[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
त्या मुनींचे भाषण ऐकल्यावर राजाने व वैश्याने अत्यंत नम्र भावनेने मुनीना प्रणाम केला. त्यांच्या मनात भगवतीविषयी भक्ती निर्माण झाली. ते हात जोडून मुनीना म्हणाले, "हे भगवान, गंगेमुळे भगीरथ शांत झाला. तसेच आपल्या वाग्सरस्वतीने आम्ही शांत झालो. गुणांचे आश्रयस्थान, परोपकारी असे आपणांसारखे सत्पुरुष उत्पन्न होतात, म्हणून आमच्यासारख्या दीनांचा उद्धार होतो. पूर्व पुण्य थोर म्हणून आम्ही आपणाकडे आलो. कारण आपणासारखे नि:स्वार्थी क्वचित असतात.
आम्ही दोघेही दु:खित झाल्यावर सहज आपल्या आश्रमात आलो. आपल्या दर्शनामुळे आमची शरीरपीडा नष्ट झाली व सांप्रतच्या भाषणामुळे मानसिक दु:खही संपले.
हे ब्रह्मन्, आम्ही धन्य झालो. आपणच आम्हाला पवित्र केले आहे. संसारसागरात श्रांत झालेल्या आमचा हात धरून आम्हाला तरून न्या. आपला मंत्रोपदेश घेऊन आम्ही स्वस्थानी परत जाऊ. म्हणून आम्हाला नवाक्षर मंत्र द्या.
तेव्हा सुमेधाऋषींनी त्यांना शुभ मंत्राचा उपदेश केला. त्या मंत्रप्राप्तीनंतर त्यांचा निरोप घेऊन ते दोघेही नदीकाठी गेले. एकांतात दोघेही एकाग्र चित्त करून आसनस्थ झाले. त्यांनी जप-तप-तंत्र यांनी युक्त असा तीन चरित्र्यांचा नित्य पाठ एक महिनापर्यंत केला. त्यामुळे भगवतीबद्दल त्यांच्या मनात भक्ती उत्पन्न होऊन त्यांच्या मनाला शांतता लाभली.
पुढे फलहाराला त्याग करून ते पर्णे भक्षू लागले. ते जितेंद्रिये होऊन जपध्यान करू लागले. अशी दोन वर्षे गेल्यावर त्यांना एकदा देवीने स्वप्नात दर्शन दिले. मनोहर भूषणे लेवून रक्तवस्त्रांनी युक्त अशा देवीला त्या राजाने व वैश्याने स्वप्नात पाहिले.
त्यानंतर आनंदित होऊन त्यांनी तिसर्या वर्षी केवळ उदकावर उपजीविका केली. ते मनात म्हणाले, "परमशांतीदायी देवीचे प्रत्यक्ष दर्शन न झाल्यास आम्ही देहत्याग करू."
असा विचार करून वैश्याने व राजाने त्रिकोणाकृती तीन होमकुंडे तयार केली. लगत अग्नीची स्थापना करून आपल्या शरीरातील मांस तोडून ते अग्नीत टाकू लागले. तेव्हा प्रसन्न होऊन भगवतीने दर्शन दिले. त्यावेळी आपली दु:खे विसरून ते आनंदित झाले, त्यांना देवी म्हणाली, "हे राजा, हे वैश्या, तुमच्या व्रतामुळे मी प्रसन्न झाले आहे. आपणाला इच्छित वर मागून घ्या."
देवीच्या या भाषणाने दोघेही आनंदून गेले. राजा म्हणाला, "तू बलाने शत्रूचा वध करून मला राज्य दे." देवी म्हणाली, "हे राजा, आनंदाने तू स्वगृही जा. तुझे शत्रू पराजित होतील. तुझे मंत्री तुला शरण येतील. तू दहा हजार वर्षे राज्य करशील. पुढील जन्मी तू सूर्यापासून जन्मास येऊन सावर्णी नावाचा मनू होशील." त्यानंतर वैश्याला देवी म्हणाली, "हे श्रेष्ठा, तुला मोक्षप्रद प्राप्त होईल."
अशाप्रकारे दोघांनाही इच्छित वर देऊन देवी अंतर्धान पावली. नंतर राजाने मुनीना वंदन करून राजधानीकडे प्रयाण केले, तोच त्याचे मंत्री त्याच्यासमोर येऊन म्हणाले, "हे राजा, सर्व शत्रूंचा वध झाला आहे. तू राज्य कर."
नंतर राजाने आपल्या राज्याचा पूर्ण उपभोग घेतला. इकडे ज्ञानप्राप्ती होऊन मुक्त झालेला वैश्य भगवतीचे चिंतन करीत आपला काळ घालवू लागला. हे जनमेजय राजा, अशा रीतीने देवीचे अदभुत चरित्र मी तुला कथन केले. जो पुरुष भगवतीचे हे चरित्र श्रवण करतो, त्याला संसारात उत्तम सुख प्राप्त होते. ज्ञान, मोक्ष, कीर्ती यांचा लाभ होतो. पुरुषाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात."
सूत म्हणाले, "हे ऋषीहो, अशा रीतीने जनमेजय राजाने व्यास मुनीना प्रश्न विचारले असता त्या सर्वतत्त्ववेत्त्या व्यास मुनींनी त्याला अद्भुत संहिता सांगितली. ज्यामध्ये शुभनिशुंभाचा वध आहे अशा चंडीचे चरित्र राजाला निवेदन केले. तेच सर्व पुराणांचे सार असून हे मुनिश्रेष्ठांनो, मी ते सर्व तुम्हाला सांगितले आहे."