[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
जनमेजय म्हणाला, ''वसिष्ठांना देहप्राप्ती झाली. पण त्या निमीराजाला देहप्राप्ती कशी झाली ते सांग.''
व्यास म्हणाले, ''हे राजा वसिष्ठांना पुन: देह प्राप्त झाला. पण निमिला मात्र देहप्राप्ती झाली नाही. इकडे वसिष्ठांनी शाप दिल्यावर यज्ञाचे ऋत्विज चिंता करू लागले. ते म्हणाले, "आता काय करावे ? हा यज्ञ पूर्ण होताच दीक्षा घेतलेल्या त्या धार्मिक राजाला शाप झाला. खरोखरच दैवयोगे होणारे टळत नाही.''
असे म्हणून विविध मंत्रांनी त्यांनी राजाच्या देहाचे रक्षण केले. यज्ञसमाप्तीपर्यंत त्यांनी त्याचा तो निर्विकार देह तसाच सुरक्षित ठेवला. यज्ञसमाप्तीनंतर सर्व देव तेथे आले. निमीराजाकरता सर्वांनी देवांची प्रार्थना केली. तेव्हा नाममात्र श्वासोच्छवास करीत असलेल्या व खिन्न झालेल्या राजाला ते म्हणाले, "राजर्षे, आम्ही तुझ्या यज्ञाने संतुष्ट झालो आहोत. तू वर माग. तुझ्या या यज्ञामुळे तुला दिव्य जन्म प्राप्त होईल. म्हणून तुला देव अथवा मानव यांपैकी जो देह हवा असेल तो मागून घे. तुझा पुरोहित पूर्वीप्रमाणेच दुसरा देह धारण करून पृथ्वीवर राहात आहे. तुला इच्छा असेल तर तूही तसा देह माग.''
हे ऐकून निमी म्हणाला, ''हे सुरश्रेष्ठांनो, आता मला नश्वर देह नको. सर्व जीवांच्या दृष्टीत माझे वास्तव्य होवो. सर्व भूतांच्या नेत्रांत वायुभूत होऊन मी संसार करावा."
निमीचे हे शब्द ऐकून देव म्हणाले, ''ही गोष्ट सिद्धीस नेण्यास फक्त भगवतीच समर्थ आहे. त्या सर्वेश्वरी शिवेची तू प्रार्थना कर. ती तुझी इच्छा पूर्ण करील.''
हे ऐकून राजाने भगवतीची प्रार्थना केली. तेव्हा देवीने प्रसन्न होऊन त्याला दर्शन दिले. ते तेजयुक्त दर्शन अवलोकन करून सर्व मुनीही कृतार्थ झाले. त्या देवीला राजा म्हणाला, "हे देवी, मोक्षप्रद असे ज्ञान मला दे. तोपर्यंत सर्व प्राण्यांच्या नेत्रभागी माझे वास्तव्य होऊ दे.''
जगदंबिका म्हणाली, ''हे राजा, तू निर्मल ज्ञान प्राप्त करशील. तसेच भूतांच्या नेत्रांच्या पापण्यांमध्ये तुझे वास्तव्य होईल. प्राण्यांचे नेत्र तुझ्यामुळेच उघडझाप करतील. पण देवांची दृष्टी उघडीच राहील.''
असे सांगून ती देवी गुप्त झाली. नंतर विचार करून सर्व मुनींनी निमीचा देह मंडपात आणला. निमीला पुत्रप्राप्ती होण्यासाठी त्यांनी वेदोक्त मंत्रहवन केले. मंथन करताच तेथे साक्षात निमीप्रमाणे सर्वलक्षणसंपन्न पुत्र उत्पन्न झाला.
तो अरणीमंथनातून उत्पन्न झाल्याने त्याचे नाव मिथी असे ठेवले. तो मातेशिवाय फक्त जनकापासून उत्पन्न झाल्यामुळे त्याला जनक म्हणतात. विदेही निमीपासून त्या वंशाची वृद्धी झाल्यामुळे पुढे त्याच्या वंशजास विदेही म्हणून लोक संबोधू लागले.
अशारीतीने उत्पन्न झालेल्या जनकाने पुढे गंगेच्या किनार्यावर एक सुंदर नगर बसविले. सुंदर गोपुरे, हवेल्या तसेच धनधान्यांनी युक्त अशा नगरीला लोक मिथिला म्हणू लागले. ह्मा वंशात जन्मास आलेले राजे जनक या नावाने प्रसिद्ध झाले.
याप्रमाणे हे जनमेयजा, मी तुला निमीचे चरित्र निवेदन केले."
राजा म्हणाला, ''हे भगवन्, पण वसिष्ठ हा ब्रह्मदेवाचा पुत्र असून राजाचा पुरोहित व महान तपस्वी असे असताना त्या ब्राह्मणगुरूला क्षमा न करता राजाने शाप कसा दिला ?''
व्यास म्हणाले, ''इंद्रियाधीन असलेल्या प्राण्यांच्या ठिकाणी क्षमा संभव नाही. त्यातून समर्थ पुरुषाचे ठिकाणी क्षमा असणे अशक्यच. सर्वसंगपरित्याग केलेले मुनीसुद्धा कामक्रोधादि भावनांमध्ये अडकून राहिले आहेत. म्हणून षड्रिपूंना जिंकणारा प्राणी दुर्लभ.
स्वर्ग, भूलोक, वैकुंठ, कैलास यांपैकी कोठेही सर्व इंद्रिये जिंकलेला पुरुष आढळणार नाही, मोठे महातपस्वी मुनीही त्रिगुणयुक्त आहेत. अशा स्थितीत मानवांची गोष्टच नको. सांख्यवेत्ता कपिल मुनीनेही सगरपुत्रांना दग्ध केले. अहंकारापासूनच त्रैलोक्याची उत्पत्ती असल्याने ते कार्यकारणभावांनी युक्तच राहणार.
प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णु, महेश हे त्रिगुणांनी व्याप्त आहेत. मग मानव त्रिगुणांनी युक्त असल्यास आश्चर्य कोणते ? सर्व ठिकाणी गुणसंकरच झालेला आहे. तिन्ही गुण समानतेने राहात नाहीत. फक्त परमात्माच निर्गुण आहे. म्हणून तो कुणालाही दिसत नाही. तो अतर्क्य असून निर्लेप आहे. तोच अविनाशी आहे.
सर्व भूतांच्या ठिकाणी असलेली आदिशक्ती ही सुद्धा निर्गुण असल्याने प्राण्यांना तिचे ज्ञान होत नाही. परमात्मा व आदिशक्ती यांचे ऐक्य आहे. त्यांचे ऐक्य जाणणारा पुरुष सर्वमुक्त होय. अद्वैतातच मोक्ष असतो. ज्याला शक्ती व परमात्म्य ऐक्याची जाणीव झाली, तो गुणमुक्त होतो.
दोन प्रकारच्या ज्ञानांपैकी शाब्दिक ज्ञान हे बुद्धिजन्य आहे. वेदशास्त्रांचा अर्थ समजल्याने शब्दज्ञान प्राप्त होते. सुतर्क व कुतर्कामुळे विकल्प निर्माण होतात. वितर्कामुळे भ्रम होतो. त्यापासून बुद्धिभ्रंश व अखेर सर्वांचा नाश होतो.
दुसरे अनुभवसंज्ञक ज्ञान दुर्लभ आहे. परमात्म्याविषयी आसक्ती उत्पन्न झाल्याने हे ज्ञान मिळते. शब्दज्ञानाने कार्यसिद्धी होत नाही. शील, क्षमा, धैर्य, संतोष, दुसर्याचे भले करण्याची बुद्धी हे ज्ञानाचे उत्तम फळ आहे. ज्ञान, तप यांशिवाय षड्रिपूंचा नाश होत नाही.
मन चंचल असते. सर्व प्राणी मनाच्या आधीन असतात. काम, क्रोध चित्तातून उत्पन्न होतात. पूर्वी शुक्राच्या अपराधाला ययातीने क्षमा केली. पण निमीने वसिष्ठांना क्षमा केली नाही.
भृगुपुत्र शुक्राने मात्र क्रुद्ध होऊन ययातीला शाप दिला होता. पण ययातीने शाप दिला नाही. उलट शापापासून प्राप्त झालेल्या जरेचा स्वीकार केला. तात्पर्य, कोणी सौम्य तर कोणी उग्र असतो. हा स्वभावभेद असल्याने कोणाचाच दोष दिसत नाही.
धनलोभाने व्याप्त होऊन हैहय नावाचे राजे क्रुद्ध झाले. ब्रह्महत्येच्या पातकांची तमा न बाळगता त्यांनी भृगुवंशातील सर्व ब्राह्मण पुरोहितांचा नाश केला.