[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
त्या चिंताग्रस्त देवांना पाहून तो माधव म्हणाला, "देवहो, जे बरे वाईट कारण असेल ते सत्वर निवेदन करा. मी त्याचे निवारण करीन.''
देव म्हणाले, ''हे प्रभो, तुला अनाकलनीय असे त्रैलोक्यात काय आहे ? तू सर्व जाणतोस. तू आमच्यासाठी बळीला बांधलेस, इंद्राला अधिपती केलेस, वामनरूपाने त्रैलोक्य जिंकलेस, आमच्या संरक्षणासाठी तू दैत्यवध करून अमृत मिळवलेस. तूच देवांची संकटे निवारतोस.''
विष्णू म्हणाले, ''सुरश्रेष्ठहो, तुम्ही भय सोडा. वृत्रासुराच्या वधाचे कारण मला माहीत आहे. बुद्धी, बल वा कपट अशा कोणत्याही मार्गाने मला तुमचे हित करावयाचे आहे. ब्रह्मदेवाच्या वरामुळे तो अजय झाला आहे.
आता हा साम किंवा कपट याशिवाय वधला जाणार नाही. तेव्हा हे देवांनो, गंधर्वानो, तुम्ही सर्वजण वृत्राकडे जा. त्याला सामयोगाने तुम्हाला जिंकता येईल. शपथा करून, विश्वास निर्माण करून, मैत्री संपादन करून दृष्टी बलिष्ठ शत्रूचा नाश करा.
मी इंद्राच्या वज्र नावाच्या आयुधात प्रविष्ट होईन. त्यामुळे कोणालाही दिसणार नाही. पण तुम्ही कालाची वाट पहा. कारणाशिवाय त्याला मृत्यू येणार नाही. तेव्हा तुम्ही कपटाचे अवलंबन करा. विश्वासात आल्यावर इंद्र शत्रूचा नाश करील.
कपटावाचून तो वधला जाणार नाही. तसेच प्रेममय स्तोत्रे गाऊन तुम्ही त्या भगवतीला शरण जा. ती योगमाया देवांना साहाय्य करण्यास तत्पर आहे. म्हणून हे इंद्रा, तू तिची आराधना कर. ती महामाया मोहिनी त्या वृत्राला मोहित करील. नंतर आपले कार्य सिद्ध होईल.''
असे भगवान विष्णूने सांगितल्यावर सर्व देव मेरुपर्वतावर गेले. एकांत स्थल पाहून त्यांनी ध्यान व तप करण्यास प्रारंभ केला. नंतर त्या देवीचे स्तवन केले. देव म्हणाले, ''हे देवी, तू दीनांचे दुःख नाहीसे करतेस. सांप्रत वृत्रासुराच्या त्रासामुळे आम्ही तुला शरण आलो आहोत. हे देवी, तू आमचे रक्षण कर. तू सर्वज्ञ असताना पुत्रतुल्य आमची उपेक्षा का करतेस ?
तू या त्रैलोक्याला, आम्हालाही निर्माण करतेस. सर्व देव तुझ्या केवळ नेत्रकटाक्षानेच विहार करतात. माता आपल्या अपराधी पुत्रांनाही संकटप्रसंगी दूर करीत नाही. हे दयानिधे, आम्ही निरपराधी देव सांप्रत तुला शरण आहोत. मग आमचे रक्षण तू का करीत नाहीस ?
तुझ्या चरणसेवेमुळेच आम्हाला महत्त्व प्राप्त झाले आहे. हे जननी, आम्ही ऐश्वर्यात निमग्न झालो. मोहामुळे आम्हाला तुझे विस्मरण झाले. पण तू आमच्यावर दया कर.
हे जननी, आजपर्यंत कित्येक बलाढय दानवांचा तू आमच्या रक्षणासाठी रणात वध केला, असे असताना त्या वृत्राचा वध तू का करीत नाहीस ?
त्या बलाढय शुंभनिशुंभांना तू पूर्वी वधलेस. सांप्रत या वृत्राचा वध कर. वृत्रामुळे भयाने व्याप्त झालेल्या आम्हा देवांचे रक्षण कर. आमचे दुःख नाश करणारा तुझ्याशिवाय कोणी नाही. हे भवानी, तुला वृत्राबद्दल दया वाटत असेल, पण त्या जगाला दुःख देणार्या दुष्टाचा तू वध कर. आपल्या पवित्र बाणांनी तू त्याचा उद्धार कर.
हे दयाळू माते, देवांच्या शत्रूंना तू तुझ्या पवित्र बाणांनी वधून स्वर्गात पाठविलेस. ते नरकाच्या भीतीपासून मुक्त झाले. तो दुष्ट वृत्र तुझा शत्रु असावा. नाहीतर त्याने देवांना त्रस्त केले नसते.
हे जननी, तुला अवश्यक असलेले सर्व पूजासाहित्य तूच निर्मिलेस. तेव्हा तुझी पूजा कशाने करावी ? शिवाय आम्ही तुझेच अंश आहोत म्हणून इतर विधी न करता आम्ही तुझ्या चरणाजवळ लीन आहोत. तुझे चरणकमल म्हणजे भवसागर तरून जाण्याची नौकाच होय.
सर्व वेदवेत्ते यज्ञवेळी तुझे स्मरण करतात. तूच देवांना तृप्त करणारी स्वाहा असून पितृगण व असुरेश्वराला तुष्ट करणारी स्वधा आहेस. मेधा, कांती, शांती, बुद्धी सर्व काही तूच आहेस. तूच तुझ्या भक्तांना सर्व वैभव उत्पन्न करून देतेस.''
अशा रीतीने देवांनी स्तवन केल्यावर देवी प्रकट झाली. ती सडसडीत बांध्याची, सर्व अलंकारमंडित, पाश, अंकुश, वरमुद्रा धारण केलेली अशी सौंदर्यसंपन्न देवी होती.
तिच्या कमरपट्ट्यातील घागर्यांचा मंजुळ आवाज येत होता. रत्नजडित मुकुटावर चंद्रकला शोभत होती. पारिजातपुष्पाप्रमाणे तिची कांती होती. रक्त वस्त्र तिने परिधान केले होते. तिने चंदनाची उटी लावली होती. ती शृंगारवेषाने पूर्ण असून प्रसाद देण्यास तत्पर दिसत होती. ती सर्वज्ञ, सर्वकर्ती अशी सच्चिदानंदरूपिणी होती.
ती समोर दिसताच देवांनी वंदन केले. ती म्हणाली, ''आता तुमचे कोणते कार्य आहे" ते सांगा.
देव म्हणाले, ''आम्हाला पीडा देत असलेल्या वृत्राला मोहित करून त्याचा देवांवर विश्वास बसेल असे कर. तसेच शत्रूचा वध करण्याची शक्ती तू आमच्या आयुधांत उत्पन्न कर.''
त्यावर देवी म्हणाली, ''ठीक तर.''
असे आश्वासन देऊन देवी तेथेच गुप्त झाली. देवही संतुष्ट मनाने स्वस्थानी निघून गेले.