[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
तेथे एकांतात आपली पत्नी शोकावस्थेत असल्याचे पाहून इंद्र विस्मित झाला. तो तिला म्हणाला, ''हे कांते, तू या ठिकाणी कशी आलीस ? हे शुभे, कोणालाही दिसू नये म्हणून मी येथे एकांतात वास्तव्य करीत आहे. मी इथे असल्याचे तुला कसे समजले ?''
शची म्हणाली, ''हे देवा, हे स्वर्गाधिपते, देवीच्याच प्रसादाने मला आपले दर्शन घडले, देव मुनी यांनी इंद्रपदावर स्थापन केलेला नहुष राजा मला त्रस्त करीत आहे.
तो म्हणतो, 'मी इंद्र असल्याने, तू मला पती कर.
त्या पाप्याचे हे शब्द ऐकून मी काय करू ?"
इंद्र म्हणाला, "हे सुंदरी, मी कालाची वाट पाहात आहे. तूही तसेच कर."
इंद्राने असे सांगितल्यावर ती देवी दुःखाने सुस्कारे सोडू लागली. ती म्हणाली, ''मी इतके दिवस कसे घालवू ? तो पापी नहुष मला बलात्काराने हरण करील. हे शत्रुघ्ना, त्याच्या भीतीमुळे देव मुनी मला म्हणाले, "तू त्या देवराजाचा स्वीकार कर बरे." बृहस्पती तर ब्राह्मण म्हणून संरक्षण करण्यास असमर्थ आहे. म्हणून मी चिंताव्यग्र आहे.
मी पतिनिष्ठ स्त्री असल्यामुळे माझा तुझ्यातच लय झाला आहे. मी जारिणी नाही. तेव्हा सांप्रत शरण जाण्यास योग्य असा कोणीही नाही.''
इंद्र म्हणाला, "सुमुखी, मी सांगतो तसे कर, म्हणजे संकटप्रसंगी तुला शीलाचे रक्षण करता येईल. पतिव्रते, स्वत:च्या शिलाचे रक्षण अखेर स्वत:च करावे लागते.
कोटयावधी रक्षक असले तरी चित्त मदनविव्हल झाल्यास शील कसे सुरक्षित राहणार ?
म्हणून हे सुहास्यवदने, बलात्काराने नहुषाने तुला ओढून नेले तर गुप्त संकेताने तू त्याची फसवणूक कर. हे मदालसे, एकांतात तू त्याला म्हण, "हे जगदीश्वरा, तू दिव्य ऋषियानात बसून माझ्याकडे आलास तर मी तुझी होईन."
असे तू म्हणालीस म्हणजे तो कामांध ऋषींना आपल्या वाहनास जोडील. एखादा तपस्वी त्याच वेळी त्याला शापभ्रष्ट करील. तसेच ती भगवती जगदंबा तुला मदत करील. तिच्या स्मरणाने संकटनिवृत्ती होते. तेव्हा गुरूचे ऐकून मणिद्वीपवासिनी भगवतीची सेवा कर.''
असे शचीला सांगताच ती 'बरे' म्हणून विश्वासाने नहुषाकडे गेली. तेव्हा नहुष तिला म्हणाला, ''हे सत्यभाषिणी, तुझे कल्याण असो, खरोखर मी तुझा दास आहे. तू आता माझा स्वीकार कर. तुझे कोणतेही प्रिय कार्य सत्वर सांग. मी ते पूर्ण करीन.''
शची म्हणाली, ''हे कृत्रिम इंद्रा, माझी एकच इच्छा आहे. ती आपण शेवटास नेल्यास मी आपल्या आधीन होईन."
नहुष म्हणाला, ''हे चंद्रवदने, आता तू सत्वर काय ते सांग. मी तुझी इच्छा पूर्ण करीन.''
शची म्हणाली, ''हे राजेंद्रा आपण माझी इच्छा पूर्ण कराल अशी शपथ वाहा. कारण मला विश्वास वाटत नाही. या भूतलावर सत्यवचनी फार क्वचित् आढळतात. म्हणून माझे वांच्छित पूर्ण केल्यास मी आपली होईन.''
नहुष म्हणाला, ''हे सुंदरी, मी आजवर यज्ञाने व दानाने मिळवलेल्या पुण्यावर शपथेवर असे सांगतो की तू म्हणशील ते मी शेवटास नेईन.''
शची म्हणाली, ''अश्व, गज, रथ ही इंद्राची वहाने होती. वासुदेवाचा गरूड, यमाचा महिष, शंकराचा वृषभ, ब्रह्मदेवाचा हंस, कार्तिकेयाचा मयूर, गजाननाचा मूषक अशी निरनिराळ्या देवांची विविध वाहने आहेत. परंतु याहीपेक्षा आपले वाहन अपूर्व असावे.
हे महाराज, सदाचरणी निर्मल मुनींना पालखी वाहायला लावून त्यातून आपण मजकडे यावे. त्यामुळे आपले तेज वृद्धींगत होईल आणि मी आपल्या आधीन होईन.''
तिचे भाषण ऐकून तो मूर्ख, मदांध नहुष हसला. त्याला महादेवीने मोहित केल्यामुळे त्याने सांप्रतच्या पदाला अनुचित असे कृत्य करण्याचे ठरविले. तो म्हणाला, ''हे सुंदरी, हे सुकेशी, खरोखर तू म्हणतेस ते योग्य आहे. मी तुझी इच्छा पूर्ण करीन. या जगात मुनींना वाहन करणारा म्हणून माझी कीर्ती होईल. हे देवी, देवर्षी व सप्तर्षी माझे वाहक होतील.''
असे म्हणून त्याने इंद्रायणीला जाण्यास सांगून सत्वर ऋषींना बोलावून आणले व तो म्हणाला, ''हे विप्रहो, सांप्रत सर्वशक्तिशाली असा मीच इंद्र आहे. म्हणून सांगेन तसे तुम्ही करा. आता लवकरच इंद्राणीही मला प्राप्त होईल. तिने मला सांगितले की, 'देवराजा, आपण मुनियानातून मजकडे या.''
म्हणून हे मुनिश्रेष्ठानो, आपण दयाळू होऊन माझी ही इच्छा पूर्ण करा. मी मदनव्याकुल झालो असून आपण सांप्रत माझे प्रिय करून रक्षण करा.''
त्याचे बोलणे ऐकून व भवितव्य जाणून घेऊन अगस्तीमुनींनी कृपाळु होऊन त्याचे म्हणणे मान्य केले. ते ऐकून राजाला आनंद झाला. तो त्वरित एका सुंदर शिबिकेवर आरुढ झाला व "चल, चल," (सर्प, सर्प) असे म्हणून पायानेच त्याने मुनीच्या मस्तकाला स्पर्श केला. इतकेच नव्हे तर कामबाणांनी पीडित झाल्यामुळे त्याने महाप्रतापी, समुद्रही पिऊन टाकणार्या, वातापीला पचविणार्या त्या महासाध्वी लोपामुद्रेच्या पतीला, त्या महातपस्वी अगस्तीमुनीला चाबकाने मारले.
तो पुन: 'चल, चल,' (सर्प, सर्प) म्हणून चाबकाने मारण्याची भीती घालू लागला. त्यामुळे क्रुद्ध होऊन त्या अगस्तीमुनीने त्याला शाप दिला. अगस्तीमुनी म्हणाले, ''हे दुरात्म्या, तू महाभयंकर घोर शरीरधारण करणारा सर्प होशील.''
ती शापवाणी ऐकून नहुष खाली उतरला व भयभीत होऊन मुनींची क्षमायाचना करू लागला. तेव्हा तो मुनी शांतचित्ताने म्हणाला, ''हे नहुषा, माझा शाप असत्य होणार नाही. कित्येक सहस्र वर्षे तू सर्पयोनीत यातना भोगशील. त्याच अवस्थेत बलाने तू सर्वत्र संचार करशील. पण युधिष्ठिराच्या दर्शनाने तुझ्या प्रश्नांची उत्तरे ऐकल्यावर तू मुक्त होऊन पुन: स्वर्गात येशील.''
अशा रीतीने उ:शाप ऐकल्यावर ऋषींची स्तुती केली आणि तो अकस्मात सर्प होऊन स्वर्गातून भूमीवर पडला. तेव्हा बृहस्पतीने मानस सरोवरात जाऊन सर्व घटना इंद्राला निवेदन केली. ते ऐकून इंद्र आनंदित होऊन तेथेच राहू लागला.
नहुष भूतलावर पडल्याचे अवलोकन केल्यावर सर्व देव, ऋषी, इंद्राकडे गेले. ते सन्मानाने त्याला स्वर्गात घेऊन आले. त्यांनी पुनः इंद्राला राज्याभिषेक केला.
त्यानंतर स्वर्गप्राप्ती झाल्यावर शचीसह इंद्र पुन: नंदनवनात क्रीडा करण्यास मग्न झाला.
अशाप्रकारे विश्वरूपाचा वध केल्यामुळे इंद्राला घोर दुःख भोगावे लागले. पण देवीच्या कृपेमुळे त्याला पुन: स्वर्गप्राप्ती झाली.
व्यासमुनी म्हणाले, ''हे जनमेजया, अशारीतीने केलेल्या कर्माचे फल हे भोगावेच लागते.''