[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
जनमेय म्हणाला, ''हे मुनिश्रेष्ठ, मानव व देव यांना भेट देण्यास योग्य अशा पुण्यक्षेत्रांचे वर्णन करा. तसेच त्यांच्या स्नानाने कोणती फले मिळतात ? त्यांचे नियम काय ? ते विस्ताराने सांगा.''
व्यास म्हणाले, ''नद्यांमध्ये जान्हवी, यमुना, सरस्वती, नर्मदा, गंडकी, सिंधू, गोमती, तमसा, कावेरी, चंद्रभागा, वेत्रवती, चर्मण्वती, शरयू, तापी, साभ्रमती ह्या सर्व पवित्र नद्या आहेत. याच आणखी काही पुण्यकारक नद्या समुद्राला मिळाल्या आहेत.
ज्यांचा ओघ कायम असतो त्या विशेष पुण्यकारक असतात. या सर्व नद्या श्रावण व भाद्रपद महिन्यांत रजस्वला असतात. पावसाळ्यात गावाला उपयोगी पडणार्या लहान नद्या निर्माण होतात. पुष्कर, कुरूक्षेत्र, धर्मारण्य, प्रभास, प्रयाग, नैमिषारण्य, अर्बुदारण्य, तसेच श्रीशैल, सुमेरू, गंधमादन, मानससरोवर, बिंदुसरोवर, अक्षोद सरोवर व मुनींचे आश्रम ही सर्व पुण्यस्थाने असतात.
बदरिकाश्रमात नरनारायणमुनींनी तप केले. त्याप्रमाणे वामनाश्रम व शतयूपाश्रम हे आश्रमही प्रसिद्ध आहेत.
हे भूपते, देवीची स्थाने दर्शनानेच पापहरण करतात. तीर्थे, दाने, व्रते यज्ञ व तपेही सक्षम पुण्यकर्मे आहेत. द्रव्य, क्रिया व मन शुद्ध असल्यास ती सुद्धा पवित्र स्थाने निर्माण करतात.
द्रव्यशुद्धी क्रियाशुद्धी या आढळतात, पण मनशुद्ध सर्वांना सुलभ असते असे नाही. हे राजा, मन फार चंचल असते.
हे राजा, अनेक भावनात्मक मन शुद्ध कसे होणार ? काम, क्रोध, लोभ, अहंकार व मद हे तपश्चर्या, तीर्थे, व्रते यांत विघ्ने आणतात. अहिंसा, सत्य, शौच, इंद्रियनिग्रह आणि धर्मपालन यामुळेच सर्व तीर्थांची फले प्राप्त होत असतात. नित्य कर्मांच्या त्यागामुळे तीर्थाटन व्यर्थ होते व संसर्गदोष घडल्यास व्यर्थता वृद्धिंगत होते.
हे राजा, तीर्थे देहाचा मल नाहीसा करतात, पण मनाच्या मलाचे क्षालन करण्यास ती समर्थ नाहीत. तसे असते तर गंगातीरी वास्तव्य करणारे व ईश्वराचे ध्यान करणारे मुनी एकमेकांचा द्रोह का करते ? वसिष्ठ - विश्वामित्रासारखे विनयसंपन्न मुनी काम व क्रोधांमुळे व्याकुल होतात. म्हणून हे राजा, चित्तशुद्धी करणारे तीर्थ गंगातीर्थापेक्षाही पावन असते. विशेषतः सत्संग प्राप्त झाला तरच मानसिक मलाचे क्षालन होते.
वेद, शास्त्रे, व्रते, तपश्चर्या, यज्ञ व दाने यांमुळे चितशुद्ध होतेच असे नाही. वेदांत निपुण असलेले ब्रह्मापुत्र वसिष्ठसुद्धा गंगातीराच्या आश्रयाला असूनही खरोखरच रागद्वेषांनी युक्त होते. विश्वामित्र व वसिष्ठ यांच्यात केवळ द्वेषामुळेच महायुद्ध झाले. देवांनाही त्यामुळे विस्मय वाटला. विश्वामित्र महातपस्वी असूनही वसिष्ठांनी शाप दिल्यामुळे बक झाला आणि विश्वामित्राने शाप देऊन वसिष्ठालाही अडीचा देह धारण करायला लावले.
ते महातेजस्वी मुनी शापामुळे अडिबक झाल्यावर काही दिवस मानससरोवराच्या तीरी राहिले. त्या ठिकाणी नखे व चोची ह्यांच्या प्रहारांनी त्यांनी दारुणयुद्ध केले. क्रुद्ध झालेले ते ऋषी दहा हजार वर्षे लोटेपर्यंत मदोन्मत्त सिंहाप्रमाणे युद्धच करत होते.''
राजा म्हणाला, ''ते तपस्वी कोणत्या कारणामुळे वैरी झाले ? एकमेकांना क्लेश देणार्या व त्यामुळे इतरांनाही दुःख देणार्या त्या महाविचारी मुनींनी परस्परांना शाप का दिला ?''
व्यास म्हणाले, ''रविवंशामध्ये त्रिशंकूचा पुत्र हरिश्चंद्र नावाचा श्रेष्ठ राजा होऊन गेला. त्याने पुत्रप्राप्तीसाठी नरमेध करण्याचा नवस केला. त्यामुळे वरुण संतुष्ट झाला. पुढे राजपत्नीला डोहाळे लागले. राजाही आनंदित झाला. गर्भसंस्कारकर्मे त्याने यथाविधी केली.
काही कालाने त्याला सर्वलक्षणसंपन्न पुत्र झाला. पुत्रजन्म झाल्यावर राजालाही आनंद झाला. त्याने जातकर्मादि संस्कारविधी करून ब्राह्मणांना सुवर्ण व दुभत्या गाई दिल्या. ह्याप्रमाणे जन्मोत्सव चालला असता राजाच्या घरी विप्रवेष धारण करून वरुण प्राप्त झाला. तेव्हा राजाने यथाविधी आसन देऊन व पूजा करून आगमनाचे कारण विचारले असता तो ब्राह्मण राजाला म्हणाला, ''मी वरुण आहे. पुत्र हाच अत्यंत पवित्र पशू कल्पून तू यज्ञ कर. तू यज्ञाचा नवस केला आहेस. यास्तव आता आपले वचन पाळ.
हे ऐकताच राजा दुःखाने व्याकुळ झाला. पण तो हात जोडून वरुणाला म्हणाला, ''हे प्रभो, मी प्रतिज्ञा केल्याप्रमाणे विधिपूर्वक यज्ञ करीन आणि आपले शब्द खरे करीन. हे सुरश्रेष्ठा, महिना भरल्यावर स्त्री शुद्ध होते. म्हणून भार्या शुद्ध झाल्यानंतर तो पशुयुक्त यज्ञ मी करीन.''
ते ऐकून वरुण स्वगृही परत गेला. राजा आनंद व दुःख एकाच वेळी भोगत होता. महिना पूर्ण झाल्यानंतर वरुण पुन: उत्कृष्ट वेष धारण करून द्विजरूपाने राजगृही परत आला. पूर्वीप्रमाणे पूजन झाल्यावर तो सुरश्रेष्ठ सुखाने बसला. हरिश्चंद्र राजा हेतुगर्भ भाषणाने म्हणाला, "हे प्रभो, त्या असंस्कृत पुत्राला मी यूपाशी कसा बरे बांधू ? संस्काराने शुद्ध केल्यानंतर मी उत्कृष्ट यज्ञ करीन.''
वरुण म्हणाला, ''हे राजेंद्रा, प्रतिज्ञा करून तू मला फसवीत आहेस. तू पूर्वी निपुत्रिक असल्यामुळे सांप्रत तुझ्या ठिकाणी उत्पन्न झालेले पुत्रप्रेम दूर होणे कठीण आहे. तथापि तुझ्या भाषणामुळे मी तूर्त जातो. काही काळ वाट पाहिल्यानंतर मी पुनः तुझ्या घरी येईन. तेव्हा मात्र तू सत्यवचनी हो. नाहीतर मी तुला शाप देईन.''
राजपुत्र रोहित हा अत्यंत बुद्धिमान व विद्यापारंगत झाला. पण त्याला यज्ञाचे कारण समजल्यावर तोही भयभीत होऊन कोणालाही न कळत पर्वताच्या गुहेत पळून गेला व गुप्त रीतीने राहू लागला.
नंतर राजाने सांगितलेला काल प्राप्त झाल्यावर वरुण यज्ञाच्या इच्छेने राजगृही आला व ''यज्ञ कर" असे म्हणाला, ''हे सुरश्रेष्ठ, मी काय करू ? माझा पुत्र कोठे निघून गेला हे समजत नाही.'' हे राजाचे भाषण श्रवण करून वरुण क्रुद्ध झाला आणि वारंवार असत्य भाषण करणार्या त्या राजाला क्रोधाने त्याने शाप दिला.
तो म्हणाला, ''हे कपटपटु राजा, ज्या अर्थी वचन देऊन तू मला फसविलेस त्या अर्थी तुला जलोदराची व्याधी होईल.
तेव्हा राजा रोगग्रस्त व चिंतातुर होऊन राहिला. शापजन्य रोगाने राजा पीडित झाला. पिता व्याधिग्रस्त झाल्याचे पुत्रालाही समजले.
तेव्हा आपल्यामुळे पित्याला दुःख झाले हे कळल्यावर तो आक्रोश करू लागला व घरी जाण्यास निघाला.
पण त्याच वेळी इंद्र त्याच्याकडे आला आणि हितोपदेशाच्या निमित्ताने म्हणाला, ''हे राजपुत्रा, तू मूर्ख आहेस. तू तेथे जाऊन राजाला अधिक दुःख देशील. तू जाऊ नकोस."