[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मणांनी वृत्राचे स्वस्तिवाचन केले. नंतर तो महाबलाढय वृत्र रथारूढ होऊन इंद्राच्या वधासाठी निघाला. तेव्हा कित्येक राक्षस देवांच्या द्वेषाने त्याला येऊन मिळाले. ते पाहून इंद्राच्या दूताने इंद्राला हा वृत्तांत निवेदन केला.
दूत इंद्राला सविस्तर घटना सांगत असता देवगण भयभीत होऊन इंद्राकडे आले. ते म्हणाले, "हे इंद्रा, अशुभ पक्ष्यांचे ध्वनी व दुश्चिन्हे स्वर्गात होत आहेत. काक, गृध्र, श्येन, कंक वगैरे पक्षी विकृत सुरात ओरडत आहेत.
रात्री प्रचंड राक्षसी गृहावर बसून भयंकर शब्द करीत असतात. स्वर्ग, पृथ्वी, अंतरिक्ष यांत उत्पात होत आहेत. अक्राळविक्राळ कृष्णवर्णी स्त्रिया "घरातून निघून जा" असे सांगत असतात. राक्षस स्वप्नात येऊन केश उपटीत असतात.
हे सुरेश्वरा, भूकंप, उल्कापात, कोल्ह्यांचे ओरडणे सारखे चालू आहे. घरोघर सर्प निघत आहेत. अशाप्रकारे दुश्चिन्हे होत आहेत.''
असे देवगणांचे भाषण ऐकल्यावर इंद्र भयग्रस्त झाला. त्याने बृहस्पतीला विचारले, "ब्रह्मन्, काय भयंकर दुश्चिन्हांचे कारण तसेच यावर उपाय काय ? आपण हे सत्वर सांगा.''
बृहस्पती म्हणाला, ''सहस्राक्षा तुझ्या घोर पापाचे हे फल आहे. म्हणून विचारपूर्वक कर्म करावे. दुसर्याला ताप होईल असे कर्म करू नये. दुसर्याला पीडा देणार्याचे कधीही भले होत नाही. हे इंद्रा, तू केलेल्या ब्रह्महत्येमुळे तुला हे फल प्राप्त झाले आहे. हा वृत्रासुर देवांना अवध्य आहे.
त्याच्याबरोबर अनेक दानव येत आहेत. त्याला जिंकण्यास अथवा वधण्यास कोणीही समर्थ नाही.''
बृहस्पतीच्या भाषणाने स्वर्गात एकच गोंधळ उडाला. गंधर्व, यक्ष, किन्नर, मुनी, तपस्वी, देव आपापली स्थाने सोडून पळून गेले. तेव्हा इंद्राने सैन्याला सज्ज रहाण्याची आज्ञा दिली. इंद्र म्हणाला, "हे सेवकांनो, वसू, रुद्र, अश्विनीकुमार, वरुण, आदित्य, पूषा, भग, वायू, कुबेर, यम या सर्वांनी युद्धसाहित्य घेऊन विमानांतून रणांगणावरून जावे.''
स्वत: इंद्र गजारुढ झाला. इकडे वृत्रही मानसोत्तर पर्वतावर आला. इंद्रही समोर येऊन संग्रामास सिद्ध झाला.
दोघांचे शंभर वर्षे युद्ध झाले. त्या भयंकर युद्धात वरुण, वायुगण, यम, सूर्य यांचा क्रमाक्रमाने पराभव झाला. इंद्रही पराभूत होऊन तेथून निघून गेला. तेव्हा सर्व देव पळून गेल्याचे अवलोकन करून वृत्रासुर आनंदाने पित्याकडे आला. तो पित्याला म्हणाला, "तात, मी इंद्रादी देवांना युद्धात जिंकून आपले कार्य केले आहे. सिंहाला पाहून भिऊन पळणार्या मृगाप्रमाणे इंद्र पळाला. मी इंद्राचा सुंदर गज आणला आहे. हा पाहा ऐरावत. भ्यालेल्याला मारू नये म्हणून मी त्याचा वध केला नाही. आता आपली दुसरी काय आज्ञा आहे हे सांगा.''
ते ऐकून त्वष्टा आनंदाने म्हणाला, "आज माझे जीवन सफल झाले. तू माझा उद्धार केलास. हे पुत्रा, आता हितावह गोष्ट ऐक. तू आता स्थिर होऊन तप कर. कोणावरही विश्वास ठेवू नकोस. कारण इंद्र कपटी असून तुझा शत्रू आहे.
तपश्चर्येमुळे लक्ष्मी, राज्य, बल हे सर्व प्राप्त होते. तू ब्रह्मदेवाची आराधना करून वर प्राप्त करून घे. ब्रह्महत्येचे पातक केलेल्या इंद्राचा वध कर. इंद्राने तुझ्या भावाचा वध केल्यामुळे तो माझा शत्रु आहे. माझ्या निरपराधी व तपस्वी पुत्रांचा वध इंद्राने केल्यामुळे मी दुःखी आहे. म्हणून तू माझे दुःख नष्ट कर.''
पित्याच्या या भाषणाने क्रुद्ध झालेला वृत्र तपासाठी अरण्यात निघून गेला. गंधमादन पर्वतावर जाऊन त्याने गंगेत स्नान केले. अन्न व उदक वर्ज्य करून तो दारुण तप करू लागला, व वृत्राचे तप पाहून इंद्र घाबरला. त्यात विघ्न आणावे म्हणून त्याने मायावी गंधर्वांकडे जाऊन उपाय योजले. पण वृत्रासूर तपापासून ढळला नाही.