[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
ऋषी म्हणाले, "हे महाभाग्यवान सूता, तू सांगितलेल्या भगवतीच्या कथा श्रवण करूनही आमची तृप्ती झाली नाही. वेदात सांगितलेली एक पापनाशक कथा ऐकण्याची आमची इच्छा आहे. त्वष्टयाचा महाप्रतापी पुत्र वृत्रासुर याचा इंद्राने वध का केला ? त्वष्टा देवांच्या बाजूचा होता. मग त्या महाबलाढय ब्राह्मणपुत्राचा वध का केला ?
शंकर ऋतू करणार्या त्या इंद्राने सत्त्वगुणी असून सुद्धा वृत्राचा कपटाने वध केला. देव सत्त्वगुणी आणि कपटी यात विरोध नाही का ? परमसत्त्वगुणी विष्णु त्यावेळी इंद्राच्या वज्रात प्रविष्ट झाला. तह करूनही इन्द्र व विष्णु यांनी कपटाने उदकाच्या फेसाच्या योगाने वृत्राचा घात केला.
हे सूता, इंद्र, विष्णु हे सुद्धा पापबुद्धीनेच वागतात ना ? देव सदाचारसंपन्न असतात म्हणूनच त्यांना शिष्ठत्व प्राप्त होते. पण ते तर कपटाचरणी आहेत. इंद्राने कपटाने वृत्राचा वध केल्यामुळे त्याला ब्रह्महत्येचे पाप लागले नाही काय ? शिवाय श्रीदेवीने वृत्रासुराचा वध कसा केला ?
सूत म्हणाले, ''आता वृत्रासुरवधाचा वृत्तांत मी तुम्हाला सांगतो. या वधामुळे इंद्राला केवढे दुःख भोगावे लागले हेही आता ऐका. हे मला व्यासांनी सांगितले.
जनमेजय राजा म्हणाला, ''हे मुने, इंद्राने, विष्णूचे सहाय्य घेऊन वृत्रासुराचा वध कसा व का केला ? वृत्रासुराच्या निमित्ताने अंबेचे वैभवच तू आम्हांला सांग.''
व्यास म्हणाला, ''हे राजेंद्रा, देवांनी एकदा अमृतप्राशन केल्यावर पुनः अमृताविषयी त्यांची इच्छा राहात नाही. तू पुराणश्रवणाची इच्छा करतोस. तू धन्य आहेस.
हे राजा, नित्य पुराणकथा श्रवण केल्याने भक्तिभाव दृढ होतो. श्रोता एकचित्ताने ऐकतो म्हणून सांगणार्यालाही आनंद होत असतो. निष्पाप वृत्रासुराचा वध केल्यामुळे इंद्राला दुःख प्राप्त झाल्याची कथा पुराणात आहे.
हे राजा, मुनिश्रेष्ठ वृत्रासुराच्या हातून निंद्य कर्म घडल्यामुळे त्या त्रिमस्तक वृत्रासुराचा वध करण्यात आला. त्यातून भगवान विष्णूही मायामोहात अडकून अशाप्रकारची कर्मे करीत असतो. मनाला जिंकण्यास कोण समर्थ आहे ?
भगवानाला मत्स्यादियोनीत जन्म घ्यावा लागला. हे मायेमुळेच घडते. म्हणून तो अविनाशी नरमित्र, भगवान नारायण विहित अथवा अविहित कर्मे करतो. प्रत्येकजण माया-मोह यांनी विकल झालेला असतो. म्हणून हे माझे ते माझे असा त्याला मोह होतो आणि तो पापाचा साठा करतो. जगाचे रहस्य जाणणाराही माया - मोहापासून मुक्त नाही. इंद्र- विष्णु ह्यांसह सर्वजण यात गुरफटलेले आहेत.
प्रजाधिपती त्वष्टा हा देवकार्यतत्पर असा ब्राह्मण होता. इंद्राबद्दलच्या द्वेषाने प्रेरित होऊन त्याने तीन मस्तके असलेला पुत्र निर्माण केला. त्याचे नाव विश्वरूप होते. तो अत्यंत सुस्वरूप होता. तो एकाच वेळी तीन मुखांनी भिन्न कार्ये करी. एका मुखाने वेदाध्ययन, दुसर्या मुखाने सुरापान व तिसर्याने सर्वत्र निरीक्षण असे तो एकदम करीत असे.
त्याने अत्यंत दारुण तप केले. जितेंद्रिय व धर्म तत्पर राहून त्याने पंचाग्निसाधन केले. ग्रीष्मकाली तो वृक्षाच्या शेंडयावर बसे. हेमंत व शिशिर ऋतूंत तो उदकात राहात असे. असे त्याचे दुर्घट तप अवलोकन करून इंद्र भयभीत झाला. आपले इंद्रपद हा घेईल असे त्याला वाटले.
त्याने विचार केला, "अशा शत्रूची उपेक्षा करू नये. कामाच्या योगाने याचे तप नाहीसे करावे." इंद्राने काही अप्सरांना विश्वरूपाकडे पाठविले.
ऊर्वशी, मेनका, रंभा, घृताची, तिलोत्तमा या रूपगर्वितांना तो म्हणाला, ''आज तुम्ही सर्वांनी माझे प्रिय कार्य करा. ह्या माझ्या शत्रूचे तप नाहीसे करण्यासाठी विविध शृंगार, वेशभूषा, शरीराचे हावभाव वगैरे करून त्याला मोहवश करा. हे अबलांनो, त्या विश्वरूपाने माझे स्थान घेऊ नये म्हणून तुम्ही सत्वर त्याचा तपोभंग करा.''
इंद्राचे भाषण ऐकून अप्सरा म्हणाल्या, ''आपण भिऊ नका. नृत्य, गीत, विहार यामुळे आम्ही त्याला मोहवश करू. नेत्रकटाक्ष, अंगविक्षेप करून आम्ही त्याला कामबाणांनी पीडित करू. पण देवराज, आम्हाला मात्र त्याच्यापासून भीती उत्पन्न होणार नाही अशी व्यवस्था करा.
असे म्हणून त्या सर्वजणी विश्वरूपाजवळ गेल्या. त्या नृत्य, गायनादि विविध हावभाव करून त्याला मोहित करण्याचा प्रयत्न करू लागल्या. पण विश्वरूपाने तिकडे लक्ष दिले नाही. खूप प्रयत्न करून तो मुनी निश्चल राहिला. अखेर त्या अप्सरा निराश होऊन इंद्राकडे गेल्या.
त्या देवराजाला म्हणाल्या, ''हे देवाधिदेवा, हे प्रभो, आम्ही खूप प्रयत्न केला. म्हणून तू आता दुसरा उपाय कर. तो जितेंद्रिय असून त्याने आम्हाला शाप दिला नाही हे नशीबच.''
नंतर अप्सरा गेल्यावर त्या मंदबुद्धी व पापात्म्या इंद्राने त्याचा वध करण्याचा विचार केला.