहय राजे निर्धन बनले. त्यांना एकदा धनाची जरुरी भासली. म्हणून ते भृगूकडे गेले. पण धनलोभी भृगूंनी त्यांना विन्मुख परत पाठवले. काही भृगूंनी जमिनीत पुरुन ठेवलेल्या धनापैकी काही धन भीतीमुळे ब्राह्मणांना वाटले. काहींनी आपले धन गुप्तप्रकारे ठेवले. भृगुवंशातील ब्राह्मण हैहयांच्या भीतीने त्रस्त झाले आणि ते आश्रम सोडून निघून गेले. ते गिरिकंदराचा आश्रय करून राहू लागले.
पण धनाची फारच जरूरी भासल्याने हैहय राजे भृगूंच्या आश्रमात आले. पण तेथे कोणीच नाही असे पाहून त्यांनी तेथील भूमीत खणले. तेव्हा तेथे त्यांना विपुल धन मिळाले.
पण भृगूंच्या घरातून द्रव्य सापडलेले पाहून धनाशेने त्यांनी जवळच्या अनेक ब्राह्मणांची घरे खणली. त्यामुळे सर्व ब्राह्मण भीतीने शोक करू लागले. तेव्हा तेथेही धन सापडले. क्रुद्ध होऊन हैहयांनी शरण आलेल्या ब्राह्मणांचा वध केला. शिवाय त्यांनी भृगूंचा शोध करून त्यांच्या संपूर्ण कुलाचा नाश केला. भृगूंचे गर्भसुद्धा नाहीसे केले. नंतर ते पृथ्वीवर अभिमानाने विहार करू लागले. भृगूंच्या स्त्रियांच्या गर्भाचाही नाश झाल्याने स्त्रिया दुःखी झाल्या. इतर मुनींनी ते अवलोकन केल्यावर ते म्हणाले, "क्षत्रियांनी ब्राह्मणांवर इतके क्रुद्ध होऊ नये. भृगुपत्नींच्या गर्भाचाही वध करून तुम्ही फारच निंद्य कर्म केलेत. पापपुण्याचे फल याच लोकी भोगावे लागते. म्हणून तुम्ही असले कर्म करू नये.''
पण मत्त झालेले हैहय मुनींना म्हणाले, ''कपटी भृगूंनी आमच्या पूर्वजांकडून धन हरण करून घेतले म्हणून ते वंचक आहेत व बगळ्याप्रमाणे ढोंगी आहेत. आम्ही एकदा त्यांच्याकडे धनाची मागणी केली. पुन: सव्वापटीने परत देण्याचे आश्वासन देऊनही त्या लोभी भृगूंनी आम्हाला नकार दिला. आमच्या पूर्वजांपैकी कार्तवीर्याकडून त्यांनी धन प्राप्त करून घेतले होते. विप्रांनी धनसंचय न करता दान, यजन, उपभोग यांसाठी द्रव्य खर्च करावे. कारण धनाला चोर, राजा, अग्नी इत्यादीपासून भय असते. द्रव्याचे केवळ रक्षण करणारा हा मृत्यु पावल्यावर नरकात जातो, पण धन मात्र तेथेच राहते. पुण्यवानांनी दान व भोग यांतच द्रव्य व्यय करावे. पातक्यांच्या धनाचा नाश होतो. कृपण व वंचक पुरुषाला राजाने शिक्षाच करावी. म्हणून आम्ही गुरूंचाही वध केला. त्याबद्दल तुमच्यासारख्या श्रेष्ठ मुनींनी क्रुद्ध होण्याचे कारण काय ?''
अशाप्रकारे भाषण केल्यावरही इतर मुनींनी त्यांना निवारण करण्याचा प्रयत्न केला. पण ते भृगुस्त्रियांचा शोध करीत पृथ्वीवर हिंडू लागले. तेव्हा काळजीने कृश झालेल्या त्या भृगुस्त्रिया रडत रडत हिमालयाच्या आश्रयाला गेल्या.
लोभामुळेच हैहयांनी भृगूंचा नाश केला. लोभ हा दुःख व नाश यांचा कर्ताच आहे. लोभामुळे पापाची वृद्धी होते. लोभामुळे कुल, जाती, धर्म यांचा नाश होतो, तसेच अप्तेष्टांचा नाश होतो. क्रोध, अहंकार, काम, लोभ हे सर्वात मोठे शत्रु आहेत. लोभामुळेच, पापी हैहयांनी भृगूंचा नाश केला. खरोखरच लोभी पुरुष कोणते निंद्य कृत्य करणार नाही !