[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
जनमेजय म्हणाला, ''हे भगवान, वसिष्ठ मुनीचे नाव मैत्रावरुणी का पडले ? हे नाव कर्मामुळे की गुणामुळे प्राप्त झाले हे सांगा.''
व्यास म्हणाले, ''हे नृपश्रेष्ठा, निमीचा शाप झाल्याने वसिष्ठांनी देहत्याग केला. मित्रावरुण मुनीपासून ते पुनः उत्पन्न झाले म्हणून त्यांना मित्रावरुणी असे म्हणतात."
जनमेजय म्हणाला, ''त्या पण धर्मात्म्याला शाप होण्याचे कारण काय ? राजाने दिलेल्या शापाबद्दल मला विस्ताराने कथन करा."
व्यास म्हणाले, ''राजा, खरे म्हणजे हे जग मायागुणांमुळे व्याप्त झाले आहे. भूपाल असो वा तपस्वी असो, त्यातून तो सुटला नाही. धर्माचरण व तप त्रिगुणांनी व्याप्त असल्यामुळे कोणीही पूर्णपणे शुद्ध आढळत नाही. लोभ, अहंकार यांनी व्याप्त होऊनच मुनी तप करीत असतात.
रजोगुणात्मक क्षत्रिय व ब्राह्मण हे बहुधा यजन करीत असतात. शुद्ध व सत्त्वगुणी असे जगात कोणीही नाही. म्हणून राजा व मुनी हे एकमेकाला शाप देऊन दुःखव्याप्त झाले. या त्रिगुणव्याप्त संसारात द्रव्य, क्रिया, चित्त यांची शुद्धी होणे अशक्य. हा सर्व देवीचा प्रभाव असल्याने ती ज्याच्यावर अनुग्रह करील तोच संसारमुक्त होतो. तिच्या कृपेवाचून ब्रह्मा, विष्णु, महेशसुद्धा मुक्त होत नाहीत. तिचा आशय समजणारे तिन्ही लोकांत कोणीही नाही. पण ती भक्ताधीन असते. म्हणून चित्तशुद्धीकरता तिची भक्ती करावी.
इक्ष्वाकु फुलातील निमीराजा रूप, गुणांनी युक्त होता. तो धर्मतत्पर, सत्यवक्ता, दानशूर, यज्ञयाग करणारा, ज्ञानी, शुद्ध, बुद्धिमान, प्रजाहितदक्ष असा होता. त्याने केवळ ब्राह्मणांच्या हितासाठी गौतमाश्रमाजवळ जयंतपूर नावाचे नगर बसविले.
त्याने विपुल दक्षिणांनी युक्त असा यज्ञ पुष्कळ कालपर्यंत करावा या इच्छेने आपल्या पित्याची अनुज्ञा घेतली. त्याने निपुण पंडितांकडून महायाग केला. भृगु, अंगिरा, वामदेव, गौतम, वसिष्ठ, पुलस्त्य, ऋचीक, ऋतु या सर्वज्ञ मुनींना राजाने आमंत्रण दिले.
यज्ञसाहित्याची जुळणी केल्यावर तो वसिष्ठांना म्हणाला, ''हे कृपानिधे, आपण माझ्या यज्ञाचे यजन करा. उत्तम सामग्री सिद्ध असून हा याग पाच हजार वर्षे करावा अशी माझी इच्छा आहे. यज्ञात मला जगदंबिकेची आराधना करायची आहे. तिच्यासाठी हा विधिपूर्वक यज्ञ करण्यास मी सिद्ध झालो आहे."
वसिष्ठमुनी राजाला म्हणाले, ''हे राजा, इंद्राने मला प्रथम निमंत्रण दिले आहे. तोही पराशक्तीसाठी यज्ञ करीत आहे. पाचशे वर्षेपर्यंत मी त्याला यज्ञदीक्षा दिली आहे. तेव्हा त्याचा यज्ञ पूर्ण झाल्यावर मी तुझे कार्य करीन.''
राजा म्हणाला, ''हे गुरो, मी तर यज्ञासाठी सर्व मुनींना निमंत्रणे केली आहेत. आपण आमचे कुलगुरू असून सांप्रत दुसर्या ठिकाणी का बरे जाता ? केवळ धनलोभाने आपण माझा यज्ञ सोडून जात आहात हे योग्य नव्हे.''
तरीही वसिष्ठ इंद्राकडे गेले. त्यामुळे खिन्न होऊन राजाने गौतमाला गुरू करून यज्ञ करविला. त्याने यज्ञात विपुल दक्षिणा दिल्या. पाच हजार वर्षे यज्ञदीक्षा धारण करून त्याने ऋत्विजांचे पूजन केले.
पाचशे वर्षांनी इंद्राचा यज्ञ पूर्ण झाल्यावर राजाचा यज्ञ पाहण्यासाठी वसिष्ठ निमीराजाच्या यज्ञमंडपात आले. पण त्याचवेळी राजा निद्रिस्त झाला होता व सेवकांनीही त्याला उठविले नाही. राजा सामोरा न आल्याने अवमानित झालेले वसिष्ठ क्रुद्ध झाले. त्यांनी राजाला शाप दिला, "माझ्यासारख्या कुलगुरूचा त्याग करून तू दुसरा गुरु केलास. मी निवारण केले असताही तू यज्ञदीक्षा घेतलीस म्हणून माझ्या अवज्ञेसाठी तू विदेही होशील.''
हे मुनीचे भाषण ऐकताच सेवकांनी राजाला उठवून मुनी क्रुद्ध झाल्याचे सांगितले. तेव्हा तो राजा स्पष्टपणे म्हणाला, ''हे धर्मज्ञा, मी निर्दोष आहे. लोभवश होऊन आपण मला सोडलेत. आपणाला या निंद्य कृत्याची लज्जा वाटली नाही. वस्तुत: मुनीनी संतुष्ट असावे. आपण प्रत्यक्ष ब्रह्मदेवपुत्र आहात. आपण मला वृथा शाप दिलात. आपणाला धर्माच्या गतीची जाणीव नाही. म्हणून क्रोधाने दोषित झालेला आपला देहही सत्वर पडो.''
एकमेकांना शाप देऊन दोघेही दुःखव्याप्त झाले. चिंतायुक्त होऊन वसिष्ठांनी ब्रह्मदेवाला ही वार्ता कळविली. ते म्हणाले,"या शापामुळे मी दुःखी झालो आहे. तेव्हा काय करू ? मला या देहाप्रमाणेच पुढे देह प्राप्त व्हावा. सांप्रत या देहात जसे ज्ञान आहे तसेच पुढील जन्मातील देहाच्या ठिकाणी असावे. तेव्हा हे तात, आपण याला समर्थ आहात, म्हणून मजवर दया करावी."
हे ऐकून ब्रह्मदेव वसिष्ठांना म्हणाले, ''तू देहत्याग कर व मित्रवरुणांच्या तेजात प्रविष्ट हो, म्हणजे यथावकाश तू अयोनीसंभवाने जन्म पावशील. पुढेही तू धर्मज्ञ, ज्ञानी, सर्वज्ञ व सर्वमान्य होशील.''
हे ऐकून वसिष्ठांनी पित्याला प्रदक्षिणा घालून प्रणाम केला. देहत्याग करून ते मित्रावरुणांच्या तेजात विलीन पावले.
एकदा उर्वशी आपल्या सखीसह वरुणलोकी आली असता तिला पाहून मित्रावरुण कामविव्हल झाले. ते उर्वशीला म्हणाले, "हे सुंदरी, आम्ही तुला अवलोकन करताच कामातुर झालो आहे. म्हणून तू आमचा स्वीकार कर. तू आमच्यासह क्रीडा कर."
उर्वशीने ते ओळखून ती त्याच्या आधीन होऊन मित्रावरुणांच्या घरी राहिली. तिच्यासह क्रीडा करीत असता एकाएकी दोघांचेही वीर्य एका घटात पडले. त्यातून मुनी जन्मास आले. अगस्ती व वसिष्ठ असे दोघेजण त्यातून जन्म पावले. अगस्ती बालपणीच अरण्यात जाऊन तप करू लागला. इक्ष्वाकुने वसिष्ठांना बालवय असताच पूर्वीप्रमाणे कुलगुरु केले. हे पूर्वीचे वसिष्ठ आहेत हे कळल्यावर राजाला अतिशय आनंद झाला.
अशाप्रकारे वसिष्ठांना शाप देऊन ते मित्रावरुणाच्या कुलात दुसरा देह धारण करून उत्पन्न झाले.