[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
राजा सुरथ म्हणाला, "हे भगवान, त्या भगवतीची आराधना कशी करावी हे मला विधिपूर्वक सांगा."
सुमेधाऋषी म्हणाले, "हे राजेंद्रा, मनोरथ पूर्ण करणार्या, दु:खनाश करणार्या, मोक्षदायी भगवतीच्या पूजेसंबंधी मी तुला विधिपूर्वक सांगतो."
प्रथम स्नानाने पवित्र होऊन शुभ वस्त्र परिधान करावे. एकाग्रतेने आचमन करून स्थानशुद्धी करावी. सारवलेल्या भूमीवर आसन मांडावे. तीन वेळा आचमन करावे. पूजासाहित्यावर प्रोक्षण करावे. यथाविधी न्यास करावे.
तांब्याच्या पात्रात षट्कोनाकृती यंत्र श्वेत चंदनाने कोरावे. त्याच्या बाहेर अष्टदल काढून नवाक्षर मंत्रांची बीजे त्यात लिहावीत. योग्य मंत्र म्हणून वेदोक्त स्थापना करावी.
असे यंत्र न मिळाल्यास भगवतीची मूर्ती घ्यावी. तंत्रात सांगितल्याप्रमाणे भगवतीची पूजा करावी. आगमोक्त पद्धतीने वैदिक मंत्रांनी पूजा केल्यास स्वस्थ चित्ताने ध्यान करावे. नवाक्षर मंत्राचा जप करावा.
जपाच्या दशांश होम करावा. होमाच्या दशांश तर्पण करावे. तर्पणाच्या दशांश ब्राह्मणभोजन घालावे. तीन चरित्रांचा नित्यपाठ करावा. नंतर देवीचे विसर्जन करावे. याचप्रमाणे नवरात्रव्रतही करावे. आश्विन व चैत्र या महिन्यांतील शुक्ल पक्षात शुभफलाची इच्छा करणार्या पुरुषाने नवरात्रीचे वेळी उपवास करावा.
शर्करा, घृत, मध यांच्या पयसाचे पुष्कळ जपमंत्रांनी हवन करावे. क्षत्रियांनी तांबड्या कण्हेरपुष्पानी किंवा शर्करायुक्त तिलांनी हवन करावे. अष्टमी, चतुर्दशीस व विशेष करून नवमीस देवीची महापूजा करावी, ब्राह्मणभोजन घालावे. यामुळे निर्धनाला धन मिळते, रोगी रोगमुक्त होतो, निपुत्रिकाला सदाचारी पुत्र होतो, राज्यभ्रष्टाला राज्यप्राप्ती होते, शत्रूचा वध होतो.
जे विद्यार्थी जितेंद्रिय राहून भगवतीचे पूजन करतात त्यांना शुभ विद्या मिळते. कोणत्याही वर्णाच्या पुरुषाने देवीचे पूजन केल्यास त्याला सुखप्राप्ती होते. नवरात्रव्रतोत्सव भक्तीने करणार्याच्या सर्व मनकामना पूर्ण होतात. आश्विनातील शुक्ल पक्षात नवरात्रीचे व्रत करणार्याची इच्छा पूर्ण होते. नवरात्राच्या पूजेसाठी यथाविधी मंडल करावे. वेदमंत्रांनी कलशाची स्थापना करावी. नंतर देवीची मंत्रकलशावर स्थापना करावी. कलशाभोवती यव पेरावेत. पुष्पमालांनी युक्त असा चांदवा लावावा. नंदादीप तेवत ठेवावा. त्रिकाल पूजन करावे. वित्तशाठ्य न करता धूप, दीप, नैवेद्य, विविध फले, पुष्पे, गीत, वाद्ये, स्तोत्रपाठ, वेद पारायणे वगैरेच्या योगाने विविध वाद्ये वाजवून उत्सव करावा.
चंदन, भूषणे, वस्त्रे, भक्ष्य पदार्थ, सुगंधी तेले, पुष्पे यांनी कुमारीपूजन करावे. अष्टमी व नवमीस विधिपूर्वक होम करावा. दशमीच्या दिवशी परायण करून ब्राह्मणभोजन घालावे. यथाशक्ती दाने द्यावीत.
जो कोणी हे व्रत करील त्याला इच्छेप्रमाणे सुखप्राप्त होईल. मृत्युनंतर परमस्थान मिळेल. अंबिकेच्या ठिकाणी जन्मोजन्मी अचल भक्ती राहील. सदाचारसंपन्न पुत्र प्राप्त होईल. म्हणून सर्वात नवरात्रव्रत श्रेष्ठ आहे. हेच देवीची आराधना करण्याचे उत्तम साधन आहे.
हे सुरथ राजा, तूही विधियुक्त देवीची आराधना कर. म्हणजे तुला पूर्ववत् सुखप्राप्ती होईल. हे श्रेष्ठा, हे वैश्या, तूही असेच देवीचे व्रत कर म्हणजे तुलाही स्वगृही गेल्यावर उत्तम सुखलाभ होईल. तू आप्तेष्टांना मान्य होशील. देवाची आराधना न करणार्यास इहलोकात विविध दु:खे व नरकयातना प्राप्त होतात.
बिल्वदले, करवीर, शतपत्र, चंपक यांनी अंबिकेचे अर्चन केल्यास त्यांना विषयभोग मिळतात. ते शक्तीची उपासना करतात. म्हणून वेदोक्त मंत्रांनी भवानीचे पूजन केल्यास इहलोकी ऐश्वर्य, सुख, मान व गुणैश्वर्य प्राप्त होते.