[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
हे भाषण ऐकून शुंभ म्हणाला, "मी पलायन करून जिवंत रहाण्याची इच्छा करणार नाही. माझे सचीव, भ्राता यांचा बळी देऊन मी जिवंत कशासाठी राहू ? सर्वांचा कर्ता कालच आहे. तो अनिवार असून रूपरहित आहे व तोच जर ईश आहे तर मग मला काळजी तरी कशाला ? जे करायचे असेल ते तो करील. मला मरण्याची अथवा जगण्याची मुळीच काळजी नाही.
दोन परार्धा इतका काल लोटला असता प्रत्यक्ष जगत्कर्ता ब्रह्मदेवही नाश पावतो. त्या ब्रह्मदेवाच्या एका दिवसात चार युगांचे हजार फेरे होतात. त्यात चवदा इंद्र होत असतात. त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाचा द्विगुण काल लोटला असता विष्णूला मृत्यु येतो. त्याच्यापेक्षा द्विगुण काल लोटल्यावर शंकरालाही मरण येते. न टळणार्या ह्या देवनिर्मित मरणाविषयी काळजी का असावी ? पृथ्वी, पर्वत, सूर्य व चंद्र ह्यांनाही नाश आहेच. मग आपली काय कथा ?
जन्मास आलेल्याला मृत्यु असून मृताला जन्मप्राप्ती होत असते. हे शरीर अनित्य असल्यामुळे कोणीही अक्षय्य राहणार्या यशाचेच रक्षण केले पाहिजे. म्हणून माझा रथ सत्वर तयार होऊ द्या. मी रणांगणामध्ये जातो. दैवामुळे जय अथवा मरण जे काही प्राप्त होणे असेल ते प्राप्त होवो."
असे सांगून शुंभ सत्वर रथारूढ झाला आणि हिमाचलावर असलेल्या अंबिकेकडे गेला. तेव्हा गज, अश्व, रथ ह्यांनी युक्त व आयुधांनी संपन्न असे पुष्कळ चतुर्विध सैन्यही त्याने बरोबर घेतले.
तेथे गेल्यानंतर सिंहारूढ झालेली, त्रैलोक्यमोहिनी व सौंदर्यसंपन्न जगदंबिका त्याच्या दृष्टीस पडली. ती सर्व अलंकारांनी व भूषणांनी शृंगारलेली होती. सर्व लक्षणांनी ती युक्त होती. आकाशामध्ये असलेले देव, गंधर्व, यक्ष व किन्नर तिचे स्तवन करीत होते. ती स्वत: शंखाचा व घंटेचा नाद करीत होती.
तिला अवलोकन करून शुंभ मदनाने व्याकुळ व मोहित झाला आणि तो मनामध्ये म्हणाला, "काय उत्कृष्ट रूप हे ! काय हे अद्यत चातुर्य ! सौकुमार्य व धैर्य हे परस्परविरुद्ध प्रकार तिच्या ठिकाणीच दिसत आहेत. सुकुमार, शरीराने अतिशय सडपातळ व नुकतीच यौवनावस्था प्राप्त झालेली ही बाला विषयवासनारहित आहे हे मोठेच आश्चर्य आहे. रूपाने ही रतीशी बरोबरी करणारी आहे. ही महाबलाढ्य दैत्यांचा वध करीत आहे. ह्या कमलाक्षी स्त्रीला वश करून घेण्याचे खास मंत्र माझ्यापाशी नाहीत. कारण ही मदमत्त स्त्री मोहिनी असून सर्व मंत्रमयच आहे. ही श्रेष्ठ स्त्री मला कशी बरे वश होईल ? आता ह्या समरांगणापासून पाताळाप्रत जाणे आज मला योग्य वाटत नाही. साम, दाम व भेद ह्या उपायांनी सुद्धा ही महाबलाढ्य देवी साध्य होणे शक्य नाही.
आता जावे कोठे ? ह्या स्त्रीच्या हातून ह्या ठिकाणी मरण येणेही योग्य नव्हे, ते दुष्कीर्तीलाच कारण आहे. समरांगणामध्ये मरण उत्तम म्हणून ऋषींनी सांगितले आहे. परंतु ते मरण म्हटले म्हणजे खरोखर जो बलाने तुल्य असून त्याच्याशी युद्ध करणार्या योद्ध्यांना येणारे होय. अबला असूनही अतिबलाढ्य व शेकडो नरांपेक्षाही श्रेष्ठ अशी ही नारी आहे. ही स्त्री आमच्या कुलाचा नाश करण्याकरताच आलेली आहे. सामदामाने ही वश होईलसे वाटत नाही. येथे भेद करता येणार नाही. कारण ही देवांच्या आधीन आहे. तेव्हा संग्रामामध्ये मरण येणेच श्रेयस्कर असून पलायन योग्य नव्हे. दैवाप्रमाणेच जय अथवा मरण, जे काही प्राप्त होईल ते होवो."
ह्याप्रमाणे ठरवून शुंभाने धैर्याचे अवलंबन केले. युद्धाकरता निश्चय करून तो समोर उभा असलेल्या त्या अंबिकेला म्हणाला, "हे देवी, युद्ध कर. परंतु हे कांते, आज तुझे श्रम व्यर्थ आहेत. तू मूर्ख आहेस. युद्ध हा स्त्रियांचा धर्म नाही. नेत्र हेच स्त्रियांचे बाण असून भ्रुकुटी हेच धनुष्य होय. हावभाव हीच शस्त्रे आणि कामकलाभिज्ञ पुरुष हेच स्त्रीचे लक्ष्य होय. त्याचप्रमाणे अंगराग हेच चिलखत असून मनोरथ हाच रथ होय. मंदहास्य हाच दुंदुभीचा शब्द आहे. अस्त्रे धारण करणे ही स्त्रियांची विटंबना आहे.
हे कांते, स्त्रियांना लज्जा हेच भूषण आहे. स्त्री युद्ध करू लागली असता कर्कशा स्त्रीप्रमाणे दिसू लागते. स्त्रियांनी स्तन झाकून ठेवावयाचे असतात. त्यांच्या हातून धनुष्याचे आकर्षण कसे होणार ? तसेच स्त्रियांचे मंदगमन कोणीकडे आणि गदा घेऊन धावणे कोणीकडे ? खरोखरच या चामुंडा आणि चंडिका तुला अयोग्य सल्ला देत असतात. भयंकर आवाज असलेला हा सिंह हेच तुझे वाहन आहे.
त्याचप्रमाणे वाणीनादाचा त्याग करून तू घंटानाद करीत आहेस. हे वरवर्णिनी, तुझे रूप व यौवन यांना हे विरुद्ध आहे. हे भामिनी, संग्रामाची इच्छा असल्यास तू करूप, लंबोष्ठी, कुनखी, क्रूर, काकवर्ण व अंध अशी हो. त्याचप्रमाणे तुझे पाय लांब होवोत, दंत वाईट होवोत आणि डोळ्यांचा आकार मांजराच्या डोळ्यांप्रमाणे होवो. अशाप्रकारचे रूप धारण करून तू युद्धामध्ये स्थिर हो म्हणजेच तुला युद्ध करणे शोभेल. तू कर्कश भाषण करू लाग म्हणजे मी तुझ्याशी युद्ध करीन.
हे रतितुल्य स्त्रिये, मनोहर दंतांनी युक्त असलेल्या अशा प्रकारच्या तुजसारख्या सुंदरीला पाहून संग्रामामध्ये तुझा वध करण्यास माझा हात धजत नाही."
कामातुर होऊन याप्रमाणे भाषण करीत असलेल्या त्या शुंभाला पाहून जगदंबिका म्हणाली, "हे मंदमते, मला पाहून तू कामबाणांनी मोहित झालास. तू माझ्याशी युद्ध करण्याविषयी का बरे टाळीत आहेस ? हे मूढा, मी तुझ्याशी युद्ध करीत नाही. मी प्रेक्षक ह्या नात्याने उभी आहे. तू ह्या कालिकेशी अथवा चामुंडेशी युद्ध कर. रणांगणामध्ये तुला ह्याच योग्य आहेत. तू ह्यांना यथेष्ट प्रहार कर. मला तुझ्याशी युद्ध करण्याची इच्छा नाही." असे सांगून देवी कालिकेला म्हणाली, "हे क्रूर कालिके, ह्या कुरूपप्रिय शुंभाचा तू संग्रामात चांगला समाचार घे."
जगदंबिकेने असे सांगताच कालप्रेरित व कालरूप धारण करणारी ती कालिका तयार झाली. वेगाने हातात गदा घेऊन ती समरांगणात शुंभासुराशी युद्ध करू लागली. त्यांचे अति भयंकर युद्ध झाले. गदा उगारून शुंभाने रणामध्ये कालिकेवर प्रहार केला. कालिकेनेही गदेच्या योगाने दैत्यराजावर जोराने प्रहार केला.
नंतर चंडीने सुवर्णासारखा उज्वल असलेला त्याचा रथ गदेने मोडून टाकला. रथास जोडलेल्या गर्दभांचा वध केला. कालिकेने त्याच्या सारथ्यालाही ठार केले. तेव्हा पदाती बनलेल्या त्या क्रुद्ध शुंभाने मोठी गदा घेऊन हसत हसत कालिकेच्या दोन्ही भूजांचे मध्यभागी प्रहार केला. पण गदेचा तो प्रहार कालिकेने चुकवून सत्वर खड्ग हाती घेतले आणि चंदन लावलेला त्याचा उजवा हात आयुधासह तोडला. तेव्हा हात तुटून विरथ झालेला तो शुंभ रक्ताने लाल झाला. पण पुन: त्याने डाव्या हातात गदा घेतली व जवळ येऊन कालिकेवर प्रहार केला. तेव्हा त्या कालिकेने गदा व बाहूभूषण ह्यासह खड्गाच्या योगाने त्याचा डावा हातही तोडला.
तेव्हा लत्ताप्रहार करण्याकरता तो शुंभ क्रुद्ध होऊन वेगाने धावू लागला. इतक्यात कालिकेने त्वरेने खड्गाच्या योगाने त्याचे पायही तोडून टाकले. याप्रमाणे हातापाय तोडले असताही तो शुंभ कालिकेला "थांब थांब" असे म्हणाला आणि कालिकेला भिवण्यासाठी तसाच सरपटत तिच्याकडे आला. पण तो जवळ येताक्षणीच कालिकेने त्याचे मस्तक कंठापासून कापून काढले. तेव्हा त्यातून रक्ताचा एकसारखा प्रवाह सुरू झाला. नंतर तो पर्वततुल्य शुंभ भूमीवर पडला. त्याचा प्राणही सत्वर निघून गेला.
दैत्य गतप्राण होऊन पडल्यावर इंद्रासह सर्व देव त्या देवीची, चामुंडेची व कालिकेची, स्तुती करू लागले. वारे मंगलकारक वाहू लागले. दिशा निर्मल झाल्या व अग्नीही होमकाली प्रदक्षिण ज्वालांनी युक्त व म्हणूनच शुभ असा झाला. मेलेल्या दैत्यांशिवाय जे थोडे दैत्य अवशिष्ट राहिले होते ते सर्वही जगदंबिकेला प्रणाम करून व आयुधे टाकून देऊन पाताळामध्ये निघून गेले.
अशा रीतीने शुंभ-निशुंभाचा वध झाला. देवीचे हे चरित्र ऐकल्यास निपुत्रिकाला पुत्र होतो. तसेच मनोवांच्छित वासना पूर्ण होतात.