[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
वृत्रासुर तपश्चर्येत स्थिर असल्याचे पाहून देव निराश होऊन निघून गेले. शंभर वर्षे तप केल्यावर ब्रह्मदेव हंसारूढ होऊन वृत्रासुराकडे आला. तो म्हणाला, "हे पुत्रा, मी प्रसन्न झालो आहे. इच्छित वर माग. कल्याण असो. म्हणून इष्ट वर माग.
ती जगत्पतीची मधुरवाणी ऐकून वृत्रासुराच्या नेत्रांतून आनंदाश्रू वाहू लागले. नम्रतेने ब्रह्मदेवाच्या चरणावर त्याने मस्तक ठेवले. नंतर हात जोडून तो गद्गदलेल्या स्वरात ब्रह्मदेवाला म्हणाला, ''आपल्या दुर्लभ दर्शनामुळे मला आनंद झाला. हे नाथ, आपण माझी इच्छा जाणत आहात. धातू, काष्ठ, कोणतीही शुष्क किंवा आर्द्र वस्तु, वंशसमुदाय, यांपैकी कशानेही मला मृत्यु येऊ नये. युद्धात माझे सामर्थ्य वृद्धिंगत व्हावे म्हणजे मी सर्व देवांनाही अजिंक्य होईन.''
ब्रह्मदेव हसत म्हणाला, ''हे पुत्रा, उठ. तुझे कल्याण असो. तुझी इच्छा पूर्ण होईल. तुला इच्छित दिला आहे.''
असा वर प्राप्त झाल्यावर वृत्र आनंदाने पित्याकडे येऊन त्याने त्वष्टयाला सर्व वृत्तांत कथन केला.
त्वष्टा म्हणाला, ''हे महाभाग्यवान पुत्रा, आता तू माझ्या इंद्रनामक पापी शत्रूचा वध कर आणि सत्वर परत ये. युद्धात विजयी होऊन तू देवांचा राजा हो. पुत्राच्या नाशामुळे त्रस्त झालेल्या मला निश्चिंत कर. पापबुद्धीने इंद्राने माझ्या निरपराधी पुत्राचा वध केल्याचे मला विस्मरण होणार नाही.''
पित्याचे भाषण ऐकून दुर्जय वृत्रासूर वेगाने घरातून बाहेर पडला. दैत्यांनी रणदुंदुभी वाजविल्या, घोष केला. त्याच्या प्रचंड रणगर्जनेने अमरावती नगरीत भीती उत्पन्न झाली. इकडे इंद्रानेही सैन्य सज्ज केले.
इंद्राने प्रथम गृध्रव्यूह रचला. तेवढयात वृत्र त्वरेने तेथे आला. इंद्र व वृत्र यांच्यात तुमुल युद्ध झाले. विविध आयुधे घेऊन देव व दानव एकमेकांवर प्रहार करू लागले. तेव्हा वृत्राने एकदम इंद्राला तोंडात टाकले व तो उभा राहिला. पूर्वीचे वैर आठवून वृत्राला आनंद झाला.
इकडे हा प्रकार पाहून देव गोंधळले. ते 'इंद्रा, इंद्रा' असे म्हणून आक्रोश करू लागले. ते बृहस्पतीला म्हणाले, ''हे द्विजश्रेष्ठ, इंद्राला वृत्राने गिळून टाकले. आता काय करावे ? इंद्राच्या सुटकेसाठी अभिचारकर्म करा."
बृहस्पती म्हणाला, ''हे देवांनो, इंद्र अजूनही शत्रूच्या कोठ्यात जिवंत आहे.''
इंद्राची ही अवस्था पाहून देव चिंता करू लागले. त्यांनी त्याच्या मुक्ततेसाठी प्रयत्न सुरू केले. प्रचंड जांभई निर्माण केली. त्यामुळे वृत्र जांभया देऊ लागला. जांभईसाठी तोंड उघडताच इंद्र अवयव आकुंचन करून बाहेर आला. तेथून तो सत्वर निघून गेला. त्या दिवसांपासून प्राण्यांत जांभई निर्माण झाली.
नंतर देवांनी आनंदित होऊन युद्ध केले. ते दारुण युद्ध दहा हजार वर्षे चालू होते. रणांगणात एका बाजूला वृत्र व दुसर्या बाजूला देवसैन्य उभे होते. एकाएकी वृत्र वृद्धिंगत होऊ लागला. वृत्राच्या तेजाने दिपून जाऊन इंद्राचा पराभव झाला.
इंद्रासह सर्व देव रणांगणातून निघून गेले, वृत्राने देवांचे स्थान घेतले. सर्व दानव देवांच्या सुखाचा उपभोग घेऊ लागले. ऐरावत, विमाने, उच्चैश्रवा अश्व, कामधेनू, पारिजात, अप्सरा सर्व काही दैत्याच्या आधीन झाले. देव पर्वतांच्या गुहांतून राहू लागले. देवांचे पद प्राप्त झाल्यामुळे वृत्र मदोन्मत्त झाला. त्यामुळे त्वष्टाही आनंदित झाला.
भीतिग्रस्त होऊन देव मुनींसह विचार करू लागले. कैलास पर्वतावर जाऊन सर्वजण महादेवाला शरण गेले. देव महादेवाला म्हणाले, "हे देवाधिदेवा, वृत्रापासून आमचे रक्षण कर. हे देवा, आम्ही स्वर्गभ्रष्ट झालो आहोत. आता आम्ही काय करावे ? आता आपणच आम्हाला सहाय्य करा व वृत्राचा वध करा.''
शिव म्हणाले, ''आपण ब्रह्मदेवासह वैकुंठाप्रत जाऊ. विष्णूला शरण जाऊन त्यावर उपाय योजू. तोच एकमेव शरण्य व दयासागर आहे. म्हणून आपण त्याच्याकडे जाऊ."
असा विचार करून शिव, ब्रह्मा, इंद्र व इतर देव सर्वजण वैकुंठास गेले. तेथे जाऊन त्यांनी जगद्गुरू श्रीहरीची वेदोक्त पुरुषसुक्ताने स्तुती केली. तेव्हा त्या जगन्नाथाने दर्शन दिले. तो आदराने म्हणाला, ''हे देवांनो, तुम्ही सर्वजण का आला आहात हे सत्वर मला सांगा."
हरीचे हे भाषण ऐकल्यावरही ते चिंताग्रस्त व भयव्याकुल देव हात जोडून स्तब्ध उभे राहिले.