[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
गुरूने शचीला संरक्षण दिल्यामुळे नहुष राजा गुरूवर क्रुद्ध झाला. तो म्हणाला, "हे देवहो, मी गुरूचा वध करीन. कारण तो आपल्या घरात इंद्राणीचे रक्षण करीत आहे.''
क्रुद्ध झालेल्या नहुषाला पाहून देव ऋषींना घेऊन नहुषाकडे गेले व त्याला म्हणाले, ''राजेंद्रा, पापबुद्धी धरू नकोस. धर्माप्रमाणे परस्त्रीगमन हे निंद्य आहे. पती जिवंत असताना ती साध्वी पतिव्रता दूसरा पती वरणार नाही. तू धर्म सोडल्यास प्रजेचा नाश होईल. सर्वेश्वराने शिष्टाचारच पाळला पाहिजे. स्वर्गात शचीपेक्षाही सुंदर किती तरी वेश्या आहेत. त्यांचा स्वीकार कर. बलात्काराने रसभंग होतो.
हे नृपश्रेष्ठा, रतिक्रीडेसाठी दोघांचेही प्रेम असणे आवश्यक आहे तरच सुख मिळते. म्हणून तू सद्बुद्धी धर. तुला इंद्रपद प्राप्त झाले आहे तेव्हा पापवासना न धरता सदाचारी हो."
नहुष म्हणाला, ''हे देवांनो, इंद्राने गौतम स्त्रीचा, चंद्राने गुरुपत्नीचा उपभोग घेतला, तेव्हा धर्म कोठे गेला होता ? शब्दपांडित्याने दुसर्याला उपदेश करणारे पुष्कळ असतात. पण स्वत: तसे वागत नाही. तेव्हा इंद्राणीने माझ्याकडे यावे म्हणजे तिलाही सुख प्राप्त होईल. मला तिच्याशिवाय सुख वाटणार नाही. तेव्हा तिला इकडे घेऊन या."
तेव्हा अत्यंत त्रस्त झालेले देव त्या मदन व्याकुळ राजाला म्हणाले, सामपूर्वक आम्ही तिला इकडे आणतो.
असे सांगून देव बृहस्पतीच्या घरी गेले. ते म्हणाले, "हे गुरो, इंद्राणी आपल्या घरी आहे असे कळले. तिला आपण नहुषाचे स्वाधीन करा. त्याला सर्वांनी इंद्र केले आहे म्हणून त्या स्त्रीने त्याला पती करावे.''
बृहस्पती म्हणाला, "हे देवांनो, शरण आलेल्या इंद्राणीचा त्याग मी करणार नाही.''
देव म्हणाले, "मग नहुषाला प्रसन्न करण्याचा दुसरा उपाय सांगा. तो क्रुद्ध झाल्यास परिस्थिती कठीण होईल.''
बृहस्पती म्हणाले, ''इंद्राणीने राजाकडे जाऊन कपटाने म्हणावे, "माझा पती मृत झाल्याचे समजल्यास मी आपणाला पती करीन. कारण पती जिवंत असल्यास मी आपणाला पती कसे करावे ? म्हणून मी आता त्याचा शोध करते." असे सांगून राजापासून निघून जावे. नंतर पतीला आणण्याचा तिने प्रयत्न करावा.
असा विचार ठरल्यावर इंद्राणी व गुरू यांसह सर्व देव नहुषाकडे आले. ते येत असलेले पाहून राजाला आनंद झाला. तो इंद्राणीला म्हणाला, "कांते, सांप्रत मीच इंद्र आहे. माझा स्वीकार कर."
तेव्हा बृहस्पतीने सांगितल्याप्रमाणे इंद्राणी लाजत म्हणाली, ''हे राजा, माझा पती जिवंत आहे किंवा नाही याचा निर्णय होईपर्यंत आपण थांबावे. नंतर निश्चयाने मी आपला स्वीकार करीन. आपण तोपर्यंत मला क्षमा करा."
नहुष आनंदाने म्हणाला, ''बरे तर.''
नंतर इंद्राणी सत्वर देवांकडे गेली. ती म्हणाली, "हे देवांनो, इंद्राला लवकर शोधून आणा.''
तेव्हा सर्व देव इंद्राविषयी विचार करू लागले. वैकुंठाला जाऊन सर्वांनी जगन्नाथाचे स्तवन केले. ते त्या जगन्नाथाला म्हणाले, "हे सुरेश्वरा, ब्रह्महत्येने त्रस्त होऊन इंद्र गुप्ततेने वास्तव्य करीत आहे. हे भगवान, तुम्ही त्या इंद्राचे व आमचे रक्षण करणारे आहात. तेव्हा ब्रह्महत्येपासून इंद्राची मुक्ती कशी होईल ते सांगा.''
विष्णू म्हणाला, ''हे देवांनो, अश्वमेधयज्ञाने इंद्राच्या पापाचा नाश होईल. देवी जगदंबा संतुष्ट झाल्यावर सर्व पापे नाहीशी होतात. तिच्यासाठी हा यज्ञ करा. इंद्राणीला भगवतीचे पूजन करण्यास सांगा. तसेच शिवाची आराधना करा.
जगन्मातेच्या मायेने नहुष मोहित होऊन त्याच्या हातून घडलेल्या पापामुळे त्याचा नाश होईल. इंद्राला पुनः स्वस्थानाची प्राप्ती होईल.''
विष्णूने सांगितल्याप्रमाणे सर्व जेथे इंद्र राहात होता तेथे गेले. नंतर त्याच्याकडून अश्वमेध यज्ञ देवांनी करविला. विष्णूने इंद्राच्या ब्रह्महत्येचे विभाग केले. ते वृक्ष, नद्या, पर्वत, पृथ्वी, स्त्रिया यांच्या ठिकाणी विभागून दिले.
इंद्राचा पापनाश झाल्याने तो निश्चिंत झाला, पण कालाची मार्गप्रतीक्षा करीत तो कमलाच्या नालातच राहिला.
असे हे अद्भुत कार्य करून देव परतले, विरहव्याकुळ इंद्राणी एकदा गुरूला म्हणाली, ''हे प्रभो, अश्वमेधानंतरही माझा पती मला का दिसत नाही ? त्याच्या भेटीसाठी काही तरी उपाय सांगा.''
बृहस्पती म्हणाले, ''हे इंद्राणी, तू भगवती शिवेची आराधना कर. ती देवी तुझ्या पापमुक्त पतीशी तुझी भेट घडवून देईल. तीच नहुषाचेही निवारण करून राजाला स्थानभ्रष्ट करील.''
त्यानंतर इंद्राणीने परिपूर्ण व विधियुक्त अशी देवी अंबिकेची आराधना केली. सर्व भोगांचा व सुखसाधनांचा त्याग करून तिने तामस वेष धारण केला. अत्यंत नम्र भावनेने पतिदर्शनासाठी तिने देवीची पूजा केली.
काही काल लोटल्यानंतर संतुष्ट झालेल्या देवीने इंद्राणीला दर्शन दिले. ती वरदायिनी हंसारूढ होऊन सौम्य रूपाने तेथे आली. विविध आयुधे तिने घेतली होती. विविध अलंकारांनी ती युक्त होती. तिने परिधान केलेली सुंदर मौक्तिकमाला पायापर्यंत रुळत होती.
ती प्रसन्न, हास्यमुद्रेने भूषित होती. ती अनंतकोटीब्रह्मांडनायिका परमेश्वरी अनंत रसांनी युक्त असलेल्या स्तनांनी झळकत होती. ती सर्वेश्वरी, सर्वज्ञ, कूटस्थ देवी अधर स्वरूपिणी होती.
मेघतुल्य गंभीर स्वरात ती देवी इंद्राणीला म्हणाली, "हे सुंदरी, वर माग. तुझ्या पूजनामुळे मी प्रसन्न झाले आहे. कोटयावधी जन्मांतील संचित पुण्याच्या प्रभावानेच माझे दर्शन होते."
इंद्रपत्नी नम्रपणाने म्हणाली, ''हे माते, मी पतीच्या दर्शनाची इच्छा करीत आहे. तसे नहुषापासून माझे रक्षण व्हावे. माझ्या पतीला पूर्वीचे स्थान प्राप्त करून दे.''
देवी म्हणाली, ''हे इंद्राणी, माझ्या दूतीला तू बरोबर ने व तू मानस सरोवरावर जा. तेथे विश्वकामा या नावाची माझी स्थिर मूर्ती आहे. तेथे दुःखी व भयग्रस्त इंद्राला पाहशील. मी इकडे नहुषाला मोहवश करते. हे विशालनयने, मी तुझी इच्छा पूर्ण करीन.''
नंतर देवीच्या सांगण्याप्रमाणे इंद्रपत्नी दूतीला बरोबर घेऊन तिकडे गेली. तिथे बर्याच काळानंतर तिने आपल्या पतीला अवलोकन केले. पतिदर्शनाने व आपले वांच्छित पूर्ण होणार या आशेने तिला आनंद झाला.