इंद्र म्हणाला, ''तुला पशु करून तुझा पिता नरमेध यज्ञ करील. तुझा वध होईल.'' असे सांगून इंद्राने त्याचे निवारण केल्यावर मायेने मोहित होऊन तो तेथेच राहू लागला. अशा रीतीने पित्याच्या दुःखामुळे घरी जाण्याचे पुनः पुन्हा त्याच्या मनात येत असे, पण इंद्र त्याचे निवारण करी.
इकडे रोगग्रस्त झालेल्या राजाने वसिष्ठांना एकांतात विचारले, ''अशा दुःखाकुल अवस्थेत मी काय करू ? मी या महारोगामुळे त्रस्त होऊन आपणाला शरण आलो आहे. माझे रक्षण करा.''
वसिष्ठ म्हणाले, ''हे राजा, रोगमुक्तीसाठी मी तुला उपाय सांगतो. धर्मशास्त्रात तेरा प्रकारचे पुत्र सांगितले आहेत. तू त्यांपैकी एखादा द्विजपुत्र विकत घेऊन क्रीतपुत्र कर. त्यायोगे यज्ञ करून तुला दुःख मुक्त होता येईल.''
हे ऐकून राजाने मंत्र्याला सांगितले, ''तू कोठेही हिंडून एखादा द्विजपुत्र विकत आण. द्रव्यलोभाने एखादा गरीब ब्राह्मण पुत्र देईल. यज्ञासाठी पुत्र हवा आहे अशी प्रार्थना करून तू पुत्र विकत आण. तू शहरे, गावे अथवा बरोबर जाऊन तपास कर.''
राजाचे बोलणे ऐकून तो मंत्री शोध करू लागला. तेव्हा अजिगर्त नावाच्या दरिद्री ब्राह्मणाविषयी त्याने ऐकले. त्याने त्याचा पुत्र शुनःशेप याला विकत घेतले. राजाला क्रीतपुत्र लाभल्यामुळे आनंद झाला. त्याने यज्ञाची सिद्धता केली.
पण यज्ञाचे सुरुवातीलाच विश्वामित्राने या कृत्यासाठी राजाचा निषेध केला. विश्वामित्र म्हणाला, ''हे राजेंद्रा, या ब्राह्मणपुत्राला सोडून दे. अशाने तुला निश्चित दुःख प्राप्त होईल. कारण हा पुत्र रडत आहे. मला ते पाहून दया उत्पन्न झाली आहे. क्षत्रिय दुसर्याचे रक्षण करून स्वर्गात जातात. या द्विजपुत्राचा वध करून तू पाप करू नकोस. माझे म्हणणे ऐक व याला मुक्त कर."
पण रोगग्रस्त राजाने विश्वामित्राचे ऐकले नाही. विश्वामित्रांनी राजावर क्रुद्ध होऊन शुन:शैपाला मंत्रोपदेश दिला. वरुणाचे स्मरण करून त्याने तो मंत्र म्हटला. त्यामुळे वरुणाने प्रसन्न होऊन त्याला मुक्त केले. राजालाहि रोगमुक्त केले.
शुनःशेपाला विश्वामित्राने आपला पुत्र मानले पण राजावर त्याने राग धरला. एकदा शिकारीच्या निमित्ताने राजा अश्वारूढ होऊन कौशिकीच्या तीराकडे गेला. तेव्हा त्याचे सर्वस्व विश्वामित्राने दानाच्या रूपाने हरण केले. त्यामुळे हरिश्चंद्राला फार यातना भोगाव्या लागल्या. त्यामुळे वसिष्ठ क्रुद्ध होऊन विश्वामित्राला म्हणाले, ''हे दुर्बुद्धे, तू ब्राह्मणधर्माचे अवलंबन करून बकाप्रमाणे वागत आहेस. तू हरिश्चंद्राला अत्यंत दुःख का भोगायला लावलेस ? तू बकाप्रमाणे दांभिकतेने वागत आहेस. म्हणून बगळा होशील.''
तेव्हा विश्वामित्रांनीही त्याला शाप दिला, ''मी बक असेपर्यंत तू अडी होशील.''
अशाप्रकारे परस्परांना शाप दिल्यावर ते दोघेही अडिबक झाले. दोघेही घरटी करून मानस सरोवराचे ठिकाणी राहू लागले. पुढे दोघांनी युद्ध केले. एकमेकांचा मत्सर करणारे ते पक्षी चोच, पंख यांच्या सहाय्याने युद्ध करू लागले. ते दोघेही रक्ताने माखून गेले. ते तेथेच कित्येक काळापर्यंत राहिले.
त्यांचे युद्ध पाहून ब्रह्मदेव देवांसह तेथे आला. त्याने दोघांचेही युद्धापासून निवारण केले व शापमुक्त केले. नंतर ते आपापल्या स्थानी परत गेले.
अशारीतीने दोन तपस्व्यांनी एकमेकांशी व्यर्थ वैर धरून युद्ध केले.
म्हणून हे राजा, चित्तशुद्धी करणे कठीण आहे. त्याशिवाय तीर्थ, दान, तप सत्यभाषण हे सर्व व्यर्थ आहे. चित्त वासनारहित करून पूजेविषयी तत्पर राहून पुरुषाने तीर्थक्षेत्रावर वास्तव्य करावे. कालाच्या भीतीने त्रस्त झालेल्याने भगवतीच्या चरणाचे स्मरण करावे म्हणजे त्याची पापे नष्ट होऊन तो संसारतापापासून मुक्त होतो.