बृहस्पतिरुवाच
न भेतव्यं त्वया देवि नहुषात्पापमोहितात् ।
न त्वां दास्याम्यहं वत्से त्यक्त्वा धर्मं सनातनम् ॥ ६१ ॥
शरणागतमार्तं च यो ददाति नराधमः ।
स एव नरकं याति यावदाभूतसंप्लवम् ।
स्वस्था भव पृथुश्रोणि न त्यक्ष्ये त्वां कदाचन ॥ ६२ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्या
संहितायां षष्ठस्कन्धे इन्द्रस्य पद्मनालप्रवेशानन्तरं नहुषस्य
देवेन्द्रपदेऽभिषेकवर्णनं नाम सप्तमोऽध्यायः ॥ ७ ॥
इंद्राचा अज्ञातवास -
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
वृत्रासुराच्या वधानंतर विष्णु स्वस्थानी गेले. ब्रह्महत्येच्या पातकामुळे इंद्र शंकाकुल झाला. तो भीतिग्रस्त होऊन आपल्या नगरीत गेला. इकडे मुनिजन मात्र भयभीत झाले. ते म्हणू लागले, "अरेरे ! वृत्रासुराला फसवून इंद्राने त्याचा वध केला. खरोखरच आम्ही मुनी या संज्ञेस पात्र आहोत काय ? आमच्या हातून हे पातक घडले आहे. आमच्याच वचनावरून वृत्राने इंद्रावर विश्वास ठेवला. इंद्राबरोबर आम्हीही विश्वासघातकी ठरलो.
कपटाने शपथा घेववून आम्ही वृत्राला फसवले, म्हणून आमचा धिक्कार असो. विष्णूनेही वज्रात प्रवेश करून महापातक केले आहे.
धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चार पुरुषार्थांपैकी मधले दोनच पुरुषार्थ या त्रैलोक्यात आहेत. धर्म व मोक्ष हे नष्ट झाले आहेत. केवळ दंभरूप शब्दवाद शिल्लक राहिला आहे.'' असे म्हणून ऋषी पश्चात्ताप करू लागले.
इकडे पुत्राच्या मृत्यूमुळे त्वष्टा अधिकच शोकविव्हल झाला. त्याने पुत्राचे यथाविधी संस्कार केले. त्या मित्रघातकी इंद्राला त्याने शाप दिला.
"इंद्राने खोटया शपथा घेऊन माझ्या पुत्राचा घात केला म्हणून इंद्राला भयंकर दुःख भोगावे लागेल.'' असे संतापाने म्हणून तो त्वष्टा मेरू पर्वतावर जाऊन उग्र तप करू लागला.
देव, असुर, मानव यांपैकी कोणीही असला तरी कर्माचे फल भोगावेच लागते. विष्णूने केवळ आपत्काल म्हणून इंद्राला सहाय्य केले. पण त्यानंतर पुढे विष्णूने इंद्राला सहाय्य केले नाही.
संसारात आप्तस्वकीय आपत्काली उपयोगी पडत नाहीत. पिता, माता, भ्राता, सहोदर, सेवक, मित्र, औरस पुत्र यांपैकी कोणाचेही दैव प्रतिकूल झाले असता त्याला सहाय्यकर्ता उरत नाही. इकडे इंद्र निस्तेज झाला. देवांनीही त्याला शाप दिला. त्याला हे ब्रह्मघातकी म्हणू लागले. इंद्राने वाईट कर्म केले अशी सर्वत्र चर्चा झाली. "खरोखर इंद्र अथवा विष्णु यांच्याशिवाय वचन देऊन विश्वासघात करणारा दुसरा कोणी नाही." असे सर्व बोलू लागले.
अशारितीने सर्वत्र इंद्राची निंदा झाली. अहो, सहजगत्या मार्गामध्ये भेट झाल्यावर वैर विसरून हसतमुखाने जाणारा असा तो श्रेष्ठ राजा इंद्रद्युम्न हासुद्धा निष्पाप असूनही केवळ कीर्तीचा क्षय झाला म्हणून स्वर्गच्युत होणारच.
ययाती राजाही स्वर्गातून च्युत होऊन अठरा युगे खेकडा झाला. भृगुपत्नीचा शिरच्छेद केल्यामुळे भृगुशापामुळे विष्णूला मकरासारख्या पशुयोनीत जन्म घ्यावा लागला, वामन होऊन याचक व्हावे लागले, रामावतारी पत्नीवियोगाचे दुःख भोगावे लागले.
याच कारणावरून ब्रह्महत्येच्या पातकासाठी इंद्राला स्वत:चे स्थान सोडावे लागले. एकदा इंद्र भीतिने, भ्रांतीने निश्चेष्ट पडून सुस्कारे सोडीत होता. तेव्हा इंद्राणी म्हणाली, ''हे प्रभो, आपल्या शत्रूचा नाश झाला असताही आपण दुःखी का होता ? आपल्या चिंतेचे कारण सांगा. आता आपणाला बलाढय शत्रू राहिला नाही.''
इंद्र म्हणाला, ''हे राज्ञी, ब्रह्महत्येच्या दोषामुळे मी भयभीत झालो आहे. त्यामुळे सर्व स्वर्गसुखे असताही मला सुखावह वाटत नाही. प्रिय पत्नी अशी तू असताही मला सुख लाभत नाही. कोठे जावे ? काय करावे ? अशी सारखी चिंता लागून राहिली आहे. मन स्वस्थ होत नाही.''
असे त्याने आपल्या प्रिय भार्येला सांगितल्यावर इंद्रपत्नीही शोकमग्न झाली. शोकाने कृश झालेल्या इंद्राने सत्वर घर सोडले आणि तो भीतीने एका कमलात प्रविष्ट झाला. त्यावेळेपासून इंद्राचे ठिकाण कोणालाच सापडेना.
तडफड करीत तो पाण्यात राहू लागला. इंद्रिये विकल झालेला इंद्र कधी कधी गुप्ततेने एकटाच विहार करीत असे. अशा रीतीने इंद्र नाहीसा झाल्यावर देव काळजी करू लागले. विश्वात उत्पात होऊ लागले. ऋषी, सिद्ध, गंधर्व सर्वजण भयभीत झाले. जिकडे तिकडे अराजक माजले. अवर्षण पडून नद्या व सरोवरे उदकरहित होऊ लागले.
अशी सर्वत्र अराजकता माजल्यावर देवता, मुनी यांनी एकत्र येऊन विचारपूर्वक राजा नहुषाला इंद्रपद दिले.
मूळचा धर्मनिष्ठ नहुष राजा इंद्रपद प्राप्त होताच विषयासक्त होऊन उपवनात अप्सरांसह क्रीडा करू लागला. एकदा त्याच्या मनात इंद्राणीबद्दल अभिलाषा उत्पन्न झाली. तो राजा ऋषींना म्हणाला, ''हे मुनीहो, हे अमरहो, इंद्राणी मजकडे का येत नाही ? तुम्ही सर्वांनी मला इंद्र केले आहे. तेव्हा माझे प्रिय करण्यासाठी इंद्राणीला मजकडे पाठवा. मी त्रैलोक्याचा अधिपती असल्याने इंद्राणी माझ्याकडे आलीच पाहिजे."
हे ऐकल्यावर सर्वजण चिंतामग्न झाले. ते सर्वजण इंद्रपत्नीकडे जाऊन म्हणाले, ''हे देवी, आम्ही सर्वांनी नहुषाला इंद्र केले पण आता तो इंद्रपत्नीची इच्छा करीत आहे. तेव्हा सांप्रत आम्ही काय करावे ?''
हे ऐकल्यावर दुःखित इंद्राणी म्हणाली, "हे देवहो, माझे रक्षण करा. मी आपणाला शरण आले आहे.''
बृहस्पती म्हणाला, ''हे देवी, तू भिऊ नकेस. नहुष पापाने मोहित झाला आहे. आम्ही अधर्म करून तुला त्याच्याकडे पाठवणार नाही. शरणागत व दीनाला शत्रूच्या हाती देणे म्हणजे अधमपणा आहे. म्हणून सुंदरी, तू निश्चिंत राहा."